कंबरदुखीमागे मानसिक तणावाचं कारण? तिच्यावर मात करण्यासाठीची CFT थेरेपी काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गणेश पोळ
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कंबरदुखी ही एक अशी वेदना आहे, जी अनेकांना आयुष्यात सर्दी-तापासारखी कधी न कधी जाणवते.
सुरुवातीला आपण या वेदनेकडे दुर्लक्ष करतो. पण काही लोकांबाबत पुढे ती गंभीर स्वरूप घेते.
आता ही समस्या केवळ किरकोळ पातळीवर राहिली नाहीये. तर जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), कंबरदुखी ही अपंगत्वाचे सर्वात मोठे कारण ठरत आहे.
या व्याधीमुळे अनेकजण हालचाल करणे किंवा बाहेर फिरायला जाणे टाळतात.
कंबरदुखी थांबवण्यासाठी आतापर्यंत वापरात येणारी औषधं आणि व्यायाम यांचा दूरवर परिणाम होताना दिसत नाहीये. काही दिवसानंतर ही वेदना पुन्हा डोके वर काढते.
जगाची लोकसंख्या जशी वाढतेय तशी ही समस्या आणखी गंभीर होत आहे. भारतासारख्या कमी उत्पन्न असणाऱ्या देशात लाखो लोक श्रमाची कामे करतात. त्यामुळे त्यांना हमखास कंबरदुखी होते, असं आढळून आलं आहे.
दरम्यान, द लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलमध्ये नुकताच प्रसिद्ध झालेल्या संशोधन पेपरमध्ये एक नवीन उपचार पद्धत विकसित करण्यात आली आहे. त्याचं नाव आहे 'कॉग्निटिव्ह फंक्शनल थेरेपी' (CFT).
ऑस्ट्रेलियातील मॅक्वेरी युनिव्हर्सिटी येथील प्रा. मार्क हॅनकॉक आणि सहकाऱ्यांनी ही उपचार पद्धत विकसित केली आहे.
या उपचारात कमी खर्चात कंबरदुखीवर दीर्घकाळ आराम मिळत असल्याने याकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
CFT उपचार घेतल्यावर किमान तीन वर्षं कंबरदुखी थांबल्याचा दावा या संशोधातून करण्यात आला आहे.
CFT उपचार पद्धत काय आहे?
कॉग्निटिव्ह फंक्शनल थेरपी (CFT) ही एक आधुनिक उपचार पद्धत आहे, जी विशेषतः कंबरदुखीच्या दीर्घकालीन दुखण्यावर लक्ष केंद्रित करते.
ही पद्धत केवळ औषधांवर आधारित नसून, यात मानसिक, शारीरिक आणि सामाजिक घटकांचा विचार केला जातो. हे दुखणे थांबवायचे असेल, तर या तिन्ही गोष्टींवर उपचार करणे महत्त्वाचे ठरते.
नवीन संशोधनानुसार आपले विचार, भावना आणि वर्तन हे कंबरेच्या दुखण्यावर परिणाम करतात. CFT उपचारादरम्यान या गोष्टींचा विचार केला जातो आणि त्यावर उपाय शोधले जातात.

फोटो स्रोत, Getty Images
वैद्यकीय भाषेत याला बायो-सायको-सोशल दृष्टिकोन असे म्हटले जाते.
सर्वात आधी रुग्णाच्या वेदना समजून घेण्यावर भर दिला जातो. यात रुग्णाच्या चुकीच्या समजुती आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती कमी करण्यावर भर दिला जातो.
रुग्णाला हालचाल करताना होणाऱ्या वेदनांबद्दलची भीती कमी केली जाते आणि त्याला स्वतःची काळजी घेण्याचे कौशल्य शिकवले जाते.
"CFT ही एक मानसोपचार (Psychotherapy) पद्धत आहे. यात माणसाने स्वतःची काळजी कशी घ्यावी, वेदना कशा कमी कराव्यात आणि रोजच्या जीवनातील गोष्टी आत्मविश्वासाने कशा कराव्यात हे शिकवले जाते. अशा सवयींमुळे दीर्घकाळ चांगले परिणाम दिसतात. शिवाय आरोग्यदायी जीवनशैली ठेवली, तर त्याचाही चांगला फायदा होतो," असे प्रा. मार्क हॅनकॉक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.
आजवर कंबरदुखीवर उपचार करताना फक्त बायो-मेडिकल पद्धतीचा उपयोग केला जायचा. म्हणजे औषधे, सर्जरी आणि फिजिओथेरपी यांचाच विचार केला जायचा.
पण आता तुमच्यावर वाढलेला मानसिक ताण आणि चिंता यामुळेही कंबरदुखी वाढू शकते, असे समोर आले आहे. त्यामुळे CFTच्या उपचार पद्धतीत तीन गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाते.

CFT हा एक व्यक्ती-केंद्रित दृष्टिकोन आहे, जिथे प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार उपचार पद्धती तयार केली जाते. म्हणजेच प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार उपचारात बदल केले जातात. कारण हॅनकॉक यांच्या मते, कंबरदुखीसाठी प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतात.
या थेरपीमध्ये, रुग्णाला त्याच्या वेदना किंवा इतर आरोग्य समस्यांमागील कारणे समजून घेण्यास मदत केली जाते.
यात शारीरिक हालचालींमधील त्रुटी, नकारात्मक विचारसरणी, ताणतणाव आणि सामाजिक वातावरणाचा आरोग्यावर होणारा परिणाम या सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला जातो.
CFTच्या चाचणीला 'The RESTORE trial' असं नाव देण्यात आलं आहे.
याद्वारे सुरुवातीच्या दिवसांपासून पेशंटला चुकीच्या विचारसरणी आणि हालचाली बदलण्यासाठी मदत केली जाते.
यामध्ये त्यांच्या वेदनेविषयीची भीती कमी करून त्याला हलके-फुलके व्यायाम आणि हालचाली करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे स्नायूंवरचा ताण कमी होतो आणि वेदना कमी होण्यास मदत होते. हा उपचार केवळ कंबरदुखीवर फोकस ठेवत नाही. तर त्यांचे मानसिक विचार, भावना आणि वर्तनांवर लक्ष केंद्रित करतो.
वैयक्तिक पातळीवर रुग्णाला त्यांच्या वेदनेचे नेमक कारण समजावून सांगणे, गैरसमजुती सुधारणे आणि त्यांच्या जीवनशैलीत बदल करणे यावर काम केले जाते. यामुळे रुग्णाला वेदनेशी सामना करण्याची क्षमता वाढते आणि त्याच्या हालचालींमध्ये सुधारणा होते.

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला डिप्रेशनमुळे जास्त चिंता करायची सवय असेल तर त्याकाळात कंबरदुखी आणखी तीव्र होत असल्याचं दिसून आलं आहे.
वेदनेबद्दल नकारात्मक विचार करणं. 'आता माझं काही खरं नाही,' असं वाटत राहाणं, हालचाल केली तर जास्त दुखेल असं वाटल्याने काहीच हालचाल न करणे, कामाच्या ठिकाणी समाधान नसेल किंवा प्रमाणाबाहेर ताण असेल तर हे घटक कंबरदुखीला चिटकून राहायला आणि त्याच्या वाढीला खतपाणी घालतात.
तुमचा मानसिक तणाव, कामाचे प्रेशर आणि आजूबाजूची नकारात्मक परिस्थिती या गोष्टी एकमेकांशी जोडल्या असल्याचं हॅनकॉक सांगतात.
त्यामुळे संबंधित व्यक्ती कुटुंब किंवा मित्रमैत्रिणीसोबत फिरायला किंवा कार्यक्रमाला जाणं टाळतात. त्यांना जास्तवेळ उभं राहण्याची किंवा कारमध्ये बसण्याची भीती वाटते.
दुसऱ्या बाजूला, कंबरदुखीविषयी असणाऱ्या गैर समजुतींमुळेही काहीवेळा दुखणं तीव्र होतं.
आजवर या प्रकरणात आरामाचा सल्ला दिला जातो. पण ही एक गैरसमजूत आहे. CFT नुसार, जास्त आरामामुळे पाठीचे स्नायू आखडतात. याउलट अशा लोकांनी त्यांची सामान्य कामे करत राहाणं फायद्याचं राहातं.
कंबरदुखी असेल तर प्रत्येकाला ताठ मणका ठेवून बसा, असं सांगितलं जातं. पण प्रत्येकासाठी ही गोष्ट कामी येईल, असं म्हणता येणार नाही, कदाचित काही लोकांना ताठ बसल्याने मणक्याच्या डिस्कवर जास्त प्रेशर येऊ शकतं.
प्रा. मार्क हॅनकॉक यांच्या अभ्यासानुसार, जुन्या गैरसमजुती दूर करणं सध्या जास्त कठीण जात आहे.
कशामुळे होते कंबरदुखी?
कंबरदुखीची अनेक कारणे आहेत आणि वयोगटानुसार ही कारणे वेगवेगळी असू शकतात. तरुणांमध्ये, पाठदुखीचे मुख्य कारण त्यांच्या फिटनेसची पातळी किंवा चुकीच्या शारीरिक स्थितीमुळे (Posture) होणारी समस्या असू शकते.
चुकीच्या पद्धतीने बसल्यास किंवा वाकल्यास तरुणांना पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.
याउलट, वृद्ध व्यक्तींमध्ये, वाढत्या वयानुसार शरीरात होणारे बदल हे पाठदुखीचे प्रमुख कारण असू शकते.
मुंबईतल्या सैफी हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक डॉक्टर अबी तुराब चुनिया यांच्या मते, सामान्यतः आढळणाऱ्या पाठदुखीसाठी शस्त्रक्रियेची गरज नसते. परंतु, काहीवेळा 'स्लिप डिस्क' (slipped disc) सारख्या गंभीर कारणामुळेही कंबरदुखी होऊ शकते. यामध्ये, नसेवर तीव्र दाब आल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते, जी नसेवरील दाबाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. त्यामुळे, कंबरदुखीची अनेक कारणे असू शकतात.
चुनिया सांगतात, "कंबरदुखीवर निश्चितपणे उपचार शक्य आहेत. त्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य शारीरिक हालचाली (posture) ठेवल्यातर याचा त्रास कमी करता येतो. पण जर मणक्यातील नसेवर तीव्र दाब असेल, तर अशा परिस्थितीत शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते."
या समस्येची तीव्रता सर्व वयोगटातील लोकांसोबत दिसून येतेय. यात श्रमाची कामे करणाऱ्या वयोगटातील लोक जास्त आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारतात अनेकजण रोजंदारीवर आणि शारीरिक श्रमाची कामं करतात. त्यांच्या कामात बदल करता येत नाहीत.
शिवाय, कंबरदुखी आहे, असं सांगून सुटी घेता येत नाही. जर तशी सुटी घेतली तर त्यादिवशीचा पगार कापला जातो. त्यामुळे ही व्याधी आरोग्य समस्येपुरती मर्यादित राहिली नाहीये. तर यामुळे सामाजिक आणि आर्थिक परिणाम दिसून येतायत.
दुसरीकडे, पाठीच्या मणक्यात काय प्रॉब्लेम आहे, हेच कळणं अवघड जाते. कोणती नस किंवा स्नायू दाबलाय हे Xray, MRI Scanने सहज शोधणं शक्य होत नाही. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये सामान्य लोकांचे खूप पैसे जातात.
मणक्याला फ्रॅक्चर झालं असेल, मणक्यात कॅन्सरची गाठ असेल किंवा तिथे जखम झाली असेल तरच कंबरदुखीचं कारण स्पष्टपणे समजू शकतं, असं हॅनकॉक सांगतात.
त्यामुळे दवाखान्यात अमाप पैसे न घालवता प्रत्येकाने आपल्या मानसिक, शारीरिक आणि सभोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन कंबरदुखीवर उपचार करावेत. CFT उपचारामुळे रुग्ण तुलनेने कमी पैशात बरे होतील अशी त्यांना आशा आहे, कदाचित याच गोष्टीमुळे सध्या CFTची वैद्यकीय क्षेत्रात चर्चा होतेय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











