भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर कसं करायचं? या प्रक्रियेत नवीन बदल काय झालेत?

फोटो स्रोत, GETTY IMAGES
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
राहुल शेळके हे छत्रपती संभाजीनगरच्या धोपटेश्वर गावात राहतात. त्यांना त्यांच्या वर्ग-2 च्या जमिनीचं वर्ग-1 मध्ये रुपांतर करायचं आहे. त्यासाठी त्यांनी मला फोन केला आणि कागदपत्रांची विचारपूस केली.
त्याचवेळी हा विषय डोक्यात आला की, आपण सामान्य नागरिकांना भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनीचं वर्ग-1 मध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया काय आहे, गेल्या काही वर्षांमध्ये या प्रक्रियेत नेमके काय बदल झाले आहेत, ते अगदी सोप्या भाषेत समजून सांगायला हवं.
मग मी याविषयीचे सरकारचे कायदे-नियम वाचले, काही महसूल तज्ज्ञांशी चर्चा केली आणि ही बातमी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
या बातमीत आपण वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर कसं करायचं? यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा? नजराणा किती लागतो? याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत.
वर्ग-2 आणि वर्ग-1 ची जमीन म्हणजे काय?
सातबारा उताऱ्यावर तुमची जमीन कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत येते, ते नमूद केलेलं असतं.
भोगवटादार वर्ग-1 या पद्धतीतमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.
भोगवटादार वर्ग-2 या पद्धतीतमध्ये खातेदारांना शासनाकडून मिळालेल्या जमिनी असतात. या जमिनींचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही.
यामध्ये देवस्थान इनाम जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इ. जमिनींचा समावेश
होतो.
अर्ज कसा करायचा?
8 मार्च 2019 रोजी महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्ट्यानं प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरित करणे) नियम, 2019 राजपत्राद्वारे प्रसिद्ध केला.
या नियमानुसार, ज्या जमिनी शासनानं नागरिकांना कृषिक, रहिवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक वापरासाठी कब्जेहक्कानं अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या आहेत, त्या जमिनींचं वर्ग 1 मध्ये रुपांतर करता येतं.
यासाठी तहसील कार्यालयात तहसिलदारांकडे अर्ज करता येतो.
महसूल कायदेतज्ज्ञ डॉ. संजय कुंडेटकर यांच्या एका लेखात यासाठीच्या अर्जाचा नमुना दिलेला आहे. खालील फोटोत तुम्ही तो पाहू शकता.

फोटो स्रोत, DR SANJAY KUNDETKAR
अर्जाच्या सुरुवातीला, प्रती लिहून
त्याखाली तहसीलदार असं लिहायचं आहे.
मग त्याखाली तालुक्याचं आणि त्याखाली जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे.
मग विषय – लिहायचा आहे की,
महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणे) नियम, 2019 अन्वये अर्ज.
मा. महोदय,
मी, अर्जदार नामे ---------(अर्जदाराचं नाव)
राहणार --------(गावाचं नाव)
महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग - 1 मध्ये रूपांतरीत करणे) नियम, 2019 अन्वये खालीलप्रमाणे अर्ज सादर करीत आहे.
- जमीन धारकाचे नाव:-
- जमीन धारकाचा संपूर्ण पत्ता:-
- जमीन धारकाचा संपर्क क्रमांक:-
- जमीन धारकाला जमीन प्रदान करण्यात आलेल्या आदेशाचा क्रमांक व दिनांक:-
- जमीन धारकाला प्रदान करण्यात आलेली जमीन कब्जेहक्काने प्रदान करण्यात आली आहे की भाडेपट्टयाने?-
जमिनीचा तपशील असं लिहून तो पुढीलप्रमाणे लिहायचा आहे.
सुरुवातीला गावाचे, तालुक्याचे मग जिल्ह्याचे नाव लिहायचं आहे.
मग अनुक्रमांक, त्यानंतर कोणत्या गटात ती जमीन आहे तो गट किंवा भूपामन क्रमांक आणि शेवटी जमिनीचं क्षेत्र एकर आर मध्ये लिहायचं आहे.
समजा जमीन 1 एकर 12 गुंठे असेल, तर एकरच्या रकान्यात 1 लिहून आरच्या रकान्यात 12 लिहायचं आहे.
अशाप्रकारे वेगवेगळ्या गटात जमीन असेल तर ते एकाखाली एक नंबर टाकून लिहायचं आहे.
उपरोक्त जमीन, महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करणे) नियम, 2019 अन्वये भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणेकामी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करीत आहे.
सदर जमिनीचे नियमानुसार होणारे अधिमूल्य शासनास अदा करण्यास मी तयार आहे. कृपया माझी उपरोक्त जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करून मिळावी.
वरील माहिती माझ्या माहितीप्रमाणे खरी व बरोबर आहे.
पुढे अर्जदाराची सही करून ठिकाण आणि दिनांक म्हणजेच तारीख टाकायची आहे.
नजराणा किती लागतो?
बदललेल्या नियमांनुसार, खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग-2 मधून वर्ग-1 करताना कोणताही नजराणा आकारला जाणार नाही, पण इतर भूमिहीनांना सरकारनं दिलेल्या जमिनी वर्ग-2 मधून वर्ग-1 करताना प्रचलित दरानुसार नजराणा आकारला जाईल, असं सरकारनं स्पष्ट केलंय.
डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात याविषयी बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, “भोगवटादार वर्ग-2 मधून 1 करताना ज्या मूळ खंडकऱ्यांच्या जमिनी होत्या, त्यांना अधिमूल्य आकारायचं नाही. इनामाच्या ज्या जमिनी आहेत, त्यावर प्रचिलित कायद्यानुसार आकारणी करावी लागेल.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
प्रचलित दरानुसार, नजराणा किती भरावा लागेल ते पाहूया...
- कृषिक प्रयोजनसाठी जमीन प्रदान केलेली असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 50 % इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.
- वाणिज्यिक अथवा औद्योगिक वापरासाठी कब्जेहक्कानं किंवा भाडेपट्ट्यानं धारण केलेली असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 50 % इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.
- रहिवासी वापरासाठी कब्जेहक्कानं धारण केलेली जमीन असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 15% इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.
- रहिवासी वापरासाठी पण भाडेपट्ट्यानं धारण केलेली जमीन असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 25% इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019 च्या या नियमानंतर, ज्या नागरिकांनी वर्ग-2 च्या जमिनी वर्ग-1 मध्ये रुपांतरित केल्यात त्यांना नजराणा भरण्यासाठी 7 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. आधी ही मुदत मार्च 2022 पर्यंत होती.
कागदपत्रे कोणती लागणार?
वर्ग-2 च्या जमिनीचं 1 मध्ये रुपांतर करण्यासाठी कोणती कागदपत्रं लागणार, ते जाणून घेण्यासाठी तुम्ही एकदा तहसील कार्यालयात जाऊन त्याबाबत विचारपूस करणं कधीही चांगलं ठरतं.
साधारणपणे कोणती कागदपत्रं लागतात ते पाहूया-
- संबंधित जमिनीचे गेल्या 50 वर्षांतील सातबारा उतारे
- या सातबारा उताऱ्यावरील सर्व फेरफार नोंदी
- चतु:सीमा दाखवणारा नकाशा
- आकरबंदाची मूळ प्रत
- एकत्रीकरणाचा मूळ उतारा
- मूळ धारकास जमीन कशी मिळाली त्याबाबत कबुलायत
- तलाठी यांच्याकडील वन जमीन नोंद वहीचा उतारा
अर्ज केल्यानंतर पुढे काय?
एकदा का अर्ज सादर केला की, किती नजराणा भरायचा त्याबाबतचं चलन तहसील कार्यालयाकडून अर्जदारास दिलं जातं. अर्जदारानं बँकेत ही रक्कम भरल्यास ते चलन आणि खरेदीची इतर कागदपत्रं पाहून तलाठी त्या व्यवहाराची गाव नमुना 6 मध्ये नोंद करतात.
पुढे मंडळ अधिकारी सर्व कागदपत्रं बघतात आणि मग त्या जमिनीवरील भोगवटादार वर्ग-2 हा शेरा कमी होऊन तिथं भोगवटादार वर्ग-1 हा शेरा लागतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








