परग्रहांवर जीवन आहे का?आपण या शोधाच्या उंबरठ्यावर आहोत का?

- Author, पल्लब घोष
- Role, विज्ञान प्रतिनिधी
'आपण या विश्वात एकटे आहोत का?'
हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. पण शास्त्रज्ञांना आता काही पुरावे मिळत आहेत, ज्यातून हे समजू शकतं की आपल्या सूर्यमालेबाहेर, किंवा आपल्या सूर्यमालेतच, आणखी कुठं तरी जीवन असू शकतं.
नवीन तंत्रज्ञान, मोठ्या दुर्बिणी, आणि अंतराळ मोहिमांच्या मदतीनं हे शोध आणखी टप्प्यात येताना दिसत आहेत.
हा शोध फक्त परग्रहांवरील जीवांपुरता नाही, तर तो आपल्याला आपल्या अस्तित्वाकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवतो.
आणि जर खरंच इतरत्र जीवन सापडलं, तर ते विज्ञानासाठीच नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी तो एक ऐतिहासिक क्षण ठरेल.
काही वैज्ञानिक शोध फक्त आपलं ज्ञान वाढवत नाहीत, तर आपल्या मनावरही खोल परिणाम करतात.
कारण ते आपल्याला हे विश्व किंवा जग किती विशाल आहे आणि त्यात आपली जागा किंवा आपण किती लहान आहोत हे दाखवून देत असतात.
अशाच काही क्षणांमध्ये एक महत्त्वाचा क्षण होता, जेव्हा अंतराळ यानाने पृथ्वीचे पहिले फोटो पाठवले. असाच आणखी एक क्षण म्हणजे दुसऱ्या ग्रहावर जीवनाचे पुरावे सापडणे आणि आज तो क्षण आणखी थोडा जवळ आला आहे.
कारण 'K2-18B' नावाच्या एका ग्रहावर एका अशा वायूचे संकेत सापडले आहेत, जो पृथ्वीवर समुद्रातील साध्या सागरी जीवांमुळे तयार होतो.
या शोधात सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांच्या मते, आता परग्रहावर खरोखरच जीव सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच आपण या विश्वात एकटे नाही, यावर शिक्कामोर्तब होणं ही फार लांबची गोष्ट राहिलेली नाही.
"विश्वातील अस्तित्वाच्या संदर्भातील मूलभूत प्रश्नांपैकीहा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कदाचित आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहोत," असं केंब्रिज विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोनॉमीचे प्रा. निक्कू मधुसूदन म्हणाले.
पण या सगळ्यामुळे आणखी बरेच प्रश्न उपस्थित होतात. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जर खरंच दुसऱ्या ग्रहावर जीव सापडला, तर त्याचा मानवजातीवर काय परिणाम होईल? आपण स्वतःमध्ये कसे बदल करू?
उडणाऱ्या तबकड्या आणि विज्ञानकथांतील एलियन
आपले पूर्वज खूप पूर्वीपासून आकाशात राहणाऱ्या काही रहस्यमय प्राण्यांच्या गोष्टी सांगत आले आहेत.
20व्या शतकाच्या सुरुवातीला काही खगोलशास्त्रज्ञांना मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर सरळ रेषा दिसत असल्याचं वाटलं, आणि त्यामुळे असा अंदाज लावला गेला की, आपल्या जवळच्या या ग्रहावर एखादी प्रगत संस्कृती असू शकते.
या कल्पनेतूनच उडणाऱ्या तबकड्या (फ्लाइंग सॉसर) आणि लहान हिरवे परग्रहवासी (एलियन) यांच्यासारख्या विज्ञानकथांची (सायन्स फिक्शन) एक संपूर्ण संस्कृतीच तयार झाली.
त्या काळात पाश्चिमात्य सरकारांनी साम्यवादाच्या (कम्युनिझम) प्रसाराची भीती निर्माण केली होती, त्यामुळे बाहेरून आलेले परग्रहवासी बहुतांश वेळा धोकादायक म्हणून दाखवले गेले. ते संकट घेऊन येतात अशीच त्यांची प्रतिमा तयार केली गेली.
पण अनेक दशकांनंतर, दुसऱ्या ग्रहावर जीव असल्याचे 'आजपर्यंतचे सर्वात ठोस पुरावे' आले आहेत. ते मंगळ किंवा शुक्र ग्रहावरून नाहीत तर अब्जावधी मैल दूर असलेल्या एका ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहावरून मिळाले आहेत.

फोटो स्रोत, Reuters
परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेताना सर्वात मोठं आव्हान म्हणजे कुठे शोधायचं हे माहीत असणं.
अलीकडच्या काळापर्यंत नासाच्या जीवसृष्टीचा शोध प्रामुख्याने मंगळ ग्रहावर केंद्रित होता. पण 1992 मध्ये आपल्या सौर मंडळाच्याबाहेर एका दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरणारा पहिला ग्रह सापडला आणि त्यानंतर ही दिशा बदलायला लागली.
खगोलशास्त्रज्ञांना आधीपासूनच शंका होती की, दूरवरच्या ताऱ्यांभोवतीही इतर ग्रह असतील, पण त्याचा ठोस पुरावा तोपर्यंत मिळाला नव्हता. त्या वेळेपासून आजपर्यंत आपल्या सौरमालेबाहेर सुमारे 6,000 ग्रह शोधण्यात आले आहेत.
त्यापैकी बरेच ग्रह आपल्या सौरमालेतील गुरू आणि शनीसारखे वायूने भरलेले मोठे ग्रह आहेत. इतर काही ग्रह इतके गरम किंवा इतके थंड आहेत की, तिथे द्रव स्वरूपात पाणी टिकू शकत नाही आणि पाणी हे जीवनासाठी आवश्यक मानलं जातं.
पण अशा अनेक ग्रहांना खगोलशास्त्रज्ञ "गोल्डीलॉक्स झोन" म्हणतात. म्हणजेच जिथे ग्रह ताऱ्यापासून अगदी योग्य अंतरावर असतो, जिथे जीवन टिकू शकण्याची शक्यता असते.
प्रा. मधुसूदन यांच्या मते, आपल्या आकाशगंगेत असे हजारो ग्रह असू शकतात.
महत्त्वाकांक्षी तंत्रज्ञान
'एक्सोप्लॅनेट्स' (सौरमालेबाहेरील ग्रह) सापडू लागल्यानंतर, शास्त्रज्ञांनी त्यांच्या वातावरणातील रासायनिक घटक तपासण्यासाठी खास उपकरणं विकसित करण्यास सुरुवात केली. हे ध्येय इतकं मोठं होतं की, अनेकांना ते धाडसी आणि थक्क करणारं वाटलं.
या दूरवरच्या ग्रहांच्या वातावरणातून जाणाऱ्या ताऱ्यांच्या अगदी क्षीण प्रकाशाला पकडून त्याचं विश्लेषण करायचं अशी कल्पना होती. यातून अशा रसायनांचे ठसे (फिंगरप्रिंट्स) शोधायचे होते, जे पृथ्वीवर फक्त सजीव सृष्टीमुळेच तयार होतात, यालाच 'बायोसिग्नेचर्स' म्हणतात.
त्यांनी जमिनीवरील (ग्राऊंड) तसेच अंतराळातील (स्पेस बेस्ड) दुर्बिणीसाठी (टेलिस्कोप) अशी उपकरणं विकसित करण्यात यश मिळवलं.
या आठवड्यात K2-18B या ग्रहावर वायूचे संकेत शोधणारी नासाची जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) ही आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली अंतराळ दुर्बीण (स्पेस टेलिस्कोप) आहे.
2021 मध्ये तिच्या प्रक्षेपणानंतर मोठी उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर आता अखेर जीवनाचा शोध मानवजातीच्या आवाक्यात येऊ लागला आहे.

फोटो स्रोत, NASA
पण JWST ला काही मर्यादा आहेत. त्याद्वारे आपल्या पृथ्वीसारखे छोटे आणि त्यांच्या ताऱ्याजवळ असलेले ग्रह ओळखू शकत नाही. कारण त्या ताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशामुळे अडथळा येतो.
त्यामुळं नासा आता हॅबिटेबल वर्ल्ड्स ऑब्झर्व्हेटरी (HWO) नावाचा नवीन प्रकल्प 2030च्या दशकात सुरू करण्याची योजना आखत आहे. ही दुर्बीण प्रणाली अशा ग्रहांचे वातावरण ओळखू व तपासू शकेल, जी आपल्या पृथ्वीसारखी असेल. (हे शक्य होणार आहे, कारण त्यात एक अत्याधुनिक 'सूर्यकवच' (सनशिल्ड) वापरण्यात येणार आहे, जे ग्रहाभोवती फिरणाऱ्या ताऱ्याचा प्रकाश कमी करून ग्रह सहज दिसेल.)
या दशकाच्या अखेरीस युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीचं (इएसओ) एक्स्ट्रिमली लार्ज टेलिस्कोप (इएलटी) देखील कार्यान्वित होणार आहे. ही दुर्बीण जमिनीवर असेल आणि चिलीच्या वाळवंटातील स्वच्छ, निर्मळ आकाशाकडे पाहून संशोधन करेल.
या दुर्बिणीत आतापर्यंत बनवलेल्या कोणत्याही उपकरणांपेक्षा सर्वात मोठा आरसा आहे. ज्याचा व्यास 39 मीटर आहे. त्यामुळे ती याआधीच्या दुर्बिणींपेक्षा ग्रहांच्या वातावरणातील खूप बारकावे आणि तपशील पाहू शकेल.
अधिक शोध, अधिक प्रश्न
परंतु, प्रा. मधुसूदन यांना आशा आहे की, पुढच्या दोन वर्षांत त्यांच्याकडे इतका डेटा असेल की K2-18B या ग्रहावर बायोसिग्नेचर्स आढळले असल्याचं ठामपणे सिद्ध करता येईल.
पण जरी त्यांना हे उद्दिष्ट गाठता आलं, तरीही दुसऱ्या ग्रहावर जीव सापडल्याच्या शोधाबद्दल मोठ्या प्रमाणावर जल्लोष होईल, असं नाही.
त्याऐवजी, ही एका नव्या वैज्ञानिक चर्चेची सुरुवात असेल की, हे बायोसिग्नेचर खरंच सजीवांमुळेच तयार झालं आहे की, त्यामागे काही निर्जीव कारणंही असू शकतात.

फोटो स्रोत, Reuters
एडिनबर्ग विद्यापीठातील प्राध्यापक आणि स्कॉटलंडच्या अॅस्ट्रॉनॉमर रॉयल प्रा. कॅथरीन हेमन्स यांच्या मते, जसजसा अधिक ग्रहांच्या वातावरणांचा डेटा मिळत जाईल आणि रसायनशास्त्रज्ञ बायोसिग्नेचर्ससाठी इतर कोणतेही पर्यायी (निर्जीव) स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरतील, तसतसे वैज्ञानिकांचे एकमत हळूहळू आणि निश्चितपणे या दिशेने झुकू लागेल की, इतर जगांवर खरंच जीवसृष्टी असू शकते.
"दुर्बिणींवर अधिक वेळ दिला की खगोलशास्त्रज्ञांना या ग्रहांच्या वातावरणातील रासायनिक रचना अधिक स्पष्टपणे समजू लागतील. आपल्याला लगेच हे सांगता येणार नाही की, तिथे खरोखरच जीव आहे.
पण माझ्या मते, जसजसा अधिक डेटा जमा होईल आणि जर हे असे संकेत एकाच नव्हे तर वेगवेगळ्या ग्रहांवर दिसू लागले, तर आपला आत्मविश्वास वाढत जाईल," असं त्या म्हणाल्या.
जगभरात वापरलं जाणारं इंटरनेट (वर्ल्ड वाइड वेब) एकदम नव्हे, तर हळूहळू छोट्या-छोट्या तांत्रिक शोधांमधून तयार झालं. त्या वेळी फार मोठं काही घडतंय असं वाटलंही नव्हतं.
अशाच प्रकारे, कदाचित लोकांना नंतर जाऊन लक्षात येईल की, मानवाच्या संपूर्ण इतिहासातील सगळ्यात मोठी वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि सामाजिक बदलाची घटना घडून गेली आहे. परंतु, जेव्हा पहिल्यांदा इतर जगांवर जीवन असल्याचं संकेत मिळाले, तेव्हा तो क्षण पूर्णपणे ओळखला गेला नव्हता.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या सौरमालेतच एखाद्या रोबोटिक अंतराळ यानाच्या (स्पेस क्राफ्ट) मदतीने जीवनाचा शोध घेणं हे अधिक ठोस शोध ठरेल.
अशा यानांमध्ये छोट्या प्रयोगशाळा असतील, ज्या त्या जीवाणूंचं (सूक्ष्मजीव/ऑफ वर्ल्ड बग) तिथेच विश्लेषण करू शकतील, किंवा कदाचित काही नमुने पृथ्वीवरही आणता येतील.
अशा प्रकारे मिळालेला थेट पुरावा वैज्ञानिक शंका किंवा विरोध कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो.
अलीकडच्या वर्षांत विविध अंतराळ यानांनी पाठवलेल्या माहितीमुळे आपल्या सौरमालेत जीवन आहे किंवा पूर्वी कधी तरी होतं, याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता अशा जीवनाच्या चिन्हांचा शोध घेण्यासाठी काही महत्त्वाच्या मोहिमांवर वेगाने काम सुरू आहे.
युरोपियन स्पेस एजन्सीचं (इएसए) 'एक्सोमार्स रोव्हर' 2028 मध्ये प्रक्षेपित करण्याची योजना आहे. हे रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागाखाली खोदकाम करून तिथे पूर्वीचे (किंवा कदाचित अजूनही असलेल्या) जीवसृष्टीचे संकेत शोधणार आहे.
मात्र मंगळावरील अतिशय कठीण परिस्थिती लक्षात घेता, तिथे जीवाश्मरूपात म्हणजेच फॉसिल झालेलं जुने जीवन सापडण्याची शक्यता जास्त आहे.
चीनची तियानवेन-3 मोहीमही 2028 मध्ये प्रक्षेपित करण्याची योजना आहे. या मोहिमेचं उद्दिष्ट म्हणजे मंगळावरून नमुने गोळा करून ते 2031 पर्यंत पृथ्वीवर परत आणणं.
दरम्यान, नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी (इएसए) या दोघांच्याही अंतराळ मोहिमा सध्या गुरुच्या बर्फाच्छादित उपग्रहांकडे जात आहेत, तिथल्या पृष्ठभागाखाली पाणी कदाचित विशाल समुद्र असण्याची शक्यता तपासण्यासाठी, ते जात आहेत.

फोटो स्रोत, NASA/ Reuters
पण अंतराळयान थेट जीवन शोधण्यासाठी तयार केलेले नाहीत. त्याऐवजी, या मोहिमा भविष्यातील अशा मोहिमांसाठी पायाभरणी करत आहेत, ज्या थेट जीवन शोधतील, असं लंडनच्या इम्पीरियल कॉलेजच्या प्रा. मिशेल डॉफर्टी सांगतात.
"ही एक दीर्घ आणि संथ प्रक्रिया आहे," असं त्या म्हणतात.
"पुढचं महत्त्वाचं पाऊल म्हणजे एक लँडर (उतरवणारी यंत्रणा) पाठवण्याचा निर्णय घेणं. ते कोणत्या उपग्रहावर जावं आणि नेमकं कुठे उतरवावं, हे ठरवणं."
"आपण अशा ठिकाणी उतरू इच्छित नाही जिथे बर्फाचं आवरण इतकं जाड असेल की पृष्ठभागाखाली पोहोचणं अशक्य होईल. म्हणूनच ही प्रक्रिया हळूहळू आणि काळजीपूर्वक केली जाते. पण हा प्रवास खूप रोमांचक आहे," असं त्या म्हणाल्या.
नासा 2034 मध्ये ड्रॅगनफ्लाय नावाचं अंतराळ यान शनीच्या टायटन या उपग्रहावर उतरवणार आहे. टायटन हे अनोखं जग मानलं जातं.
कार्बन‑समृद्ध रसायनांपासून बनलेल्या सरोवरांसारख्या पाणथळ ठिकाणांमुळे आणि ढगांमुळे तिथे केशरी धुके पसरल्याचं दिसतं. ही दृश्यं बीटल्सच्या 'लुसी इन द स्काय विथ डायमंड्स' या गाण्याची आठवण करून देतात.
पाण्यासोबत हे रसायनही जीवनासाठी आवश्यक घटक मानले जाते.
प्रा. डॉफर्टी या त्यांच्या क्षेत्रातील अग्रगण्य ग्रहशास्त्रज्ञांपैकी एक आहेत. त्यांना वाटतं का, की गुरू किंवा शनीच्या बर्फाच्छादित उपग्रहांपैकी कुठल्यातरी एका वर जीवसृष्टी असू शकते?
"जर तिथे जीवन नसेलच, तर मला खूप आश्चर्य वाटेल," असं त्या आनंदानं हसत म्हणाल्या.
"जीवन निर्मितीसाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत: उष्णतेचा स्रोत, द्रव स्वरूपात पाणी आणि सेंद्रिय (कार्बनवर आधारित) रसायने. जर ही तीनही घटकं आपल्याकडे असतील, तर तिथे जीवन तयार होण्याची शक्यता खूपच वाढते," असं त्या म्हणाल्या.
मानवाची 'विशेषत्वाची भावना' कमी करणं
जर साधे जीव सापडले, तरी याचा अर्थ असा नाही की तिथे अधिक जटिल जीवसृष्टीही आहेच याची खात्री असेल.
प्रा. मधुसूदन यांचं म्हणणं आहे की, जर हे सिद्ध झालं, तर साधं जीवन आकाशगंगेत 'खूप सामान्य' असू शकतं. "पण त्या साध्या जीवसृष्टीतून कठीण जीवसृष्टीकडे जाणं हे एक मोठं पाऊल आहे आणि तो अजूनही खुला प्रश्न आहे.
तो टप्पा कसा पार होतो? त्यासाठी कोणत्या अटी गरजेच्या असतात? हे आपल्याला अजून माहिती नाही. आणि त्यानंतर जटिल जीवनातून बुद्धिमान जीव निर्माण होणं हे आणखी एक मोठं पाऊल आहे," असं ते म्हणतात.

फोटो स्रोत, NASA
रॉयल अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे उपकार्यकारी संचालक डॉ. रॉबर्ट मॅसी यांचंही मत आहे की, दुसऱ्या जगावर बुद्धिमान जीवसृष्टी निर्माण होण्याची शक्यता साध्या जीवांपेक्षा खूपच कमी आहे.
"आपण पृथ्वीवर जीवन कसं निर्माण झालं ते पाहिलं, ते खूपच गुंतागुंतीचं होतं. बहुकोशिकीय (मल्टिसेल्यूलर) जीवन तयार होण्यासाठी खूपच काळ लागला आणि त्यानंतर ते हळूहळू विविध प्रकारच्या जीवसृष्टीत विकसित झालं," असं ते म्हणाले.
"खरा प्रश्न असा आहे की, पृथ्वीवरच असं काही विशेष होतं का, ज्यामुळे अशी उत्क्रांती शक्य झाली?
दुसऱ्या जगांवरही अशी उत्क्रांती व्हायला आपल्यासारखीच परिस्थिती, आपल्यासारखा आकार, महासागर, खंड यांची गरज आहे का? की मग ही उत्क्रांती कोणत्याही परिस्थितीत घडू शकते?"
त्यांचं मत आहे की, जरी अगदी साधं परग्रहावरील जीवन सापडलं, तरीही ते विश्वात मानवाच्या स्थानाची विशेष भावना कमी करणाऱ्या पुढच्या अध्यायासारखं असेल.

फोटो स्रोत, NASA
ते म्हणतात, काही शतकांपूर्वी आपल्याला वाटायचं की आपणच विश्वाच्या केंद्रस्थानी आहोत. पण खगोल शास्त्रातील प्रत्येक नव्या शोधासोबत आपण त्या केंद्रापासून अधिकाधिक दूर होत गेलो आहोत.
"माझ्या मते, जर इतरत्र जीवन सापडलं, तर ते आपल्या विशेष असल्याच्या भावनेला आणखी कमी करेल," असं ते म्हणतात.
दुसऱ्या बाजूला, प्रा. डॉफर्टी यांचं मत आहे की, आपल्या सौरमालेतच जीवन सापडणं ही गोष्ट विज्ञानासाठी तर चांगली ठरेलच, पण माणसाच्या आत्म्यासाठीही उपयुक्त ठरेल.
"जर अगदी साधं जीवन सुद्धा सापडलं, तर त्यातून आपल्याला हे चांगल्या प्रकारे समजेल की आपण कोट्यवधी वर्षांपूर्वी कसे उत्क्रांत झालो. माझ्यासाठी ही गोष्ट म्हणजे आपलं या विशाल विश्वातलं आपलं स्थान शोधण्यास मदत करणारी आहे."
"जर आपल्याला आपल्या सौरमालेत आणि कदाचित त्यापलीकडेही जीवन आहे हे समजलं, तर मला त्यातून एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल.
असं जाणवेल की, आपण या विशाल विश्वाचा एक छोटा पण महत्त्वाचा भाग आहोत आणि त्यामुळे आपलं अस्तित्व आणखी मोठं वाटेल."

फोटो स्रोत, NASA
यापूर्वी कधीच शास्त्रज्ञांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर परग्रहांवर जीवन शोधण्यासाठी प्रयत्न केले नव्हते आणि कधीच त्यांच्याकडे इतकी अविश्वसनीय साधनंही नव्हती.
या क्षेत्रात काम करणारे अनेक शास्त्रज्ञ असं मानतात की, परग्रहावर जीवन सापडेलच, फक्त हे केव्हा घडेल याची वाट पाहायची आहे. आणि प्रा. मधुसूदन यांच्या मते, परग्रहावर जीवन सापडलं, तर ते भीती न वाटता आशा निर्माण करेल.
"जेव्हा आपण आकाशाकडे पाहू, तेव्हा आपल्याला फक्त तारे, ग्रह आणि भौतिक वस्तूच दिसणार नाहीत, तर एक 'जिवंत आकाश' दिसेल. याचे समाजावर होणारे परिणाम खूप मोठे असतील.
ही गोष्ट आपल्या विश्वातल्या स्थानाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा क्रांतिकारी बदल घडवून आणेल," असं प्रा. मधुसूदन म्हणतात.
"ही गोष्ट मानवाच्या विचार करण्याच्या पद्धतीत मुळापासून बदल घडवून आणेल. स्वतःकडे आणि एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी बदलेल.
भाषा, राजकारण, भूगोल अशा सगळ्या भिंती गळून पडतील, कारण आपल्याला जाणवेल की आपण सगळे एक आहोत. आणि यामुळे आपण एकमेकांजवळ अधिक येऊ," असंही ते पुढे सांगतात.
"तो आपल्या उत्क्रांतीमधला आणखी एक टप्पा असेल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











