राहुल बजाज भर कार्यक्रमात अमित शाहांना म्हणाले होते, 'लोक तुम्हाला घाबरतात'

अमित शाह आणि राहुल बजाज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमित शाह आणि राहुल बजाज

दिवंगत उद्योगपती राहुल बजाज यांचा आज (10 जून) जन्मदिन.

भारतातील प्रसिद्ध बजाज कंपनीचे राहुल बजाज सर्वेसर्वा होते. बजाज कंपनीला देशातील उद्योग क्षेत्रात आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

राहुल बजाज हे एकेकाळी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत पोहोचले होते. मात्र, मोदी सरकारच्या काळात त्यांनी त्यांच्या सरकारवर टीकाही केली.

इकोनॉमिक टाईम्सच्या डिसेंबर 2019 मधील एका पुरस्कार सोहळ्यातील त्यांचं एक वक्तव्य त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता.

राहुल बजाज म्हणाले होते, "लोक (उद्योगपती) तुम्हाला (मोदी सरकार) घाबरतात. युपीए-2 सरकार असताना आम्ही कोणावरही टीका करू शकत होतो. पण आता जर आम्ही उघडपणे टीका केली तर तुम्हाला ते आवडेल का, याची आम्हाला खात्री नाही,"

राहुल बजाज अमित शहांसमोर उघडपणे असं बोलल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

अमित शाहांसमोर राहुल बजाज यांनी केलेल्या वक्तव्यानंतर बजाज यांच्याविषयी सोशल मीडियावरबरंच काही लिहीलं गेलं. एका उद्योगपतीने सरकारच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवली, खरी परिस्थिती सगळ्यांसमोर आणली, असं म्हणत एकीकडे काहीजण त्यांचं कौतुक करत होते, तर त्यांचं हे विधान राजकीय हेतूंनी प्रेरीत असून, बजाज 'काँग्रेस प्रेमी' असल्याचं म्हणत दुसरीकडे त्यांच्यावर टीकाही केली होती.

सोशल मीडियावर राहुल बजाज यांचे असेही काही व्हीडिओज शेअर करण्यात आले होते, ज्यामध्ये ते जवाहरलाल नेहरू आपले आवडते पंतप्रधान असल्याचं सांगत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींचं कौतुक करताना दिसत आहेत.

हे सगळे दाखले देत राहुल बजाज 'काँग्रेसचे चमचे' असल्याचं म्हणणाऱ्या भाजप सरकार समर्थकांना एका गोष्टीचा मात्र सोयीस्कररित्या विसर पडत होता. तो म्हणजे, 2006मध्ये राहुल बजाज अपक्ष म्हणून राज्यसभेवर निवडून गेले होते आणि त्यासाठी त्यांना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेच पाठिंबा दिला होता. अविनाश पांडे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते आणि बजाज यांनी त्यांचा 90 मतांनी पराभव करत राज्यसभेतली ही जागा जिंकली होती.

राहुल बजाज

फोटो स्रोत, Getty Images

देशातल्या आर्थिक स्थितविषयी उद्योगपतींना असलेली चिंता आणि त्यांना वाटणारी भीती राहुल बजाज यांनी व्यक्त केल्यानंतर उत्तर देताना अमित शाह म्हणाले होते, "कोणीही घाबरण्याची गरज नाही आणि कोणीही घाबरवायचा प्रयत्न करत नाहीये."

पण राहुल बजाज यांनी टीका केल्यानंतर त्याविषयी गहजब करत भाजप समर्थकांनी गृहमंत्र्यांचं विधान फोल ठरवलं.

याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार टी. के. अरूण म्हणाले होते, "हा एक नवीन ट्रेंड झालाय. टीका करण्यामागची भावना समजून घेतली जात नाही. फक्त टीका करणाऱ्यांच्या विरोधात ओरड केली जाते. बजाज यांनी केलेली टीका महत्त्वाची आहे. कारण कोणीतरी बोललं तरी. नाहीतर सीआयआयच्या बंद खोल्यांमध्ये होणाऱ्या बैठकांमध्ये उद्योगपती ज्या गोष्टींविषयी काळजी व्यक्त करत असले, तरी त्याविषयी खुलेपणाने कोणीही बोललेलं नाही."

बजाज यांचं हे विधान एका विशिष्ट पक्षाच्या विरोधात नसून, याआधीही त्यांच्या अशा टीकेची चर्चा झाली असल्याचं अरूण म्हणाले होते.

अरुण जेटली आणि राहुल बजाज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अरुण जेटली आणि राहुल बजाज
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राहुल बजाज सुरूवातीपासूनच एक स्पष्टवक्ता म्हणून ओळखले जातात, असं ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर म्हणाले होते.

चंदावरकर त्यावेळी म्हणाले होते, "राहुल बजाज यांनी भाजप सरकारप्रमाणेच इतर सरकारांवरसुद्धा परखड टीका केलेली आहे. ते वेळोवेळी सरकारच्या धोरणांवर बोलत असतात. पण त्यांनी अमित शहा यांना विचारलेल्या प्रश्नावरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे."

राहुल बजाज यांचं वक्तव्य म्हणजे फक्त एका कार्यक्रमात विचारलेला प्रश्न नसून त्यामागे तीन वर्षांपासूनची अस्वस्थता असल्याचं रोहीत चंदावरकर यांना वाटतं.

त्यांनी पुढे सांगितलं होतं की, "भारत सरकारने काळ्या पैशावर कारवाईकरण्यासाठी पावलं उचलली आहेत. पण याबाबत उपाययोजना करत असताना त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्यामुळे उद्योजकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळेच गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राहुल बजाज अस्वस्थ आहेत. त्यांची नाराजी वेळोवेळी दिसून आली आहे."

पुण्यातील एका कार्यक्रमात राहुल बजाज, शरद पवार आणि नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत उपस्थित होते. त्यावेळी सुद्धा बजाज यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली होती.

उद्योजकांना भारतात व्यापार करणं अवघड बनल्याचं त्यांनी अमिताभ कांत यांना सांगितलं होतं, अशी आठवण चंदावरकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितली.

राहुल बजाज यांची भूमिका अनेकवेळा प्रस्थापितांच्या विरोधी असल्याचं निरीक्षण सीएनबीसी आवाज वृत्तवाहिनीचे माजी संपादक आलोक जोशी यांचंसुद्धा आहे.

ते त्यावेळी म्हणाले होते, "राहुल बजाज स्वभावाने बंडखोर मानले जातात. विविध प्रसंगी त्यांनी सरकारविरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या विरोधातही त्यांनी कणखरपणा दाखवला होता. पियाजिओ कंपनीसोबत कराराचं उल्लंघन केल्याचं प्रकरण त्याचं उत्तम उदाहरण आहे."

महात्मा गांधींचा 'पाचवा मुलगा'

राहुल बजाज यांचा जन्म जून 1938चा. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे या उद्योगक्षेत्रातील बजाज कुटुंबाशी अगदी जवळचे संबंध होते.

राहुल बजाज यांचे आजोबा - जमनालाल बजाज यांनी 1920च्या दशकामध्ये 'बजाज ग्रुप ऑफ कंपनीज' ची स्थापना केली होती. या समूहात 20 पेक्षा अधिक कंपन्या होत्या. राजस्थानातील मारवाडी समुदायातील जमनालाल यांना दूरच्या एका नातेवाईकाने दत्तक घेतलं होतं. हे कुटुंब महाराष्ट्रात वर्ध्यात रहायचं. म्हणूनच जमनालाल यांनी वर्ध्यातूनच व्यापाराला सुरुवात केली आणि इथूनच धंदा वाढवला. यानंतर ते महात्मा गांधींच्या संपर्कात आले आणि त्यांच्या आश्रमासाठी जमनालाल बजाज यांनी जमीनही दिली होती.

जमनालाल बजाज यांना महात्मा गांधींचा 'पाचवा मुलगा' असं म्हटलं जायचं. म्हणूनच नेहरूंनाही जमनालाल बजाज यांचा आदर होता.

जमनालाल बजाज यांना पाच मुलं. सगळ्यात मोठा मुलगा कमलनयन. मग तीन मुली आणि त्यानंतर सगळ्यात लहान मुलगा - रामकृष्ण बजाज.

राहुल बजाज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राहुल बजाज

राहुल बजाज हे कमलनयन बजाज यांचा मोठा मुलगा. राहुल यांचे दोन मुलगे - राजीव आणि संजीव सध्या बजाज समूहातील काही कंपन्यांचा कारभार सांभाळतात. इतर काही कंपन्या राहुल बजाज यांचे धाकटे भाऊ आणि चुलत भाऊ सांभाळतात.

गांधी आणि बजाज कुटुंबातील घरोब्याचे अनेक किस्से आहेत.

राहुल बजाज यांचा जन्म झाला तेव्हा इंदिरा गांधी राहुल यांचे पिता - कमलनयन बजाज यांच्या घरी गेल्या. माझी एक अतिशय मूल्यवान गोष्ट तुम्ही घेतलीत, अशी तक्रार त्यांनी कमलनयन यांच्या पत्नीकडे केली. ही गोष्ट होती - 'राहुल' हे नाव. हे नाव पंडित नेहरूंना आवडलेलं होतं आणि इंदिरांनी आपल्या मुलाचं नाव राहुल ठेवावं, असं त्यांना वाटत होतं. पण नेहरूंनी त्यांच्या डोळ्यांसमोरच लहानाच्या मोठ्या झालेल्या कमलनयन बजाज यांच्या मुलाचं नाव राहुल ठेवलं. असं म्हटलं जातं की इंदिरांनी राजीव गांधींच्या मुलाचं नाव 'राहुल' ठेवण्यामागे हेच कारण होतं. कारण हे नाव त्यांच्या वडिलांच्या आवडीचं होतं.

1920 च्या दशकामध्ये ज्यांच्या स्वातंत्र्यसैनिक आजोबांनी सगळ्या कुटुंबासह खादीचा स्वीकार करत आपल्या विदेशी कपड्यांची होळी केली होती, त्यांचाच नातू स्वतंत्र भारतातल्या भांडवलशाहीतला एक महत्त्वाचा चेहरा कसा झाला, याची कहाणीही रंजक आहे.

'लायसन्स राज' मध्ये बजाज

कमलनयन बजाज यांच्या प्रमाणेच राहुल बजाज यांनीही परदेशात शिक्षण घेतलं. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतल्यानंतर राहुल यांनी जवळपास तीन वर्षं बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीत प्रशिक्षण घेतलं. याच दरम्यान त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं.

60 च्या दशकात राहुल बजाज यांनी अमेरिकेतल्या हार्वड बिझनेस स्कूलमधून MBAची पदवी घेतली.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 30 वर्षांच्या राहुल बजाज यांनी 1968मध्ये 'बजाज ऑटो लिमिटेड'चं सीईओपद स्वीकारलं त्यावेळी ते अशा उच्च पदावरचे सर्वांत तरूण भारतीय असल्याची चर्चा झाली होती.

जमनालाल बजाज

फोटो स्रोत, BAJAJGROUP.COM

फोटो कॅप्शन, जमनालाल बजाज

त्या काळाविषयी अर्थतज्ज्ञ मोहन गुरुस्वामी म्हणतात, "राहुल बजाज यांच्या हाती कंपनीची धुरा आली तेव्हा देशात लायसन्स राज होतं. म्हणजे देशभरात अशी काही धोरणं-नियम होते ज्यामुळे सरकारच्या मर्जीशिवाय उद्योगपतींना काहीही करता येत नव्हतं. व्यापाराच्या दृष्टीने ही कठीण परिस्थिती होती.

मर्यादित उत्पादन होत होतं. ईच्छा असूनही उद्योगपती मागणी पूर्ण करू शकत नव्हते. असं म्हटलं जायचं की कोणी स्कूटर बुक केली, तर अनेक वर्षांनी डिलीव्हरी मिळायची. म्हणजे ज्या परिस्थितीत इतरांना काम करणंही कठीण जात होतं, त्याच परिस्थितीत बजाज यांनी तथाकथितपणे निरंकुश पद्धतीने उत्पादन केलं आणि स्वतःच्या कंपनीला देशातल्या सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक करण्यात यश मिळवलं."

'हमारा बजाज...'

70-80 च्या काळात राहुल बजाज यांची ओळख युथ आयकॉन म्हणून बनली होती. त्यांच्या कंपनीची चेतक ही स्कूटर त्या काळात विशेष लोकप्रिय होती.

"या स्कूटरचं 1 लाख उत्पादन करण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली होती. पण सरकारने त्यांना फक्त 80 हजार स्कूटर तयार करण्याची परवानगी दिली. त्यावरून त्यांची सरकारसोबत खडाजंगी झाली होती," असं आलोक जोशी सांगतात.

त्या काळी उत्पादन घेण्याआधी सरकारकडून परवानगी घ्यावी लागत होती. त्यावेळीसुद्धा त्यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली.

पुढे 1991 ला खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे अशा प्रकारचा प्रसंग पुन्हा निर्माण झाला नाही, असं ते सांगतात.

रोहित चंदावरकर सांगतात, "बजाजची स्कूटर ऐतिहासिक ठरली होती. तिने भारतीय बाजारपेठेत वेगळं स्थान प्राप्त केलं होतं. या स्कूटरसाठी पंधरा-पंधरा वर्षे वेटिंग लिस्ट असायची. चेतकची हमारा बजाज ही जाहिरात आजसुद्धाअनेकांच्या लक्षात असेल."

गेल्या दोन दशकांमध्ये राहुल बजाज यांनी अनेक मोठ्या मुलाखतींदरम्यान 'लायसन्स राज' चुकीचं होतं असं म्हणत यावर टीका केलेली आहे.

राहुल बजाज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राहुल बजाज

बजाज चेतक (स्कुटर) आणि नंतर बजाज पल्सर (मोटरसायकल) यासारख्या उत्पादनांमुळे त्यांच्या ब्रँडची बाजारातली विश्वासार्हता वाढल्याचं त्यांनी अनेकदा म्हटलंय. यामुळेच त्यांच्या कंपनीची उलाढाल 1965 मधील तीन कोटींवरून 2008 मध्ये जवळपास 10,000 कोटींवर गेला होता.

'मारवाडी बनिया' जेव्हा मराठी मुलीच्या प्रेमात पडला...

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं बालपण काळात महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात गेलं होतं. पुढे काही काळाने ते पुण्यात दाखल झाले. सुरुवातीपासूनच राहुल बजाज हे मराठी वातावरणातच राहिले, वाढले.

मूळचे गुजराती मारवाडी असलेल्या राहुल बजाज यांची नाळ महाराष्ट्राशी खूप घट्ट जुळलेली होती. विशेष म्हणजे, राहुल बजाज यांचा प्रेमविवाह एका मराठी मुलीशी झाला होता.

याबाबत इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला होता.

1961 साली म्हणजे वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी राहुल बजाज हे रुपा घोलप यांच्याशी विवाहबद्ध झाले. रुपा घोलप या एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कन्या होत्या. रुपा घोलप यांना 'मराठी ब्युटी क्वीन' म्हणून ओळखलं जात असे. ऐन तारुण्यात प्रवेश करत असतानाच राहुल बजाज त्यांच्या प्रेमात पडले.

अखेर प्रेमाचा यशस्वी प्रवास करून राहुल आणि रुपा यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. बजाज कुटुंबातील तो पहिला प्रेमविवाह होता, असं म्हटलं जातं.

याबाबत बोलताना राहुल बजाज म्हणाले होते, हा फक्त बजाज कुटुंबातील पहिला प्रेमविवाह होता असं नाही. तर मारवाडी-गुजराती औद्योगिक समाजातील तो पहिला प्रेमविवाह होता.

आपल्या वैवाहिक जीवनातील सुरुवातीच्या आठवणी सांगताना राहुल बजाज म्हणाले होते, "रुपा घोलप यांच्याशी विवाह झाल्यानंतर आमचा सुखाचा संसार सुरू होता. दरम्यान माझी पत्नी रुपा मला मजेत म्हणायची, तुझ्याशी विवाह करण्यासाठी मी किती त्याग केलाय पाहा, राहुल. मी मराठी ब्राह्मण आहे. तू मारवाडी-बनिया आहेस. तुझ्या डोक्यात नेहमी पैशाचाच विचार सुरू असतो."

पत्नीसोबत खास नातं

राहुल बजाज यांच्या पत्नी रुपा यांचा जन्म 7 सप्टेंबर 1938 साली झाला होता. वयाच्या 75 व्या वर्षी 2013 साली त्यांचं निधन झालं.

रुपा यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईच्या बांद्रा येथील सेंट जोसेफ शाळेत झालं. पुढे त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर काही काळ त्यांनी त्याच ठिकाणी शिक्षक म्हणूनही कार्यरत होत्या.

दरम्यान, रुपा घोलप यांना मॉडेलिंगचाही छंद होता. त्यांनी काही काळ मॉडेलिंगही केली होती. त्यांना मराठी ब्युटी क्वीन अशी ओळख त्या काळी मिळाली होती.

राहुल बजाज आणि रुपा बजाज यांचं एकमेकांवरचं खूप प्रेम होतं. कधीही रुपा यांचा उल्लेख व्हायचा, तेव्हा तिचं आणि माझं नातं किती खास होतं, हे सांगताना राहुल बजाज भरभरून बोलायचे.

मुलाखतीत रुपा यांच्याविषयी सांगताना राहुल बजाज पुढे म्हणतात, "माझी पत्नी खूप समजूतदार होती. ती माझ्यासाठी नेहमीच खास राहिली. तिने माझ्यासाठी खूप काही केलं."

रुपा बजाज

फोटो स्रोत, BAJAJ COMPANY

फोटो कॅप्शन, रुपा बजाज

बजाज कंपनीच्या वेबसाईटवर रुपा बजाज यांच्याविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे.

रुपा बजाज यांना चालू घडामोडींविषयी खूप ज्ञान होतं. त्यांना वाचन करायला खूप आवडत असे. तसंच त्या पुण्याच्या इंम्प्रेस गार्डनच्या बोर्डवरही होत्या.

लग्नानंतर रुपा बजाज या राहुल यांच्यासह पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी ते पुण्यात बजाज ऑटो कॉलनी परिसरात राहत असायचे.

तिथे इतर कर्मचाऱ्यांच्या पत्नींना सोबत घेऊन त्यांनी वनिता मंडळाची स्थापना केली होती. त्या महिलांनाही लहान मुलांचे कपडे विणण्यास त्या प्रोत्साहित करत. त्यांनी हातांने बनवलेल्या वस्तूंची विक्री त्यांनी पुणे क्लबच्या सेलमध्ये केली होती.

लग्नानंतर काहीच दिवसांत रुपा यांनी परिसरातील महिलांमध्ये एक वेगळी ओळख प्रस्थापित केली. तेथील महिला विविध विषयांवर सल्ला किंवा मदत मागण्यासाठी रुपा यांच्याकडे येत असत.

राहुल बजाज यांची बजाज कंपनी देशातील उद्योग क्षेत्रात आघाडीवर येत होती. त्यावेळी उद्योग विश्वात बजाज कंपनीचे शेअर्स घेण्याविषयी प्रचंड चर्चा होत असे.

पण राहुल बजाज यांचे सासरे एल. टी. घोलप यांनी कधीच बजाज कंपनीचे शेअर विकत घेतले नाहीत.

ICS अधिकारी असलेले एल. टी. घोलप आपल्या कडक स्वभावासाठी ओळखले जात. त्यांनी बजाज यांच्या कंपनीच एक रुपयाचीही गुंतवणूक कधी केली नाही, असं राहुल बजाज यांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)