फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉन यांना त्यांची पत्नी महिला आहे, हे का सिद्ध करावं लागत आहे? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन थेट अमेरिकच्या कोर्टात! सादर करणार पत्नी ब्रजी या महिला असल्याचे पुरावे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अनुष्का मुतांडा-डोहर्टी, मेलनी स्टीवर्ट-स्मिथ आणि व्हिक्टोरिया फर्नकोम्ब
    • Role, फेम अंडर फायर पॉडकास्ट

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुअल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रजी मॅक्रॉन आता अमेरिकेच्या न्यायालयात दिसणार आहेत. कारण सोशल मीडिया आणि यूट्यूबवर ब्रजी मॅक्रॉन या पुरुष असल्याचे आरोप करण्यात आले होते.

राष्ट्राध्यक्ष इमॅनुअल मॅक्रॉन हे अमेरिकेच्या न्यायालयात त्यांची पत्नी ब्रजी या महिलाच असल्याचे सिद्ध करणारे फोटोग्राफिक आणि वैज्ञानिक पुरावे सादर करणार आहेत.

मॅक्रॉन दाम्पत्यांच्या वकिलांनी याबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले की, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि ब्रजी मॅक्रॉन हे अमेरिकेच्या इन्फ्लुएन्सर कॅन्डेस ओवेन्स यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात कागदपत्रं सादर करणार आहेत.

कारण कॅन्डेस ओवेन्स यांनी ब्रजी मॅक्रॉन यांचा पुरुष म्हणून जन्म झाला होता, असा दावा केला होता.

दरम्यान, ओवेन्स यांच्या वकिलांनी हा खटला फेटाळून लावावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.

'आरोप खोटे असल्याचं सिद्ध करण्यास मॅक्रॉन दाम्पत्य तयार'

बीबीसीच्या फेम अंडर फायर पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मॅक्रॉन यांचे वकील टॉम क्लेअर म्हणाले की, ब्रजी मॅक्रॉन यांना हे आरोप 'फारच दुखावणारे वाटले' आणि ते फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसाठीही त्रासदायक आणि त्यांना 'विचलित' करणारे ठरले.

"या आरोपांचा त्यांच्या कामावर परिणाम झाला, असं मला म्हणायचं नाही. पण जसं प्रत्येकाला करिअर आणि कौटुंबिक आयुष्य सांभाळताना त्रास होतो, त्याचबरोबर जेव्हा कुटुंबावर हल्ला होतो, त्याचाही त्रास होतो. अशावेळी ती व्यक्ती या सर्वांपासून दूर राहू शकत नाही, कारण ते एका देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत," असं त्यांनी म्हटलं.

मॅक्रॉन यांचे वकील टॉम क्लेअर म्हणाले की, मॅक्रॉन दाम्पत्याला हे आरोप दुखावणारे आहेत आणि हे खोटे आरोप आहेत, ते सिद्ध करू शकतात.
फोटो कॅप्शन, मॅक्रॉन यांचे वकील टॉम क्लेअर म्हणाले की, मॅक्रॉन दाम्पत्याला हे आरोप दुखावणारे आहेत आणि हे खोटे आरोप आहेत, ते सिद्ध करू शकतात.

क्लेअर म्हणाले की, न्यायालयात 'वैज्ञानिक स्वरूपाची तज्ज्ञांची साक्ष' सादर केली जाईल. त्यांनी नेमका त्याचा तपशील उघड केला नाही, पण असं नमूद केलं आहे की, मॅक्रॉन दाम्पत्य हे आरोप 'सामान्य आणि ठराविक दोन्ही प्रकारे' खोटे आहेत, हे सिद्ध करायला तयार आहेत.

"अशाप्रकारचे पुरावे सादर करावं लागणं हे खूप दुखावणारं आहे," असं त्यांनी म्हटलं.

"ही एक प्रक्रिया आहे, ज्यात त्यांना सर्वसामान्य लोकांसमोर स्वतः सामोरं जावं लागेल. पण त्या ते करण्यास तयार आहेत. खोट्या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी त्या ठामपणे सज्ज आहेत."

"सत्य समोर आणण्यासाठी आणि खोटं थांबवण्यासाठी तिथे जाऊन त्रास सहन करावा लागत असेल तर त्यासाठी त्या 100 टक्के तयार आहेत."

'आरोप करणाऱ्या कॅन्डेस ओवेन्स इन्फ्लूएन्सर'

ब्रजी मॅक्रॉन या गर्भवती असताना आणि त्यांच्या मुलांचे संगोपन करत असतानाचे फोटो मॅक्रॉन दाम्पत्य दाखवतील का, असं जेव्हा विचारण्यात आलं, तेव्हा क्लेअर म्हणाले की, असे फोटो आहेत आणि ते न्यायालयात दाखवले जातील.

कॅन्डेस ओवेन्स, या पूर्वी अमेरिका कॉन्जर्व्हेटिव्ह वृत्तसंस्था डेली वायरशी संलग्नित होत्या आणि सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत, त्यांनी नेहमी ब्रजी मॅक्रॉन या पुरुष असल्याचा दावा केला आहे.

या आरोपावर आपली 'संपूर्ण व्यावसायिक प्रतिष्ठा' पणाला लावू, असा दावा ओवेन्स यांनी मार्च 2024 मध्ये केला होता.

हा आरोप काही वर्षांपूर्वी फ्रिंज ऑनलाइन स्पेसमधून सुरू झाला होता, विशेषतः 2021 मध्ये फ्रेंच ब्लॉगर्स अ‍ॅमँडाइन रॉय आणि नटाशा रे यांनी केलेल्या यूट्यूब व्हीडिओमुळे.

ब्रजी मॅक्रॉन या पुरुष असल्याचा दावा कॅन्डेस ओवेन्स यांनी यूट्यूब आणि सोशल मीडियावर वारंवार केला आहे.

फोटो स्रोत, Candace Owens

फोटो कॅप्शन, ब्रजी मॅक्रॉन या पुरुष असल्याचा दावा कॅन्डेस ओवेन्स यांनी यूट्यूब आणि सोशल मीडियावर वारंवार केला आहे.

मॅक्रॉन यांनी सुरुवातीला 2024 मध्ये रॉय आणि रे यांच्याविरोधात फ्रान्समध्ये बदनामीचा खटला जिंकला, पण याविरोधात केलेल्या अपिलात 2025 मध्ये तो निकाल रद्द करण्यात आला.

हे सत्यावर नव्हे, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आधारित होतं. मॅक्रॉन दाम्पत्य आता त्या निकालाविरुद्धही अपील करत आहेत.

जुलैमध्ये, मॅक्रॉन दाम्पत्याने अमेरिकेत ओवेन्स यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. त्यात आरोप केला आहे की, "त्यांनी त्यांचा दावा खोटं ठरवणाऱ्या सर्व विश्वासार्ह पुराव्यांकडे दुर्लक्ष केलं आणि त्याऐवजी बदनामी करणाऱ्यांना प्राधान्य दिलं."

अमेरिकेत सार्वजनिक व्यक्तींविरुद्धच्या बदनामीच्या खटल्यांमध्ये, खटला दाखल करणाऱ्याने सिद्ध करावं लागतं की, प्रतिवादीने जाणूनबुजून खोटी माहिती पसरवली किंवा सत्याची पर्वा न करता काम केलं.

'माझ्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी न्यायालयात'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ऑगस्टमध्ये, इमॅनुअल मॅक्रॉन यांनी कायदेशीर कारवाई का सुरू केली हे फ्रेंच मासिक 'पॅरिस मॅच'ला स्पष्ट केलं होतं.

"हे माझ्या सन्मानाचं रक्षण करण्याबद्दल आहे! कारण हा मूर्खपणा आहे. ही अशी व्यक्ती आहे, ज्याला पूर्ण माहिती होती की तिच्याकडे खोटी माहिती आहे. पण तरीही त्यांनी हानी पोहोचवण्याच्या उद्देशानं हे केलं, एका विचारसरणीच्या सेवेत आणि अति उजव्या नेत्यांशी सलगी करण्यासाठी."

ओवेन्स यांच्या वकिलांनी मॅक्रॉन दाम्पत्याच्या खटल्याला फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, हा खटला डेलावेअरमध्ये दाखल होऊ नये, कारण त्याचा त्यांच्या व्यवसायाशी काही संबंध नाही, जे त्या राज्यात नोंदणीकृत आहेत.

त्यांना डेलावेअरमध्ये या खटल्याचा बचाव करावा लागल्यास मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल आणि कामकाजासाठीही त्रास होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

बीबीसीने कॅन्डेस ओवेन्स यांच्या कायदेशीर टीमशी संपर्क साधला आहे. ओवेन्स यांनी आधी सांगितलं होतं की, त्या जे काही बोलत आहेत, ते त्यांना खरं वाटतं, त्यावर त्यांचा विश्वास आहे आणि अमेरिकेत भाषण स्वातंत्र्य आणि टीका करण्याचा अधिकार हाच सर्वात महत्त्वाचा आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.