आधी पत्रकाराची हत्या, मग मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकून वरून प्लास्टर; गुन्ह्याचा उलगडा कसा झाला?

फोटो स्रोत, ALOK PUTUL/BBC
- Author, आलोक प्रकाश पुतुल
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Reporting from, रायपूर
छत्तीसगडमधील बीजापूरचे टीव्ही पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह 3 जानेवारीला एका सेप्टिक टँकमध्ये सापडला आहे.
1 जानेवारी 2025 च्या रात्रीपासूनच 33 वर्षांचे मुकेश चंद्राकर त्यांच्या घरातून बेपत्ता झाले होते.
मुकेश चंद्राकर स्वतंत्र पत्रकार म्हणून 'एनडीटीव्ही'साठी काम करायचे. याशिवाय 'बस्तर जंक्शन' हे युट्यूबवरील लोकप्रिय चॅनलदेखील ते चालवत होते. या चॅनलवर ते बस्तरमधील अंतर्गत बातम्या सादर करायचे.
बस्तरमध्ये माओवाद्यांनी अपहरण केलेले पोलीस कर्मचारी किंवा ग्रामस्थ यांच्या सुटकेमध्ये मुकेश चंद्राकर यांनी अनेकदा महत्वाची भूमिका पार पाडली होती.
बिजापूर पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकात या प्रकरणात तीन जणांना अटक केल्याचं म्हटलं आहे. मात्र, पोलिसांनी अटक केलेल्यांची नावं जाहीर केलेली नाहीत.
पोलिसांनी काय माहिती दिली?
बस्तरचे पोलीस महानिरीक्षक (आयजी) सुंदरराज पी. म्हणाले, "पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या भावानं तक्रार केल्यानंतर पोलिसांची विशेष टीम तयार करण्यात आली होती आणि त्यासंदर्भात तपास केला जात होता."
"शुक्रवारी (3 जानेवारी) संध्याकाळी आम्ही पारा बस्तीमधील कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांच्या मालमत्तेच्या परिसरातील एका सेप्टिक टँकमधून मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह हस्तगत केला आहे."

फोटो स्रोत, ALOK PUTUL/BBC
पोलिसांचं म्हणणं आहे की, पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन आणि फोन कॉलच्या आधारे तपास सुरू होता.
त्यादरम्यान कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांनी त्यांच्या मजुरांची राहण्याची व्यवस्था केलेल्या परिसरात पोलीस तपास करत होते. त्यावेळेस पोलिसांना काँक्रिटचं एक ताजं बांधकाम दिसलं.

फोटो स्रोत, ALOK PUTUL/BBC
पोलिसांनी त्याचा तपास केल्यावर अशी माहिती मिळाली की, हा एक जुना सेप्टिक टँक आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याचं झाकण बंद करून त्याच्यावर काँक्रिटचं बांधकाम करण्यात आलं आहे.
पोलिसांना याचा संशय आल्यावर त्यांनी सेप्टिक टँकचा वरचा भाग तोडला. तेव्हा त्यांना आतमध्ये पाण्यात पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह मिळाला. त्यांच्या मृतदेहावर खोल जखमांच्या अनेक खुणा होत्या.
मुकेशच्या मृत्यूवरून भाजपा-काँग्रेस आमने-सामने
या घटनेनंतर काँग्रेस आणि भाजपानं एकमेकांवर टीका केली आहे. सुरेश चंद्राकर काँग्रेसशी संबंधित असल्यामुळे भाजपानं काँग्रेसवर टीका केली आहे.
तर कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा मांडून काँग्रेस भाजपावर टीका करते आहे.

फोटो स्रोत, X/VISHNUDEO SAI
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर लिहिलं, "बिजापूरचे तरुण आणि समर्पित पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येची बातमी अतिशय दु:खद आणि वेदनादायी आहे."
"मुकेशजींच्या मृत्यूमुळे पत्रकारिता आणि समाजाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या दोषीला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत."

फोटो स्रोत, ALOK PUTUL/BBC
तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसनं या हत्येवरून राज्यातील भाजपा सरकारवर टीका केली आहे.
या हत्येसंदर्भात काँग्रेसनं राज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज म्हणाले, "भाजपा सरकारच्या काळात पत्रकारांना पत्रकारिता करण्याची किंमत जीव देऊन मोजावी लागते आहे. मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह ज्याप्रकारे सेप्टिक टॅंकमध्ये मिळाला, ती अतिशय भयानक बाब आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला आहे ते यातून स्पष्ट होतं."

फोटो स्रोत, @BJP4CGState
छत्तीसगड भाजपानं सोशल मीडिया व्यासपीठावर याला उत्तर देत लिहिलं, "कंत्राटदार आहे की काँग्रेसचा कॉन्ट्रॅक्ट किलर!! बिजापूरचे तरुण पत्रकार स्व. मुकेश चंद्राकर यांच्या हत्येचा मुख्य आरोपी कंत्राटदार सुरेश चंद्राकर याची काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांच्याशी असलेले जवळचे संबंध जगजाहीर आहेत."

"दीपक बैज यांनीच सुरेश चंद्राकर यांना काँग्रेस पक्षाच्या एससी मोर्चाचं राज्यातील सरचिटणीसपद दिलं आहे. काँग्रेसच्या तथाकथित मोहब्बतच्या दुकानातून विविध प्रकारच्या गुन्हेगारी साहित्याची विक्री होते आहे. कारण दुकानातील सर्व सेल्समन गुन्हेगार आहेत. राहुल गांधी याचं उत्तर द्या."
मुकेश चंद्राकर कधीपासून बेपत्ता होते?
मुकेश चंद्राकर यांचे मोठे भाऊ आणि टीव्ही पत्रकार यूकेश चंद्राकर यांनी बीबीसीला सांगितलं की, बुधवारी, 1 जानेवारी 2025 च्या संध्याकाळपासून मुकेश घरातून बेपत्ता झाले होते.
मात्र, कुटुंबीयांना दुसऱ्या सकाळीच ही गोष्ट लक्षात आली. यूकेश यांनी सुरुवातीला विचार केला की, त्यांचा भाऊ एखाद्या बातमीच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी जवळपासच्या भागात गेला असेल. मात्र, जेव्हा मुकेश यांचा फोनदेखील स्वीच ऑफ असल्याचं आढळलं, तेव्हा घरातल्या लोकांना चिंता वाटू लागली.

फोटो स्रोत, ALOK PUTUL/BBC
यूकेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मी आणि मुकेश वेगवेगळे राहतो. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाली मुकेशशी माझी शेवटची भेट झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मुकेश घरात नव्हता, तसंच त्याचा फोन देखील बंद होता."
"त्यामुळे मी त्याच्या परिचयातील लोकांना त्याच्याबद्दल विचारण्यासाठी फोन केले. मात्र मुकेशबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर संध्याकाळी मी पोलिसांकडे तक्रार नोंदवली."
यूकेश यांचा दावा आहे की सुरेश चंद्राकर हा कंत्राटदार 1 जानेवारीच्या संध्याकाळी त्यांच्या भावाला म्हणजे मुकेशला भेटणार होता. सुरेश चंद्राकर त्यांचे जवळचे नातेवाईक देखील आहेत.

फोटो स्रोत, ALOK PUTUL/BBC
यूकेश यांनी बीबीसीला सांगितलं की, "कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांनी एका रस्त्याचा बांधकाम केलं होतं. त्या कामात भ्रष्टाचार झाल्याची एक बातमी एनडीटीव्हीवर प्रसारित झाली होती. त्यानंतर राज्य सरकारनं या प्रकरणात तपास करण्याची घोषणा केली होती."
"भाऊ बेपत्ता झाल्यानंतर आम्ही त्याच्या लॅपटॉपवर त्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन पाहिलं. ते ठिकाण दिनेश चंद्राकर, सुरेश चंद्राकर आणि रितेश चंद्राकर या कंत्राटदारांच्या मजूरांसाठी बनवण्यात आलेल्या कॅम्पसमध्ये असल्याचं दिसत होतं. त्यामुळे मला शंका आली."
यूकेश यांनी पोलिसांकडे जी तक्रार नोंदवली त्यात कंत्राटदार दिनेश चंद्राकर, सुरेश चंद्राकर आणि रितेश चंद्राकर यांनीच मुकेशच्या जीवाचं बरं वाईट केल्याची शंका देखील व्यक्त केली होती.
कोण आहे कंत्राटदार सुरेश चंद्राकर?
पोलिसांना मुकेश यांचा मृतदेह सुरेश चंद्राकर यांच्या मालमत्तेच्या परिसरात असलेल्या सेप्टिक टॅंकमध्ये मिळाला आहे. सुरेश चंद्राकर एक कंत्राटदार आहेत. बस्तरमधील सरकारी बांधकामं आणि खाणउद्योगाशी निगडीत बड्या कंत्राटदारांमध्ये त्यांचा समावेश आहे.
ते छत्तीसगडमधील काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राज्यातील उपाध्यक्ष देखील आहेत.

फोटो स्रोत, ALOK PUTUL/BBC
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं त्यांना नवापूर विधानसभा मतदारसंघातील निरीक्षक म्हणून नेमलं होतं.
माओवाद्यांच्या विरोधात पोलीस संरक्षणात सुरू झालेल्या 'सलवा जुडूम' या मोहिमेत सुरेश चंद्राकर सहभागी होते. त्यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला होता. मात्र गेल्या काही वर्षांतच माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात सरकारी बांधकामांचं कंत्राट घेऊन ते बस्तरमधील आघाडीच्या आणि बड्या कंत्राटदारांपैकी एक झाले आहेत.

फोटो स्रोत, ALOK PUTUL/BBC
23 डिसेंबर 2021 ला सुरेश चंद्राकर (40 वर्षे) चर्चेत आले होते. त्यामागचं कारण होतं, 73 टक्के आदिवासी लोकसंख्या असणाऱ्या बीजापूरमध्ये त्यांनी शाही पद्धतीनं केलेलं स्वत:चं लग्नं.
त्यांच्या होणाऱ्या पत्नीला सासरी आणण्यासाठी खासगी हेलीकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती.
याशिवाय बीजापूरसारख्या ठिकाणी त्यांनी स्वत:च्या लग्नात नाचण्यासाठी म्हणून रशियन डान्सर्स बोलावले होते.
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी बीजापूरच्या स्टेडियममध्ये मेजवानी दिली होती. असं म्हटलं जातं की बस्तरमध्ये यापूर्वी सुरेश चंद्राकर यांच्या लग्नासारखं शाही थाटातील लग्न कधीही झालं नव्हतं.
या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











