'मला घरी जायचंय असं सांगत मी भीक मागायचो अन् पैसे मिळाले की दारू प्यायचो'; दारूच्या व्यसनाचे दुष्परिणाम

दारूचे व्यसन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, सौरभ यादव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

( इशारा: या लेखामध्ये देण्यात आलेली काही माहिती तुम्हाला विचलित करू शकते. )

"मी माझं घर सोडलं होतं. माझ्याकडे कपड्यांचे दोन जोड होते. मी रस्त्यावरच राहायचो. भीक मागायचो आणि खोटं सांगायचो की मला घरी जायचं आहे, माझी मदत करा. थोडेसे पैसे मिळताच, मी लगेच दारूच्या दुकानावर जायचो आणि दारू प्यायचो."

हे शब्द आहेत अमितचे (नाव बदललेलं आहे). त्यांनी दारूच्या व्यसनापायी आयुष्यातील सर्वकाही पणाला लावलं होतं.

दारूच्या व्यसनामुळे त्यांनी नोकरी गमावली होती. नाती तुटली, इतकंच काय ओळखदेखील गमावली होती.

मात्र ही फक्त अमितचीच कहाणी नाही. अमितसारखे कोट्यवधी लोक दररोज दारूच्या व्यसनाशी एक अदृश्य लढाई लढत आहेत.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या 2019 च्या आकडेवारीनुसार, भारतात 5.7 कोटी लोकांना दारूशी निगडीत समस्यांमध्ये मदतीची आवश्यकता आहे.

उत्तर प्रदेशातील, गौतम बुद्ध नगर जिल्हा हॉस्पिटलमध्ये मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या डॉ. स्वाती त्यागी म्हणतात की त्यांच्याकडे 12 वर्षांपासून ते 70 वर्षे वय असलेले लोक दारूशी संबंधित समस्यांमध्ये मार्गदर्शन, मदत घेण्यासाठी येतात.

त्या म्हणतात, "यातील बहुतांश जण तरुण आहेत. विशेषकरून ते 12 वर्षे ते 30 वर्षे या वयोगटातील आहेत."

दारूचं व्यसन आणि त्याचे परिणाम

दिल्लीच्या रहिवासी असलेल्या कविता (नाव बदललेलं आहे) म्हणतात की शालेय जीवनात जेव्हा मी इतर मुलींना दारू पिताना आणि सिगारेट ओढताना पाहायचे तेव्हा मला माझं आयुष्य 'डबक्यातल्या बेडका'सारखं वाटायचं.

मग मी देखील ठरवलं की एक दिवस मी दारू पिणार आणि कॉलेजमध्ये असताना मी पहिल्यांदा दारू घेतली.

कविता म्हणतात, "मी खूप शांत आणि अंतर्मुख स्वभावाची आहे. मी जास्त मोकळेपणानं बोलत नाही. मात्र दारूनं माझ्यामध्ये जबरदस्त बदल घडवला. मी डान्स करू लागले होते, लोकांमध्ये मिसळू लागले, जगण्याचा आनंद घेऊ लागले, माझ्यात एक आत्मविश्वास जागा झाला आणि मला असं वाटू लागायचं की मी जणूकाही वाघीण झाले आहे. ती जाणीव खूपच ॲडिक्टिव्ह, हवीहवीशी वाटणारी होती."

त्या पुढे म्हणतात, "मी विचार करायचे की मी स्वत:साठी पिते आहे. त्यात एक बंडखोरीदेखील होती. जर पुरुष पिऊ शकतात तर महिला का पिऊ शकत नाहीत? मला हे सिद्ध करायचं होतं की पाहा, मीसुद्धा दारू पिऊ शकते."

भारतात कोट्यवधी लोक दारूच्या व्यसनाच्या विळख्यात, दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठीचे महत्त्वाचे मुद्दे

कविता म्हणतात की दारूच्या व्यसनाचा परिणाम त्यांच्या मुलांवर आणि नातेसंबंधांवरदेखील झाला.

त्या म्हणतात, "कामावरून परतताना मी दारू प्यायचे. डोक्यात सतत हाच विचार असायचा की पती सात वाजेपर्यंत येतील, त्याच्याआधी मी एक क्वार्टर दारू प्यावी. मी तसं करायचे देखील."

कविता पुढे म्हणाल्या, "दारूड्या माणूस म्हटला की एक चित्र डोळ्यासमोर येतं ते म्हणजे, तो दारू पिऊन रस्त्याच्या कडेला पडलेला असतो. त्याचे कपडे फाटलेले असतात. इथे फरक एवढाच होता की मी माझ्या घरातील अंधरुणात पडलेली असायचे."

जर तुम्हाला देखील दारूचं व्यसन लागलेलं असेल, तर तुम्ही मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करू शकता.

नॅशनल टोल फ्री हेल्पलाइन- 1800-11-0031

नशा मुक्त भारत अभियान हेल्पलाइन नंबर: 14446

दारूच्या व्यसनामुळे तुटणारी नाती

दारूच्या व्यसनामुळे वडिलांची कॉलर देखील पकडणारा अमित असो की गरोदर पत्नीला अपाय करणारा सतपाल (नाव बदललं आहे), यांना ते जुने दिवस आठवले की त्यांची मान शरमेनं झुकते.

अमित म्हणतात, "मी दारू पिण्यास सुरुवात केल्यानंतर जवळपास तीन वर्षांतच माझी परिस्थिती अतिशय वाईट झाली होती. माझ्यामुळे माझ्या कुटुंबाच्या वाट्याला दु:ख येईल असा विचार मी कधीही केला नव्हता."

"मात्र एक दिवस माझ्यामुळे माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले होते. ते म्हणाले होते की जर तू जन्माला येताच मेला असता, तर चांगलं झालं असतं."

दारूच्या व्यसनामुळे तुटणारी नाती

फोटो स्रोत, Getty Images

सतपाल म्हणतात, "दारू प्यायल्यानंतर मला वाटायचं की मी हवेत उडतोय. मला प्यायची ठिकाणं आणि पिणारे मित्र चांगले वाटायचे. जे लोक दारू घेत नसत, ते मला अजिबात आवडत नसत."

ते पुढे म्हणतात, "एकदा माझ्या घरी एक कार्यक्रम होता. माझे नातेवाईकदेखील आले होते. माझी पत्नी दुकान सांभाळायची. माझ्या मेहुण्यानं माझे कान भरले की तुझी पत्नी दुकानात बसते, ती अशी आहे, ती तशी आहे...मी आलो आणि माझ्या गरोदर पत्नीच्या पोटात ठोसा लगावला."

"ती 5-6 महिन्यांची गरोदर होती...पोटातील बाळ गोल फिरलं होतं. मात्र तरीदेखील मला जाणीव झाली नाही की मी काय केलं."

भारतात कोट्यवधी लोक दारूच्या व्यसनाच्या विळख्यात, दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठीचे महत्त्वाचे मुद्दे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संग्रहित छायाचित्र

कविता, अमित आणि सतपाल यांनी आता दारू सोडली आहे. पण भारतात अनेक जण आहेत जे अद्यापही या व्यसनाच्या विळख्यात अडकलेले आहेत.

सरकारी आकडेवारीतून दिसतं की अजूनही कोट्यवधी भारतीयांना मदतीची आवश्यकता आहे.

सरकारी आकडेवारीतून काय दिसतं?

सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध असणाऱ्या 2019 च्या आकडेवारीनुसार भारतात 10 ते 75 वर्षे वयोगटातील जवळपास 16 कोटी लोक दारू पितात.

जवळपास 5.7 कोटीहून अधिक लोक दारूमुळे होणाऱ्या समस्यांना तोंड देत आहेत.

दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं, तर भारतात दारू पिणारा दर तिसरा माणूस दारूसंबंधित समस्यांना तोंड देतो आहे आणि त्याला मदतीची आवश्यकता आहे.

  • सरकारी आकडेवारीतून दिसतं की भारतात जवळपास 30 टक्के लोक देशी दारू आणि 30 टक्के लोक परदेशी दारू पितात.
  • ईशान्येतील राज्यांमधील सर्वाधिक लोकांना घरात तांदळापासून बनलेली राईस बीअर प्यायला आवडतं. तर बिहारमधील लोक सर्वाधिक (30 टक्के) बेकायदेशीररीत्या तयार झालेली गावठी दारू पितात.
  • छत्तीसगडमध्ये सर्वाधिक 35.6 टक्के लोक दारू पितात. त्यानंतर त्रिपुरातील 34.7 टक्के लोक, पंजाबातील 28.5 टक्के लोक, अरुणाचल प्रदेशात 28 टक्के आणि गोव्यात 26 टक्के लोक दारू पितात.
  • जर दारू पिणाऱ्या लोकांच्या एकूण संख्येचा विचार केला तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक 4.2 कोटी लोक, पश्चिम बंगालमध्ये 1.4 कोटी लोक आणि मध्य प्रदेशात 1.2 कोटी लोक दारू पितात.
  • अरुणाचल प्रदेशात 15.6 टक्के महिला आणि छत्तीसगडमध्ये 13.7 टक्के महिला दारू पितात. फक्त या दोन राज्यांमध्येच दारू पिणाऱ्या महिलांची संख्या 10 टक्क्यांहून अधिक आहे.
  • पंजाबात 6 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 3.9 टक्के आणि महाराष्ट्रात 3.8 टक्के मुलं दारू पितात.
  • 2019 च्या सरकारी आकडेवारीनुसार, देशभरात जवळपास 2.9 कोटी लोकांना दारूचं व्यसन जडलं आहे.

ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार 2020 मध्ये भारतात प्रति व्यक्ती दारूचा खप 3.1 लीटर होता. 2023 मध्ये ते प्रमाण 3.2 लीटर झालं आणि 2028 पर्यंत हे प्रमाण 3.4 लीटर होऊ शकतं.

बिझनेस स्टँडर्डच्या एका अहवालानुसार, भारतातील दारूची बाजारपेठ 60 अब्ज अमेरिकन डॉलरची आहे.

कविता, अमित, सतपाल यांना दारूचं व्यसन सोडण्यासाठी त्यांच्या निकटवर्तीयांनी मदत केली. कोणी व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेतली, तर कोणी एखाद्या सपोर्ट ग्रुपची.

व्यसनमुक्ती केंद्र की सपोर्ट ग्रुप, अधिक प्रभावी काय?

डॉ. स्वाती त्यागी म्हणतात, "दीर्घकाळापासून दारू पिणाऱ्या लोकांना अपस्माराचे झटके येणं, भीती वाटणं, झोपेची समस्या, हातपाय थरथरणं यासह अनेक गंभीर शारीरिक समस्या होऊ शकतात."

"जेव्हा एखादी व्यक्ती प्रदीर्घ काळ दारू पित राहिल्यानंतर अचानक दारू पिणं थांबवते, तेव्हा त्याचा गोंधळ उडतो, त्याला दिवस-रात्रीची शुद्ध राहत नाही. अशा स्थितीत सायकोसिससारखा मानसिक आजारदेखील होऊ शकते. दीर्घकाळ दारू पित राहिल्यामुळे डिमेन्शियादेखील होऊ शकतो."

व्यसनमुक्ती केंद्र की सपोर्ट ग्रुप, अधिक प्रभावी काय?

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. त्यागी म्हणतात, "रिहॅब सेंटर अधिक प्रभावी असतं. मात्र असं सेंटर चांगलं असतं जिथे तज्ज्ञ असतात, समुपदेशक असतात. व्यसनमुक्ती केंद्र असं नसावं की जिथे रुग्णालाय मारहाण केली जाते त्याचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही.

"दारूचं व्यसन मारहाणीनं नाही, तर औषधं आणि देखभालीनं सुटतं. काही काळानं जेव्हा रुग्ण स्थिरावतो, तेव्हा सपोर्ट ग्रुपची भूमिका सुरू होते," डॉ. त्यागी म्हणतात.

व्यसनमुक्ती केंद्र कशाप्रकारे काम करतात?

तपस्या फाउंडेशन आणि रिहॅबिलिटेशन सेंटरचे संचालक दिनेश शर्मा म्हणतात, "जेव्हा एखाद्या रुग्णाला व्यसनमुक्ती केंद्रात आणलं जातं, तेव्हा सर्वात आधी त्याला औषधोपचाराची आवश्यकता असते. डॉक्टरचं काम असतं, दारू सोडल्यानंतर येणाऱ्या विथड्रॉल सिंप्टम्सना नियंत्रित करण्याचं. जवळपास 15-20 दिवस औषधं दिली जातात. त्यानंतर ग्रुप सेशन सुरू होतं."

दिनेश म्हणतात, "या ग्रुप सेशन्समध्ये कौन्सलर त्यांचे अनुभव सांगतात. नव्या रुग्णांना जाणीव होते की ते ज्या गोष्टी ऐकत आहेत, त्या त्यांच्याबरोबरदेखील होत राहिल्या आहेत. हळूहळू ते मोकळे होऊ लागतात."

"मग होतो वन- ऑन-वन सेशन. यात रुग्ण एखाद्या विश्वासू व्यक्तीजवळ त्याच्या आयुष्याबद्दल बोलतो. यामुळे त्याचं मन हलकं होतं. त्याच्यात सकारात्मक विचार विकसित होऊ लागतात."

व्यसनमुक्ती केंद्र कशाप्रकारे काम करतात?

फोटो स्रोत, Getty Images

दिनेश म्हणतात, "दारूचं व्यसन हा शारीरिक नाही, तर मानसिक आजार आहे. डब्ल्यूएचओनुसार, दारू सोडल्यानंतर 28 दिवसांच्या आत माणसाचं शरीर डिटॉक्स होतं. मात्र खरं आव्हान त्यानंतर सुरू होतं. कारण बहुतांशजण बाहेर पडताच, पुन्हा दारू पिऊ लागतात. त्यामुळे व्यसनमुक्ती केंद्र आवश्यक ठरतं."

त्यांच्या मते, "अल्कोहॉलिक्स ॲनॉनिमस आणि इतर संस्थांच्या आकडेवारीनुसार, जगभरात दारूचं व्यसन सुटण्याचं प्रमाण 7-8 टक्के आहे. तर भारतात मात्र हे प्रमाण फक्त 2-3 टक्केच आहे."

दिनेश म्हणतात की व्यसनमुक्ती केंद्र हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. या केंद्रातून बाहेर आलेला प्रत्येकजण दारू पिणं बंद करेल असंही नसतं.

दारूच्या व्यसनाविरोधातील संघर्षात जवळच्या व्यक्तींची साथ

दारूचं व्यसन सुटण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र, डॉक्टर आणि औषधांबरोबरच त्या व्यक्तीला त्याच्या जवळच्या लोकांची साथदेखील आवश्यक असते.

अमित म्हणतात, "दारुड्या व्यक्तीकडे समाजात तुच्छ नजरेनं पाहिलं जातं. लोक त्याच्याजवळ उभे राहत नाहीत, त्याला फटकारतात. त्याच्या भावनांची कदर करत नाहीत. वास्तविक तो फक्त एक आजारी माणूस असतो."

कविता म्हणतात, "आम्हालाही तितक्याच प्रेमाची, तितक्याच देखभालीची आवश्यकता असते, जितकी इतर कोणत्याही आजारी व्यक्तीला असते. दारूच्या व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तीला देखील तितक्याच देखभालीची आणि प्रेमाची आवश्यकता असते."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)