बांगलादेशला चारी मुंड्या चीत करणाऱ्या भारतीय महिला संघाच्या पत्रकार परिषदेत फक्त एकच पत्रकार?

आशा शोभना यांची पत्रकार परिषद

फोटो स्रोत, ANNESHA GHOSH/X

    • Author, शारदा उग्रा
    • Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार

आशा शोभना.. हे नाव किती जणांना माहिती आहे?

भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झालेली 33 वर्षांची आशा शोभना ही भारतातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणारी सर्वात वयस्कर क्रिकेटपटू बनली आहे.

पुरुषांच्या क्रिकेट संघात कोणत्या खेळाडूचं पदार्पण कधी झालं? कोणत्या खेळाडूने किती धावा केल्या? कोणकोणत्या विक्रमांना गवसणी घातली याची माहिती तोंडपाठ असणारे क्रिकेट फॅन्स भारतात कमी नाहीत, पण महिला क्रिकेटपटूंच्या नशिबी असे फॅन्स नाहीयेत, हेही तितकंच खरं.

बांगलादेश विरुद्ध भारताच्या सामान्यांचं प्रक्षेपण करणाऱ्या चॅनलने 33 वर्षे 51 दिवसांच्या आशा शोभनाची मुलाखत घेतली, तेव्हा तिच्या बाजूला उभ्या असणाऱ्या इतर खेळाडूंना तिचं कौतुक वाटत होतं.

तिचा प्रवास ऐकून इतर खेळाडू हरखून गेले होते. पण तीच आशा शोभना सामना आटोपल्यानंतर पत्रकार परिषदेसाठी पोहोचली, तेव्हा तिथे फक्त एक पत्रकार तिची गोष्ट ऐकण्यासाठी तिथे आलेली होती.

भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या आशा शोभना यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एकमेव महिला पत्रकाराचं नाव आहे ओनिशा घोष.

ओनिषा घोष यांनी एक्सवर पोस्ट करून या विशेष पत्रकार परिषदेची माहिती दिली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

नुकत्याच बांगलादेशात पार पडलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघाने 5-0 असा सफाईदार विजय मिळवला आहे.

तरुण कर्णधार आणि एका नवीन स्फूर्तीने घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशच्या संघाचा अनुभवी भारतीय संघाने पराभव केला.

मालिकेतील शेवटच्या सामन्यात डावखुरी फिरकीपटू राधा यादव ही सामनावीर ठरली, तर संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी केल्यामुळे तिलाच मालिकावीर म्हणून गौरविण्यात आलं.

गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे क्रिकेटसामने प्रक्षेपित करणारी फॅनकोड नावाची वेबसाईट नसती तर अशी एखादी मालिका भारतीय महिलांनी जिंकली आहे हे कुणाला कळलं देखील नसतं.

एकीकडे देशभर आयपीएलचा ज्वर चढलेला असताना, आयपीएलमध्ये उभारल्या जाणाऱ्या धावांच्या डोंगरांचं कौतुक होत असताना दुसरीकडे भारताच्या महिला संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या घवघवीत यशाची साधी चर्चाही होत नाही हे वास्तव आहे.

प्रसारमाध्यमांकडून अपेक्षा करावी का?

आयपीएल अंतिम टप्प्यात असताना भारतीय महिलांच्या क्रिकेट संघाचं वार्तांकन करायला एखादी संस्था त्यांचे पत्रकार भारतातून बांगलादेशात पाठवेल ही अपेक्षा करणंही चुकीचं आहे.

संपूर्ण जगभरात क्रीडा पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची संख्या रोडावत चाललीय. पण या संपूर्ण प्रकरणात भारतीय क्रिकेटचं नियमन करणाऱ्या, कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या नियामक मंडळाची भूमिका मात्र आश्चर्यचकित करणारी आहे.

बीसीसीआयच्या वेबसाईटवर महिला संघाच्या एकाही सामन्याचं थेट समालोचन (लाईव्ह कॉमेंट्री) केलं गेलं नाही. बांगलादेशच्या मैदानात भारतीय महिला कशा खेळतायत, त्यांनी किती धावा काढल्यात यापैकी काहीही माहिती सामना सुरु असताना प्रक्षेपित केली गेली नाही पण हे सगळं एवढ्यावरच थांबत नाही.

हरमनप्रीत कौर

फोटो स्रोत, PHOTO BY SAZZAD HOSSAIN/SOPA IMAGES/LIGHTROCKET VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, हरमनप्रीत कौर ढाका येथील पत्रकार परिषदेत

आयपीएलच्या वेबसाईटवर प्रसारमाध्यमांसाठी विपुल प्रमाणात कंटेंट उपलब्ध असतो. यासोबतच देशभरातील आणि जगभरातील प्रसारमाध्यमांना स्वतः बीसीसीआयतर्फे आयपीएलच्या सामन्यांसंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ पाठवले जातात.

साखळी फेरीतील सामना असला तरीही बीसीसीआय मोठ्या तत्परतेने त्या सामन्याच्या वार्तांकनात मदत करेल असा मजकूर अगदी वेळेत आणि बिनचूक पाठवत असतं.

बीसीसीआयतर्फे पाठवल्या जाणाऱ्या या माहितीत पत्रकार परिषदेच्या लिंक, सामन्यातील महत्त्वाचे निर्णय यासोबतच आयपीएलबाबत सोशल मीडियावर काय काय चर्चा सुरु आहे याचे तपशील पाठवले जातात. पण महिलांच्या टी-20 मालिकेबाबत मात्र बीसीसीआयच्या वेबसाईटवर स्मशानशांतता दिसून आली.

महिलांच्या मालिकेबाबत कसलीच माहिती बीसीसीआयने शेअर केली नव्हती. त्यांच्याकडून मेल पाठवण्यात आले नाहीत, पत्रकार परिषदेच्या लिंक्स पाठवल्या गेल्या नाहीत, एवढंच काय तर बांगलादेशच्या संघाचा 'व्हाईट वॉश' करणाऱ्या महिला खेळाडूंचे व्हिडिओ, फोटो कशालाच बीसीसीआयतर्फे प्रसिद्धी देण्यात आली नाही.

शेफाली वर्मा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेफाली वर्मा

या मालिकेत भारतीय संघाने विक्रमांचे डोंगर उभे केले. आशा शोभनाने ऐतिहासिक पदार्पण केले, हरमनप्रीत कौरने 300वा सामना खेळला तर तरुण तडफदार आणि आक्रमक शेफाली वर्माने भारतातर्फे 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा बहुमान मिळवला.

यासोबतच भारतीय महिला क्रिकेटचं भविष्य आणि वर्तमान म्हणून मान्यता मिळवलेल्या शेफाली आणि स्मृती मंधाना यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 2000धावांची भागीदारी करणारी पहिली जोडी होण्याचा विक्रम त्यांच्या नावे केला.

मीडिया मॅनेजरही गायब

बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवर महिला क्रिकेटसाठी समर्पित असणाऱ्या कॉलममध्ये 13 मेपर्यंत फक्त 15 एप्रिलपर्यंतच्याच बातम्या आहेत. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेटविश्वात काय घडलं याचा कसलाही तपशील बीसीसीआयच्या या वेबसाईटवर उपलब्ध नव्हता.

15 एप्रिलला जी बातमी प्रकाशित झाली तीही बांगलादेशच्या दौऱ्यासाठी निवड झालेल्या भारतीय संघात कोणकोण आहे याची माहिती देत आहे. या निवडीनंतर तो संघ बांगलादेशला गेला, तिथे त्या संघाने पाच सामने खेळले आणि त्या पाचही सामन्यांमध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला हे मात्र बीसीसीआयच्या वेबसाईटवर कुठेही सांगितलेल नाही.

या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमध्ये सगळ्यात अलीकडचा व्हिडिओ 28 एप्रिलचा आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर यास्तिका भाटिया माध्यमांशी संवाद साधत असतानाच हा व्हिडिओ आहे.

आशा शोभना

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, महिला प्रीमियर लीग 2024 च्या सामन्यात आशा शोभना
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बांगलादेशच्या दौऱ्यावर भारतीय संघासोबत मीडिया मॅनेजर (माध्यम व्यवस्थापक) नव्हता. जरी तो गेला असेल तरी तो कुठेही दिसला नाही.

एखाद्या दौऱ्याचं वार्तांकन करण्यासाठी पत्रकार उपलब्ध नसतील तर अशा परिस्थितीत संघाच्या माध्यम व्यवस्थापकाची भूमिका महत्त्वाची असते.

दौऱ्यात नेमकं काय काय घडतंय, एखाद्या सामन्यात काही विशेष घडलं असेल तर त्याचा तपशील यासोबतच खेळाडूंच्या मुलाखती देशातील प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी या व्यवस्थापकाची असते.

अर्थात आयपीएल आणि निवडणुकांची रणधुमाळी सुरु असल्यामुळे वर्तमानपत्रांमध्ये महिला क्रिकेटबाबत बातम्या छापायला जागेची कमतरता असू शकते पण बीसीसीआयच्या माध्यम विभागाने प्रसिद्ध केलेल्या चांगल्या बातम्या प्रकाशित करायला डिजिटल माध्यमं नेहमीच उत्सुक असतात.

पण हे तेंव्हाच शक्य झालं असतं जेंव्हा महिलांच्या क्रिकेटला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठीच उत्साह आणि तयारी दाखवली गेली असती.

ज्या काही थोड्याथोडक्या पत्रकारांना महिलांच्या या मालिकेचं वार्तांकन करण्याची इच्छा होती, त्यांना बांगलादेशपासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या भारतात बसून स्वतःच्या मर्यादित क्षमता आणि सूत्रांचा वापर करून या मालिकेचं वार्तांकन करावं लागलं.

त्यांनी सीमेपलीकडे राहणाऱ्या त्यांच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना स्वतःहून संपर्क केला, बांगलादेश क्रिकेट नियामक मंडळाशी संपर्क साधला आणि त्यातून त्यांना जी काही माहिती मिळाली ती गोळा करून, एकत्रित करून या मालिकेचं वार्तांकन करण्याचा प्रयत्न या पत्रकारांनी केला.

'कथनी आणि करणी'त फरक दिसून आला

मागच्या आठवड्यात गुरुवारी (9 एप्रिलला) बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी काही पत्रकारांशी संवाद साधला.

जय शहा यांच्या भेटीत पत्रकारांना व्हिडीओ आणि ऑडिओ रेकॉर्ड करण्याची परवानगी नव्हती. जय शहा यांनी दिलेली माहिती लिहून घेण्याची परवानगी मात्र त्यांना दिली गेली होती.

तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी जय शहा यांनी भारतीय महिला क्रिकेटच्या भवितव्याबाबत काही प्रश्न विचारले.

हरमनप्रीत कौर

फोटो स्रोत, PHOTO BY SAZZAD HOSSAIN/SOPA IMAGES/LIGHTROCKET VIA GETTY IMAGES

यावर बोलताना ते म्हणाले की यावर्षी 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान बांगलादेशमध्ये होऊ घातलेल्या टी-20 विश्वचषकाची तयारी करता यावी म्हणून भारतीय महिला संघाला बांगलादेशच्या दौऱ्यावर पाठवण्यात आलं आहे.

बांगलादेशच्या ढाका आणि सिल्हेट या शहरांमध्ये विश्वचषक आयोजित करण्यात आला आहे. तेथील मैदानांची, वातावरणाची ओळख भारतीय महिला खेळाडूंना व्हावी या उदात्त हेतूने हा दौरा आयोजित केला गेल्याच शहा म्हणाले.

पण विश्वचषक स्पर्धा पावसाळ्यानंतर खेळवली जाणार आहे, या स्पर्धेला अजून पाच महिन्यांचा अवकाश आहे. पावसाळ्यानंतर होणाऱ्या एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या तयारीसाठी पाच महिने अगोदर भर उन्हाळ्यात दौऱ्यावर जाणारा भारतीय संघ हा एकमेव असावा.

शाह यांनी लगेच सांगितलं की महिला प्रीमियर लीग (WPL) ला अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे आणि केवळ तिकिटांच्या विक्रीतून 5 कोटी रुपयांचं उप्तन्न मिळालं आहे.

बीसीसीआय महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबाबत शहा यांना अभिमान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार शहा म्हणाले की महिला क्रिकेटची परिस्थिती दिवसेंदिवस चांगली होत आहे आणि पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या क्रिकेटला तेवढंच महत्त्व दिलं जातंय.

जय शहा म्हणाले की, "आम्ही पुरुष क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहोत त्यामुळे आता आमचं 51 टक्के लक्ष हे महिलांच्या क्रिकेटवर आहे तर पुरुषांच्या क्रिकेटसाठी आम्ही 49 टक्के ऊर्जा खर्च करतो. यामुळेच आम्ही महिला क्रिकेटला प्राधान्य देत आहोत, आम्ही महिलांना दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ केली आहे आता त्यांना त्यातून चांगलं उत्पन्न मिळतंय."

महिलांच्या क्रिकेटवर दोन टक्के अधिक लक्ष असणं कौतुकास्पद आहे पण नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशच्या दौऱ्याचा विचार केला तर त्यांचे हे शब्द सत्यात उतरताना दिसत नाहीयेत.

बीसीसीआयचे सचिव जय शहा

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, बीसीसीआयचे सचिव जय शहा

जर समजा भारत 'अ'(इंडिया-ए) संघाने बांगलादेशचा दौरा केला असता, तिथे पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली असती आणि या दौऱ्याच्या वार्तांकनासाठी पत्रकारांनी उत्साह दाखवला नसता तर बीसीसीआयने या संघासोबत नक्कीच एक माध्यम व्यवस्थापक पाठवून प्रसिद्धीची तजवीज केली असती.

भारत 'अ' संघातील खेळाडूंची कामगिरी, सामन्यांचे धावफलक आणि इतर गोष्टींचं साग्रसंगीत वर्णन करणाऱ्या बातम्या माध्यमांना पुरवल्या गेल्या असत्या पण महिला क्रिकेटमध्ये मात्र तसं घडलं नाही.

महिला खेळाडूंना मिळणाऱ्या सामना शुल्कात (मॅच फीस) मध्ये केलेली वाढ नक्कीच चांगली आहे पण याचा फायदा तेंव्हाच होईल जेंव्हा पुरुषांप्रमाणेच महिला संघाचंही एक कॅलेंडर बनेल, कोणत्या महिन्यात कुठे आणि किती सामने खेळवले जातील याची स्पष्टता या खेळाडूंना दिली जाईल.

प्रत्येक मोसमात खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांची संख्या न्याय्य असेल तर आणि तरच सामना शुल्कात केलेली वाढ ही या खेळाडूंसाठी पूरक ठरू शकेल.

त्यामुळे महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचा गप्पांचा नुसता रतीब घालणं एकीकडे आणि त्या गप्पांची अंमलबजावणी करणं दुसरीकडे अशी परिस्थिती सध्या आहे.

फक्त कौतुक मिळवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आश्वासनांची खैरात वाटली जाऊ नये एवढंच.