पतीला मारुन स्वयंपाकघरात पुरलं, दोन महिने तिथेच स्वयंपाक केला; एक वर्षानंतर उघड झालं गूढ

फोटो स्रोत, Bhargav Parikh/ Getty Images
- Author, भार्गव पारिख
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
"जर कोणी मला माझ्या पतीबद्दल विचारलं, तर मी सांगायचे की... ते पैसे कमवण्यासाठी दुबईला गेले आहेत. प्रत्यक्षात, मी त्याची हत्या केली होती आणि त्याचा मृतदेह स्वयंपाकघरातच पुरला होता. त्यानंतर दोन महिने मी त्याच स्वयंपाकघरात स्वयंपाक केला आणि माझ्या मुलांना जेवू घातलं. मग मी माझ्या प्रियकराबरोबर दुसरीकडे राहायला गेलो."
रुबी नावाच्या महिलेनं अहमदाबादच्या गुन्हे शाखेच्या (क्राईन ब्रँच) कार्यालयात जेव्हा पोलिसांसमोर हा कबुली जबाब दिला, तेव्हा पोलिसांनादेखील धक्का बसला.
रूबी या महिलेवर तिच्या कथित प्रियकराच्या मदतीनं तिच्या पतीची हत्या केल्याचा आणि त्यानंतर ती हत्या लपवण्यासाठी पतीचा मृतदेह त्यांच्याच स्वयंपाकघरात पुरल्याचा आरोप आहे.
हत्येचा कोणताही पुरावा सापडू नये म्हणून त्या खड्ड्यात मीठदेखील ओतण्यात आलं होतं. त्यानंतर स्वयंपाकघरात वरून टाईल्स टाकून ते परत पूर्वीसारखं करण्यात आलं.
या हत्येबद्दल एक वर्षभर कोणालाही माहिती नव्हती. मात्र अखेर पोलिसांना याची माहिती मिळाली आणि हत्येचं हे गूढ उलगडलं. त्या ठिकाणी पोलिसांना मोहम्मद इसराएल अकबरअली अन्सारी उर्फ समीर बिहारी नावाच्या व्यक्तीचे अवशेष सापडले.
त्यानंतर रूबी, तिचा कथित प्रियकर इम्रान वाघेला आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली.
हे प्रकरण आहे तरी काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर बिहारी आणि रूबी मूळचे बिहारमधील आहेत. ते जवळपास आठ वर्षांपूर्वी अहमदाबादला आले होते. या दोघांनी त्यांच्या कुटुंबांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्यानंतर ते तिथून पळून आले होते.
समीर मूळचा बिहारमधील सिवान जिल्ह्यातील रामपूर गावचा रहिवासी होता. समीर आणि रूबी अहमदाबादमधील सरखेज भागात राहत होते. समीर गवंडीकाम आणि रंगकाम करायचा.
अहमदाबादच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त (डीसीपी) अजित राजियन म्हणाले, "कोरोनाच्या संकट काळात, इम्रान वाघेला नावाचा माणूस या दोघांच्या शेजारी राहायला आला. रूबी आणि इम्रान यांची भेट झाली आणि ते प्रेमात पडले."
"समीर बिहारी याला जेव्हा त्याच्या पत्नीच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली, तेव्हा या दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. रूबीनं दिलेल्या माहितीनुसार, समीर तिला खूप मारहाण करायचा. त्यामुळे ती त्याला कंटाळली होती."
"मग तिनं तिचा प्रियकर इम्रान याला याबद्दल सांगितलं आणि त्यांनी समीरची हत्या करण्याचा कट आखला."

फोटो स्रोत, Bhargav Parikh
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान आधी त्याचे दोन चुलत भाऊ रहीम शेख (वय 22) आणि मोहसिन पठाण (वय 20) यांच्याशी बोलला. मग त्यानं या हत्येच्या कटात त्या दोघांनाही सामील करून घेतलं.
एक वर्षभरापूर्वी रात्रीच्या वेळेस समीर त्याच्या घरात झोपलेला होता. त्यावेळेस इम्रान, रूबी, रहीम आणि मोहसिन या चौघांनी मिळून समीरची हत्या केली. त्यानंतर त्यांची समीरच्याच घरातील स्वयंपाकघरात खड्डा खोदून त्यात त्याचा मृतदेह पुरला, त्यावर मीठ ओतलं आणि मग तो बुजवून त्यावर पुन्हा टाईल्स लावल्या.
पोलिसांनी कार्यकारी दंडाधिकारी आणि एफएसएल तज्ज्ञांच्या उपस्थितीत हा खड्डा खोदला, तेव्हा त्यांना तिथे समीरचे केस, हाडं आणि स्नायूंचे अवशेष सापडले. पोलिसांनी हे अवशेष डीएनए चाचणीसाठी पाठवले.
उपायुक्त राजियन म्हणाले, "आम्ही जेव्हा रूबिनाचा प्रियकर इम्रान याला याबद्दल विचारलं, तेव्हा सुरूवातीला त्यानं काहीही सांगितलं नाही. मात्र दीर्घकाळ चौकशी केल्यानंतर त्यानं त्याचा गुन्हा कबूल केला."
इम्राननं पोलिसांनी सांगितलं की त्याच्या दुसऱ्या पत्नीला त्याच्या आणि रूबीच्या संबंधांबद्दल कळल्यापासून ती रूबीशी वारंवार भांडत असे. त्यामुळे ते वेगळे राहत होते.
पोलिसांना हत्येची माहिती कशी मिळाली?
एक वर्षभर, समीरच्या हत्येबद्दल कोणालाही माहित नव्हतं. अगदी त्याच्या कुटुंबानंदेखील त्याची चौकशी केली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल शकील मोहम्मद यांना त्यांच्या एका खबऱ्यानं माहिती दिली की, फतेहवाडी परिसरातील अहमदी रो हाऊसमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा पती वर्षभरापासून बेपत्ता आहे. मात्र यात काहीतरी संशयास्पद गोष्ट आहे. ही टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

फोटो स्रोत, Bhargav Parikh
गुन्हे शाखेचे इन्स्पेक्टर एस. जे. जाडेजा यांनी बीबीसीला सांगितलं की "आम्हाला माहिती मिळाली की समीर बिहारी आणि रूबी आठ वर्षांपूर्वी बिहारमधून अहमदाबादला पळून आले होते. आम्ही रूबीला समीरबद्दल विचारलं. तेव्हा रूबी म्हणाली की तिचा पती पैसे कमवण्यासाठी दुबईला गेला आहे."
"शेजाऱ्यांनी सांगितलं की रूबी आधी इथेच राहत होती. मात्र नंतर ती तिचा प्रियकर इम्रानबरोबर दुसरीकडे राहायला गेली होती. त्यानंतर आमचा संशय आणखी बळावला."

फोटो स्रोत, Bhargav Parikh
पोलीस उपायुक्त अजित राजियन यांनी बीबीसीला सांगितलं की, "आठ वर्षांपूर्वी, हे अकल्पनीय होतं की एक जोडपं त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न करेल, अहमदाबादला येईल, अहमदाबादमध्ये घर बांधेल, गवंडी काम करेल आणि मग त्यांच्या दोन मुलांना मागं सोडून, तो माणूस दुबईला जाईल. हे अकल्पनीय होतं की इम्रानला आधीच दोन बायका असताना, रूबी ही त्याची तिसरी पत्नी होईल."
रूबीनं पोलिसांना सांगितलं की हत्येच्या दोन महिन्यांनंतर, ती तिच्या मुलांसोबत त्याच घरात राहिली. तिनं पतीला ज्या स्वयंपाकघरात पुरलं होतं, तिथेच तिनं स्वयंपाकदेखील केला.
मात्र शेजारी तिला सतत विचारत होते की तिचा पती समीर बिहारी कधी परत येणार आहे. त्यामुळे तिनं घर भाड्यानं घेतलं आणि ती इम्रानबरोबर त्याची तिसरी पत्नी म्हणून राहायला गेली.
तरुण नातलगांचीही घेतली मदत
पोलिसांना माहिती मिळाली की समीर बिहारीचं पूर्ण नाव इसराएल अकबरअली अन्सारी आहे आणि तो 2016 मध्ये रूबीशी लग्न करण्यासाठी गावातून पळून गेला होता. त्यानंतर गावातील कोणाशीही समीरचा कोणताही संपर्क राहिला नव्हता.
शबीनाबेन नावाची समीरच्या शेजारी राहणारी एक महिला म्हणाली, "समीर या भागात 2018 मध्ये राहायला आला होता. तो गवंडी काम करून चांगली कमाई करत होता. कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊनमुळे जेव्हा काम बंद पडलं होतं, तेव्हा त्याला आर्थिक अडचण निर्माण झाली होती."
"त्याच काळात, इम्रान त्याच्या पहिल्या पत्नीला सोडून त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत इथे आला. तो सढळपणे पैसे खर्च करत होता. त्यावेळेस, रूबी आणि इम्रान प्रेमात पडले, सोसायटीमधील प्रत्येकालाच याची माहिती होती."

फोटो स्रोत, Bhargav Parikh
त्या पुढे म्हणाल्या, "समीर बेपत्ता झाल्यानंतर, रूबीनं त्याचे कपडे जाळून टाकले आणि लोकांना सांगितलं की तिचा पती तिला सोडून पैसे कमावण्यासाठी दुबईला गेला आहे. रूबीचं इम्रानच्या दुसऱ्या पत्नीशी भांडण होत असे. समीर बराच काळ बेपत्ता होता. मात्र समीरची हत्या झाली असेल याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती."
फतेहवाडीमधील इम्रानचे शेजारी खालिद शेख यांनी बीबीसीला सांगितलं की, "इम्रान रंगकाम करायचा. तो कंत्राटं घ्यायचा. तो त्याच्या नातेवाईकांना काम मिळवून देण्यासाठी आणि त्यांना पैसे उसनवार देण्यासाठी अहमदाबादला बोलावत असे. त्याला आधीच एक पत्नी होती आणि नंतर त्यानं दुसरं लग्न केलं होतं."

फोटो स्रोत, Bhargav Parikh
समीरच्या हत्येच्या प्रकरणात इम्रानचा मामा रहीम यालादेखील अटक करण्यात आली आहे. रहीम मोडासामधील कुकरी गावचा रहिवासी आहे.
त्याच्या गावातील एका नातेवाईकानं सांगितलं की, "इम्रान जेव्हा गावी यायचा, तेव्हा सढळपणे पैसे खर्च करायचा. त्यामुळे अनेकजण त्याच्याबरोबर काम करण्यासाठी अहमदाबादला यायचे."
रहीमला (22 वर्षे) या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचं कळताच धक्का बसला.
इम्रानचा चुलत भाऊ मोहसिन याचंही नाव या हत्येच्या प्रकरणात समोर आलं आहे.
त्याच्या कुटुंबातील एक सदस्य, इम्तियाज पठाण यानं बीबीसीला सांगितलं की, "इम्राननं मोहसिनला एक टेम्पो दिला होता आणि त्यावर ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवलं होतं."
"सणासुदीला जेव्हा तरुण गावी येत असत, तेव्हा इम्रानच्या दयाळूपणामुळे पैसे कमावण्याबद्दल बोलत असत. इम्राननं केलेल्या मदतीच्या ओझ्याखाली मोहसिन जाळ्यात अडकला होता, असं दिसतं."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











