रिकाम्या खुर्च्या, 'बाईचा पुरुष' आणि 'काळ्या बायां'ना मिळालेला प्रतिसाद; मी अनुभवलेलं साहित्य संमेलन

फोटो स्रोत, amol langar
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, अमळनेर
97 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि 18 वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरमध्ये सुरू आहे. ही संमलेनं कव्हर करण्यासाठी मी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अमळनेरमध्ये पोहचलो.
पारोळा मार्गे अमळनेर जाताना एक गोष्ट हमखास जाणवली, ती म्हणजे जागोजागी असलेली रसवंतीची दुकानं.
सव्वा दहा वाजता माझी भेट योगेश चौधरी यांच्याशी झाली. त्यांचं रसवंतीचं दुकान आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलनाचं स्थळ कुठं आहे, अशी विचारपूस त्यांच्याकडे केली.
साहित्य संमेलनाबद्दल विचारल्यावर त्यांनी म्हटलं की, “आम्ही खूश आहोत. कारण आमदार-खासदार लोक पाहायला भेटतील. मोठमोठे लोक येतील त्यातून ज्ञान भेटेल. लोक इथून पुस्तकं नेतील. संमेलनासाठी शाळेतल्या पोरांना तिकडं नेलं आहे.”
योगेश यांच्या दुकानावरून निघाल्यावर मी संमेलनस्थळाकडे निघालो तेव्हा शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या गाड्या भरभरून येत होत्या.
शिक्षक मंडळी या विद्यार्थ्यांना रांगेनं संमेलनस्थळाकडे नेत होती.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALGE/BBC
रस्त्याच्या दोन्ही बाजूनं साहित्य संमेलनाबाबतचे पोस्टर्स लावण्यात आले होते.
लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडलं.
यावेळी व्यासपीठासमोर बरीच गर्दी होती. म्हणजे जेवढ्या खुर्च्या होत्या, तेवढ्या भरलेल्या होत्या.

फोटो स्रोत, AMOL LANGAR
दीडच्या सुमारास मात्र जवळपास सगळं सभागृह रिकामं झालं होतं. विशेष म्हणजे यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांचं अध्यक्षीय भाषण सुरू होतं.
शाळा-कॉलेजेसचे जे विद्यार्थी आणलेले होते, ते परत चालले होते. सभागृहातील दोन्ही बाजूच्या बहुतेक खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या.
शोभणे यांनी त्यांच्या भाषणात मराठी साहित्यासहित शिक्षण व्यवस्था, त्यातील मराठीचं स्थान, बेकारीची समस्या इत्यादी मुद्दे मांडले.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
मागच्या बाजूस एक तरुण मोबाईलवर गेम खेळत बसला होता.
लोक परत का चाललेत, असं विचारल्यावर तो म्हणाला, "आधी बरेच लोक होते. पण अजित पवारांचं भाषण झाल्यावर लोक गेले."
पण का, असा प्रतिप्रश्न केल्यावर तो लगेच म्हणाला, "आजकाल कुणी भाषण ऐकतं का हो?"

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
सभागृहाच्या मागच्या बाजूस बसलेली मुलं पतंग उडवण्यात, मोबाईल पाहण्यात, गप्पा करण्यात दंग होती.
तितक्यात माझ्या शेजारी एक तरुण येऊन उभा राहिला. अमळनेरचाच असल्याचं त्यानं सांगितलं.
लोक का गेले असतील, असं विचारल्यावर तो म्हणाला, "मंत्री गेले का? लोक नेत्याला पाहायला येतात. ज्यांना साहित्य संमेलनाचं महत्त्व कळालं तेच थांबेल आहेत फक्त."
हे वाक्य बोलून काही सेकंद होत नाही, तोच तोही तरुण तिथून निघून गेला.
सभागृहात व्यासपीठासमोर प्रमुख पाहुण्यांसाठी म्हणजे गावागावातून येणाऱ्या साहित्यिक लोकांसाठी खुर्च्या ठेवलेल्या होत्या. त्याही निम्म्याहून अधिक रिकाम्याच होत्या.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
परत मागे आलो तर सत्तरी ओलांडलेले दोन आजोबा खुर्चीवर शांतपणे बसून होते.
यापैकी एक होते 71 वर्षांचे चतुर्भूज पाटील. ते निवृत्त प्राध्यापक आणि कीर्तनकार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जे वक्ते सहभागी होणार होते, त्यापैकी एक चतुर्भूज पाटील होते.
माझ्याशी बोलताना ते म्हणाले, “तरुण मंडळी इथं प्रत्यक्ष येतील, इथं येऊन ऐकतील, असे कार्यक्रम ठेवायला पाहिजे. नाहीतर ते हे असे कार्यक्रम घरी बसून मोबाईलवरही ऐकू शकतात. तुम्ही पाहत असाल की तरुण निघून गेले, वृद्ध मात्र शेवटपर्यंत इथं बसून राहिले.”
यानंतर ग्रंथदालन म्हणजे पुस्तक विक्रीसाठी ज्या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल्स लावण्यात आले होते तिकडे मी गेलो.
तिथं एका ठिकाणी अध्यक्ष शोभणे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यासाठी गर्दी जमल्याचं दिसून आलं. यातही बहुतेक मंडळी ही केस पांढरे झालेलीच होती.

फोटो स्रोत, AMOL LANGAR
दुपारी अडीचच्या सुमारास ना.धो. महानोरांच्या नावे असलेल्या सभागृहात 'कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक' या विषयावर परिसंवाद सुरू होता. इथंही वेगळी परिस्थिती नव्हती. वक्ते त्यांची त्यांची मतं मांडत होती, समोर मात्र निम्म्या खुर्च्या रिकाम्या होत्या.
पुस्तक विक्रीसाठी मुंबईहून आलेली काही मंडळी पश्चात्ताप व्यक्त करत होती. तीन दिवसांत 25-30 हजार रुपये वाया गेले, असे शब्द कानावर पडत होते.
साहित्य संमेलन आहे असं वाटतच नाही, असंही काही जण म्हणत होते.
दुपारी माझ्या सहकाऱ्याला घरुन फोन आला तेव्हा त्याच्या मुलानं इंग्रजी पुस्तक असेल तर आणा, असं त्याला म्हटलं.
आपण मराठी वाचलंच पाहिजे बेटा, असं एका स्टॉलवर पुस्तक विक्री करणारी महिला पालकांसोबत आलेल्या मुलाला समजून सांगताना दिसली.

फोटो स्रोत, AMOL LANGAR
तृतीयपंथीय समुदायाचे मराठी साहित्यातील स्थान आणि चित्रण, असा एक परिसंवादाचा विषय होता.
संध्याकाळी सुरू असलेल्या या परिसंवादावेळी मात्र सभागृह फुल भरलेलं होतं. लोक बाहेर उभं राहून वक्त्यांचे विचार ऐकत होते.
संध्याकाळी साडेसहा नंतर संमेलनस्थळी बरीच रेलचेल दिसून आली. बरेच जण आपापल्या लहान मुलांना संमेलनस्थळी घेऊन येत होते.
साहित्य संमेलनस्थळी फिरत असताना जळगाव, धुळे, नंदूरबारची अहिराणी बोली सतत कानावर पडत होती.
संध्याकाळच्या सुमारास सुरू झालेल्या कवी संमेलनालाही बऱ्यापैकी लोक आल्याचं दिसलं.

फोटो स्रोत, AMOL LANGAR
रात्री 8 च्या सुमारास मी संमेलस्थळावरुन बाहेर पडलो. त्यावेळी दोघे जण रस्त्यावर फिरत होते.
संमेलनस्थळाच्या प्रवेशद्वारापाशीच तृतीयपंथीच्या परिसंवादाचं बॅनर लागलेलं होतं. ते दोघे हे बॅनर पाहून थांबले आणि त्यातल्या पुरुषानं सोबत असलेल्या महिलेला परिसंवादाबाबत सांगायला सुरुवात केली.
“हा संवाद खूप भारी झाला. खूप गर्दी होती. इतकी कोणत्याच संवादाला नसेल. तो मुलगा खूप छान बोलला.”
तो पोरगा आधी बाई होता, मग पुरुष झाला, असं त्या माणसानं बॅनकरडे बोट करत सोबत असलेल्या महिलेला सांगितलं. त्याचं बोट बॅनरवरील प्रून्नीत गौडा यांच्या फोटोकडे होतं.
तेव्हा ती महिला म्हणाली, “हो काही पण काय सांगता?” त्यानंतर तो तिला समजावत पुढे निघून गेला.

फोटो स्रोत, AMOL LANGAR
या नंतर मी विद्रोही साहित्य संमेलन ज्या आर.के. नगर मध्ये आयोजित करण्यात आलं होतं, तिकडं गेलो.
2 फेब्रुवारीची रात्र होती आणि सव्वा आठ वाजले होते. मी तिथं पोहचलो, तेव्हा एकपात्री प्रयोग सुरू होता. सभागृहात नजर फिरवली तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. लोक उभे राहून हा प्रयोग ऐकत होते.
हर्षल पाटील नावाचा तरुण 'नली निरपेक्ष प्रेमाची गोष्ट' हा एकल नाट्यप्रयोग सादर करत होता.
या प्रयोगात तो शेतीबाडी, शेतकरी आत्महत्या हे विषय गांभीर्यानं मांडत होता. त्याला टाळ्यांनी प्रतिसाद मिळत होता.
“काळ्या बाया काळ्या मातीत निंदताहेत,
शेतात काम करणाऱ्या बाया मातीसोबत माती होताहेत.”
या वाक्यानं त्यानं त्याच्या प्रयोगाचा शेवट केला, तेव्हा सभागृह टाळ्यांनी दुमदुमून गेलं. हे चित्र पाहिल्यावर अमळनेरमध्ये ‘ऐकणारी’ माणसं असल्याचा फील आला.

फोटो स्रोत, AMOL LANGAR
दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 फेब्रुवारीपासून विद्रोही साहित्य संमेलन सुरू होणार होतं.
आयोजक व्यासपीठावरुन साहित्य संमेलनासाठी येणारे लेखक, कलाकार यांची माहिती देऊन लोकांना उपस्थित राहण्याचं आवाहन करत होते.
यात बहुतेक लेखक, कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय, चांगले फॅन-फॉलोइंग असणारे होते.
3 फेब्रुवारीच्या सकाळी 9 च्या सुमारास मी विद्रोही मराठी साहित्य संमेलनस्थळी पोहचलो. अनेक जण रिक्षातून संमेलनस्थळी पोहचत होते.
संमेलन स्थळाच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढली जात होती. बहिणाबाई चौधरींचा मोठा फोटो आणि त्याखाली त्यांच्या ओव्या लिहिलेल्या होत्या.
पुस्तक विक्रेते स्टॉल्स लावण्याच्या तयारीत होते. एका स्टॉलवर पुस्तक पाहत होतो, तेव्हा तिथं काही जणांचा ग्रुप आला. बाबासाहेबांचा फोटो हवा, रात्री चमचम करेल असा हवा, अशी त्यांनी दुकानदाराकडे विचारपूस केली.
अनेकांच्या शर्टवर 'सत्यशोधक' असा बिल्ला लावलेला दिसत होता.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
मुख्य सभागृहात पोहचलो, तर मागून आवाज आला, अरे बाप रे, भारी पेंडॉल केलाय यंदा. आधी अशी व्यवस्था नव्हती. आता मस्त केलं.
मागे वळून बघितलं तर मुसाभाई शेख आणि त्यांचा मित्र एकमेकांशी बोलत होते.
मुसाभाई छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या आंबा गावचे. गावातून दोन पिकमध्ये 40 जण विद्रोही संमेलनासाठी आल्याचं ते म्हणाले.
माझ्याशी बोलताना ते म्हणाले, “मी आधी धुळे, बुलडाणा येथील विद्रोही साहित्य संमेलनाला गेलो होतो. तेव्हा बसायला नुसत्या चटया टाकलेल्या होत्या. आता मात्र भारी व्यवस्था केलीय.”
काय व्यवस्था केलीय ती आताच पाहून घेऊन, पुन्हा मग प्रवचनं सुरू होतात, असं म्हणत ते आणि त्यांचा गावकरी पुढे निघून गेले.
मी मागून त्यांना विचारलं, इथली प्रवचनं आवडतात का ऐकायला?
त्यावर ते म्हणाले, “हो मग. जीवनाबद्दल चांगलं मार्गदर्शन करतात ते.”

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
त्यानंतर अकराच्या वाजता मी पुन्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळी पोहोचलो. तेव्हा एका सभागृहात पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची मुलाखत सुरू होती. समोर श्रोते म्हणून रिकाम्या खुर्च्या होत्या. प्रमुख पाहुण्यांसाठीच्या खुर्च्याही जवळपास 60 % रिकाम्या होत्या.
साडे अकराच्या दुसऱ्या एका सभागृहात चैत्राम यांची 'ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन' या विषयावर मुलाखत सुरू होती. इथं मात्र थोड्या फार प्रमाणात लोक उपस्थित होते.
रिकाम्या खुर्च्यांसमोर बोलायचं म्हटल्यावर किती मोठं धारिष्ट्य लागत असेल, असा प्रश्न माझ्या मनात कायम उपस्थित होत होता. हा प्रश्न मी एका पत्रकार मित्राला बोलून दाखवला तर तो म्हणाला, त्यांना काय त्यांचं मानधन भेटत असेल.
त्यानंतर काही वेळानं मी पुन्हा विद्रोही साहित्य संमेलनस्थळी पोहचलो, तेव्हा संमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होता. पुन्हा तेच चित्र दिसलं. सभागृह खचाखच भरलेलं होतं. यात महिलांचाही सहभाग मोठा होता.
देशामध्ये सध्या जी पिरिस्थिती आहे, तिला उत्तर देण्यासाठी हे विद्रोही संमेलन आहे, असं व्यासपीठावरुन एक जण म्हणाले.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
प्रास्ताविक सादत करताना डॉ. लिलाधर पाटील म्हणाले, “देशात लेखणीला, अभिव्यक्तीला साखळ्यांनी बंद करण्याचा कार्यक्रम चालू आहे. ही साखळी आम्ही तोडली आहे. जोपर्यंत जिवंत आहोत, तोपर्यंत बोलत राहू हा संदेश आम्ही या संमेलनातून दिला आहे.”
या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून हिंदी कवी संपत सरल येणार होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नसल्याचं आयोजकांनी उपस्थितांना सांगितलं.
दुपारी दोनच्या सुमारास मी इथून बाहेर पडत होतो. तेव्हा प्रवेशद्वाराकडे जाताना बरोबर मधोमध तोफ ठेवलेली होती. तोफेच्या तोंडाला लेखणी होती आणि तोफेवर भारतीय संविधान असं लिहिलेलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








