भारतात राहायचं की पाकिस्तानात? वादाचं रुपांतर मृत्यूच्या दारात; नवी मुंबईतलं हे प्रकरण काय?

- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
(यातील काही मजकूर तुम्हाला विचलित करू शकतो)
नवी मुंबईच्या खारघर परिसरात सोमवारी (9 जून) एक धक्कादायक घटना उघडकीस आली.
सोमवारी सकाळी एका व्यक्तीनं राहत्या घरी स्वतःच्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर चाकूने वार करून आत्महत्या केली, असं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं पोलिसांना सांगितलं.
या घटनेमुळं खारघरसह नवी मुंबईत सर्वत्र एकच खळबळ उडाली. खारघर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
नक्की प्रकरण काय आहे?
9 जून 2025 रोजी सोमवारी सकाळची वेळ होती. नवी मुंबईतील खारघर सेक्टर 34 मधील डॉल्फिन प्राईड सोसायटीत दुसरा मजल्यावर सचदेव हे दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह गेल्या 6 महिन्यांपासून वास्तव्यास होते.
सोमवारी 10 वाजण्याच्या सुमारास सपना सचदेव (35) आणि नोतनदास उर्फ संजय सचदेव (42) यांची मुलं क्लास व शाळेतून घरी आली. त्यावेळी पती-पत्नी हे घरीच होते. मुलांनी आल्यावर घराची बेल वाजवली, पण त्यांना आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

मुलांनी आईवडिलांना बाहेरून आवाज दिल्यानंतरदेखील दरवाजा उघडला नाही. त्यामुळे मुलांनी शेजाऱ्यांच्या मदतीनं खारघर सेक्टर-6 मध्ये राहणारी सपना यांची बहिण संगीता सेवक माखीजा (46) यांना कॉल केला. त्यानंतर संगीता मखीजा या डॉल्फिन प्राइड सोसायटीत आल्या. शेजाऱ्यांच्या मदतीने नातेवाईक घरामध्ये दुसऱ्या खिडकीतून शिरले.
तेव्हा सचदेव पती-पत्नी दोघांचेही रक्ताच्या थारोळ्यात माखलेले मृतदेह दिसून आले. तसेच, पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केल्याचा हा सर्व प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी
या घटनेनंतर आसपासच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला. शेजारीपाजारी जमले आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती कळवली.
खारघर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाताच ते घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. घटनेसंदर्भात आणि या दोन व्यक्तींसंदर्भात पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली. तसेच घटनास्थळावरून काही साहित्य ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
स्वयंपाकघरातील चाकूने केले वार
पोलीस तपासात समोर आले आहे की, नोतनदास यांनी अज्ञात कारणातून पत्नी सपना यांच्याशी वाद घातला आणि त्या वादाच्या दरम्यान स्वयंपाकघरातील धारदार चाकूने सपनाच्या गळ्यावर, पाठीवर आणि खांद्यावर वार करून तिचा जीव घेतला. त्यानंतर त्यांनी स्वतःच्याही गळ्यावर चाकूने वार केले, ज्यात त्यांचा देखील मृत्यू झाला.
सहदेव दाम्पत्य मुळचे पाकिस्तानचे
मूळ पाकिस्तानमध्ये राहणारे, नोतनदास सचदेव (40) व त्यांची पाकिस्तानी नागरिक असलेली पत्नी सपना सचदेव (35) दोन मुलांसोबत 6 महिन्यांपूर्वी भारतात आले होते. दोघेही पती-पत्नी हिंदू आहेत. त्यांना एक 10 वर्षांचा तर एक 6 वर्षांचा मुलगा आहे.
ते नोव्हेंबर 2024 मध्ये शॉर्ट टर्म व्हिजिट व्हिसावर भारतात आले होते. मागील 6 महिन्यांपासून दोन मुलांसह खारघरमध्ये भाड्याच्या घरात वास्तव्यास होते.

अनेकदा पती-पत्नीमध्ये विविध कारणांवरून वाद व्हायचा. त्यात सपनाला पुन्हा पाकिस्तानमध्ये जायचे होते आणि नोतनदास मात्र भारतात राहण्यास इच्छुक होता. यावरून दोघांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होते.
याच वादातून सोमवारी नोतनदासने सपनावर चाकूने अनेक वार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकांनी देखील याबाबत माहिती दिल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
यापूर्वी झालेल्या वादावेळी पोलीस पोहोचले मात्र...
उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी या घटनेसंदर्भात माहिती देताना म्हटलं, "याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रथमदर्शनी या घटनेत असं दिसून आलं की, पतीने पत्नीची चाकूने हत्या केली आणि त्यानंतर स्वतः देखील चाकूनं वार करत आत्महत्या केली. हे दोघेही हिंदू नागरिक आहेत. ते शॉर्ट टर्म विजावर भारतात आले होते."
"सपना सचदेव यांच्या दोन्ही बहिणी भारतात राहायला आहेत. लग्न झाल्यापासून पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद व्हायचा, अशी माहिती नातेवाईकांनी दिली."
"संजय सचदेव हा रागीट स्वभावाचा होता. तो पत्नी सपनाला नेहमी मारहाण करायचा. त्यामुळे सपनाला परत पाकिस्तानात जायचं होतं. मात्र संजय भारतातच राहण्यासाठी इच्छुक होता. या कारणावरून दोघांमध्ये वाद व्हायचा, अशी माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली," असंही त्यांनी नमूद केलं.

मोहिते या प्रकरणाविषयी माहिती देताना पुढे म्हणाले, "यापूर्वी 25 मे रोजी देखील त्यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यावेळी त्याने पत्नीला मारहाणही केली होती. त्यावेळी 100 नंबरवर या संदर्भात कॉल आला होता."
"त्यानुसार कंट्रोल रूमच्या सूचनेने पोलीस तिथे दाखल झाले होते. मात्र पत्नीने तिथे गेल्यावर तक्रार देण्यास नकार दिला. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे."
सपना नोतनदास आणि त्यांचे पती नोतनदास हे दोघेही पाकिस्तानातील मूळ रहिवासी होते. दोघांचे व्हिसा आणि ओळखपत्र याच्या आधारे तपासणीसाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
नवी मुंबई खारघर पोलीसानी कलम 103(1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. नातेवाईक व इतर माध्यमातून पोलीस अधिक तपास करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सपना आणि नोतनदास यांच्या दोन्ही मुलांना सध्या मृत सपना यांच्या बहिणीकडे म्हणजेच संगीता मखिजा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











