'माझे वाघ-सिंह आक्रमक नाहीत,' जंगलचे राजे पाळणाऱ्यांवर पाकिस्तानात कारवाईचा बडगा

फोटो स्रोत, Fayyaz
- Author, आझादेह मोशिरी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पाकिस्तानातील लाहोर शहराच्या बाहेर असलेल्या एका शेतातल्या फार्महाऊसबाहेर दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे इथं काहीतरी वेगळं असल्याचा संशय आला.
त्या फार्महाऊसमध्ये गेल्यानंतर समजलं की तिथं 26 सिंह, वाघ आणि त्यांच्या बछड्यांचा समावेश आहे आणि ही जागा फयाज नावाच्या व्यक्तीची आहे.
पावसामुळे इथं चिखल झाला असला तरी, प्राणी इथं सुरक्षित असल्याचं तो ठामपणे सांगतो.
ते आम्हाला बघताच जवळ येतात. पण, 'ते आक्रमक नाहीत' असं ते म्हणत असतानाच अचानक एका सिंहानं मोठ्यानं गर्जना केली.
त्यावर फय्याज म्हणतात 'हा सिंह आक्रमक आहे, त्याचा स्वभावच तसा आहे.'
फय्याज यांचे वाघ, सिंहांवर विशेष प्रेम आहे. देशभरातील खासगी मालकीच्या वाघ-सिंहांच्या ठिकाणांपैकी हे एक सर्वात मोठ केंद्र मानलं जातं.
पाकिस्तानात प्राणी म्हणजे सामर्थ्य, प्रतिष्ठा आणि राजकीय निष्ठेचं प्रतीक
38 वर्षांचे फय्याज गेल्या दहा वर्षांपासून इथूनच सिंहांचे छावे आणि प्रजननासाठी सिंह-सिंहिणीची विक्री करतोय.
पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या सिंह विक्रेत्यांपैकी फय्याज एक आहे.
अनेक दशकांपासून पाकिस्तानात सिंह, वाघ, चित्ता यांसारखे बिग कॅट फॅमिलीतील असे प्राणी सामर्थ्य, प्रतिष्ठा आणि राजकीय निष्ठेचेही प्रतीक मानले जातात.
वाघ हा प्राणी पाकिस्तानमधील सत्ताधारी पक्ष मुस्लीम लीग नवाज पक्षाच्या झेंड्यांवर आहे.
सध्या इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाच्या काळात या प्राण्यांना पाळण्याची क्रेझ झपाट्यानं वाढली आहे. इतकंच नाहीतर आता सिंहांना लग्नात सुद्धा आणलं जातं.
आता प्रत्येक प्राण्यामागे भरावे लागणार नोंदणी शुल्क
मात्र, काही दिवसांपूर्वी लाहोरमध्ये एका सिंहानं पळून जाऊन रस्त्यावर चालणारी एक महिला आणि तिच्या दोन मुलांवर हल्ला केला.
त्यामुळे पाकिस्तान सरकारनं कठोर कारवाई सुरू केली आहे. त्याचा परिणाम फय्याजसारख्या लोकांवर होताना दिसतोय.
नवीन नियमांनुसार, प्रत्येक फार्मवर फक्त दोन प्रजातींच्या जास्तीत जास्त 10 मोठ्या प्राण्यांना ठेवता येणार आहे.

त्यासाठी प्रत्येक प्राण्यामागे एकावेळी 50 हजार रुपये नोंदणी शुल्क संबंधित फार्मच्या मालकाला भरावं लागेल.
तसेच ही ठिकाणं जनतेसाठी खुली ठेवणंही अनिवार्य करण्यात आलं आहे.
या नियमांचं उल्लंघन केल्यास 2 लाख पाकिस्तानी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
फार्महाऊसमधील सिंह, सिंहीण आधीच लपवून ठेवल्याचा संशय
लाहोरच्या बाहेर असलेल्या आणखी एका शेतात सिंहांची चिखलानं माखलेले पाच छावे पिंजऱ्यात फिरताना दिसले.
याठिकाणी सिंह आणि त्याचे छावे परवानगी नसताना पाळले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वन्यजीव अधिकारी इथं पोहोचले होते.
तिथं जवळच काही रिकामे पिंजरेही दिसले. हे बघून या ठिकाणचा मालक कुठे आहे असा प्रश्न वन्यजीव अधिकाऱ्यांनी केला.
वन्यजीव अधिकारी तिथं पोहोचण्याच्या आधीच मालक गायब झाला होता. तिथली सगळी जबाबदारी फक्त देखरेख करणाऱ्या व्यक्तीवर होती.

मी इथं दोन आठवड्यांपूर्वी रुजू झाल्याचं, तो वन्यजीव अधिकाऱ्यांना सांगतो. त्यानंतर अधिकारी त्याला चौकशीसाठी घेऊन जातात.
या फार्महाऊसमधील सिंह, सिंहीण यांना कुठंतरी आधीच लपवून ठेवल्याचा संशय वन्यजीव अधिकाऱ्यांना आहे.
सध्या वन्यजीव अधिकाऱ्यांनी या शेतातून सिंहांचा छावे ताब्यात घेतले असून त्यांना लाहोरमधील एका सार्वजनिक प्राणीसंग्रहालयात हलवण्यात आलं आहे.
त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्यानं त्यांना इतर प्राण्यांपासून वेगळं ठेवलं जात आहे.
अनेक दशकांपासून होतेय बिग कॅट फॅमिलीतील प्राण्यांची विक्री
पाकिस्तानात अनेक दशकांपासून बिग कॅट फॅमिलीतील प्राण्यांची विक्री होत आली आहे.
फक्त पंजाब प्रांतातच शेकडो, कदाचित हजारो असे प्राणी बेकादेशीरपणे पाळण्यात आले असतील अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कारवाई व्हायला हवी असं त्यांना वाटतं.
पंजाबमधील 30 ते 40 टक्के मालक आपल्याकडील प्राण्यांची स्वतःहून नोंदणी करणार नाहीत, असं वन्यजीव आणि उद्यान विभागाचे महासंचालक मुबीन इलाही बीबीसीला सांगतात.
ते म्हणतात, याला किमान सहा महिन्याचा वेळ लागेल. तसेच इथं गुंतागुंत निर्माण झाल्याचंही ते सांगतात.
पाकिस्तानमध्ये सर्वसाधारणपणे आंतरप्रजनन होतं. त्यामुळे काही मोठ्या प्राण्यांना मारावं लागतं.
त्यांना अनेक आरोग्याच्या समस्या असतात. याबद्दलच्या धोरणावर आम्ही अजूनही विचार करत आहोत, असंही मुबीन म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
पुढे ते गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये घडलेल्या घटनेचा उल्लेख करत म्हणतात लाहोरमध्ये एक सिंह असाच पळून गेला होता. त्यानंतर त्याला गोळी मारून ठार करण्यात आलं.
तसेच फय्याजच्या फार्म हाऊसबद्दल काय करायचं याचा विचार चालू आहे.
एका अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं की ते पिंजऱ्याच्या आकाराबद्दल समाधानी नाहीत.
त्यानं स्वतःच्या फार्मला प्राणीसंग्रहालयात रुपांतरीत करणं आवश्यक आहे. नियम पाळण्यासाठी फय्याज यांच्याकडे आता तीन महिने आहेत.
पण, या प्राण्यांसाठी अधिक उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं प्राणी हक्क संघटनांना वाटतं.
आम्ही प्राणीसंग्रहालयं नव्हे तर आश्रयस्थानं तयार करण्याची मागणी करत असल्याचं अल्तमुष सईद यांनी बीबीसीला सांगितलं.
प्राणीसंग्रहालयात नेमकं काय चालतंय याबद्दल पारदर्शकता हवी आहे आणि या प्राण्यांच्या समस्येवर योग्य तोडगा काढावा. आम्हाला तात्पुरते उपाय नाही, तर कायमस्वरुपी तोडगा हवा आहे, असंही ते म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











