इस्रायलने बंदी घातलेली संयुक्त राष्ट्रसंघाची UNRWA काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलने संयुक्त राष्ट्रसंघाच्या UNRWA वर बंदी घातलीय. देशामध्ये युनायटेड नेशन्सच्या पॅलेस्टेनियन रेफ्युजी एजन्सीला काम करण्यावर घातलेल्या बंदीचा इस्रायलने पुनर्विचार करावा, असं आवाहन करण्यात येतंय.
UNRWA म्हणजे United Nations Relief and Works Agency for Palestine Refugees in the Near East
UNRWA ही सध्या गाझाची लाईफलाईन आहे आणि या गाझापट्टीतली परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होतेय. अमेरिका, युके, जर्मनी या इस्रायलच्या मित्र राष्ट्रांसह इतर देशांनीही या बंदीबद्दल काळजी व्यक्त केलीय.
गाझामधल्या लोकांना मानवतावादी मदत देण्याचं आधीपासूनच कमी असलेलं प्रमाण, UNRWA वरच्या या बंदीमुळे आणखीन कमी होणार आहे. इस्रायलने मंजूर केलेल्या विधेयकांमुळे आता या संघटनेच्या वेस्ट बँकमधल्या कामावरही निर्बंध येणार आहेत. ही बंदी 3 महिन्यांसाठी घालण्यात आलीय.
याबद्दल UNRWAचे कमिशनर जनरल फिलीप लाझारिनी यांनी म्हटलंय, "UNRWAची बदनामी करण्यासाठी सध्या जी मोहीम सुरू आहे, त्यातलाच हा प्रकार आहे. या विधेयकांचा परिणाम म्हणून पॅलेस्टिनी नागरिकांचे हाल अजून वाईट होतील."
UNRWA काय आहे?
UNRWA म्हणजे युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रेफ्युजीज इन द निअर ईस्ट.
पॅलेस्टेनियन निर्वासित असलेल्या गाझा आणि इतर भागांमध्ये ही संस्था शाळा, आरोग्य केंद्र चालवते, अन्न पुरवठा करते आणि इतर सामाजिक सेवा पुरवते.
1948 च्या युद्धानंतर इस्रायलची निर्मिती झाली. या युद्धातल्या पॅलेस्टिनी निर्वासितांना मदत करण्यासाठी 1949 मध्ये UNRWAची स्थापना करण्यात आली.


'नकबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घटनेमध्ये तेव्हा सुमारे 7.5 लाख पॅलेस्टिंनींना स्वतःची भूमी सोडून जावं लागलं होतं.
'पॅलेस्टिनी निर्वासितांच्या चार पिढ्यांचा सामाजिक आणि मानवी विकास विकास करण्यात आपला हातभार असल्याचं' एजन्सीचं म्हणणं आहे.
UNRWAसध्याच्या घडीला काय करतंय?
आज सुमारे 59 लाख पॅलेस्टिनी निर्वासित हे UNRWAच्या सेवांसाठी पात्र आहेत. यापैकी 15 लाख निर्वासित हे UNRWAने मान्यता दिलेल्या 58 रेफ्युजी कॅम्पमध्ये राहत आहेत. जॉर्डन, लेबनॉन, सीरिया, गाझा पट्टी, वेस्ट वँक आणि ईस्ट जेरूसलेममध्ये हे रेफ्युजी कॅम्प्स आहेत.
UNRWA ने दिलेल्या माहितीनुसार वेस्ट बँकमध्ये 8,71,000 पेक्षा अधिक नोंदणीकृत निर्वासित आहेत. यापैकी 25% जण 19 रेफ्युजी कॅम्प्समध्ये राहतात.

फोटो स्रोत, Getty Images
जॉर्डनची राजधानी अम्मान आणि गाझामध्ये UNRWA चं मुख्यालय आहे. तर जॉर्डन, लेबनॉन, सीरिया, वेस्ट बँक (ईस्ट जेरुसलेमसह) आणि गाझा पट्टीमध्ये त्यांची फील्ड ऑफिसेस आहेत.
UNRWA गाझामध्ये काय करतं?
गाझामध्ये सुमारे 14 लाख निर्वासित आहेत आणि UNRWA ने मान्यता दिलेल्या 8 निर्वासित छावण्या आहेत.
युद्ध सुरू झाल्यापासून गाझाच्या 23 लाखांच्या लोकसंख्येपैकी बहुतेकांनी दक्षिणेकडे पलायन केलंय आणि किमान 10 लाख पॅलेस्टिनियन लोकांनी UNRWAच्या मदतीने आसरा घेतलाय.

फोटो स्रोत, Getty Images
UNRWAकडे 13,000 कर्मचारी असून ही संयुक्त राष्ट्रसंघांची गाझामधली सर्वात मोठी एजन्सी आहे. UNRWA आरोग्य आणि 300 प्राथमिक शाळांसह इतर शिक्षण संस्था चालवते. सोबतच शिक्षकांसाठीची ट्रेनिंग सेंटर्सही चालवते. पॅलेस्टेनियन मुलांसाठी UNRWA अभ्यासाची पुस्तकंही तयार करते.
UNRWAची शाळा ही गाझा शहरातलं शेल्टर - सुरक्षित निवारा म्हणूनही काम करते.
इस्रायल - गाझा युद्ध सुरू झाल्यापासून काय घडलंय?
7 ऑक्टोबरच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हवाई आणि जमिनीवरून हल्ले सुरू केल्यापासून 42,000 पेक्षा अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत. यात बहुतेक महिला आणि लहान मुलं आहेत.
गाझामध्ये आपले 231 कर्मचारी मारले गेल्याचं UNRWAने म्हटलंय.
संयुक्त राष्ट्रसंघांनी दिलेल्या माहितीनुसार गाझा पट्टीतली सुमारे 90% लोकसंख्या, म्हणजे किमान 19 लाख लोक हे याच भागात विस्थापित झालेय. अनेकांना पुन्हा पुन्हा विस्थापित व्हावं लागंलंय. काहींनी तर 10 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा जागा बदलली आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये उत्तर गाझावर नव्याने लष्करी हल्ले सुरू केल्यापासून या भागात कोणतीही मदत पोहोचू शकली नसल्याचं मानवतावादी मदत पुरवणाऱ्या संघटनांचं म्हणणं आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये गाझात मदत पोहोचवणारी व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचं इस्रायलची स्वतःची आकडेवारी सांगते.

फोटो स्रोत, Getty Images
7 ऑक्टोबरच्या हल्ल्यापूर्वी गाझामध्ये रोज 500 ट्रक्स मदतीचं सामान घेऊन जात होते. पण ऑक्टोबर 2024 च्या पहिल्या दहा दिवसांमध्ये रोज फक्त 30 ट्रक्सना परवानगी देण्यात आली. हा संघर्ष सुरू झाल्यापासूनचं हे सर्वात कमी प्रमाण आहे.
या भागातले सुमारे 18.4 लाख लोक हे प्रचंड मोठ्या अन्न दुर्भिक्षाला सामोरे जात असून त्यांच्यापैकी 6,64,000 जणांबाबत उपासमारीची आणीबाणीची परिस्थिती आहे तर 1,33,000 जण हे जीवघेण्या उपासमारीत असल्याचं युनायटेड नेशन्सच्या सहाय्याने चालणाऱ्या इंटिग्रेटेड फूड सिक्युरिटी फेज क्लासिफिकेशन - IPC ने म्हटलंय.
UNRWA ला निधी कुठून मिळतो?
स्वेच्छेने दिलेले पैसे आणि देशांनी दिलेल्या देणग्यांमधून UNRWAचं काम चालतं.
अमेरिका हा या संघटनेचा सर्वात मोठा देणगीदार असून 2023 मध्ये त्यांनी 422 दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली होती. तर दुसऱ्या क्रमांकावरच्या जर्मनीने 212.8 दशलक्ष डॉलर्सची देणगी UNRWAला दिली होती.
UNRWA ला एकूण 1.46 अब्ज डॉलर्सच्या देणग्या या वर्षात मिळाल्या होत्या.
इस्रायलने UNRWAवर बंदी का घातली?
गाझामध्ये UNRWA हमाससोबत हातमिळवणी करत असल्याचा आरोप इस्रायलने केलाय. गेल्या अनेक दशकांपासून इस्रायलने एजन्सीला विरोध केलाय. पण 7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यांनंतर मात्र हा तणाव वाढला.
या दिवशी हमास या पॅलेस्टिनी सशस्त्र संघटनेनं केलेल्या हल्ल्यात 1200 जण ठार झाले तर 250 जणांना ओलीस धरण्यात आलं. या हल्ल्यामध्ये UNRWAच्या काही कर्मचाऱ्यांचा हात होता, असा आरोप नंतर इस्रायलने केला.
युनायटेड नेशन्सनी नंतर याची चौकशी केली आणि ऑगस्ट महिन्यात 9 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
आपण सर्व कर्मचाऱ्यांची काटेकोरपणे चौकशी करतो आणि कर्मचाऱ्यांची यादी इस्रायलला देण्यात येते असं UNRWAचं म्हणणं आहे.
इस्रायलच्या आरोपांनंतर काही देशांनी UNRWA ला देण्यात येणारं फंडिंग थांबवलं होतं. पण अमेरिका वगळता इतर सर्व देशांनी पुन्हा निधी द्यायला सुरुवात केली आहे.
UNRWA खरंच प्रगती करत नाही तोवर आपण पुन्हा निधी देणं सुरू करणार नसल्याचं अमेरिकेने म्हटलंय.
युनायटेड नेशन्सने काय म्हटलं?
UNRWA बंदी घालणाऱ्या या कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आली तर त्याचे परिणाम भयानक असतील असं संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरल अँतोनिओ गुटेरस यांनी म्हटलंय. 'याचा इस्रायल - पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा काढण्यावर आणि एकूणच या भागातल्या शांतता आणि सुरक्षेवर परिणाम होईल' असंही त्यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
UNRWA चे संचालक विल्यम दीरे यांनी म्हटलंय, "आम्ही या भागात मदत पोहोचवण्यात अतिशय महत्त्वाचे आहोत. त्यांच्याकडे 'प्लान बी' आहे का, माहिती नाही."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











