पुरुषांमध्येही 'मेनोपॉज' असतो? त्याला काय म्हणतात? त्याची लक्षणं काय असतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सिराज
- Role, बीबीसी तमिळ
स्त्रीरोगतज्ज्ञ निवेदिता कामराज सांगतात की, "स्त्रियांच्या आयुष्यात तीन टप्पे खूप महत्त्वाचे असतात. एक म्हणजे तारुण्य, दुसरं गर्भधारणा आणि तिसरं रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज. पण रजोनिवृत्तीच्या पहिल्या दोन टप्प्यांना महत्त्वच दिलं जात नाही."
मेनोपॉज ही स्त्रीच्या शरीरात घडणारी शेवटची गोष्ट आहे. बहुतेक स्त्रियांमध्ये 45 ते 55 वयादरम्यान मेनोपॉज येतो. त्यांचे हार्मोन्स बदलतात आणि त्यांची पाळी कधी लवकर येते , तर कधी येतच नाही.
यासोबतच महिलांना इतरही अनेक समस्या येतात. जसं की कशातही रस नसणे, सांधेदुखी, गुप्तांगात कोरडेपणा.
पण मेनोपॉजचं नेमकं वय काय? त्यामुळे शरीरात कोणत्या प्रकारची लक्षणे उद्भवतात? त्या लक्षणांचे परिणाम काय असतात? आणि आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा कसा परिणाम होतो?
मेनोपॉजच्या काळात वैवाहिक संबंधांमध्ये रस नसतो हे खरं आहे का? ही अनिच्छा दूर करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा का?
स्त्रियांप्रमाणे पुरुषांना मेनोपॉज होतो का? या प्रश्नांची उत्तरं या लेखामध्ये आपण पाहू.
मेनोपॉजमुळे लैंगिक जीवनात कोणते बदल होतात?
स्त्रीरोगतज्ज्ञ निवेदिता कामराज स्पष्ट करतात की, "इस्ट्रोजेन हे मुख्य हार्मोन आहे ज्यामुळे स्त्रियांना मासिक पाळी येते. जेव्हा हे हार्मोन कमी होतं तेव्हा अंड्यांची निर्मिती कमी होते आणि शेवटी थांबते. जर सलग 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ मासिक पाळी येत नसेल तर त्याला मेनोपॉज म्हणतात."
त्यांनी पुढे सांगितलं की, "इस्ट्रोजेनचा स्त्रियांच्या शरीरावर डोक्यापासून पायापर्यंत परिणाम होतो. जेव्हा या हार्मोनची कमतरता भासू लागते तेव्हा मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर परिणाम होतो. हे परिणाम मेनोपॉज सुरू होण्यापूर्वी आणि नंतर देखील जाणवतात.
मानसिक थकवा, निद्रानाश, हाडांची झीज झाल्यामुळे सांधे व पाठदुखी, शरीराचे तापमान अचानक वाढणे, लठ्ठपणा, केस गळणे आदी गोष्टी जाणवू लागतात.
डॉ. निवेदिता कामराज सांगतात,"परिणामी जननेंद्रियामध्ये कोरडेपणा येतो. इस्ट्रोजेन हे असं हार्मोन आहे जे योनीमध्ये ऊतींची निर्मिती करतो. जेव्हा हे हार्मोन कमी होतं तेव्हा योनी कोरडी पडते. यामुळे जननेंद्रियांमध्ये अस्वस्थता आणि वेदना होतात. रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या वैवाहिक जीवनात रस कमी होण्याचे हे एक कारण आहे."

फोटो स्रोत, Getty Images
"कमी इस्ट्रोजेनचा थेट परिणाम शारीरिक संबंधांवर होतो. एक महिला माझ्याकडे उपचारासाठी आली होती. वयाच्या 49 व्या वर्षी तिला रजोनिवृत्ती झाली. माझ्याकडे उपचारासाठी येण्यापूर्वी ती प्रचंड नैराश्यात होती."
लैंगिक इच्छा कमी झाल्यामुळे तिला आणि तिच्या पतीला अनेकदा समस्या येत होत्या. त्यामुळे त्यांच्या मानसिक थकव्यात भर पडली. निद्रानाश होऊ लागला. यामुळे मनात आत्महत्येचे एकापेक्षा जास्त विचार येऊ लागले.

त्यांच्या एका मित्राने माझ्याविषयी सांगितलं आणि ते माझ्याकडे उपचारासाठी आले. आम्ही त्यांना हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी सुरू केली.
हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही इस्ट्रोजेन स्राव बदलणाऱ्या औषधांसह गंभीर लक्षणे नियंत्रित करण्याची एक पद्धत आहे.
आता काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांचं सामान्य आयुष्य सुरू झालं आहे. रजोनिवृत्ती म्हणजे काय हे अनेकांना समजत नाही. रजोनिवृत्तीशी संबंधित सर्व समस्या निश्चितपणे बऱ्या केल्या जाऊ शकतात.
बरेच लोक त्यांच्या आयुष्यात कधीही डॉक्टरकडे जात नाहीत. मेनोपॉजदरम्यान शरीरात होणाऱ्या बदलांमुळे तुमच्या आयुष्यावर परिणाम होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका, असं स्त्रीरोगतज्ज्ञ निवेदिता कामराज म्हणतात.
कोणत्या वयात लैंगिक आवड नैसर्गिक असते?
"वय कितीही असू दे, स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही लैंगिक इच्छा असतात. त्यामुळे रजोनिवृत्तीला वैवाहिक नातेसंबंधात दुरावा येण्याचे कारण म्हणून पाहिले जाऊ नये," असं सेक्सोलॉजिस्ट कामराज सांगतात.
"इस्ट्रोजेन हार्मोन कमी झाल्यामुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे महिलांचं आयुष्य प्रभावित होतं. तुमचं मन आणि शरीर निरोगी असेल तर तुमचं वैवाहिक जीवन देखील यशस्वी होईल."
याव्यतिरिक्त, जननेंद्रियाच्या भागात कोरडेपणामुळे संभोग करताना तीव्र वेदना होतात आणि लैंगिक संबंधाविषयी भीती निर्माण होते. आपल्या देशात एक सामान्य समज आहे की जोडप्यांमधील लैंगिक संबंध एका विशिष्ट वयापर्यंत मर्यादित असावेत, मग त्यांनी मुलांच्या जीवनाकडे बघून अध्यात्माकडे वाटचाल करावी असं म्हटलं जातं.

फोटो स्रोत, AAKASHFERTILITYCENTRE
"रजोनिवृत्तीच्या वेळी जे बदल घडतात त्यावर आता औषधं आणि उपचार उपलब्ध आहेत. सर्वात महत्वाच्या उपचारांपैकी एक म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, जी बरेच लोक घेतात आणि सामान्य जीवन जगतात. ही थेरपी घेतल्याने रजोनिवृत्तीशी संबंधित अनेक समस्या दूर होतात."
जननेंद्रियाच्या कोरडेपणासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत. कंडोम कंपन्या यासाठी खास कंडोम बनवतात. हाडांची झीज होण्यासाठी आम्ही औषधे आणि निरोगी पदार्थांची शिफारस करतो.
थेरपी घेतल्यानंतर एक वर्षाने पती-पत्नीमध्ये लैंगिक संबंध सामान्य होतात. त्यामुळे रजोनिवृत्तीशी संबंधित समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
शारीरिक संबंधात स्वारस्य नसणं म्हणजे काहीतरी चुकीचं आहे असा विचार करू नये. शारीरिक संबंधांमुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो असं डॉ. कामराज म्हणतात.
पुरुषांनाही मेनोपॉज येतो?
"या हार्मोनल समस्या पुरुषांवरही परिणाम करतात. याला एंड्रोपॉज म्हणतात आणि याला 'पुरुषांमधली रजोनिवृत्ती' असं म्हटलं जात असल्याचं सेक्सोलॉजिस्ट कामराज म्हणतात.
"जेव्हा पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी होतं, तेव्हा स्मरणशक्ती कमी होऊ लागते, इरेक्टाइल डिसफंक्शन, स्नायू कमकुवत होणं, निद्रानाश, मानसिक थकवा, शारीरिक संबंधात रुची कमी होणे आणि शीघ्रपतन यांसारख्या समस्या उद्भवतात.
वयाच्या चाळीशीनंतर अनेकजण याला वृद्धत्वाची लक्षणे मानतात. परंतु एंड्रोपॉजच्या अवस्थेत असलेल्या पुरुषांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि शरीरातील हार्मोन्स वाढवण्यासाठी आवश्यक उपचार घ्यावेत. यामुळे त्यांचं दैनंदिन जीवनही सुधारेल.

फोटो स्रोत, Getty Images
रजोनिवृत्ती आणि एंड्रोपॉज दरम्यान पती-पत्नीने मनमोकळेपणाने बोललं पाहिजे. बरं, आपण वृद्ध होत आहोत आणि त्यामुळे लैंगिक संबंध टाळले पाहिजेत असा विचार करू नये. कारण या हार्मोनल समस्यांमुळे आरोग्य आणि मानसिक आरोग्यासंबंधित अनेक विकृत समस्या उद्भवू शकतात. 40-50 हे निवृत्त होण्याचं वय नाही.
रजोनिवृत्ती/अँड्रोपॉज या लैंगिक जीवनातील नकारात्मक गोष्टी म्हणून पाहिल्या जाऊ नयेत. या गोष्टींमुळे आपल्याला नवीन विवाहित जीवन सुरू करण्याची संधी मिळते.
जर तुम्ही चांगला वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य काळजी घेतली, तर वैवाहिक जीवनात वयाचा अडथळा येत नसल्याचं सेक्सोलॉजिस्ट कामराज सांगतात.











