अली खामेनींनंतर इराणचे सर्वोच्च नेते होण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेले मोज्तबा खामेनी कोण आहेत?

काळी पगडी आणि तपकिरी झगा घातलेले मोज्तबा खामेनी कॅमेऱ्यापासून दूर पाहताना

फोटो स्रोत, Tasnim News Agency

    • Author, बीबीसी न्यूज पर्शियन
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी हे अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाले. त्यानंतर त्यांचा शक्तिशाली मुलगा मोज्तबा खामेनी यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

गेल्या काही दिवसांत त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नव्हती. मात्र मंगळवारी (3 मार्च) इराणच्या सरकारी माध्यमांनी मोज्तबा खामेनी जिवंत असल्याचं सांगितलं. तसेच ते देशातील महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा आणि आढावा घेत असल्याचंही म्हटलं. परंतु, तरीही त्यांनी अद्याप सार्वजनिकपणे कुठेही हजेरी लावलेली नाही.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दोन इराणी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मोज्तबा खामेनी आता पुढचे सर्वोच्च नेते होण्याच्या शर्यतीत आघाडीवर मानले जात आहेत. मात्र या दाव्यांची स्वतंत्रपणे खातरजमा करणे कठीण आहे.

दरम्यान, इराणचा पुढचा सर्वोच्च नेता निवडण्याची जबाबदारी असलेली 88 धर्मगुरूंची 'असेंब्ली ऑफ एक्स्पर्ट्स' (क्लेरिकल बॉडी) ही परिषद आता 'निर्णयाच्या जवळ' पोहोचल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, निम्न शासकीय फार्स न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, हा निर्णय अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कारांपूर्वी जाहीर होण्याची शक्यता नाही. ही एजन्सी इराणच्या प्रभावशाली इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी (आयआरजीसी) संबंधित मानली जाते.

वडिलांच्या अगदी विरुद्ध म्हणजे मोज्तबा खामेनी नेहमीच सार्वजनिक जीवनात फारसे दिसलेले नाहीत. त्यांनी कधीही कोणतेही सरकारी पद भूषवलेले नाही, सार्वजनिक भाषणं किंवा मुलाखती दिलेल्या नाहीत आणि आतापर्यंत त्यांचे मोजकेच फोटो व व्हीडिओ प्रसारित झाले आहेत.

परंतु, त्यांचे वडील अली खामेनी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोज्तबा यांच्या माध्यमातूनच जावं लागतं, अशी त्यांच्याबद्दल अफवा होती. त्यामुळे त्यांना वडिलांचा 'गेटकिपर' म्हटलं जात.

2000 च्या दशकाच्या शेवटी विकिलिक्सद्वारे प्रकाशित झालेल्या अमेरिकन डिप्लोमॅटिक केबल्समध्ये त्यांचं वर्णन 'पोशाखामागची सत्ता' म्हणून केलं गेलं आहे.

राजवटीतील लोक त्यांना 'सक्षम आणि प्रभावशाली नेते' मानत होते, अशी माहिती एपी या वृत्तसंस्थेने दिली आहे.

पण मोज्तबा खामेनी यांची भावी सर्वोच्च नेता म्हणून निवड वादग्रस्त ठरू शकते. कारण 1979 मध्ये राजेशाही हटवून इराणमध्ये इस्लामिक रिपब्लिक स्थापन केले गेले होते. या व्यवस्थेचं तत्त्व असं आहे की, सर्वोच्च नेता वंशपरंपरेने (वडिलांपासून मुलाकडे) नाही, तर धार्मिक प्रतिष्ठा आणि सिद्ध नेतृत्वावरून निवडावा, असा नियम आहे.

अली खामेनी हे इस्लामिक रिपब्लिकच्या भावी नेतृत्वाबद्दल फक्त सामान्य शब्दांतच बोलले होते.

असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्समधील एका सदस्याने 2 वर्षांपूर्वी सांगितलं होतं की, अली खामेनी यांनी आपल्या मुलाला भविष्यातील नेतृत्वासाठी उमेदवार होण्याच्या कल्पनेला विरोध केला होता. मात्र त्यांनी कधीही यावर सार्वजनिक चर्चा केली नव्हती.

कोण आहेत मोज्तबा खामेनी?

मोज्तबा खामेनींचा जन्म 8 सप्टेंबर 1969 रोजी ईशान्येकडील मशहद शहरामध्ये झाला. ते खामेनी यांच्या 6 मुलांपैकी दुसरे आहेत. त्यांनी तेहरानमधील धार्मिक शाळा अलवीमध्ये माध्यमिक शिक्षण घेतलं.

इराण‑इराक युद्धाच्या वेळी साधारण 17 व्या वर्षी मोज्तबा यांनी काही काळ सैन्यात सेवा केली होती, असं इराणमधील माध्यमांनी सांगितलं आहे.

हा 8 वर्षांचा रक्तरंजित संघर्ष होता. इराणला अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांबद्दल अधिक संशय होता, कारण त्या देशांनी इराकला पाठिंबा दिला होता.

1999 मध्ये, मोज्तबा खामेनी हे धार्मिक शिक्षणाचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी क्यूम या पवित्र शहरात गेले. क्यूम हे शिया इस्लामचे एक महत्त्वाचे धार्मिक शिक्षण केंद्र मानले जाते.

त्यापूर्वी ते कधीही धार्मिक वेशात दिसायचे नाहीत. वयाच्या तिशीत त्यांनी धर्मशाळेत जाण्याचा निर्णय का घेतला हे स्पष्ट नाही. कारण बहुतांश लोक हे शिक्षण लहान वयातच घेतात.

2024 मध्ये तेहरानमधील हिजबुल्लाहच्या कार्यालयाला भेट देताना काळी पगडी आणि चष्मा घातलेले मोज्तबा खामेनी यांचा फोटो

फोटो स्रोत, West Asia News Agency Via Reuters

मोज्तबा अजून मध्यम दर्जाचे धर्मगुरू आहेत. हाच मुद्दा ते सर्वोच्च नेते होण्याच्या मार्गात अडथळा ठरू शकतो.

अलीकडच्या काही काळापासून काही सरकारी आणि प्रभावशाली माध्यमांनी त्यांना 'अयातुल्ला' म्हणण्यास सुरुवात केली आहे. अयातुल्ला ही एक वरिष्ठ धार्मिक पदवी आहे.

काही निरीक्षकांच्या मते, हा त्यांचा धार्मिक दर्जा उंचावण्याचा आणि देशाच्या सर्वोच्च नेतृत्वासाठी विश्वासार्ह उमेदवार म्हणून सादर करण्याचा प्रयत्न आहे.

धर्मशाळेच्या (सेमिनरी) प्रणालीत, 'अयातुल्ला' हे पद धारण करणं आणि उच्चस्तरीय वर्ग शिकवणे ही व्यक्तीच्या शैक्षणिक पातळी आणि ज्ञानाची निशाणी मानली जाते. त्याचबरोबर भविष्यातील नेता निवडताना ही एक आवश्यक अट समजली जाते.

पण यासाठी आधीचं एक उदाहरण समोर आहे. 1989 मध्ये अली खामेनी दुसरे सर्वोच्च नेता बनल्यावर त्यांना लगेच 'अयातुल्ला' हे पद दिलं गेलं होतं.

राजकीय हस्तक्षेपाचे आरोप

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मोज्तबा खामेनी यांचं नाव 2005 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवेळी पहिल्यांदाच सार्वजनिक चर्चेत आलं. या निवडणुकीत लोकप्रिय कट्टरवादी महमूद अहमदीनेजाद हे विजयी झाले.

या निवडणुकीतील सुधारणावादी उमेदवार मेहदी करौबी यांनी अली खामेनी यांना खुलं पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी काही आरोप केले होते.

2005 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मोज्तबा खामेनी आणि काही आयआरजीसी आणि बासिज मिलिशियाच्या लोकांनी हस्तक्षेप केला. अहमदीनेजाद यांना विजयी करण्यासाठी धार्मिक गटांना पैसे वाटले, असा आरोप त्यांनी केला होता.

4 वर्षांनी, मोज्तबा यांच्यावर पुन्हा तोच आरोप आला. अहमदीनेजाद यांच्या पुनर्निवडीचे निकाल जाहीर झाल्यावर संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले, त्याला 'ग्रीन मुव्हमेंट' म्हणतात. काही आंदोलकांनी मोज्तबा इराणचे सर्वोच्च नेते म्हणून आपल्या वडिलांची जागा घेऊ शकतात या कल्पनेला विरोध करत घोषणाबाजी केली.

तत्कालीन उप-गृहमंत्री मुस्तफा ताजझादेह यांनी त्या निवडणूक निकालाचं वर्णन 'निवडणूक चोरी' असं केलं होतं. त्यांना नंतर 7 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. याचं श्रेय ते 'मोज्तबा खामेनी यांच्या थेट इच्छे'ला देतात.

2009 च्या निषेधात आंदोलक एकत्र येत होते, काही व्यक्ती अश्रूधुराचा प्रभाव कमी करण्यासाठी एकमेकांच्या डोळ्यात धूर फेकत होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2009 च्या राष्ट्रपती निवडणुकीनंतर ग्रीन मूव्हमेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निदर्शनांना सुरुवात झाली.

2009 च्या निवडणुकीनंतर दोन सुधारणावादी उमेदवार, मीर‑हुसैन मौसावी आणि मेहदी करौबी यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. फेब्रुवारी 2012 मध्ये, मोज्तबा खामेनी यांनी मौसावी यांना भेटून विरोध करणं बंद करण्याचा सल्ला दिला, असं इराणी सूत्रांनी बीबीसी पर्शियनला सांगितलं.

मोज्तबा खामेनी जर सर्वोच्च नेता झाले तर ते आपल्या वडिलांची कट्टर धोरणं सुरू ठेवतील अशी अपेक्षा अनेकजण करतात. तर काही जणांना वाटतं की, ज्या माणसाने आपले वडील, आई आणि आपल्या पत्नीला अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात गमावलं आहे, अशी व्यक्ती पाश्चात्य देशांच्या दबावापुढे झुकणं शक्य नाही.

इस्लामिक रिपब्लिकचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, देशाला राजकीय आणि आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य व्यक्ती आहेत, हे जनतेला पटवून देणं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे.

त्यांच्या नेतृत्वाची चाचणी अजून मोठ्याप्रमाणात झालेली नाही आणि लोकांना असं वाटतंय की, देश आता वंशपरंपरेवर (घराणेशाही) चालत आहे. यामुळे सार्वजनिक असंतोष वाढू शकतो.

जर सर्वोच्च नेतेपदी मोज्तबा यांची निवड झाली तर ते निशाण्यावर येतील- कारण इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी म्हटलं आहे की, इराणचा कोणताही उत्तराधिकारी निवडला गेला तर 'तो आमच्या निशाण्यावर असेल' म्हणजेच त्याला आम्ही संपवू असं ते म्हणाले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)