मधुमेह असताना आंबा खाऊ शकतो का? नवीन अभ्यासात मिळालं आश्चर्यकारक उत्तर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी न्यूज
आंबा हा अनेकांचा विक पॉइंट असतो. आता तर सीलबंद डब्यांतील पल्पमुळे शेक्स, आईसस्क्रीम या गोष्टींमध्ये आंब्याचा आनंद वर्षभर घेता येतो. पावसाळा आला तरी देशातील विविध भागातील आंबा अजूनही काही ठिकाणी उपलब्ध असल्याचे चित्र दिसते.
परंतु, आंब्याची आवड असूनही मधुमेहींना मात्र तो खायला मर्यादा येतात. मुंबईतील एक प्रमुख मधुमेहतज्ज्ञ सांगतात की आंब्यांबाबत रुग्णांकडून सतत एकच प्रश्न विचारला जातो, 'डॉक्टर मी आंबा खाऊ शकतो का?'
"आंबा त्याच्या गोड चवीमुळे आणि वेगवेगळ्या प्रकारांमुळे भारतातील उन्हाळ्यातील मुख्य फळ आहे, आणि लोकांना ते खाण्याची इच्छा असणं स्वाभाविकच आहे," असं मधुमेहतज्ज्ञ डॉ. राहुल बक्षी सांगतात.
पण हा सोपा प्रश्न अनेक गैरसमजांनी भरलेला आहे, असंही ते म्हणतात. "काही लोकांना वाटतं की आंबा खाऊच नये, तर काही लोक उलटं समजतात की, जास्त आंबा खाल्ल्यानं मधुमेह कमी होईल म्हणजे 'रिव्हर्स डायबेटिस'ची प्रक्रिया होईल असं त्यांना वाटतं," डॉ. राहुल बक्षी सांगतात.
संशोधनात नेमकं काय आढळलं?
पण गोंधळ फक्त उन्हाळ्यापुरताच मर्यादित नाही. 'खरंतर, अनेक रुग्ण आंब्याच्या हंगामानंतर पुन्हा तपासणीसाठी येतात, आणि तेव्हा त्यांच्या रक्तातील साखरेचा स्तर वाढलेला असतो. कधी कधी यामागचं कारण फक्त आंबा खूप प्रमाणात खाणं असतं,' असं डॉ. बक्षी सांगतात.
हा सततचा गोंधळ अनेक मधुमेहींना 'फळांचा राजा' आंब्यापासून दूर ठेवतं. पण नवीन संशोधन सुचवतं की आंबा कधी कधी ज्यापद्धतीनं दोषी दाखवला जातो, तसा नाही.
भारतामध्ये झालेल्या दोन नवीन वैद्यकीय अभ्यासांनी पारंपरिक आहाराच्या कल्पना बदलल्या आहेत. या अभ्यासानुसार, ब्रेडसारख्या कार्बोहायड्रेट्सऐवजी मर्यादित प्रमाणात आंबा खाल्ल्यानं टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेचा स्तर आणि आरोग्य सुधारू शकतं.
टाइप 1 मधुमेह असतो जेव्हा पॅन्क्रियाज (स्वादुपिंड) फार कमी किंवा कोणतंही इन्सुलिन तयार करत नाही, तर टाइप 2 मध्ये शरीर इन्सुलिनच्या प्रभावाला विरोध करायला लागतं.

फोटो स्रोत, Hindustan Times via Getty Images
आंतरराष्ट्रीय मधुमेह संघटनेनुसार (आयडीएफ), जगातील 90 टक्के पेक्षा जास्त मधुमेहाचे रुग्ण टाइप 2 मधुमेहाशी संबंधित आहेत. हा सध्या जगात आठव्या क्रमांकाचा आजार आहे आणि 2050 पर्यंत दुसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे.
याबद्दल पूर्णपणे माहिती समजलेली नसली तरी, तो जास्त वजन, वय,अनुवंशिकता आणि कुटुंबातील इतिहासाशी जुळलेला आहे."
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, भारतात अंदाजे 7.7 कोटी प्रौढ लोकांमध्ये टाइप 2 मधुमेह आहे, तर सुमारे 2.5 कोटी लोक प्रीडायबेटिक आहेत आणि त्यांना हा आजार होण्याचा धोका जास्त आहे.
व्हाइट ब्रेडच्या तुलनेत ग्लायसेमिक रिस्पॉन्स कमीच
आव्हानं असूनही, नवीन संशोधन आंबाप्रेमींना आशेचं किरण दाखवतं.
'युरोपियन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन'मध्ये लवकरच प्रकाशित होणाऱ्या एका प्रायोगिक अभ्यासात 95 लोकांचा समावेश होता.
या अभ्यासात तीन लोकप्रिय भारतीय आंब्याचे प्रकार- सफेदा, दशहरी आणि लंगडा खाल्ल्यानंतर दोन तासांत रक्तातील साखरेवर परिणाम पाहिला असता, त्याचा परिणाम व्हाइट ब्रेडच्या तुलनेत समान किंवा कमी ग्लायसेमिक रिस्पॉन्स होता. (ग्लायसेमिक रिस्पॉन्स म्हणजे एखाद्या अन्न पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील साखर किती वेगानं आणि किती प्रमाणात वाढते.)
टाइप 2 मधुमेह असलेल्या आणि नसलेल्या लोकांमध्ये तीन दिवसांपर्यंत सतत रक्तातील साखरेचं निरीक्षण केलं असता, मधुमेह असलेल्या लोकांमध्ये जेवणानंतर आंबा खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेतील चढ-उतार खूपच कमी होता.

फोटो स्रोत, Bloomberg via Getty Images
संशोधकांचा असा असा दावा आहे की, हा कमी चढ-उतार असलेला ग्लायसेमिक रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद शरीरासाठी दीर्घकालीन फायदेशीर ठरू शकतो.
"आंबा हे सर्वांचं आवडतं फळ आहे, पण त्याबद्दल काही लोकांना वाटतं की, त्यामुळे रक्तातील साखर आणि वजन वाढू शकते," असं दोन्ही अभ्यासांच्या मुख्य लेखिका डॉ. सुगंधा केहर म्हणतात.
"या अभ्यासातून दिसून आलं की, नियोजित आहारात आंबा खाणं रक्तातील साखरेसाठी हानिकारक नाही आणि कदाचित फायदेशीर देखील ठरू शकतं."
दिल्लीच्या फोर्टिस सी-डीओसीमध्ये आठ आठवड्यांचा अभ्यास झाला, ज्याला भारताच्या वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मदत केली. या अभ्यासात आंबे खाण्याचे फायदे पुन्हा दिसून आले. हा अभ्यास 'जर्नल ऑफ डायबिटीज अँड मेटाबॉलिक डिसॉर्डर्स'मध्ये प्रकाशित झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
टाइप 2 मधुमेह असलेल्या 35 प्रौढ लोकांनी नाश्त्यातील ब्रेडऐवजी 250 ग्रॅम आंबा खाल्ला आणि त्यानंतर त्यांच्या उपाशी पोटी रक्तातील साखर, एचबीए1सी (सरासरी साखरेची तपासणी), इन्सुलिनची प्रतिकारशक्ती, वजन, कंबरेचा घेर आणि एचडीएल कोलेस्टेरॉल सुधारले. हे सर्व मापदंड मधुमेह नियंत्रण आणि शरीराच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.
"आम्ही दोन सविस्तर अभ्यासांमध्ये दाखवलं की, नाश्त्यात ब्रेडसारख्या कार्बोहायड्रेट्सऐवजी थोड्या प्रमाणात आंबे खाणं फायदेशीर ठरू शकतं. यामुळे आंबा खाल्ल्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या गैरफायद्यांविषयीच्या शंका दूर झाल्या," असं ज्येष्ठ लेखक आणि या अभ्यासाचे प्रमुख प्रा. अनूप मिश्रा, सांगतात.
"परंतु, लक्षात ठेवा! आंबा फक्त मर्यादित प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने खावा. जास्त प्रमाणात आंबा खाण्याची मुभा नाही."
कमी प्रमाणात आंबा खाणं म्हणजे नक्की काय?
मी प्रा. मिश्रांना याबाबत विचारलं की, मर्यादेत किंवा कमी प्रमाणात आंबा खाणं म्हणजे काय?
"जर तुमची दररोजची मर्यादा 1,600 कॅलरी असेल, तर आंब्यातील कॅलरीज त्या मर्यादेतच समाविष्ट होणं गरजेचं आहे, अतिरिक्त नाही. सुमारे 250 ग्रॅम आंबा म्हणजे एक छोटं फळ त्यामध्ये सुमारे 180 कॅलरी असतात.
अभ्यासाप्रमाणे तुम्ही समान प्रमाणात कार्बोहायड्रेट्स ऐवजी आंबा खाल्ल्यास तेच परिणाम मिळतात," असं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
डॉ. बक्षी म्हणतात की, ते आपल्या रुग्णांनाही साधारण हेच सांगतात.
"जर रक्तातील साखर (ग्लुकोज) नियंत्रणात असेल, तर मी माझ्या रुग्णांना मर्यादित प्रमाणात आंबा खाण्यास परवानगी देतो आणि त्यांना प्रोत्साहित करतो. सुमारे अर्धा भाग, ज्यात 15 ग्रॅम कार्ब्स असतात, दिवसातून एकदा किंवा दोनदा."
डॉ. बक्षी रुग्णांना सांगतात की, प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. आंबा डिजर्ट म्हणून नव्हे तर जेवणादरम्यान खाल्ला पाहिजे. त्यांना प्रोटिन किंवा फायबरसोबत खा, आणि इतर कार्ब्स किंवा साखरयुक्त पदार्थांसोबत, जसं की ज्यूस किंवा मिल्कशेक, एकत्र करणं टाळा.
आंब्याला भारतात महत्त्वाचं स्थान
आंब्याचा फक्त आरोग्यावर परिणाम होत नाही, तर त्याला भारतात सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचं स्थान आहे. हे फळ केवळ खाण्यासाठी नाही तर सांस्कृतिक, सामाजिक आणि अगदी मुत्सद्देगिरीच्या दृष्टीनेही महत्वाचं आहे.
'मँगो डिप्लोमसी' हा उपखंडात परिचित शब्द आहे, जिथे काळजीपूर्वक निवडलेल्या आंब्याच्या पेट्या राजकीय करार घडवण्यासाठी, मैत्री वाढवण्यासाठी किंवा तणावपूर्ण चर्चा सुरळीत करण्यासाठी वापरल्या जातात.
भारताच्या अनेक शहरांमध्ये 'मँगो फेस्टिव्हल्स' आयोजित केले जातात, जे या फळाचं सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व साजरं करतात. आंबा हे एक आवडतं फळ असून समाजातही त्याला विशेष स्थान आहे.

फोटो स्रोत, Getty Images
'बहुतांश भारतीयांचा स्वतःचा आवडता एक आंबा असतो आणि त्यांच्या प्रादेशिक आवडीनिवडीमुळे आंब्याच्या क्रमवारीबाबत दीर्घकाळ चर्चा होतात,' असं दिल्लीतील इतिहासकार आणि पाककलातज्ज्ञ पुष्पेश पंत म्हणतात.
"चांगले आंबे फक्त खाण्यासाठी नसतात, ते दागिन्यांसारखे साजशृंगार म्हणजेच शोभेचे असतात. आंब्याच्या नियमांनुसार सर्वोत्तम फळ तेच लोक मिळवतात जे त्यासाठी जास्त किंमत मोजण्यासाठी तयार असतात," असं सोपान जोशी यांनी 'मँजिफेरा इंडिका: अ बायोग्राफी ऑफ द मँगो' या आंब्यावरील ग्रंथात लिहिलं आहे."

भारतामध्ये 1,000 पेक्षा जास्त आंब्याच्या जाती आहेत. जोशी लिहितात की, भारतातील आंबे प्रदेशानुसार वेगळे असतात: उत्तरेकडील आणि पूर्वेकडील प्रकार जसे लंगडा, दशहरी, चौसा आणि हिमसागर खूप गोड असतात, तर दाक्षिणात्य प्रकारात गोड-आंबट अशी हलकी चव असते. पश्चिम भारतातील हापूस आंब्याचा खास स्वाद साखर आणि आम्लाच्या योग्य संतुलनामुळे मिळतो.
आंबा हा भारताच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. कवी गालिब यांनी आंब्याला 'मधाचा सीलबंद ग्लास' असं म्हटलं आहे.
या फळाच्या मोहकतेवर शेकडो पुस्तके लिहिली गेली आहेत.
थोडासा स्वादासाठी, थोडासा प्रतीक म्हणून, आंबा अजूनही आनंद देतो आणि प्रेरणा देतो. आता विज्ञानानेही त्याला आश्चर्यकारक मान्यता दिली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











