हातातील बेड्यांसह अर्ज भरायला पोहोचला उमेदवार; पुण्यात गंभीर गुन्ह्यांतील आरोपी मनपाच्या रिंगणात

पोलीस
    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात तोंडावर काळं कापड झाकून, हातात बेड्या घालून आणलेला उमेदवार, त्याने दिलेल्या घोषणा आणि मागे चालणारे पोलीस हे दृश्य यंदा पुणेकरांनी पाहीलं.

नातवाच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज भरायला जातानाचं हे दृश्य दिसलं.

पण निवडणुकीच्या रिंगणात गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा आरोप असणारे असणारे ते एकटेच उमेदवार नाहीत.

हत्या, अपहरण, खंडणी असे गंभीर गुन्हे असलेल्या आरोपींना आणि त्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात गँगवॉर, कोयता गँग असे शब्द परवलीचे झाल्यानंतर शहर गुन्हेगारी मुक्त करण्याचं आश्वासन अनेकदा देण्यात येतं. पण हे उमेदवार पाहता, आश्वासन देणाऱ्यांचे शब्द हे बोलाची कढीच असल्याचं स्पष्ट होतंय.

राष्ट्रवादी आणि भाजपकडून गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कोणाला उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्यावर कोणत्या गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे, पाहुयात.

कोणा कोणाला उमेदवारी आणि त्यांच्यावर काय गुन्हे?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रभाग 23 मध्ये सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

एकाच घरातील हे उमेदवार येरवडा तुरूंगातून निवडणूक लढवणार आहेत. घरातील वादातून आयुष कोमकर याची हत्या झाल्याच्या प्रकरणात या दोघी आरोपी आहेत.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याच प्रकरणात त्यांना तुरूंगात जावं लागलं आहे. याच प्रकरणात बंडू आंदेकरलाही अटक करण्यात आली आहे.

नेकी का काम आंदेकर का काम, अशा घोषणा देत आपण निवडणूक लढवत असल्याचं बंडू आंदेकरने जाहीर केलं.

बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकरचा वादातून खून झाला होता. त्याचा बदला म्हणून आयुष कोमकर याची गणपती विसर्जनाच्या दिवशी हत्या करण्यात आली. याच प्रकरणात अटक झालेला बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

त्यानंतर या कुटुंबातील सदस्यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी केली. सोनाली आंदेकर आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकरची सून तर हत्या झालेला माजी नगरसेवक वनराज आंदेकरची बायको आहे.

तर लक्ष्मी आंदेकर ही बंडू आंदेकरचा भाऊ उदयकांत आंदेकरची बायको आहे . दोघींवर आयुष कोमकरच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

संपूर्ण आंदेकर टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतही या दोघींचा समावेश आहे .

आंदेकर कुटुंबावरचे हे आरोप नवे नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून आंदेकर टोळी गुन्हेगारीत आणि नंतर राजकारणातही सक्रीय आहे.

आंदेकर टोळी सत्तरच्या दशकापासून पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात सक्रिय आहे . बाळकृष्ण आंदेकरने जुगार अड्डे, दारूचे अड्डे चालवण्यासाठी पुण्यातील नाना पेठेत सत्तरच्या दशकात टोळी निर्माण केली होती.

माळवदकर टोळीसोबत असलेल्या संघर्षातून बाळकृष्ण आंदेकरने 1978 मध्ये प्रमोद माळवदकरच्या वडिलांची हत्या केली होती.

त्याचा बदला माळवदकर टोळीने 1984 साली बाळकृष्ण आंदेकरची पुणे सत्र न्यायालयाच्या आवारात हत्या करून घेतला. तेव्हापासून आंदेकर टोळीची सूत्रं बाळकृष्णचा छोटा भाऊ बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरकडे आली.

तेव्हापासून बंडू आंदेकरवर हत्येचे अनेक गुन्हे नोंद आहेत. एका प्रकरणात तर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर या कुटुंबातील सदस्यांनी राजकारणात प्रवेश केला.

अजित पवार

फोटो स्रोत, x

फोटो कॅप्शन, अजित पवार

सर्वात आधी सुरेश कलमाडींनी 1997 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत आंदेकर कुटुंबातील चौघांना काँग्रेसची उमेदवारी दिली आणि चौघेही निवडून आले.

तेव्हापासून आतापर्यंत वत्सला आंदेकर, गणेश आंदेकर, उदयकांत आंदेकर, रमाकांत आंदेकर, जयश्री आंदेकर, वनराज आंदेकर असे आंदेकर कुटुंबातील अनेक सदस्य निवडून आलेत.

2017 साली झालेल्या निवडणुकीत वनराज आंदेकर निवडणून आला. मात्र सख्ख्या बहिणीसोबत झालेल्या वादातून वनराजची सप्टेंबर 2024 मध्ये हत्या झाली.

हत्येचा बदला घेणयासाठी वनराजच्या बहिणीचा मुलगा असलेल्या आयुष कोमकरची गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 5 सप्टेंबर 2025 ला हत्या करण्यात आली.

हत्येचा कट रचण्यात सोनाली आणि लक्ष्मी सहभागी होत्या आसा पोलिसांचा आरोप आहे .

या उमेदवारीबाबत बोलताना आंदेकर कुटुंबाचे वकील अ‍ॅड. मिथून चव्हाण म्हणाले की, "प्रत्येक भारतीय नागरिकाला पिपल अ‍ॅक्ट मधील सेक्शन 21 प्रमाणे निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्याच्याच आधारे आम्ही कोर्टात परवानगीसाठी अर्ज केला होता. कोर्टाने परवानगी दिल्यानंतर अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

त्यांच्यावर असलेले गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. मकोकातील आरोप निश्चित झालेले नाहीत. आम्ही प्रचारासाठीही परवानगी मागितली, मात्र कोर्टाने परवानगी दिली नाही. पण कार्यकर्त्यांना प्रचार करायला बंदी नाही".

2017 साली झालेल्या निवडणुकीत वनराज आंदेकर निवडणून आला होता.

फोटो स्रोत, Facebook/Vanraj Andekar

फोटो कॅप्शन, 2017 साली झालेल्या निवडणुकीत वनराज आंदेकर निवडणून आला होता.

दुसरा उमेदवार म्हणजे बापू नायर. प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला उमेदवारी दिली आहे. बापू नायरवर हत्या, अपहरण, खंडणीसह गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

2021 मध्ये झालेल्या दीपक मारटकर हत्या प्रकरणात तो तुरुंगात होता आणि मागील वर्षी जामिनावर बाहेर आला.

पुण्यातील धनकवडी, बालाजीनगर, सहकारनगर आणि कात्रज परिसरात बापू नायरची अनेक वर्षे दहशत होती. त्याच्यावर हत्येचा पहिला गुन्हा 2001 मध्ये नोंद झाला.

त्यानंतर जमीन बळकावण्याचे अनेक गुन्हे दाखल झाले. गजा मारणेसोबत त्याने कोथरूड परिसरात केबल व्यवसायही सुरू केला होता.

2011 मध्ये बैजू नवघणे या विरोधी टोळीतील गुंडाची हत्या बापू नायरने केल्याचा आरोप आहे. त्यामुळं त्याची दहशत अधिक वाढली.

जामिनावर सुटल्यानंतर 2015 मध्ये कोंढवा परिसरात आणखी एका हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला. त्यानंतर तो येरवडा कारागृहात होता.

कारागृहात असतानाच शिवसेनेचे नेते दीपक मारटकर यांच्या हत्येचा कट त्याने रचल्याचा आरोप आहे.

मारटकर यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात आणले असताना नायरने स्वप्नील मोढवे याला त्यांची हत्या करण्यास सांगितल्याचं तपासात उघड झालं.

2020 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत दीपक मारटकर यांची हत्या झाली आणि या प्रकरणात बापू नायरवर गुन्हा दाखल करण्यात आला.

2024 पर्यंत तो तुरुंगात होता. जामिनावर सुटलेल्या नायरला आता राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेवक होण्याची संधी दिली आहे.

गुन्हेगारांना उमेदवारीत भाजपही मागे नाही

गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात राष्ट्रवादीचा मित्रपक्ष भाजपही मागे नाही. भाजपकडून हत्या, अपहरण, खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांत आरोपी असलेल्या व्यक्तींच्या पत्नींना उमेदवारी देण्यात आली आहे.

पत्नी वर थेट गुन्हे नोंद नसले तरी त्यांच्या माध्यमातून या आरोपींचीच राजकारणात अप्रत्यक्ष एंट्री होत असल्याचा आरोप केला जात आहे. जयश्री मारणेंनी यापूर्वीही निवडणूक लढवली आहे.

तर कात्रज–आंबेगाव भागातील प्रभाग क्रमांक 38 मधून देविदास चोरघे यांची पत्नी प्रतिभा चोरघे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

रोहिदास चोरघेवर हत्या, अपहरण, खंडणी आणि गोळीबाराचे अनेक गुन्हे नोंद आहेत. वेल्हे तालुक्यातील वांगणी गावचा रहिवासी असलेल्या रोहिदास चोरघेची वेल्हे तालुक्यात तसेच पुणे शहराच्या दक्षिण भागात दहशत होती.

7 फेब्रुवारी 2008 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व इस्टेट एजंट संदीप बांदल यांच्या हत्येप्रकरणी रोहिदास चोरघेवर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली आणि येरवडा कारागृहात ठेवण्यात आले.

5 फेब्रुवारी 2011 रोजी आजारपणाचे कारण सांगून उपचारासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले असताना तो कॉन्स्टेबलला ढकलून पळून गेला.

गजानन मारणे

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, गजानन मारणेची पत्नी जयश्री मारणे यांनी यापूर्वीही निवडणूक लढवली आहे.

फरारीच्या काळात संदीप बांदल हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अविनाश शिळीमकर याची न्यायालय परिसरात हत्या करण्याचा कट त्याने रचल्याचा आरोप आहे.

फेब्रुवारी 2012 मध्ये पुणे सत्र न्यायालयाच्या आवारात शिळीमकरवर गोळीबार झाला, ज्यात त्याचा मित्र विजय कारके जखमी झाला. यानंतरही रोहिदास चोरघे फरारच होता.

फरारी असतानाच त्याने पुणे–बेंगळुरू महामार्गावरील आणेवाडी टोलनाक्यावर गोळीबार करून दहशत निर्माण केली.

यानंतर पोलिसांनी वांगणी गावातून रोहिदास चोरघेला अटक केली. अटकेवेळी तो गावचा सरपंच होता.

अटकेनंतर राजीनामा द्यावा लागला, मात्र पुढील ग्रामपंचायत निवडणुकीत तो नऊ उमेदवारांच्या पॅनलसह पुन्हा बिनविरोध निवडून आला.

त्यानंतर त्याने पुण्यातील कात्रज–आंबेगाव परिसरात आपले बस्तान बसवले. आता पत्नीच्या माध्यमातून तो पुन्हा राजकारणात प्रवेश करत आहे.

संदीप बांदल हत्या प्रकरणात पुराव्यांच्या अभावी त्याची निर्दोष सुटका झाली असली, तरी गोळीबाराचे खटले अद्याप न्यायप्रविष्ट आहेत.

याबाबत नायर तसेच मारणे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जयश्री मारणेंचा मुलगा प्रथमेश मारणेने प्रचारात व्यस्त असल्याचं सांगितलं तर नायर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

नेत्यांची भूमिका

याबाबत विचारलं असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जागा राष्ट्रवादीच्या चिन्हावर जरी लढवल्या जात असल्या तरी त्या आघाडीतल्या मित्रपक्षांच्या असल्याचं म्हणलं आहे.

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "तुम्ही म्हणता तसं नाही. त्याबद्दल मी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे.

आमची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या बरोबर युती झाली आहे. तशीच युती आरपीआय सचिन खरात यांच्या सोबत झाली आहे. या उमेदवारांना त्यांच्या जागा देण्यात आल्या आहेत."

तर खरात यांनी मात्र अजित पवार यांच्याशी चर्चा करायची आहे असं म्हणत थेट उत्तर देणं टाळलं.

 केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

फोटो स्रोत, facebook/murlidhar mohol

फोटो कॅप्शन, भाजपने दिलेल्या उमेदवारीचं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समर्थन केलं.

दरम्यान भाजपने दिलेल्या उमेदवारीचं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समर्थन केलं.

ते म्हणाले "चोरगेंचे सामाजिक काम आहे. त्यांची तशी काही पार्श्वभूमी नाही. असेल तर मला माहिती नाही. सगळ्यांनी विचार करायला हवा. त्यांची तशी काही पार्श्वभूमी असेल तर आम्ही विचार करू."

याचवेळी अजित पवारांनी दिलेल्या उमेदवारीवरून मात्र त्यांनी टीका केली. मोहोळ म्हणाले, "ज्यावेळी पालकमंत्री बोलतात या शहरातील गुन्हेगारी संपली पाहीजे, कोयता गँग संपली पाहीजे. दुसऱ्या बाजुला पुर्वेपासून पश्चिमेपर्यंत पाहीलं तर सरसकट आपल्याला दिसतं.

हे, कोणत्या तत्वात बसतं मला माहिती नाही. या शहराची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आमची राजकारण्यांची सत्ताधाऱ्यांची आहे. कोणाला उमेदवारी दिली आहे, तुम्ही तपासा."

इतिहास

अर्थात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी मिळण्याची ही पहिली वेळ नाही.गेल्या निवडणुकीच्या वेळी पुण्यातील अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचा प्रवेश झाला होता.

टीका झाल्यानंतर यातील एक प्रवेश रद्द करण्यात आला. त्यापैकी एक असणाऱ्या पिंट्या उर्फ दिनेश धावडे यांच्या पत्नीला गेल्या वेळी उमेदवारी देण्यात आली. त्या निवडूनही आल्या.

आपल्यावर कोणतेही आरोप नसल्याचा दावा दिनेश धाडवे करतो. जयश्री मारणे या पूर्वीही नगरसेविका होत्या. तर आंदेकर कुटुंबातील वनराज आंदेकर राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

तर गुन्हेगारीचा आरोप असणाऱ्या आणखी बाबा बोडकेचाही काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश झाला. मात्र टीका झाल्यावर तो रद्दही करण्यात आला.

देवेंद्र फडणवीस, अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात राष्ट्रवादी आणि त्यांचा मित्रपक्ष भाजप मागे नाहीत.

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या मानसिकतेवर टिका केली आहे. बीबीसी मराठीशी बोलताना कुंभार म्हणाले, "खरंतर आपल्या नेत्यांना अशा गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या नेत्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना तिकिटं देण्याची गरज का वाटत असावी? असं काय त्यांच्याकडे असतं किंवा असं काय त्यांनी समाजासाठी देशासाठी राष्ट्रासाठी केलं आहे.

अशी कोणती पार्श्वभूमी त्यांच्याकडे आहे? केवळ गुन्हेगाराशी असलेले संबंध किंवा त्यांच्याशी नातं या एकाच बाबीवर त्यांना तिकिट दिलं जातं आणि ही मोठी चिंतेची बाब आहे."

पुढे विजय कुंभार यांनी म्हटंल की, "अजित पवारांसारखे नेते पुण्यातून गुन्हेगारी मोडून काढू असं म्हणतात. आणि त्यानी असं म्हणल्यावर गुन्हेगारी थांबण्याच्या ऐवजी कोयता गँग वगैरे वाढलेल्या दिसतात.

या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे की, राजकारण्यांना अशा गुन्हेगारांची गरज का पडत असावी. यांना गुन्हेगारांची मदत होणार आहे म्हणून? की गुन्हेगार एवढे वरचढ झाले आहेत की, ते ऐकत नाहीत? याची उत्तरं ज्यांनी ज्यांनी अशा उमेदवारांना तिकिट दिली त्यांनी जनतेला दिली पाहिजेत.

या गुन्हेगारांनी काय म्युनिसिपल अँक्टचा अभ्यास केला आहे किंवा त्यांच्या मुळे शहराच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे असं नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.