पठ्ठे बापूराव यांचा वग ऐकल्यानंतर जेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी दिलं होतं स्वतःच्या हातातलं सोन्याचं कडं

पठ्ठे बापुराव

फोटो स्रोत, Maharashtra Sanskrutik Mandal

    • Author, रितेश साळवे
    • Role, बीबीसी मराठी

घटना आहे 1908 ची, राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचं नाव ऐकून त्यांना बोलावणं धाडलं. राजांच्या दरबारात त्यांनी आपली कला सादर केली, तिथे त्यांनी राजांच्या समोर 'मीठा राणी' हा आपला वग ऐकवला. हा वग छत्रपती शाहू महाराजांना एवढा आवडला की महाराजांनी त्यांना सोन्याचं सोलकढं देऊन त्यांच्या कलेचा सन्मान केला. ही व्यक्ती होती श्रीधर कृष्ण कुलकर्णी म्हणजेच तमाशा क्षेत्रातील आधुनिक प्रबोधनकार पठ्ठे बापूराव…

'मुंबई मेरी बडी बांका', 'सासुरवाशीण बाई परत या गावी' या आणि अशा ताकदीच्या हजारो लावण्या लिहून आपल्या लेखणीने, लावणीला लोकप्रबोधनाचं माध्यम बनवण्याचं काम केल ते पठ्ठे बापूरावांनी..

अण्णाभाऊ साठे, वसंत सबनीस, शंकर पाटील, अशा अनेक लेखकांवर पठ्ठे बापूरांवांच्या लिखाणाचा प्रभाव पाहायला मिळतो.

महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या 'महाराष्ट्राचे शिल्पकार : पठ्ठे बापूराव' या ग्रंथानुसार पठ्ठे बापूरावांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कोथाळे गावांत झाला.

त्यांची जन्म तारीख 11 नोव्हेंबर 1866 ही आहे तर, त्यांचा मृत्यू 22 डिसेंबर 1945 रोजी झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे.

या लेखातून पठ्ठे बापूरांवांनी केलेल्या कार्याचा आढावा.

'लावणी केवळ मनोरंजनासाठीच असते', असा समज ज्या काळात दृढ होत चालला होता त्याला छेद देत लावणीला समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणून वापरण्याचं धाडस पठ्ठे बापूरावांनी केलं होतं.

महाराष्ट्राला लावणीची मोठी परंपरा लाभलेली आहे. अनेक अजरामर लावण्या आणि लावण्या लिहणारे लावणीकार लेखक महाराष्ट्रात होऊन गेलेत. या सगळ्यात एक वेगळं स्थान पठ्ठे बापूरावांचं आहे.

लावणीला अश्लीलतेच्या साच्यातून बाहेर काढलं

लहानपणापासूनच त्यांना संगीताची ओढ होती. त्यांचं शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले. मराठी, हिंदी, संस्कृत आणि उर्दू भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. लहान वयातच त्यांनी कविता, अभंग आणि लावणी रचायला सुरुवात केली होती.

19 व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी लावणी ही मुख्यतः मनोरंजनाचेच साधन म्हणून ओळखली जात होती. त्या काळातील तमाशांमध्ये प्रामुख्याने अश्लीलता आणि स्त्रिया यावरच लावण्या केल्या जायच्या. आणि याच पठडीतून लावणीला बाहेर काढण्याचं काम पठ्ठे बापूरावांनी केलं.

लावणी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लावणी ( प्रातिनिधिक)
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. बळीराम गायकवाड हे पठ्ठे बापूरावांबद्दल बोलताना म्हणाले की, "दोन लाखांहून जास्त लावण्या लिहून तमाशा या कलेला जीवनाचा ध्यास बनवून लोकप्रबोधन, मनोरंजन व लोकजागरासाठी लावणी या मराठमोळ्या लोककलेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये अनन्य साधारण स्थान प्राप्त करून देण्याचे महत्त्व कार्य प्रतिभावान लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांनी केले."

"लोकजागृतीच्या तळमळीमधून आणि आपल्या काव्याच्या माध्यमातून महाराष्ट्र उत्थानाच्या उत्तुंग हेतूने पठ्ठे बापूराव यांनी तत्कालीन परिस्थितीत उपलब्ध असलेली लोककला जसे की लावणी गवळणी यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेवा निर्मितीचे महान कार्य केले आहे," असं डॉ. गायकवाड सांगतात.

मराठी रंगभूमी, लोककला आणि लावणी क्षेत्रात पठ्ठे बापूराव हे नाव आजही विशेष आदराने घेतले जातं. पठ्ठे बापूरांवांनी मराठी लावणीला अश्लीलतेच्या साचेबद्ध परंपरेतून बाहेर काढत समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनवले.

"गरीब बायांची दया करा रे देवा, उपवासाच्या भाकरीवर जीवन जावे रे देवा," अशा त्यांच्या लिखाणामुळे लावणी आणि तमाशा या लोककला प्रकारांना एक नवी ओळख आणि स्थान प्राप्त झाले.

बापूराव लावणीकडे कसे वळले?

लहानपणीच त्यांना वाचन, संगीत आणि काव्य यांची ओढ होती. औंधमधल्या शाळेत शिकताना ते नेहमी कवितांच्या स्पर्धा, कीर्तनं आणि नाटकांत भाग घ्यायचे. त्यांच्या शिक्षकांनीच त्यांच्यातील वक्तृत्व आणि काव्याची गोडी ओळखली.

पुढे पुण्यात शिक्षण घेत असताना समाजातील अन्याय, स्त्रियांवरील अत्याचार, देवदासींवरील अत्याचार आणि दलित समुदायातील लोकांवरील अन्याय त्यांच्या मनाला चटका लावू लागले. त्याच काळात त्यांना कळलं की तमाशा आणि लावणी यात प्रबोधनाची अपार ताकद दडलेली आहे.

छत्रपती शाहू महाराज आणि पठ्ठे बापूराव

फोटो स्रोत, Getty Images/Maharashtra sanskrutik Mandal

यात "त्यांनी ठरवलं की जनतेच्या भाषेत बोलायचं, त्यांच्या वेदनांवर लिहायचं आणि त्यांच्यातूनच प्रकाश निर्माण करायचा."

त्यांच्या लेखणीतून "गरीब बायांची दया करा रे देवा", "सासुरवाशीण बाई परत या गावी" अशा लावण्या जन्माला आल्या. त्या लावण्यांनी केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं नाही, तर त्यांच्या अंतःकरणाला जागं केलं.

त्या काळात तमाशात काम करणं बहुतेक मंडळी ही औपचारिक शिक्षण न घेतलेलीच असायची. परंतु हे कलाकार इतके अनुभवसंपन्न असत की ते लावण्या रचत. अशा कलाकारांसोबत पठ्ठे बापूराव काम करू लागले.

एकीकडे औपचारिक शिक्षण न घेतलेले कलावंत आणि दुसऱ्या बाजूला 'इंग्रजी बुकं शिकलेल्या', उर्दू, संस्कृतचे ज्ञान असलेल्या पठ्ठे बापूरावांना प्रेक्षकांची दाद मिळू लागली. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी नंतर हजारो लावण्या लिहिल्याचे 'महाराष्ट्राचे शिल्पकार : पठ्ठे बापूराव' या ग्रंथांत म्हटले आहे.

पवळा आणि बापूराव यांची प्रेम कहाणी

पठ्ठे बापूरावांचं नाव आलं की त्यांच्यासोबत एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे पवळा.

पवळा आणि पठ्ठे बापूराव यांची पहिली भेट झाली ती पुण्याजवळच्या एका जत्रेत. बापूराव त्या वेळी आपल्या ओळखीच्या तमाशा मंडळींसोबत फिरत होते. जत्रेत एक मंडळ गात होतं, आणि त्यातली एक तरुणी पवळा, आपल्या गळ्यातल्या सूरांनी आणि डोळ्यातल्या भावांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. बापूराव पवळा यांना पाहून म्हणाले की "हिच्यात आग आहे, हिच्या आवाजात जीव आहे."

लावणी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक

पवळा बाई म्हणजे बापूरावांच्या आयुष्यातली जणू एखादी सुरेल लावणीच. रंगमंचावर त्यांच्या नजरेतून, ओठांवरच्या ओवाळलेल्या गीतांतून आणि गळ्यातल्या सूरांतून बापूरावांचं मन बोलायचं.

दोघांचं नातं हे त्या काळच्या समाजासाठी स्वीकारार्ह नव्हतं. बापूराव ब्राह्मण समुदायातील होते आणि पवळा दलित समुदायातील होत्या.

या एकाच कारणाने समाजाने त्यांचं आयुष्य नरक बनलं. तमाशात ते एकत्र दिसले की काही गावांमध्ये लोक उभे राहून कार्यक्रम बंद पाडायचे, "ब्राह्मण माणूस नीच बाईसोबत नाचतो" म्हणून शिव्याशाप द्यायचे. पण बापूराव मागे हटले नाहीत.

पवळा आणि बापूरावांचे मतभेद

काळ जसाजसा पुढे गेला, तसतसे बापूराव आणि पवळा यांच्यात मतभेद निर्माण झाले. पवळा बाईंचं मन अधिक कलात्मकतेकडे झुकलेलं होतं, तर बापूराव समाजप्रबोधनाकडे वळले होते. लावणी समाजाच्या बदलासाठी वापरायची की मनोरंजनासाठी यावर दोघांचं मत वेगळं झालं.

"बापूराव विचारात गुंतले, पवळा भावनेत; दोघांची वाट वेगळी झाली, पण आठवण कायम राहिली." शेवटी याच कारणाने पवळा आणि बापूरावांचा फड तुटला.

फड तुटल्यानंतर बापूराव काही काळ शांत झाले. पवळा गेल्यानंतर जणू त्यांच्या आयुष्यातील रंगच ओसरले. "पवळा गेल्यापासून बापूरावांची लावणी जणू अनाथ झाली," असं म्हटलं जाऊ लागलं.

पवळा दुसऱ्या फडात गेली, पण प्रत्येक सादरीकरणात ती बापूरावांच्याच ओळी गात राहिली. दोघेही वेगळ्या मार्गावर निघाले, नंतरच्या काळात बापूराव अधिक समाजकार्याकडे वळले. त्यांनी लावणीतून स्त्री, गरिबी आणि सामाजिक प्रश्नांवर लेखन केलं.

लावणी

फोटो स्रोत, Getty Images

गावोगाव फिरून ते कार्यक्रम सादर करायचे, लोकांना सांगायचे "लावणी फक्त नाच नाही, तो विचार आहे."

पवळा मात्र मंचावरून कधीच उतरली नाही, ती आयुष्याच्या शेवटपर्यंत गात राहिली.

काळ पुढे सरकला, तमाशाचा चेहरा बदलला, समाजही बदलला, पण पठ्ठे बापूरावांच्या लावण्यांतील तो समाज प्रबोधनाचा सुर आजही लावण्यांमध्ये तितकाच जिवंत आहे. त्यांनी लावणीला केवळ नाचगाणं न ठेवता, समाजाला विचार करायला लावणारं एक व्यासपीठ बनवलं.

आजही बापूरावांच्या आठवणींशिवाय कुठला तमाशा होत नाही, प्रत्येक तमाशात बापूराव आपल्या लावणीने अजूनही जीवंत आहेत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.

(संदर्भ - महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव, लेखक - चंद्रकांत नलगे ( महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक महामंडळ प्रकाशन )

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.