'सारे जहाँ से अच्छा' लिहिणाऱ्या कवीमुळेच पाकिस्तानची निर्मिती झाली का?
"मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्ताँ हमारा"
या ओळी गेल्या एक शतकापेक्षा जास्त काळ भारतात गायल्या जातायत. पण ज्या कवीने ही रचना केली, त्यालाच पाकिस्तानच्या निर्मितीचं कारण का मानलं जातं?
'सारे जहाँसे अच्छा हिन्दोस्ताँ हमारा' हे अजरामर गीत 1904 साली इकबाल यांच्या लेखणीतून आलं. पण यानंतर 6 वर्षांतच 1910 साली 'मुस्लीम हैं हम, वतन है सारा जहाँ हमारा' असं इकबाल यांनी का लिहीलं?
पाकिस्तानात असलेल्या सियालकोटमध्ये मोहम्मद इकबाल यांचा जन्म झाला 1877 साली. व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या इकबाल यांनी गव्हर्नमेंट कॉलेज लाहोरमधून शिक्षण घेतलं.
पुढे केंब्रिज विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची डिग्री आणि म्युनिकमधून पी. एच. डी. संपादन केलेले इकबाल बॅरिस्टरही झाले. युरोपात राहून एकीकडे पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि दुसरीकडे इस्लामचा अभ्यास असलेल्या इकबाल यांनी इंग्लिश इहवादावर टीका केली.






