'जंगलात आमचे देव, पूर्वज आहेत; पुढच्या पिढीचं काय?' भावली प्रकल्पाबाबत आदिवासींचा सवाल

"आमची घरं जाणार आहेत, आमची जमीन जाणार आहे. मग आम्ही जगायचं कसं?"
भावली परिसरातील बेबीताई तेलाम यांचा हा प्रश्न केवळ घर आणि जमिनीपुरता मर्यादित नाही. ज्या जमिनीवर त्यांचं कुटुंब पिढ्यान् पिढ्या जगलं, जिथे त्यांचे देव आहेत आणि पूर्वजांना दफन करण्यात आलं आहे, तीच जमीन आता एका मोठ्या ऊर्जा प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यांतील जामुंडे, काळभोंडे आणि कोथळे या गावांच्या परिसरात 1500 मेगावॅट क्षमतेचा भावली पंप्ड स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे 275 हेक्टर जमीन लागणार असून, त्यापैकी 243.74 हेक्टर वनजमीन आहे. प्रकल्पामुळे आपली जमीन, घरं आणि जंगल यांच्यावर परिणाम होईल, अशी चिंता स्थानिक आदिवासी व्यक्त करत आहेत.
दुसरीकडे, प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेलं नसून सध्या केवळ पूर्वतयारी सुरू असल्याचं जेएसडब्ल्यू कंपनीचं म्हणणं आहे. कंपनीच्या मते, या प्रकल्पामुळे 10 कुटुंबांचं पुनर्वसन करावं लागणार आहे.
काय आहे भावली पंप्ड स्टोरेज प्रकल्प?
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यांतील जामुंडे, काळभोंडे आणि कोथळे या गावांच्या परिसरात हा प्रकल्प प्रस्तावित आहे. महाराष्ट्र सरकार आणि जेएसडब्ल्यू समूह यांच्यात 14 सप्टेंबर 2021 रोजी या प्रकल्पासाठी सामंजस्य करार म्हणजेच एमओयू झाला होता.
पंप्ड स्टोरेज प्रकल्पात वीज उपलब्ध असताना पाणी खालच्या जलाशयातून वरच्या जलाशयात सोडलं जातं. विजेची मागणी वाढते, तेव्हा हे पाणी पुन्हा खाली सोडलं जातं.
या प्रक्रियेत वीज तयार केली जाते. अशा प्रकारे गरजेच्या वेळी वीज उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो.

भावली प्रकल्पासाठी सुमारे 275 हेक्टर जमीन लागणार आहे. त्यापैकी 243.74 हेक्टर जमीन वनक्षेत्रातील आहे. ही वनजमीन प्रकल्पासाठी वापरण्याची परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भावली धरण परिसरात या प्रकल्पासाठी काही हालचाली सुरू असल्याचं बीबीसी मराठीच्या पाहणीत दिसलं.
या ठिकाणी पोकलेन यंत्रं, जेएसडब्ल्यूचे कंटेनर आणि कंपनीचे कर्मचारी दिसले. मात्र, वनमंजुरीची दुसऱ्या टप्प्यातील परवानगी अद्याप प्रलंबित आहे.
महाराष्ट्रात किती PSP प्रस्तावित आहेत?
महाराष्ट्रात भिरा इथे 1997 साली आणि घाटघर इथे 2008 साली पंप्ड स्टोरेज प्रकल्प उभारण्यात आले होते. मात्र त्यांची क्षमता कमी आहे.
भिरा इथला प्रकल्प 150 मेगावॉट तर घाटघरचा प्रकल्प 250 मेगावॉट वीज साठवतो.

आता गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र सरकारनं राज्यात पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांसाठी किमान 55 सामंजस्य करार (Memorandum of Understanding) केले आहेत. त्यात टोरेंट, टाटा, अदानी, JSW, MEIL, ग्रीनको अशा खासगी कंपन्या आणि THDC, NTPC सारख्या सरकारी कंपन्यांचा समावेश आहे.
कर्जतमधील साईडोंगर आणि भिवपुरी, साताऱ्यातील तारळी, नाशिकमध्ये भावली, माळशेज घाट-जुन्नर, नाणेघाट-भोरांडे, वरसगाव-वारांगी, मावळमध्ये शिरवटा अशा वीसहून अधिक प्रकल्पांची प्राथमिक कामं, मंजुऱ्या घेण्याची तयारी सुरू आहे.
या प्रकल्पांतून 78,215 मेगावॉट (78.2 गिगावॉट) 'ऊर्जा निर्मिती' होईल, राज्यात 4,16,701 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 1,27,000 लाख लोकांना रोजगार मिळेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च 2026 मध्ये केला होता.
"पंप्ड स्टोरेजच्या माध्यमातून क्लीन एनर्जी वापरण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पंप्ड स्टोरेजचा हब झालेला आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 25 ऑक्टोबरला नवी मुंबई टोरेंटसंदर्भातील प्रश्नांवर बोलताना म्हणाले होते.

महाराष्ट्रात प्रत्येक प्रकल्पांची वीज साठवण्याची क्षमता वेगवेगळी असेल.
सध्या राज्यात प्रस्तावित प्रकल्पांपैकी साईडोंगर 1 हा सर्वाधिक 3,000 मेगावॉट (3 गिगावॅट) क्षमतेचा प्रकल्प आहे, म्हणजे भारतातला हा सर्वात मोठा प्रकल्प ठरू शकतो.
सध्या भारतात सर्वात मोठा पंप्ड स्टोरेज प्रकल्प उत्तराखंडच्या टेहरी इथे 2.5 गिगावॉटचा आहे. जगात सर्वात मोठा पंप्ड स्टोरेज प्रकल्प चीनमध्ये फेंगनिंग इथे असून, त्याची क्षमता आहे 3.6 गिगावॉट.
म्हणजे राज्यातल्या आणि देशातल्या इलेक्ट्रिसिटी ग्रिडला स्थिरता देण्यासाठी हे प्रकल्प गरजेचे असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
पण पंप्ड स्टोरेज प्रकल्प ऊर्जा निर्मितीसाठी नाही तर साठवणुकीसाठी आहेत, असं तज्ज्ञ स्पष्ट करतात.
'आमची जमीन गेली तर आम्ही जगायचं कसं?'
भावली परिसरातील रहिवासी बेबीताई तेलाम यांना या प्रकल्पामुळे जमिनी आणि घरांवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यांच्या मते, ही जमीन केवळ शेती करण्याची जागा नाही, तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा भाग आहे.
त्या सांगतात, "या जमिनीवर आम्ही जगतो. आमची घरं आहेत आणि इकडे आमचे देव-दैवत सगळं आहे. आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत यातून खातो. मेल्यानंतर आमच्या पूर्वजांनाही आम्ही इकडेच दफन केलेलं आहे. आमचा देवही इथेच आहे आणि आमचे पूर्वजही आमच्यासाठी देवच आहेत."
प्रकल्पामुळे घरं आणि जमीन गमवावी लागेल, अशी भीतीही त्या व्यक्त करतात.
"इकडे सगळे आम्ही भूमिहीन होणार आहे. आमची घरं जाणार आहे. आमची जमीन जाणार आहे. मग आता आमचं जगायचा काय?" असा प्रश्न त्या विचारतात.
बेबीताई यांच्या मते जमीन म्हणजे केवळ मालमत्ता नाही. त्यातून मिळणारा उदरनिर्वाह, घर, देवस्थान आणि पूर्वजांच्या आठवणी या सगळ्या गोष्टी त्याच्याशी जोडलेल्या आहेत.
जंगल म्हणजे केवळ झाडं आणि प्राणी नाहीत
आदिवासी समाजाच्या काही परंपरांमध्ये विशिष्ट झाडं, पक्षी आणि प्राण्यांना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असतं.
आदिवासी कार्यकर्ते नवनाथ लहानगे सांगतात की, आदिवासी समाज जंगलाकडे केवळ जगण्यासाठीचं साधन म्हणून पाहत नाही. जंगलातील काही झाडं आणि प्राणी त्यांच्या श्रद्धेचा भाग असतात.
ते सांगतात, "आम्ही आमचे देव-दैवत पशू-पक्ष्यांमध्येच बघतो आणि आम्ही त्याला दैवत मानतो. एखाद्या कुटुंबाचं उंबराचं झाड हे जर टोटेम असेल, त्याचं कुळचिन्ह असेल, तर आम्ही त्याच्यावर कुऱ्हाड-कोयता चालवत नाही आणि त्याची पूजा करतो."

या परंपरेमुळे जंगलातील बरीचशी झाडं आणि प्राणी जपले जातात, असं नवनाथ लहानगे सांगतात. "ही सगळी पशू-पक्षी आणि इतर जीव वाचवण्याची पारंपरिक व्यवस्था आहे. आजही आम्ही त्या व्यवस्थेवर ठाम आहोत. आम्ही जगलो तर जंगल जगेल," असं ते म्हणतात.
भावलीच्या परिसरातील बदलांबाबत चिंता
पर्यावरणवादी कार्यकर्ते मनीष बाविस्कर म्हणाले, "एका प्रकल्पासाठी अडीचशे ते तीनशे हेक्टर वनजमीन लागते आणि मोठ्या प्रमाणात झाडं तोडावी लागतात.
कागदोपत्री तीस-पस्तीस हजार किंवा सत्तर हजार झाडं दाखवली जातात. पण तुम्ही या परिसरात आलात आणि इथली झाडं, झुडपं आणि त्याखालचं गवत पाहिलं, तर त्याची संख्या मोजणंही शक्य नाही. सह्याद्रीची किंमत तर कोणी करू शकत नाही. यामुळे वन्यजीवांचा अधिवास नष्ट होतो.
या आदिवासी बांधवांची व्यथाही शब्दांत व्यक्त करता येणार नाही. मग वन्यजीव, आदिवासी बांधव आणि आपल्याला ऑक्सिजन देणारं जंगल नष्ट करून आपण काय साध्य करणार आहोत? हा खरा प्रश्न आहे."
"वीज साठवणुकीसाठी BESS नावाचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मग BESS आणि PSP या दोन्ही पर्यायांची शास्त्रशुद्ध तुलना झाली आहे का? शास्त्रज्ञांकडून त्याचा अभ्यास झाला आहे का? आधी असा अभ्यास करून मगच या प्रकल्पांना मंजुरी द्यायला हवी," असं बाविस्कर यांनी म्हटलं .

या परिसरातील बदलांचा परिणाम केवळ स्थानिकांवरच नाही, तर निसर्गावर अवलंबून असलेल्या इतर घटकांवरही होऊ शकतो, अशी चिंता पर्यावरणवादी कार्यकर्त्या भारती जाधव व्यक्त करतात.
त्या सांगतात, "इथे आल्यानंतर मला धक्का बसला. पावसाळ्यात नाशिककर, पुण्याचे आणि मुंबईचे लोक इथे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येतात. पण हे सगळं उद्ध्वस्त झाल्यानंतर काय होईल, असा प्रश्न मला पडला."
जेएसडब्ल्यू (JSW) कंपनीचं काय म्हणणं आहे?
या प्रकल्पाबाबत बीबीसी मराठीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शरद महेंद्र यांनी कंपनीची भूमिका स्पष्ट केली.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्या साइटवर सुरू असलेली कामं ही कंपनीच्या ताब्यातील बिगर-वनजमिनीवरील पूर्वतयारीची कामं आहेत. वनक्षेत्रात किंवा बिगर-वनक्षेत्रात प्रत्यक्ष प्रकल्पाचं काम सुरू केलेलं नाही.

फोटो स्रोत, JSW
भावली प्रकल्पासाठी 1 जून 2026 रोजी पहिल्या टप्प्यातील वनमंजुरी मिळाली असून, दुसऱ्या टप्प्यातील मंजुरीसाठी आवश्यक पूर्तता 6 नोव्हेंबर 2026 रोजी सादर केल्याचं कंपनीने सांगितलं आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मंजुरी मिळाल्यानंतर आणि वनजमीन वळवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष प्रकल्पाचं काम सुरू होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे.
या प्रकल्पामुळे 10 कुटुंबांचं पुनर्वसन करावं लागेल, असं कंपनीने आपल्या उत्तरात म्हटलं आहे. तसेच, प्रकल्पग्रस्त आणि आसपासच्या गावांतील 46 जणांना रोजगार दिल्याचंही कंपनीने सांगितलं.
पुनर्वसन, रोजगार आणि पर्यावरणाशी संबंधित उपाययोजनांवर काम सुरू असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
जनसुनावणीत काय घडलं?
End of podcast promotion
भावली प्रकल्पासाठी 10 जानेवारी 2024 रोजी नाशिकमध्ये, तर 13 फेब्रुवारी 2024 रोजी ठाणे जिल्ह्यात जनसुनावणी झाल्याचं जेएसडब्ल्यू कंपनीने बीबीसी मराठीला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे.
जामुंडे, काळभोंडे आणि कोथळे या गावांमध्ये ग्रामसभाही झाल्या असून, आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रं मिळाल्याचा कंपनीचा दावा आहे.
मात्र, स्थानिक रहिवासी बेबीताई तेलाम यांचा अनुभव वेगळा असल्याचं त्या सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाबाबत आधी पुरेशी माहिती देण्यात आली नव्हती.
गावातील चार-पाच गावांतील आदिवासींना एका कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलं आणि तिथे त्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी जाणार असल्याचं सांगण्यात आलं.
"आम्हाला आधी काही सांगितलं नाही. तुम्ही थेट कार्यक्रम ठेवला, आम्हाला तिथे बोलावलं आणि आज सांगता की आमची एवढी जमीन जाणार आहे. मग आमच्याकडे काहीच राहत नाही," असं बेबीताई सांगतात.
त्या पुढे म्हणतात की, जमिनीच्या मोबदल्याबाबतही त्यावेळी चर्चा झाली. मात्र, जमीन द्यायचीच नाही, अशी भूमिका घेत गावातील अनेकांनी विरोध केला.
"आमचा पूर्ण आदिवासी समाज, चार-पाच गावांतील लोक जमले होते. एवढ्या लोकांनी त्यांना विरोध केला. आमचा जगण्याचा दुसरा काही आधार नाही," असं त्या सांगतात.
बेबीताईंच्या म्हणण्यानुसार, त्या बैठकीनंतर सर्वेक्षणासाठी येणाऱ्या लोकांनाही गावकऱ्यांनी विरोध केला. मात्र, जनसुनावणीच्या अधिकृत इतिवृत्तात स्थानिकांचे आक्षेप नेमके कसे नोंदवले गेले आणि त्यावर काय उत्तर देण्यात आलं, हे तपासणं महत्त्वाचं आहे.
130 कुटुंबं प्रभावित, मग उर्वरित कुटुंबांचं काय?
या प्रकल्पाबाबत आणखी एक महत्त्वाचा तपशील समोर येतो. कंपनीच्या पर्यावरणीय मंजुरीच्या कागदपत्रांनुसार, प्रकल्पामुळे एकूण 130 कुटुंबं प्रभावित होणार आहेत. त्यापैकी 10 कुटुंबांचं विस्थापन होणार असल्याचा उल्लेख आहे.
मात्र, बीबीसी मराठीला दिलेल्या उत्तरात जेएसडब्ल्यूने 10 कुटुंबांच्या पुनर्वसनाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे उर्वरित 120 कुटुंबांवर प्रकल्पाचा नेमका काय परिणाम होणार, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार आणि त्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार, हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात.

बेबीताई तेलाम यांचा मात्र विकासाला विरोध नाही. त्या म्हणतात, "आमचा विकासाला विरोध नाही. विकास होऊ नये असं काही नाही. विकास करता, ते चांगलंच आहे. पण एक सरकार आमचा विकास करीत आहे आणि एकीकडे आम्हाला खूप हालात करत आहे."
बीबीसी मराठीने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला महाराष्ट्रातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पांबाबत प्रश्न विचारले आहेत.
मात्र, हे वृत्त प्रकाशित होईपर्यंत मंत्रालयाकडून उत्तर मिळू शकलं नाही. राज्याला भविष्यात वीज साठवण्याची गरज आहे; पण त्याच वेळी भावलीतील स्थानिकांची जमीन, जंगल आणि परंपरा यांचं काय होणार, हा प्रश्न कायम आहे. या दोन्ही गरजांचा समतोल कसा साधला जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
(जान्हवी मुळे यांच्या अतिरिक्त वार्तांकनासह)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






























