पाकिटबंद अन्न आणि लठ्ठपणा : छोट्या बदलांनी मोठा फरक कसा पडतो, जाणून घ्या

पाकिटबंद अन्न आणि लठ्ठपणा : छोट्या बदलांनी मोठा फरक कसा पडतो, महत्त्वाची माहिती

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मलिसा होगनबूम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

आपण काय खावे किंवा काय खाऊ नये यावर आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा मोठा परिणाम होत असतो. ग्राहकांनी सकस आणि आरोग्यदायी अन्नाची निवड करावी असं वाटत असेल तर अन्नाच्या पाकिटांवरील माहिती (लेबल) अधिक स्पष्ट असणे आणि या विषयावर प्रभावी जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे असे पुरावे सांगतात.

तुम्ही कोणत्याही सुपरमार्केटमध्ये गेल्यावर सगळीकडे फक्त शरीराला अपायकारक आणि अति-प्रक्रिया केलेले पदार्थच दिसतात.

ते इतक्या आकर्षक पद्धतीने मांडलेले असतात की, आपल्याला ती नको असली तरी आपण त्यांच्याकडे ओढले जातो. अशा वेळी स्वतःवर ताबा ठेवणं कोणालाही कठीण जातं.

आजच्या काळात खाण्यापिण्याच्या गोष्टींची अजिबात कमतरता नाही. उलट ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. पण यामुळेच अनेक देशांतील लोकांचे सरासरी वजन सतत वाढत असल्याचे दिसून येते.

वजन वाढण्यामागचे एक मुख्य कारण म्हणजे आपल्या आहारात वाढलेला तयार आणि प्रक्रिया केलेल्या पाकीटबंद पदार्थांचा अतिवापर.

आता ही गोष्ट प्रकर्षाने समोर येत आहे की, पाकिटावरची माहिती वाचूनच आपण काय विकत घ्यायचं आणि काय खायचं हे ठरवतो. त्या माहितीमध्ये केलेले छोटे बदलही आपल्या खरेदीच्या निर्णयावर मोठा परिणाम करू शकतात. मात्र, यासोबतच जर आपण स्वतःच पौष्टिक अन्नाबद्दल थोडी अधिक माहिती घेतली तर आपल्या तब्येतीसाठी कोणते पदार्थ चांगले आहेत याचा निर्णय आपण अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकू.

अनेक तज्ज्ञांच्या मते, सध्या ज्या प्रकारे अन्नाचे उत्पादन आणि मार्केटिंग केले जाते. ते वातावरणच मुळात वजन वाढण्यासाठी पोषक आहे. यामुळेच ग्राहक आरोग्यास अपायकारक असणारे पर्याय निवडण्याकडे झुकतात. वाढता लठ्ठपणा रोखण्यासाठी केवळ आहार बदलून चालणार नाही तर नवीन संशोधनानुसार लोकांच्या सवयींमध्ये बदल घडवणारे उपक्रम आणि सरकारी नियमांमधील सुधारणा या दोन्ही गोष्टी प्रभावी ठरू शकतात.

खाद्य संस्कृती आणि उपलब्धता

2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'लॅन्सेट'या प्रसिद्ध मेडिकल जर्नलच्या एका शोधनिबंधानुसार सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर 2050 पर्यंत जगातील निम्म्याहून अधिक लोक लठ्ठ होतील.

वेळीच पावले उचलली तर ही परिस्थिती टाळता येऊ शकते. पण जर त्वरित आणि प्रभावी पाऊलं उचलली नाहीत तर जगभरात अतिवजन आणि लठ्ठपणाचे प्रमाण वाढतच जाईल, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. मात्र जेव्हा आपल्या आजूबाजूची खाद्यसंस्कृतीच केवळ नफा कमावण्याच्या उद्देशाने आखली जाते तेव्हा या समस्येशी लढायचे कसे? हाच मोठा प्रश्न आहे.

खाद्य संस्कृती आणि उपलब्धता

फोटो स्रोत, Getty Images

लंडनमधील इम्पिरियल कॉलेजचे प्रसिद्ध सार्वजनिक आरोग्य संशोधक फ्रँको सॅसी यांनी सांगितले की, आपण काय विकत घेतो आणि काय खातो याची निवड आपण स्वतः करतो असे आपल्याला वाटत असले तरी वास्तव मात्र वेगळेच आहे.

त्यांच्या मते, "आपल्या सभोवतालची परिस्थितीच आपण काय निवडणार हे ठरवत असते. जरी तुम्हाला वाटत असलं की सगळं तुमच्या नियंत्रणात आहे. तरी तुमचं वातावरणच तुमच्याकडून चुकीची निवड करून घेत असतं." यामुळेच अनेकदा लोक कळत-नकळत आरोग्यास अपायकारक असणारे पदार्थ निवडतात.

ते पुढे म्हणतात की, "कोणत्याही वस्तूची जाहिरात कशी केली जाते आणि ती आपल्याला किती सहज मिळते यावरच आपण काय खरेदी करणार हे ठरतं". त्यांच्या मते, "आपल्याला समोर काय दिसते यावरच आपल्या आयुष्यातले अनेक निर्णय अवलंबून असतात."

संशोधनातूनही हेच वारंवार सिद्ध झाले आहे की, आपल्या आजूबाजूचं वातावरण, पदार्थांच्या किमती आणि ते आपल्याला किती सहज मिळतात यावरूनच आपण काय खाणार हे ठरत असतं.

अधिक स्पष्ट माहिती देणारे लेबल्स

सर्वात चिंतेची बाब म्हणजे, कंपन्या हे पाकीटबंद पदार्थ (UPFs) अधिक चटकदार बनवण्यासाठी त्यात हवे तसे बदल करतात. जेणेकरून लोकांना त्याचा मोह आवरता येणार नाही.

अनेक तज्ज्ञ आता असेही म्हणू लागले आहेत की, या पदार्थांचे व्यसनच लागते. या पदार्थांचा थेट संबंध गंभीर आजारांशी आणि अगदी अकाली मृत्यूशी असल्याचे स्पष्ट झाले असूनही त्यांची विक्री आणि आकर्षण कमी झालेले नाही.

पाकिटावर जर सोप्या भाषेत माहिती दिली तर लोक आपल्या खाण्याच्या सवयी नक्कीच बदलतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 2016 मध्ये चिली देशाने साखर, मीठ किंवा कॅलरीज जास्त असणाऱ्या उत्पादनांवर 'काळे लेबल' (ब्लॅक लेबल) लावणे बंधनकारक केले.

याचा परिणाम असा झाला की, जास्त कॅलरीज असलेल्या पदार्थांच्या विक्रीत 23.8% घट झाली.

अधिक स्पष्ट माहिती देणारे लेबल्स

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन'चे सल्लागार फॅबिओ गोम्स यांच्या मते, "मध्य अमेरिकेतील अनेक देशांनी ही पद्धत स्वीकारली असून त्यामुळे ग्राहकांमध्ये जागरूकता वाढली आहे. त्यांच्या मते, ग्राहकांना आपण काय खातोय हे समजण्यासाठी ही किमान माहिती मिळायलाच हवी. अशा तयार पदार्थांचे सेवन जर थोड्या प्रमाणात जरी कमी झाले तरी ते आरोग्यासाठी खूप चांगले आहे."

त्याचप्रमाणे, युरोपमधील अनेक देशांमध्ये आता अन्नाच्या पाकिटावर दर्शनी भागात 'न्यूट्री-स्कोअर' (Nutri-score) नावाचे लेबल लावले जाते. ज्याची सुरुवात सर्वात आधी फ्रान्समध्ये झाली. 'फ्रेंच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड मेडिकल रिसर्च'च्या संशोधक आणि या लोगोच्या सह-निर्मात्या मथिल्डे टॉवियर सांगतात की, हे लेबल गडद हिरवा (A) ते लाल (E) अशा रंगीत अक्षरांमध्ये विभागलेले आहे. यातला हिरवा रंग आरोग्यासाठी सर्वात चांगला तर लाल रंग सर्वात कमी फायदेशीर मानला जातो.

ग्राहकांना सकस अन्न निवडताना अधिक चांगली माहिती मिळावी या उद्देशानेच हे विकसित करण्यात आले आहे. सध्या 1,500 कंपन्या हे लेबल वापरत आहेत आणि आता ते सगळ्यांना सक्तीचं करण्याची मागणी जोर धरत आहे.

टॉवियर आणि त्यांच्या टीमने केलेल्या मोठ्या संशोधनानंतर हे 'न्यूट्रि-स्कोअर' संकल्पना अस्तित्वात आली. खाण्यापिण्याचा दर्जा खराब असेल तर कर्करोगासारखे आजार होऊ शकतात हे त्या संशोधनातून स्पष्ट झाले होते.

टॉवियर सांगतात की, "यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आणि अन्न कंपन्या लोकांच्या जिवाशी खेळत आहेत अशी भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली. या वाढत्या दबावामुळेच अखेर अन्न कंपन्यांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे भाग पडले."

याला प्रतिसाद म्हणून अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांमधील साखरेचे प्रमाण कमी केले आणि मैद्याऐवजी संपूर्ण धान्याच्या पिठाचा वापर करण्यास सुरुवात केली. सुपरमार्केटमध्येही सकस पदार्थांना अधिक प्रोत्साहन दिले गेले.

टॉवियर यांच्या मते, "यामुळे 'न्यूट्रि-स्कोअर A' म्हणजे आरोग्यासाठी उत्तम असलेल्या उत्पादनांच्या विक्रीत वाढ झाली. तर 'E' श्रेणीतील म्हणजे आरोग्याला अपायकारक असलेल्या उत्पादनांची विक्री घटली. यावरून असे सिद्ध झाले आहे की, न्यूट्रि-स्कोअरसारख्या लेबलिंगमुळे ग्राहकांच्या खरेदी करण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल घडून येतो."

दैनंदिन सवयी आणि खरेदीची पद्धत बदलणे

अन्न उत्पादनाच्या संपूर्ण व्यवस्थेत मोठे बदल घडून येईपर्यंत आपण स्वतः यातून काही चांगले मार्ग शोधून सकस आहार निवडू शकतो का?

संशोधक सांगतात की, जर आपण आपल्या वागण्या-बोलण्याच्या सवयी सुधारल्या तर खाण्यापिण्याच्या पद्धतीतही बदल होऊ शकतो. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील सॅम्युअल डिकेन आणि अबी फिशर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका ताज्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, 45 लोकांना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करण्यात आले.

याचा परिणाम असा झाला की, या लोकांनी बाहेरचे पाकीटबंद पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी केले. यावरून हे स्पष्ट होते की, योग्य मार्गदर्शनामुळे आपल्या सवयी नक्कीच बदलू शकतात.

दैनंदिन सवयी आणि खरेदीची पद्धत बदलणे

फोटो स्रोत, Getty Images

या संशोधनांतर्गत सहभागी व्यक्तींना वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात आले. यामध्ये सकस अन्न कुठून खरेदी करावे याची माहिती आणि कमी प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे डाएट प्लॅन्स उपलब्ध करून देण्यात आले. तसेच बाहेरचं खाण्याऐवजी घरच्या घरी स्वतः स्वयंपाक कसा बनवायचा यासाठी त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले

डिकेन म्हणतात की, "आपल्याला अन्नाच्या वातावरणात सुधारणा करण्याची गरज आहेच. पण त्याचबरोबर लोकांना त्यांचे आहार सुधारण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि पर्याय देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वतः स्वयंपाक करा असे म्हणणे सोपे आहे. पण जर तुमच्याकडे स्वयंपाकघर नसेल, भांडीकुंडी नसतील किंवा अन्न साठवण्यासाठी फ्रिज नसेल तर तुम्ही ते कधीच करू शकणार नाही."

सहा महिन्यांच्या या अभ्यासानंतर असे दिसून आले की, सहभागी झालेल्या व्यक्तींच्या पाकीटबंद पदार्थांच्या (UPFs) सेवनात 25% घट झाली. इतकेच नाही तर त्यांचे वजन कमी झाले. बीएमआय (BMI) सुधारला आणि त्यांच्या आरोग्यातही सकारात्मक बदल दिसून आले.

दैनंदिन सवयी आणि खरेदीची पद्धत बदलणे

फोटो स्रोत, Getty Images

हे संशोधन फक्त एका लहान गटावर करून पाहिले होते त्यामुळे आता संशोधकांना खूप जास्त लोकांसोबत हा प्रयोग करून पाहायचा आहे. डिकेन सांगतात की, यात सहभागी झालेल्या लोकांना हे बदल खूप आवडले आणि त्यांचा प्रतिसादही उत्तम होता.

अर्थात, अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक मार्गदर्शन देणे वेळखाऊ आणि खर्चिक काम आहे. शिवाय, आरोग्याला अपायकारक असणाऱ्या पदार्थांपेक्षा सकस आणि चांगले अन्न खरेदी करणे सामान्यतः महाग पडते.

सॅसी म्हणतात की, "जर आपल्याला खरोखर बदल हवा असेल तर एका उपायाने काही होणार नाही. आपल्याला अनेक गोष्टी मिळून कराव्या लागतील."

ते म्हणतात, "अन्नाची ही संपूर्ण व्यवस्था खूप गुंतागुंतीची आहे. त्यामुळे आपल्याला हे सर्व प्रयत्न एकत्रच करावे लागतील." सॅसी आणि टॉवियर सांगतात की, असे केल्यामुळेच लोक स्वतःहून आरोग्याला हानिकारक असणारे पदार्थ ओळखू शकतील आणि ते खाणे कमी करतील. यामुळे लोकांचे आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)