'श्री, मी या मुंग्यांसोबत राहू शकत नाही, बाळाची काळजी घे', विवाहितेनं पत्र लिहून केली आत्महत्या

विवाहितेनं पत्र लिहून केली आत्महत्या
    • Author, प्रवीण सुभम
    • Role, बीबीसीसाठी

तेलंगणातील संगारेड्डी जिल्हा पोलिसांनी माहिती दिली आहे की, चिंदम मनीषा या 25 वर्षांच्या विवाहितेनं आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिनं तिच्या पतीला पत्र लिहिलं होतं की, "मी या मुंग्यासोबत राहू शकत नाही, बाळाची काळजी घे."

"आम्हाला वाटतं की मनीषानं अँटफोबियामुळे आत्महत्या केली आहे," असं पटनचेरूचे पोलीस निरीक्षक नरेश यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. ते या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.

"फोबिया म्हणजे, एखाद्या विशिष्ट परिस्थितीला तोंड देताना किंवा विशिष्ट गोष्ट पाहिल्यानंतर लोकांना प्रचंड भीती वाटते आणि चिंता वाटते," असं मानसोपचारतज्ज्ञ एम. ए. करीम म्हणतात.

मुंग्यांबद्दल जी भीती वाटते, त्याला मायरमेकोफोबिया म्हणतात.

नेमकं काय घडलं?

संगारेड्डी जिल्हा पोलिसांनी उघड केलेल्या माहितीनुसार, मंचिरिया येथील, चिंदम श्रीकांत आणि मनीषा यांचं तीन वर्षापूर्वी लग्न झालं होतं. त्यांना एक मुलगीदेखील आहे.

ते वर्षभरापासून संगारेड्डी जिल्ह्यातील अमीनापूरमधील नाव्या होम्समध्ये राहत होते.

मनीषा यांनी 4 नोव्हेंबरच्या संध्याकाळी घरी कोणीही नसताना आत्महत्या केली.

पटनचेरूचे तहसीलदार आणि पोलीस यांच्या उपस्थितीत स्थानिक सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या पथकानं शवविच्छेदन पूर्ण केलं.

निरीक्षक नरेश म्हणाले की. मनीषा यांनी त्यांना मुंग्यांबद्दल वाटणाऱ्या प्रचंड भीतीतून आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.

इन्स्पेक्टर नरेश
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

निरीक्षक नरेश म्हणाले, "4 नोव्हेंबरच्या दुपारी मनीषा यांनी त्यांच्या लहान मुलीला त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाच्या घरी सोडलं होतं. कारण त्यांना घराची साफसफाई करायची होती. कामावरून घरी परतताना संध्याकाळी मुलीसाठी काही स्नॅक्स आणण्यासाठी त्यांनी पतीला मेसेज केला."

"आम्हाला वाटतं की घराची स्वच्छता करताना मुंग्या पाहिल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी, त्यांनी पतीसाठी एक सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात म्हटलं होतं, 'हाय श्री, मी या मुंग्यांसोबत राहू शकत नाही, बाळाची काळजी घ्या.'"

नरेश म्हणाले की, सुसाईड नोटमध्ये मनीषा यांनी त्यांचे पती श्रीकांत यांना बाळासाठी पूर्वी केलेले नवस फेडण्यास आणि विधी पूर्ण करण्यास सांगितलं आहे.

या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून, पोलिसांनी मनीषा यांचे आई-वडील आणि त्यांचे पती श्रीकांत यांची चौकशी केली.

"मनीषाला लहानपणापासूनच मुंग्यांची भीती वाटत होती. तपासादरम्यान असं समोर आलं की मनीषा यांनी याच समस्येसंदर्भात यापूर्वी मंचेरियालमध्ये समुपदेशन देखील घेतलं होतं," असं इन्स्पेक्टर नरेश म्हणाले.

बीबीसीनं या घटनेसंदर्भात मनीषा यांच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उपलब्ध होऊ शकले झाले नाहीत.

'हा आजार नाही, तो एक मानसिक विकार आहे'

करिमनगरमधील मानसोपचारतज्ज्ञ एम. ए. करीम यांनी बीबीसीला सांगितलं की या प्रकरणाच्या तपशीलांवरून असं दिसून येतं की ही प्रचंड भीतीची एक अवस्था आहे.

मानसोपचारतज्ज्ञ करीम म्हणाले, "हा एक मानसिक विकार आहे. तो आजार नाही. तो एक काल्पनिक मानसिक विकार आहे. ज्यात जे प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, ते अस्तित्वात आहे असं समजलं जातं. बालपणात निर्माण झालेली भीती जसजशी वाढत जाते. तसतसं त्याचं रुपांतर फोबियामध्ये होतं आणि त्यातून भ्रम निर्माण होतात."

मानसोपचारतज्ज्ञ एमए करीम
फोटो कॅप्शन, मानसोपचारतज्ज्ञ एम.ए. करीम

मानसोपचारतज्ज्ञ करीम पुढे म्हणाले, "असा फोबिया असणाऱ्या लोकांना एखाद्या छोट्या मुंगीची कल्पनादेखील हत्तीइतकी मोठी करतात आणि मग प्रचंड घाबरतात. मग ते अशा टप्प्यावर पोहोचतात, जिथे ते मुंग्यांचा प्रतिकार करू शकत नाहीत."

"सध्या कोणीही माणूस उपस्थित नसल्यानं, आत्महत्येचं हेच कारण असल्याचं निश्चितपणे सांगता येणार नाही. ते फक्त एक गृहितक आहे."

हा विकार अनुवांशिक नसतो. मानसोपचारतज्ज्ञ करीम म्हणाले की कॉग्निटिव्ह बिहेव्हेरियल थेरपी (सीबीटी) तंत्रांनी अशा व्यक्तींमध्ये बदल घडवण्याची शक्यता असते.

मायरमेकोफोबिया काय असतो?

ग्रीक भाषेत मुंगीला मायरमेक्स म्हणतात. तर मुंग्यांची भीती वाटण्याच्या विकाराला मायरमेकोफोबिया म्हणतात.

फोबिया विविध कारणांमुळे होऊ शकतात. यात उक्रांत होत जाणारे (उदाहरणार्थ, सापासारख्या विषारी प्राण्यांविषयी वाटणारी सामान्य भीती) वैयक्तिक अनुभव, सांस्कृतिक प्रभाव आणि मुंग्यांबद्दल वाटणाऱ्या सामान्य मानसिक चिंता यांचा समावेश आहे.

"इतर फोबियांप्रमाणे मायरमेकोफोबिया व्यापकपणे परिचित नसला तरीदेखील, तो अजिबात दुर्मिळ नाही," असं फोबिया सोल्यूशन वेबसाईटवर म्हटलं आहे.

विवाहितेनं पत्र लिहून केली आत्महत्या
फोटो कॅप्शन, विवाहितेनं पत्र लिहून केली आत्महत्या

"जगभरातील अंदाजे 7-9 टक्के लोकांना वेगवेगळ्या प्रकारे फोबिया असतात. नेमक्या किती लोकांना फोबियाचा विकार आहे, हे सांगणं कठीण आहे. कारण अनेकजण याबाबत मदत घेत नाहीत किंवा त्यांना वाटणारी भीती ही फोबिया आहे हे त्यांना माहित नसतं," असं फोबिया सोल्यूशन वेबसाईटवर म्हटलं आहे.

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.