रवीश कुमार म्हणतात, मी मराठी लोकांकडून भाषा आणि संस्कृतीचा आदर करायला शिकलो

रवीश कुमार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रवीश कुमार
    • Author, मुकेश शर्मा
    • Role, डिजिटल एडिटर, बीबीसी इंडिया

"एनडीटीव्हीमधून बाहेर पडणं हा योग्यवेळी घेतलेला योग्य निर्णय आहे आणि हा निर्णय घेतल्याचं आपल्याला काहीही दुःख वाटत नाही", असं प्रसिद्ध पत्रकार आणि एनडीटीव्हीचे माजी सूत्रसंचालक रवीश कुमार यांनी सांगितलं आहे. 

बीबीसी हिंदीसाठी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रवीश यांनी अदान-अंबानी, रॉय दाम्पत्य, मोदी सरकारपासून राजकारणात येण्याबद्दलच्या शक्यता याबद्दल चर्चा केली. 

एनडीटीव्हीची खरेदी करणं हा काही एक व्यावसायिक निर्णय नव्हता असं त्यांनी मत मांडलं आहे. 

व्हीडिओ कॅप्शन, रवीश कुमार यांनी बीबीसीसोबत मुलाखतीत अनेक प्रश्नांवर सविस्तर आणि मनमोकळी उत्तरं दिली.

केवळ आपल्याला लक्ष्य करण्यासाठी त्यांनी एनडीटीव्हीची खरेदी केली, हे रवीश यांनी या मुलाखतीत परत एकदा सांगितलं. 

अर्थात करण थापर यांना दिलेल्या एका मुलाखतीत आपण काही गोष्टी रागारागाने आणि आवेशात नक्कीच सांगितल्या होत्या पण त्या चूक नव्हत्या असंही रवीश या मुलाखतीत म्हणाले.

रवीश कुमार
फोटो कॅप्शन, रवीश कुमार आणि बीबीसी इंडियाचे डिजिटल एडिटर मुकेश शर्मा

राजीनामा दिल्यावर रवीश यांनी अजित अंजुम आणि करण थापर यांना मुलाखत दिली आहे.

रवीश कुमार स्वतःला ब्रँड समजतात का?

अजित अंजुम आणि थापर यांना दिलेल्या मुलाखतीनंतर रवीश स्वतःला एनडीटीव्हीपेक्षा मोठा ब्रँड समजत आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे.

हाच प्रश्न बीबीसीच्या मुलाखतीत विचारण्यात आला.

यावर रवीश म्हणाले, “करण थापर यांनी हे विचारलं तेव्हा मी आवेशात, मला लक्ष्य करण्यासाठी त्यांनी एनडीटीव्हीची खरेदी केली, असं बोलून गेलो. पण मी चुकीचं बोललो नाही. हा काही अहंकाराचा मुद्दा नाही. एखाद्या मुलाखतीत जर मी रागाने बोललो तर हे बोलणं अहंकारपूर्ण आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. मी स्वतःला काय समजत आहे हे महत्त्वाचं नाहीये.”

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

ते पुढं सांगतात, की कंपनी खरेदी करण्याची कारणं काहीही असतील. परंतु डॉ. रॉय स्वतः बाजारात गेलेत आणि मी कंपनी विकतोय असं त्यांनी सांगितल्याचं, आतापर्यंत तरी पुढं आलेलं नाही. डॉ. रॉय आपली बाजू सांगत राहातील, मी माझी बाजू मांडत राहिन. 

“त्यांना कशापद्धतीने ईडीच्या कार्यालयात बसवून ठेवलं गेलं. कशा पद्धतीने केस तयार केली गेली. पण 10 वर्षांत काहीच बाहेर निघालं नाही. त्यानंतर माध्यमं ज्या व्यक्तीला सरकारच्या जवळची मानतात ती व्यक्ती चॅनल खरेदी करायला येते.

एका विमानप्रवासात अदानी आणि पंतप्रधान होऊ घातलेले मोदी एकत्र बसल्याचा फोटोही आहे आणि त्यांची घनिष्ठता असल्याची धारणा पक्की व्हायला हा फोटो पुरेसा आहे.”

रवीश कुमार यांनी राजीनामा का दिला?

याचं उत्तर देताना रवीश यांनी 25 नोव्हेंबर रोजी फायनान्शियल टाइम्सला गौतम अदानींनी दिलेल्या मुलाखतीचा उल्लेख केला. 

या मुलाखतीत अदानी म्हणाले होते, “सरकारवर टीका करू शकता पण सरकार जर चांगलं काम करत असेल त्यांचं कौतुक करण्याचं धाडसी असलं पाहिजे.”

रवीश म्हणाले, “ हे सांगणं मला एक संपादकीय आदेश वाटले. ज्यांना तसं वाटलं नाही ते आजही तिथं काम करत आहेत. पण हा इशारा मलाही आहे असं मला वाटलं.”

ते पुढं सांगतात, “मध्यंतरी असं वाटायचं की हा देश काही इतका कमकुवत नक्कीच नसेल. पत्रकारांना सहन करता येणार नाही इतके उद्योगपती कमजोर असतील असं वाटलं नव्हतं. पण हे उद्योजकच भित्रे निघाले. माझ्यासाठी दरवाजे बंद झाले आहेत. युट्यूबसारखं माध्यम नसतं तर या व्यवसायातून मला 10 रुपयेही कमवता आले नसते.” 

गौतम अदानी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गौतम अदानी

या मुलाखतीत रवीश कुमार यांनी रॉय दाम्पत्याला फक्त सावरुन घेतलं असं नाही तर त्यांचं भरपूर कौतुकही केलं.

‘कामकाजात एनडीटीव्हीच्या व्यवस्थापनाने कधीही ढवळाढवळ केली नाही’

रवीश कुमार यांच्यामते, त्यांना याची फारशी तांत्रिक माहिती नाही, पण प्रणय रॉय यांनी कर्ज फेडण्यासाठी आणि चॅनल वाचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले होते असं ते सांगतात. 

ते सांगतात, त्यांनी एनडीटीव्हीतले आपले शेअर विकले नाहीत कारण त्यामुळे डॉ. रॉय यांना वाईट वाटलं असतं असं त्यांना वाटलं.

जो भाषांतरकार आणि वाचकांची पत्रं निवडणारा माणूस आपल्याकडे काम करत होता तो कंपनीची प्रगती झाल्यावर संधी साधून पैसे कमवू लागला असं त्यांना वाटेल म्हणून आपण शेअर विकले नाहीत. 

रवीश म्हणतात, “आज त्यांना किती एकटं वाटत असेल, हे दुःख मी समजू शकतो.” 

रवीश सांगतात, की एनडीटीव्ही व्यवस्थापन किंवा डॉ. रॉय यांनी कधीही त्यांच्या कामात हस्तक्षेप केला नाही.

प्रणय रॉय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रणय रॉय

ते म्हणतात, रॉय यांनी कधीही काय करा किंवा काय करू नका, कोणती बातमी करता कामा नये याबद्दल काहीच सांगितलं नाही. रॉय कधी संपादकीय बैठकांतही यायचे नाहीत असं रवीश सांगतात.

अर्थात प्राइमटाइम शोसाठी एनडीटीव्हीचे कर्मचारी आणि बाहेरच्या लोकांशी चर्चा मात्र करायचे, असं रवीश स्पष्ट करतात. 

एकदा स्क्रीन काळी ठेवण्याचा निर्णयही आपला होता आणि त्यांना याबद्दल कोणीही विचारले नाही. दुसरे कार्यक्रम करणारे लोकही असं आम्हीपण करू काय असं विचारत होते, असं रवीश सांगतात.

एनडीटीव्हीत काम करताना रॉय यांचे काही अत्यंत वाईट अनुभवही आल्याचं रवीश सांगतात. याबद्दल आपण काहीच का बोलू शकलो नाही असा विचार करुनही त्रास होतो असं ते म्हणतात. 

प्रणय रॉय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रणय रॉय

अर्थात येत्या काळात ‘एखाद्या प्रणय रॉयला कोणा पत्रकारात रवीश कुमार होण्याची शक्यता दिसावी’ म्हणून आपण कोणतीही अशी गोष्ट सार्वजनिकरित्या सांगणार नाही.

पत्रं निवडणाऱ्या मुलाला एवढ्या वरती आणून चूक केली, असं त्यांना वाटेल अशी कोणतीही गोष्ट मी करणार नाही, असं रवीश यांनी म्हटलं.

चॅनल विकल्यावर काम करण्याचं स्वातंत्र्य मिळणार नाही असं का वाटलं?

याबद्दल रवीश सांगतात, "मुद्दा फक्त स्वातंत्र्याचा नाही. जो माणूस तिथं येतोय त्यांची काय ओळख आहे? बाजारात त्यांची काय ओळख आहे? तुम्ही कोणीही असाल पण तुम्ही प्रणय रॉय तर होऊ शकत नाही ना? प्रणय यांची जागा जे लोक आता घेत आहेत ते लोक कोण आहेत? मी त्यांच्याकडून पत्रकारितेचे धडे घेऊ काय?” 

राजीनाम्याचं असं काही स्पष्ट कारण नसतं. पण राजीनाम्यांना आपापली अशी एक वेगळी नैतिक परिस्थिती असते. 

गौतम अदानींच्या मुलाखतीचा उल्लेख करुन रवीश कुमार म्हणतात, “सरकारचं कौतुक करायचं धाडस पाहिजे असं म्हणणं ही अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे. 99 % माध्यमं तेच करत आहेत. ते असं सांगतायत की भरपूर लोक सरकारवर टीका करत आहेत, कोणीच कौतुक करत नाहीयेत म्हणून कौतुक करण्यासाठी एनडीटीव्ही खरेदी केलं जातंय.” 

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नरेंद्र मोदी

रवीश कुमार मोदी सरकारवर सतत टीका करतात, अशी सातत्याची टीका संतुलित पत्रकारिता या पत्रकारितेच्या मूळ तत्वाला डळमळीत करतात असा त्यांच्यावर आरोप होतो. 

यावर रवीश म्हणतात, "मी केलेली सर्व टीका संतुलित आहे. केंद्र सरकार एकच आहे. ते संतुलित करण्यासाठी मी 28 राज्यांत जाऊन बातम्या कराव्या का ? स्वतःला संतुलित सिद्ध करता येईल अशीच बातमी करावी अशी अपेक्षा तुम्ही पत्रकाराकडून करत आहात. ही मनमानी आहे.”

ते पुढं सांगतात, “ज्याप्रकारे मीडियाचं रुपांतर गोदी मीडियात झालंय. ते पाहाता मी नसतो तर टीव्हीवर कोण उभं राहिलं असतं? अशा काळात संतुलनाच्या नावाखाली मी शांत राहिलो असतो का?”

सरकारला पत्रकारांकडून कौतुकाची अपेक्षा का?

ते म्हणाले, “टीव्हीद्वारे लोकशाहीची हत्या होत असल्याचं मी पाहात होतो. तेव्हा मी असा टीव्ही तुम्ही कसा पाहू शकता असं विचारलं.” 

आपलं म्हणणं कवितेद्वारे समजावताना ते म्हणाले, “बहुतेक चांगल्या कवितांमध्ये गप्प बसणंच मान्य केलेलं असतं. बहुतेक कवितांमध्ये विरोधाचा प्रखर सूर असतो. माझ्या विरोधाचा सूर हा प्रश्न विचारणारा सूर होता. विरोधाचा सूर नव्हता.”

रवीश कुमार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रवीश कुमार

ते म्हणाले, "सरकार आपली बाजू मांडायला कोट्यवधी रुपये खर्च करतं. त्यामुळे पत्रकार या नात्यानं आपण लोकांचा पक्ष मांडण्यासाठी पत्रकारिता करायला हवी आणि आपण फक्त पत्रकारिताच करत होतो, मात्र त्यांना मोदीविरोधी म्हटलं गेलं."

"जर माझ्या तोंडून त्यांना कौतुक ऐकायचं होतं तर भाजपाने त्यांच्या प्रवक्त्यांना माझ्या शोमध्ये जायला मनाई का केली होती," असा प्रश्न ते विचारतात. 

रवीश राजकारणात येणार का?

याचं उत्तर देताना रवीश यांनी आपले अनेक मित्र आणि हितचिंतक आपण राजकारणात आलं पाहिजे असं सांगत असल्याचं म्हणतात.

पण कोणत्याही राजकीय पक्षानं त्यांना अद्याप आमंत्रण दिलेलं नाही. 

ते सांगतात, कल्पना करा, “मी लोकसभेत आहेत, त्यांच्या (मोदींच्या) समोर आहे. लोकसभा तरी कोणी खरेदी करू शकणार नाही ना. 

परंतु ते म्हणतात, अर्थात तुमच्या स्वप्नात येईल तेच काम करावं. माझ्या स्वप्नातही टीव्हीच येतो. जेव्हा हे स्वप्न बदलेल त्या दिवशीच मी बदलेन.”

बरखा दत्त

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बरखा दत्त

त्यांच्या एनडीटीव्हीमधल्या माजी सहकारी बरखा दत्त यांनी एक ट्वीट केलं होतं.

त्यात त्या म्हणाल्या होत्या, “जेव्हा मुकेश अंबानी एनडीटीव्हीचे 30 टक्के मालक होते तेव्हा एनडीटीव्ही स्वतंत्र होतं आणि तेच 30 टक्के अदानींनी खरेदी केले तेव्हा एनडीटीव्ही संपुष्टात आलं.” 

याला उत्तर देताना रवीश कुमार यांनी एक किस्सा ऐकवला.

रवीश सांगतात, बरखा दत्त यांना एनडीटीव्हीच्या ऑफिसमध्ये चक्कर आली तेव्हा प्रणय रॉय त्यांचे तळवे चोळताना मी पाहिलं आहे. 

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मुकेश अंबानी यांनी 30 टक्के मालक असणं आणि अदानी नवे मालक होणं यातला फरक समजावताना

रवीश म्हणतात, “मुकेश अंबानी यांचा कोणी संपादक न्यूज रुममध्ये आला नव्हता. त्यांचा कोणी माणूस बैठकांत आला नव्हता. त्यांनी कधीही सरकारचं कौतुक करायला धाडस लागतं असं वक्तव्य केलं नव्हतं. अल जझिरासारखा ग्लोबल ब्रँड करू असं ते कधी म्हणाले होते का?”

रवीश कुमार पुढे काय करणार?

याचं उत्तर देताना ते म्हणाले जगभरातले लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. या लोकांच्या पाठिंब्यामुळेच त्यांचं युट्यूब चॅनल अल्पावधीत इतकं लोकप्रिय झालं आहे.

 ते म्हणाले, “जे लोक लोकशाहीला मारण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आपण अजून जिवंत आहोत असं मला सांगायचं आहे.” 

सध्या आपण यूट्यूब चॅनलच चालवू, ग्राऊंड रिपोर्टसाठी आवश्यक सामग्री सध्या आपल्याकडे नसल्याचं ते सांगतात. 

रवीश कुमार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रवीश कुमार

हळूहळू पायऱ्या चढत जायचं आहे असं ते सांगतात. त्यांनी एक भोजपुरी युट्यूब चॅनलही सुरू केलं आहे. आपली मातृभाषा हिंदी नसून भोजपुरी आहे. असं ते सांगतात.

आपली भाषा आणि संस्कृतीचा सन्मान करणं आपण मराठी लोकांकडून शिकलो, असं ते सांगतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)