'वेदनेला पुरस्कार दिल्याने वेदना संपत नाही', 'युवा साहित्य अकादमी विजेता' देवीदास यांचा लेखन प्रवास

देवीदास सौदागर

फोटो स्रोत, Ashay Yedge

    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी

'बघून लिहिणाऱ्यापेक्षा भोगून लिहिणाऱ्याचं लिखान जास्त जीवंत असतं, आणि याच भोगातून उमेटलेली प्रतिक्रिया म्हणजे उसवण ही कादंबरी आहे,' असं देवीदास सौदागर म्हणतात.

देवीदास सौदागर यांच्या ‘उसवण’ कादंबरीला साहित्य क्षेत्रातील मानाचा ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर बीबीसी मराठीनं त्यांच्याशी बोलून या कादंबरीबाबत आणि त्यांच्या जीवनाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

वेदनेला पुरस्कार दिल्याने वेदना संपत नाही, पण पुरस्कार मिळाल्यानं बळ नक्कीच वाढतं असं सौदागर म्हणाले.

ग्रामीण आणि शहरी जीवनातील विसंगती, संघर्ष आणि मानवी भावभावना या त्यांच्या लेखनातील मुख्य विषयांपैकी एक आहेत.

'उसवण' ही त्यांच्या साहित्यिक प्रवासातील एक महत्वपूर्ण कामगिरी मानली जाते. त्यांच्या लेखनात मानवी नात्यांची गुंतागुंत आणि समाजातील विविध प्रश्नांची चर्चा प्रकर्षाने आढळते.

ग्राफिक्स

कादंबरी एका ग्रामीण समाजातील कथा सांगते. त्यात कुटुंबातील नातेसंबंध, सांस्कृतिक बदल आणि सामाजिक ताण-तणाव यांचे सूक्ष्म चित्रण आहे.

या कादंबरीत ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनाचे बारकावे, आर्थिक संकटं आणि आधुनिकतेचा वाढता दबाव या सर्वांचं वर्णन आहे.

कादंबरीत मांडला जगण्याचा संघर्ष

या कादंबरीच्या विषयाबाबत बोलताना सौदागर म्हणाले की, "मी जे शिवणकाम करतोय तेच काम माझे वडीलही करायचे. हे काम करताना आलेल्या अनुभवांवर आधारित अशी ही उसवण कादंबरी आहे.

"या कामामुळं पाहिलेला चांगला काळ आणि नंतर परिस्थिती बदलल्यानं पाहिलेला वाईट काळ या सगळ्याचं चित्रण त्यात आहे. स्वतः भोगलेले सगळे बरे-वाईट अनुभव कादंबरीमध्ये आले आहेत.

"रेडिमेड कपड्यांची फॅशन, ऑनलाइन कपडे खरेदी यामुळं पारंपरिक शिवणकामावर परिणाम झाला. त्यामुळं शिवणकाम करणाऱ्यांची झालेली उपासमार यामध्ये चित्रित करण्यात आली आहे," असं सौदागर म्हणाले.

देवीदास सौदागर

फोटो स्रोत, Ashay Yedge

पूर्वी ग्रामीण भागात गावगाडा, बलुतेदार पद्धत होती. पण ती नंतर बदलली आणि शहरीकरणानंतर लोक कामासाठी शहरात गेले.

शाळेत ठराविक विषयांचं शिक्षण मिळतं. पण आपल्या पारंपरिक कलांसाठी शाळेत काहीच नाही. शिंपीकाम, सुतारकाम अशी कला कुटुंबामधूनच पंजोबा आजोबा वडील यांच्याकडून शिकावी लागत होती.

नंतरच्या काळात मशीन आल्या आणि या कलांची किंमत कमी झाली. कलाकारांची उपयोगिताही संपली. समाजात त्यांना काही किंमत राहिली नाही. त्यामुळं कलेच्या जीवावर पोट भरण्याचे पर्याय कमी होत राहिले. या सगळ्यांची गोष्ट उसवणमध्ये मांडली असल्याचं सौदागर म्हणाले.

कादंबरीचा जन्म कसा झाला?

देवीदास सौदागर यांना सुरुवातीपासून वाचनाची आवड होती. त्यातून ते वाचत राहिले. नंतरच्या काळात जेव्हा वाचलेलं बऱ्यापैकी समजू लागलं तेव्हा त्यांना वाटलं की, आपण अनेकांच्या जीवनाविषयी वाचलं पण आपल्या आयुष्याचा आरसा दिसावा किंवा आपल्या आयुष्यासारखी पुस्तकं फारच कमी आहेत.

विशेषतः शिवणकामाबाबतची पुस्तकं मराठी साहित्यात कमी होती, त्यामुळं आपण आपली गोष्ट लोकांना सांगावी असं वाटलं, आणि त्यातून या कादंबरीचा जन्म झाल्याचं ते म्हणाले.

"कादंबरी लिहिण्यासाठी जवळपास अडीच ते तीन वर्षे लागली. ही कादंबरी लिहिताना अनेकदा वाटलं की, आपण थांबावं आता पुढं लिहिता येणार नाही. कारण कादंबरी लिहिण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. घर लहान असल्यानं सलग बैठक करून लिहिणं शक्य होत नव्हतं. त्रासदायक वाटत होतं. त्यामुळं थांबावं वाटलं.

उसवण

फोटो स्रोत, Ashay Yedge

पण नंतर विचार केला की, आपण थांबलो तर नंतर कोणी यावर लिहिल का? आपल्या समकालातील लिखाण कसं होणार? या विचाराने मी प्रयत्न करून ही कादंबरी पूर्ण केली," असं त्यांनी सांगितलं.

"घरची गरिबी असल्यानं टीव्ही, रेडिओ असं काही नव्हतं. त्यामुळं वर्तमानपत्र वाचण्याची सवय लागली. त्यातून पुस्तकं वाचू लागलो आणि अण्णाभाऊ साठे, वि. स. खांडेकर, विश्वास पाटील, भालचंद्र नेमाडे, आसाराम लोमटे अशा वेगवेगळ्या कथाकारांची पुस्तकं वाचली. ते वाचल्यानंतर आपणही आपल्या जगण्याची गोष्ट लिहावी असं वाटलं. सुरुवातीला काही काळ कविता लेखन केलं. पण ही गोष्ट कवितांतून मांडता येणार नाही असं वाटलं आणि त्यातूनच ही कादंबरी पूर्ण केली."

बोलीभाषा लोकांना आवडली

कादंबरी लिहिताना स्वतःच्याच जीवनाचं वर्णन करण्याचा विचार कसा आला? या मागचं कारणही सौदागर यांनी सांगितलं.

"पूर्वी अनेक प्रतिभावान लोक होऊन गेली. तशी आपल्या कुटुंबातही होती. पण केवळ शिक्षण नसल्यानं त्यांना स्वतःबद्दल नोंद करून ठेवता आली नाही. आपण शिकलो आहोत, त्यामुळं आपण लिहायला हवं. आपल्या जीवनाचा समकालीन संदर्भग्रंथ म्हणून नंतरच्या काळत हे लिखाण इतिहासात नोंदवलं जात असतं," असं ते सांगतात.

या ठराविक काळामध्ये या भागातील लोक कसं जगत होते? त्यांची दिनचर्या, ते कुठल्या कष्टाशी झुंजत होते? याची नोंद होण्यासाठी भोगणाऱ्यानं लिहायला हवं, असा आग्रह ते करतात.

देवीदास सौदागर

फोटो स्रोत, Ashay Yedge

"भोगणाऱ्यांनी केलेलं लिखाण जीवंत उमटतं कारण ते त्यांनी स्वतः भोगललेलं असतं. बघणाराही उत्तम लिहू शकतो, पण त्याला अत्यंत संवेदनशीलतेनं समोरच्याच्या दुःखाशी एकरूप होऊन लिहावं लागतं. त्यापेक्षा भोगणाऱ्यानं स्वतः लिहिलेलं उत्तम. कारण लिहिलं नाही, तर बाहेरच्यांना सोडा भोगणाऱ्याच्याच पुढच्या पिढीला किंवा काही काळानं स्वतःलाही याचा विसर पडतो. त्यामुळं मी यावर लिहिलं."

मराठीतील बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. पण बोलीभाषा आपल्याला आवडते, त्यामुळं कादंबरीतील संवाद बोलीभाषेतच लिहिल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळंच लिहिताना मला आणि वाचताना लोकांनाही आनंद वाटला, असं सौदागर यांनी सांगितलं.

'गरीबी होती आणि आजही आहे'

देवीदास सौदागर यांची आर्थिक स्थिती ही सर्वसाधारण अशीच आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले की,त्यांच्या नशिबी पिढीजात गरीबी आलेली असून आजही स्थिती तशीच आहे. त्यांचे आजोबा शेतमजूर होते. तर वडीलही शेजमजूर होते पण त्यांनी नंतर टेलरकाम शिकले.

देवीदास सौदागर

फोटो स्रोत, Ashay Yedge

देवीदास यांनाही त्यांच्या वडिलांनी टेलरकाम शिकवलं. त्यांचं शिक्षण झालेलं होतं, पण नोकरी मिळण्याची शक्यता कमी होती. दुसरीकडं शिवणकामाला त्यावेळी बरे दिवस होते, त्यामुळं या कामाकडे वळाल्याचं ते सांगतात.

"पण आता या कामाची स्थिती वाईट आहे. उदरनिर्वाह करणंही शक्य नाही," असं ते सांगतात.

'पुरस्कारामुळे बळ मिळतं'

देवीदास सौदागर म्हणतात की, "पुरस्कार हे त्यांच्या ठिकाणी योग्यच असतात. पण वेदनेला पुरस्कार दिल्याने वेदना संपत नाही, फक्त त्यावर फुंकर बसते. पुढं पाऊल टाकण्यासाठी बळ मिळतं आणि भोवतालही आपल्या सोबत असल्याच्या बळातून आपण पुढं चालत राहतो."

पण या वेदना संपत नाही, त्यामुळं लिखाणही संपत नाही. पुरस्कार मिळाला किंवा नाही मिळाली तरीही लिखाण चालूच राहतं. जगणं संपत नाही, तोपर्यंत लिखाण संपत नाही, असं मत त्यांनी मांडलं.

सौदागर यांनी काही कविताही लिहिल्या आहेत. त्या कवितांमधूनही त्यांच्या जीवनासाठी सुरू असलेल्या रोजच्या संघर्षाचं चित्र उभं राहतं. त्यापैकी एका कवितेत 'रक्ताची किंमत' सांगताना ते म्हणतात...

"नामदेवा एखादे वेळी धागे घालताना सुई घुसते बोटात

रक्तात भरुन जाते सुई

रक्ताचा एखादा थेंब पडतो कापडावर

तेव्हा सुरू होते चर्चा, कापड किती किमतीचे आहे त्यावर

पण फाटलेल्या बोटाचं आणि सांडलेल्या रक्ताचं

कुणाला काहीच वाटत नाही का? रक्ताची काहीच किंमत नाही का?

हा प्रश्न सुईपेक्षाही जास्त खोल घुसत जातो काळजात!"