भोगवटादार वर्ग-2 मध्ये कोणत्या 16 प्रकारच्या जमिनी येतात? यापैकी किती जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर करता येतं?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी
प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, getty images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

“सातबारा उताऱ्यावर प्रतिबंधित सत्ता प्रकार आहे, पण हे काय असते याविषयी माहिती द्या,” असा प्रश्न योगेश बोडखे यांनी विचारला होता.

बीबीसी मराठीच्या गावाकडची गोष्ट क्रमांक 113चा व्हीडिओ पाहिल्यानंतर त्यांनी हा प्रश्न कमेंट करून विचारला.

खरंतर, सातबारा उताऱ्यावर तुमची जमीन कोणत्या भूधारणा पद्धती अंतर्गत येते, ते नमूद केलेलं असतं. पण बरेचदा भोगवटादार वर्ग-2 अंतर्गत येणाऱ्या जमिनींविषयी अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

या बातमीत आपण भूधारणा पद्धतीचे प्रकार कोणते आहेत? भोगवटादार वर्ग-2 अंतर्गत येणाऱ्या जमिनींचे प्रकार कोणते आहेत? यापैकी किती जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर करता येतं? याची माहिती जाणून घेणार आहोत.

भूधारणा पद्धतीचे 4 प्रकार

भूधारणा पद्धतीचे एकूण 4 प्रकार पडतात.

भोगवटादार वर्ग-1 पद्धत - या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात. शेतकरीच या जमिनीचा मालक असतो. तो त्याच्या इच्छेनुसार या जमिनीची विक्री करू शकतो.

भोगवटादार वर्ग-2 पद्धत – या पद्धतीमधील जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत. सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही.

या जमिनी भोगवटादार वर्ग-2 किंवा नियंत्रित सत्ता प्रकार किंवा निर्बंधित सत्ता प्रकार किंवा प्रतिबंधित सत्ता प्रकार या नावानेही ओळखल्या जातात.

‘शासकीय पट्टेदार' – या जमिनी सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या असतात. या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्वावर दिल्या जातात.

‘महाराष्ट्र शासन’ - चौथ्या प्रकारच्या जमिनी ‘महाराष्ट्र शासन’ या प्रवर्गात मोडतात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात.

भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनी

भोगवटादार वर्ग-2 या भूधारणा पद्धतीतील जमिनीचं सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय हस्तांतरण होत नाही.

यामध्ये खातेदारांना वेगवेगळ्या कायद्यांनुसार वाटप केलेल्या किंवा प्रदान केलेल्या जमिनी येतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, LAXMAN DANDALE

भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींची माहिती गाव नमुना 1 (क) मध्ये नोंदवलेली असते. आता, भोगवटादार वर्ग-2 च्या पद्धतीमध्ये किती व कोणत्या प्रकारच्या जमिनी येतात, ते पाहूया.

वर्ग-2 च्या जमिनींचे 16 प्रकार

महाराष्ट्र सरकारनं 17 मार्च 2012 रोजीच्या शासन निर्णयानुसार, भोगवटादार वर्ग-2 जमिनींच्या अनधिकृत हस्तांतरणास आळा बसावा या दृष्टीनं महसूल नियम पुस्तिकेच्या खंड 4 मधील गाव नमुना एक (1) मध्ये सुधारणा केली.

सोबतच शासनानं भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींची एकूण 14 प्रकारांमध्ये वर्गवारी केली.

त्यानंतर 15 मार्च 2021 रोजी सरकारनं शासन निर्णयाद्वारे 2 प्रकारच्या जमिनी यात समाविष्ट केल्या.

अशाप्रकारे भोगवटादार वर्ग-2 मध्ये एकूण 16 प्रकारच्या जमिनींचा समावेश होतो. आता या जमिनी कोणत्या आहेत आणि त्यांची नोंद गाव नमुन्यात कुठे असते ते पाहूया.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

  • मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी – 1 क (1)
  • वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी (देवस्थान जमिनी वगळून) - 1 क (2)
  • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 अन्वये विविध योजनांतर्गत प्रदान / अतिक्रमण नियमानुकुल केलेल्या जमिनी (भूमीहीन, शेतमजूर, स्वातंत्र सैनिक इ.) - 1 क (3)
  • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 अन्वये विविध योजनांतर्गत प्रदान/ अतिक्रमण नियमानुकुल केलेल्या जमिनी (गृह निर्माण संस्था, औद्योगिक अस्थापना, शैक्षणिक संस्था, विशेष वसाहत प्रकल्प इ.) - 1 क (4)
  • सिलिंग कायदा म्हणजेच महाराष्ट्र शेतजमीन कमाल धारणा अधिनियम, 1961 अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी - 1 क (5)
  • महानगरपालिका, नगर पालिका व विविध प्राधिकरण यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी अथवा ग्रामपंचायतीकडे गुरचरण अथवा इतर प्रयोजनांसाठी वर्ग केलेल्या जमिनी - 1 क (6)
  • देवस्थान इनाम जमिनी - 1 क (7)
  • आदिवासी खातेदारांच्या जमिनी (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966, कलम 36 अ अन्वये) – 1 क (8)
  • महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम 1999 च्या कलम 16 अन्वये प्रदान केलेल्या जमिनी - 1 क (9)
  • भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनी - 1 क (10)
  • भूदान व ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमिनी - 1 क (11)
  • महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिनियम, 1975 तसेच महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 अन्वये चौकशीसाठी प्रलंबित असलेल्या जमिनी - 1 क (12)
  • भूमीधारी हक्कान्वये प्राप्त झालेल्या जमिनी - 1 क (13)
  • महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 अन्वये कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी - 1 क (14).
  • भूसंपादन अधिनियमान्वये संपादित केलेल्या जमिनी – 1 क (15)
  • वक्फ जमिनी - एक क (16)

कोणत्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर होत नाही?

भोगवटादार वर्ग-2 मधील 16 जमिनींपैकी काही जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर होत नाही.

महसूल कायदेतज्ज्ञ डॉ. संजय कुंडेटकर यांनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये खालील जमिनींचा समावेश होतो.

  • सिलिंगच्या जमिनी वर्ग-1 करण्याची अजून तरी कायद्यात तरतूद नाहीये.
  • महानगरपालिका, नगर पालिका यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी शासकीय जमिनी असल्यामुळे त्यांचं वर्ग-1 मध्ये रुपांतर होत नाही.
  • देवस्थान इनाम जमिनी
  • आदिवासी खातेदारांच्या जमिनी
  • खाजगी वने (संपादन) अधिनियम अन्वयेच्या जमिनी
  • सिलिंग अन्वये कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी
  • भूसंपादन अधिनियमान्वये संपादित केलेल्या जमिनी आणि
  • वक्फ जमिनी.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)