बीएच सिरीजची नंबर प्लेट कशी मिळते? तिचे काय फायदे आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
तुम्हाला तुमच्या कामानिमित्त दोन अथवा त्याहून अधिक राज्यांमध्ये सतत येणं-जाणं करावं लागतं का?
अथवा, तुम्ही एखाद्या ट्रान्सफरेबल जॉबमध्ये आहात का, जिथे दर दोन-तीन वर्षांनी तुम्हाला नव्या राज्यामध्ये जावं लागतं?
तर, तुम्हाला तुमच्या कारसाठी बीएच (BH) सिरीजची नवी नंबर प्लेट घेणं कधीही फायद्याचं ठरू शकतं.
मात्र, ही बीएच सिरीजची नंबर प्लेट नक्की आहे तरी काय? ती कशी मिळते? त्यासाठी काय करावं लागतं? तिचे काही तोटेही आहेत का?
जाणून घेऊयात, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं.
बीएच सिरीजची नंबर प्लेट काय आहे?
बीएच सिरीज नंबर प्लेटची सुरुवात भारत सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये केली होती.
ही नंबर प्लेट फक्त नव्या खासगी गाड्यांनाच दिली जाते. व्यावसायिक (कमर्शियल) वाहनांना अशी नंबर प्लेट मिळत नाही.
ही नंबर प्लेट ओळखणं फारच सोपं आहे. इतर नंबर प्लेटप्रमाणेच सामान्य असलेल्या या नंबर प्लेटवर इंग्रजीमध्ये 'बीएच' असं लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ आहे 'भारत.'
पण, सामान्य नंबर प्लेटच्या तुलनेत फक्त इथे नंबर टाकण्याची पद्धत थोडी वेगळी असते.
या सिरीजच्या नंबर प्लेटमध्ये बीएच या अक्षरानंतर गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर लिहिला जातो, तसेच वाहनाची कॅटेगरी काय आहे, याचीही माहिती असते.

फोटो स्रोत, Getty Images
या नंबर प्लेटच्या फॉर्मॅटमध्ये, इअर ऑफ रजिस्ट्रेशन (YY), त्यानंतर BH (भारत सिरीज), मग 4 डिजीटचा रजिस्ट्रेशन नंबर आणि मग वाहनाची कॅटेगरी सांगणारे दोन अक्षरं असतात, जी A पासून ते Z मधील कोणतीही असू शकतात.
थोडक्यात, एखाद्या कारचा नंबर 22 BH 9999AA असा असेल, तर याचा अर्थ हे वाहन 2022 मध्ये भारत सिरीजनुसार रजिस्टर झालेलं आहे. त्यापुढील 4 आकडे हे रजिस्ट्रेशन नंबर आणि त्यानंतर वाहनाची कॅटेगरी दाखवणारे असतील.
आता तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल, की नॉर्मल नंबर प्लेटमध्ये फक्त 'बीएच' हीच अक्षरं तर नसतात. त्याऐवजी, राज्याचं नाव दर्शवणारी अक्षरं असतात. तर मग, या नव्या नंबर प्लेटमध्ये असं काय खास आहे?
या नंबर प्लेटचे काही खास फायदे आहेत. जसे की, ही नंबर प्लेट संपूर्ण देशभरात वैध असते आणि दुसरं म्हणजे, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी या नंबर प्लेटच्या वाहनाचं पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज पडत नाही.
बीएच नंबर प्लेटचे फायदे
खरं तर, स्टेट रजिस्ट्रेशन नंबर असलेलं वाहन घेऊन जर तुम्ही नव्या एखाद्या राज्यात गेलात, तर तुम्हाला 12 महिन्यांच्या आत वाहनाचं रजिस्ट्रेशन बदलून घ्यावं लागतं. जर तुम्ही हा नियम पाळला नाहीत, तर तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो. तुमच्या कारचा इन्श्यूरन्स क्लेम रिजेक्ट केला जाऊ शकतो.
विमा कंपन्या रस्ते नियमांचं पालन न केल्याचं कारण पुढे करत तुमच्या कारचा इन्श्यूरन्स क्लेम रिजेक्ट करू शकतात. मात्र, तुमच्याकडे बीएच नंबर प्लेट असेल, तर ही अडचण तुम्हाला येणार नाही.
कारण, या नंबर प्लेटसह जर तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झालात, तरी तुम्हाला वाहनाचं रजिस्ट्रेशन बदलून घेण्याची गरज राहत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे, कार इन्श्यूरन्स कव्हरेज अथवा क्लेम व्हॅलिडीटीसंदर्भात कोणतीही चिंता तुम्हाला करण्याची गरज उरत नाही.
आणखी एक गोष्ट म्हणजे सामान्य नंबर प्लेटची कार खरेदी केल्यानंतर सामान्यत: 15 वर्षांचा रोड टॅक्स भरावा लागतो. हा टॅक्स वाहनाची लांबी, इंजिनची क्षमता आणि तिच्या प्रकारावर अवलंबून असतो.
मात्र, बीएच सिरीजची नंबर प्लेट घेतल्यास, फक्त येणाऱ्या दोन वर्षांचाच रोड टॅक्स भरण्याची आवश्यकता असते. त्यानंतर प्रत्येक दोन वर्षांनी रोड टॅक्स पुन्हा भरावा लागतो.
बीएच सिरीजच्या गाड्यांवरील रोड टॅक्स हा वाहनाच्या एकूण किमतीमधून जीएसटी वगळून मोजला जातो.
बीएच सिरीजच्या गाड्यांचा आणखी एक फायदा असाही आहे की, तुम्ही तुमची गाडी इतर कोणत्याही राज्यातील व्यक्तीला सहजपणे विकू शकता. कारण, या गाड्यांचं रजिस्ट्रेशन संपूर्ण भारतात वैध मानलं जातं.
कुणाला मिळू शकते ही नंबर प्लेट?
पीआयबीच्या 2023 मधील प्रेस रिलीजनुसार, देशातील 26 राज्ये अथवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये भारत सिरीज नंबर प्लेटच्या रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध आहे.
म्हणून राज्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी, संरक्षण कर्मचारी, बँक कर्मचारी किंवा प्रशासकीय सेवेतील कर्मचारी आहेत, ते बीएच सिरीज नंबर प्लेटसाठी अर्ज करू शकतात.

तर, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियमांमध्ये थोडासा बदल आहे. त्यांच्या कंपनीची कार्यालये किमान 4 राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असतील, तर ते देखील यासाठी पात्र आहेत.
आता, जर तुम्ही या निकषात बसत असाल तर BH सिरीज नंबर प्लेटसाठी नोंदणी कशी करावी, हे देखील जाणून घेणं आवश्यक ठरेल.
कसे कराल रजिस्ट्रेशन?
बीएच सिरीज नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया फारच सोपी आहे.
यासाठी तुम्हाला तुमच्या राज्यातील आरटीओच्या ऑफिसमध्येही जाण्याची गरज भासत नाही. तुम्ही घरबसल्या ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
त्यासाठी तुम्ही 'मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज'च्या VAHAN पोर्टलवर स्वत: लॉगिन करू शकता किंवा एखाद्या अधिकृत ऑटोमोबाइल डीलरचीही मदत घेऊ शकता.

फोटो स्रोत, parivahan.gov.in
त्यासाठी खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 60 भरावा लागतो. सोबतच, त्यांना वर्क सर्टिफिकेटसोबतच एम्प्लॉयमेंट आयडीदेखील दाखवावा लागतो. त्याशिवाय, काही आवश्यक कागदपत्रेही सबमिट करावी लागतात.
त्यानंतर, संबंधित अधिकारी तुमच्या गाडीच्या पात्रतेची तपासणी करतात. बीएच नंबरसाठी आरटीओकडून संमती मिळाल्यानंतर तुम्हाला आवश्यक तो मोटर व्हेईकल टॅक्स भरावा लागतो.
त्यानंतर VAHAN पोर्टलकडून तुमच्या कारसाठी बीएच सिरीजचा रजिस्ट्रेशन नंबर उपलब्ध करून दिला जातो.
आता, बीएच सिरीजचा नंबर घेण्यामध्ये काही नुकसान होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न पडणंही साहजिक आहे.
यामध्ये काही नुकसान आहे का?
बहुतांश ऑटो एक्स्पर्टचं असं म्हणणं आहे की, बीएच सिरीज नंबर प्लेटचे फायदे अधिक असून नुकसान अगदीच नसल्यात जमा आहे.
जर तुम्ही तुमची गाडी लोनवर घेतलेली असेल, तर बँकेच्या एनओसीची गरज भासू शकते. मात्र, अद्यापही अनेक बँकांची धोरणं या बीएच सिरीज रजिस्ट्रेशनबाबत सुस्पष्ट नाहीयेत. त्यामुळे, तिथे थोडी अडचण येऊ शकते.
दुसऱ्या बाजूला, जर एखाद्याला असं वाटलं की, मला बीएच रजिस्ट्रेशन नको आहे आणि जुनीच नंबर प्लेट हवी आहे, तर ती प्रक्रिया अधिक मोठी आणि क्लिष्ट असू शकते, हे लक्षात घेणंही तितकंच गरजेचं आहे.
यासोबतच, टॅक्सचे दरदेखील थोडे अधिक लागू शकतात.
उदाहरणार्थ, 10 लाख रुपयांपर्यंतच्या किमतीच्या वाहनांसाठी 8 टक्के कर, 10 ते 20 लाख रुपयांपर्यंतच्या किमतीच्या वाहनांसाठी 10 टक्के कर, तर 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांसाठी 12 टक्के कर द्यावा लागतो.
हे दर पेट्रोल कारसाठी आहेत, डिझेलवर 2 टक्के अतिरिक्त आणि इलेक्ट्रिकवर 2 टक्के कमी कर आकारला जातो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











