पंकजा मुंडेंना निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलनकर्त्याला पोलिसाने मारली लाथ
स्वातंत्र्यदिनानिमित्त जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना दौऱ्यावर होत्या. त्यांच्या ताफा जात असताना एका आंदोलकाने त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.
ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना पोलीस ठाण्यात नेत असताना, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी धावत येऊन फिल्मी स्टाईलने एका आंदोलकाच्या कमरेत लाथ घातल्याचा व्हीडिओ समोर आला आहे.
निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौधरी कुटुंबावर कौटुंबिक वादातून जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, आरोपींना पोलीस सहकार्य करत असून फिर्यादींना त्रास दिला जात असल्याचा आरोप अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी यांनी केला आहे. ते गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा आंदोलकांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ताब्यात घेताच आंदोलकांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचाही प्रयत्न केला.






