उंच इमारतींमध्ये आग लागल्यावर जीव वाचण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे?

हाँगकाँग आग

फोटो स्रोत, Reuters

काही दिवसांपूर्वीच हाँगकाँगच्या ताई पो परिसरातील एका निवासी भागाला भीषण आग लागण्याची घटना घडली. या आगीत अनेकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमीही झाले. तर अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. ज्या इमारतीत आग लागली तिथे नूतनीकरणाचे काम सुरू होते.

कोणत्याही इमारतीत मग ती रहिवासी की व्यावसायिक असो आग कधीही लागू शकते. त्यासाठी अनेक कारणं असतात. मात्र उंच किंवा गगनचुंबी इमारतींच्या बाबतीत आग लागण्याचा प्रसंग अतिशय आव्हानात्मक असतो.

कारण इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर पडणं किंवा बाहेर काढणं हे तितकंच कठीण असतं. अशा प्रसंगांमध्ये ती इमारत कशाप्रकारे बांधण्यात आली आहे आणि तिथल्या रहिवाशांना आगीपासून बचाव करण्यासाठी किती सज्ज करण्यात आलं आहे, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

जगात लोकसंख्या वाढत असतानाच, उंच, गगनचुंबी इमारतींची संख्या वाढते आहे. मग त्या निवासी असो की व्यावसायिक इमारती असो त्यांची उंची वाढत चालली आहे. विशेषकरून शहरांमध्ये याप्रकारच्या इमारती मोठ्या प्रमाणात उभ्या राहत आहेत. साहजिकच अशा इमारतींमध्ये राहणाऱ्यांची संख्यादेखील वाढत चालली आहे.

या इमारतींमध्ये राहणं हे एरवी जितकं आलिशान मानलं जातं, तितकंच अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये या इमारतीतील लोकांची सुरक्षितता हाताळणं कठीण आणि अत्यंत आव्हानात्मक असतं.

हाँगकाँगमध्ये या आठवड्यात उंच इमारतींच्या एका कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. त्या आगीचं स्वरूप इतक भीषण आणि रौद्र होतं की ते पाहिल्यानंतर फक्त हाँगकाँगच नाहीतर, जगभरात उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या, तिथे काम करणाऱ्या लाखो लोकांच्या मनात या घटनेमुळे एक प्रश्न निर्माण झाला असेल. तो म्हणजे, "माझ्या इमारतीत आग लागली तर मी काय केलं पाहिजे?"

"इमारत जितकी जास्त उंच असेल, तितकंच आग लागण्याच्या वेळेस त्यात राहणारे रहिवासी सुरक्षित ठिकाणापासून तितकेच लांब असतील," असं बेन लेव्ही बीबीसी न्यूज वर्ल्ड सर्व्हिसला म्हणाले. बेन युकेच्या नॅशनल फायर चीफ्स कौन्सिल फायर्स इन टॉल बिल्डिंग्स ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

'आग लागल्यावर प्रत्येक सेकंद महत्त्वाचा'

मात्र त्याचबरोबर ते कोणत्याही परिस्थितीत आग लागल्यावर त्यापासून वाचण्याची शक्यता वाढवण्यासाठी लोक काय करू शकतात, याविषयीच्या मूलभूत गोष्टींवर भर देतात.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बेन म्हणतात, "तुम्हाला इमारतीत आग लागल्याचं दिसलं की लगेचच आपत्कालीन क्रमांकावर मदतीसाठी कॉल करा. जर तुमच्या आजूबाजूलाच आग लागल्याचं तुम्हाला माहीत असेल, तर तुम्ही स्वत:ला सुरक्षित ठेवा आणि आजूबाजूच्या लोकांनादेखील त्याबद्दल सावध करा."

"आपत्कालीन सेवेला कॉल करणं टाळू नका. हे काम कोणीतरी आधीच केलं आहे, असं गृहीत धरू नका. आग लागल्याच्या स्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. जितक्या लवकर आम्हाला आगीबद्दल माहीत होईल, तितक्या लवकर आम्ही मदत पाठवू शकतो. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचवणं शक्य होईल."

ते पुढे म्हणतात, "दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा प्रसंगी शांत राहा. पळापळ करू नका. शांतपणे आणि शिस्तबद्धपणे, गोंधळ न करता, झुंबड न उडवता जवळच्या फायर एक्सिटजवळ चालत जा. यामुळे अग्निशमन दलाला लोकांना बाहेर पडणं सोपं होईल."

"यामुळे इमारतीतून बाहेर पडण्याचे मार्ग आणि अग्निशमन दलाच्या बचाव कार्यात अडथळा येणार नाही. आधी तुम्ही सुरक्षित असल्याची खात्री करा आणि त्यानंतर ज्या लोकांना हालचाल करण्यास समस्या आहे, ज्यांना मदतीची आवश्यकता आहे, अशा लोकांना मदत करणं तुम्हाला शक्य असेल तर त्यांना मदत करा."

हाँगकाँग आग

फोटो स्रोत, Peter Power/Toronto Star via Getty Images

रहिवाशांनी फायर ड्रिल, आगीपासून वाचण्याचा सराव केलाच पाहिजे

कॅनडातील टोरंटो शहरातील अग्मिशमन सेवा, बे वेलिंग्टन टॉवर या गगनचुंबी इमारतीमध्ये नियमितपणे मॉक ड्रिल म्हणजे आग लागल्यावर काय करायचं याविषयीच्या सरावाची सुविधा पुरवते.

जेणेकरून इमारतीतून बाहेर पडण्याच्या सर्वात सुरक्षित मार्गावर भर दिला जाईल. तो म्हणजे एका रांगेत पटापट जिन्यानं खाली उतरता येईल.

हाँगकाँग आग

फोटो स्रोत, Andrew Stawicki/Toronto Star via Getty Images

उंच इमारतींमध्ये आग लागल्यावर त्यातून वाचण्याचा एकमेव विश्वासार्ह मार्ग म्हणजे इमारतीच्या जिन्याच्या पायऱ्यांनी खाली उतरणं. मात्र त्यामुळेच तिथे आव्हान असतं ते गर्दीचं. कारण प्रत्येक मजल्यावरील लोक जिन्यानं उतरू लागताच, तिथे लोकांची गर्दी वाढू लागते.

आगीपासून सुटका करण्यासाठी जिन्यानं खाली उतरणं हे बहुतांश लोकांना वाटते, त्यापेक्षा खूपच हळू होणारी गोष्ट असते. एखाद्या नियंत्रित स्थितीत किंवा मॉक ड्रिल म्हणजे सरावाच्या वेळेस, लोक जिन्याच्या पायऱ्यांनी जवळपास 0.4 - 0.7 मीटर प्रति सेंकदाच्या गतीनं खाली उतरतात.

मात्र प्रत्यक्ष आग लागण्याच्या स्थितीत, विशेषकरून उंच इमारतींमधील आगीच्या वेळेस, यात झपाट्यानं घट होऊ शकते.

थकवा येणं ही यातील प्रमुख बाब असते. उंच इमारतींमध्ये थेट खाली येण्यासाठी बऱ्याचवेळ पायऱ्या उतरताव्या लागतात. बराच वेळ चालल्यामुळे उतरण्याचा वेग लक्षणीयरीत्या कमी होतो. तसंच उंच इमारतीमधून अशा प्रसंगी बाहेर पडणारे बहुतांशजण किमान एकदा तरी जिन्यात थांबतात.

2010 मध्ये चीनमधील शांघाय शहरातील एका उंच इमारतीला आग लागली होती. त्यावेळेस यातून वाचलेल्या जवळपास निम्म्या वृद्ध लोकांनी सांगितलं होतं की खाली उतरत असताना त्यांचा वेग खूपच कमी झाला होता.

कुटुंबांचा जिन्यातून खाली उतरण्याचा पॅटर्न, एकापाठोपाठ एक चालणं आवश्यक

कुटुंबांच्या वर्तनामुळे किंवा त्यांच्या वागण्याच्या पद्धतीमुळे इमारतीतून बाहेर पडण्याचा वेग आणखी कमी होऊ शकतो. कारण कुटुंबातील वृद्ध व्यक्ती किंवा लहान मुलांची हालचाल हळूहळू किंवा कमी वेगानं होते. वृद्ध किंवा लहान मुलं एका रांगेनं चालण्याऐवजी एकत्र होत किंवा गोळा होऊन खाली उतरतात. याचा वेगावर परिणाम होतो.

प्राध्यापक मिलाद हघानी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठात शहरी धोका, कणखरपणा आणि गतीशीलता या मुद्द्यांवर अभ्यास करतात.

प्राध्यापक मिलाद बीबीसी न्यूज वर्ल्ड सर्व्हिसला म्हणाले, "माझ्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की लोक जेव्हा कुटुंबाबरोबर असतात, तेव्हा ते बहुभुज आकार तयार करतात. म्हणजे ते चौकोनात, त्रिकोणात किंवा आयताकृती पद्धतीनं उभे असतात."

"ते एकापाठोपाठ चालत नाहीत तर घोळका करतात. अगदी पायऱ्यांवरदेखील ते अशाच पद्धतीनं गोळा होतात."

हाँगकाँग आग

फोटो स्रोत, Tesson/Andia/Universal Images Group via Getty Images

याचा अर्थ कुटुंब जेव्हा अशाप्रकारे घोळका करून जिन्यातून उतरत असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये बरीच जागा व्यापली जाते. ती जागा वापरली जात नाही. यामुळे जिन्यात गर्दी होऊ शकते आणि त्यामुळे खाली उतरणाऱ्या लोकांचा वेग कमी होऊ शकतो.

ते म्हणतात, "मात्र जेव्हा जिन्यात एकत्र असलेलं प्रत्येक कुटुंबं किंवा गटागटानं येणारे लोक जेव्हा एकापाठोपाठ उतरत असतात, तेव्हा उतरण्याचा वेग वाढतो."

"मी याबाबतीत प्रयोग केले आहेत आणि त्यातून मी दाखवून दिलं आहे की लोक जर एकापाठोपाठ एक असे एका सरळ रांगेत असतील तर त्यामुळे लोकांच्या खाली उतरण्याची गती लक्षणीयरीत्या वाढते."

लेव्ही म्हणतात, "जर गटातील प्रत्येकानं एक, दोन, तीन असं मोठ्यानं एकत्रितपणे मोजलं, तर त्यांना पायऱ्या उतर असताना शांत राहत स्थिर वेग राखता येईल." तसंच ज्यांना जिन्याच्या कठड्याला धरता येत असेल त्यांनी ते धरून ठेवलं तर उतरताना त्यांना मदत होईल.

ते पुढे म्हणतात, "लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा जिन्यातून पायऱ्या उतरत खाली येत असता. त्याचवेळेस खालून अग्निशमन दलाचे जवानदेखील जिन्यातून वर येण्याची शक्यता असते."

आगीच्या घटना हाताळण्याच्या यासारख्या सरावांमुळे, खऱ्या आगीच्या प्रसंगी कुटुंब अधिक वेगानं प्रतिसाद देतील, योग्य ती पावलं उचलतील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

संभाव्य आगीच्या प्रसंगांसाठी आधीच सज्ज राहा

मात्र, उंच इमारतींमध्ये आग लागलेली असताना त्यातून वाचण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आग लागल्यावर काय करायचं याच्या तयारीत आहेत, ही बाब तज्ज्ञ मान्य करतात.

इमारतीत आग लागली असताना बचावासाठी बाहेर पडण्याचे मार्ग आणि इमारतीचा सामान्य आराखडा माहित असणं महत्त्वाचं ठरू शकतं. विशेषकरून ज्या रहिवाशांना रात्रीच्या वेळी अशाप्रकारच्या प्रसंगांना तोंड द्यायची वेळ येते, त्यांच्यासाठी ते महत्त्वाचं ठरतं.

उंच इमारतीत राहणारे रहिवासी एरवी सहसा लिफ्टचाच वापर करतात. मात्र नेहमीच लिफ्टचा वापर करण्याऐवजी वेळोवेळी तळमजल्यावर जाण्यासाठी जिन्यातील पायऱ्यांचा वापर केला पाहिजे, असं लेव्ही म्हणतात.

"आग लागल्यावर निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत जिन्यानं खाली येण्याची गरज पडण्यापूर्वीच जिना उतरणं कसं असतं, याचा अनुभव आधीच घ्या. अशा संभाव्य प्रसंगांसाठी आधीच तयार राहा," असं ते म्हणतात.

दरम्यान, प्राध्यापक हघानी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधतात. तो म्हणजे आग लागण्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत काहीजण स्तब्ध होतात. काय करावं हे त्यांच्या लक्षात येत नाही, जणूकाही त्यांचा मेंदू सुन्न होतो.

प्राध्यापक हघानी म्हणतात, "स्वाभाविकपणे, अनेकजण जेव्हा आग लागण्याची सूचना मिळते किंवा फायर अलार्म ऐकतात तेव्हा थिजल्यासारखे होतात."

ते पुढे म्हणाले, "सर्वसाधारणपणे, जे लोक अशा प्रसंगातून बचावलेले असतात, त्यांनी लगेचच पावलं उचललेली असतात. त्यांनी लगेचच प्रतिसाद दिलेला असतो."

हाँगकाँग आग

फोटो स्रोत, Getty Images

"याचा संबंध, त्यांना आगीतून बाहेर पडण्यासंदर्भात किती शिक्षण मिळालं आहे, ते किती जागरुक झाले आहेत. तसंच आगीपासून बचाव करण्याच्या किती सराव सत्रांचा त्यांना अनुभव मिळाला आहे, याच्याशी ते जोडलेलं असतं."

इमारतींचं बांधकाम आणि आगीपासून बचावासाठीची मानकं

जगभरातील असंख्य उंच इमारती आगीच्या संकटांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या मान्यताप्राप्त मानकांची पूर्तता करत नाहीत, असा इशारा तज्ज्ञ देतात.

लेव्ही आणखी एका गोष्टीचं महत्त्व मांडतात. ते म्हणजे, इमारती शक्य तितक्या सुरक्षित असण्याची खातरजमा करण्याचं.

ते म्हणतात, "आपण सर्वजण असं गृहीत धरतो की आपण राहत असलेल्या इमारती सुरक्षित आहेत. त्या आगीच्या संकटाला तोंड देण्यास योग्य ठरतील अशा मान्यताप्राप्त मानकांनुसार बांधण्यात आल्या आहेत."

ते पुढे म्हणतात, "इमारतीत असणारे आगीपासून बचाव करणारे दरवाजे, कम्पार्टमेंटेशन आणि बांधकामाचा दर्जा, दबाव सहन करण्याची इमारतीची क्षमता याबाबत आगीच्या प्रसंगात सुरक्षित ठेवणारे घटक खरे ठरले पाहिजेत. इमारतीतील रहिवासी सुरक्षित राहिले पाहिजेत, जर त्यांनी इमारतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर ते पुरेसे सुरक्षित राहिले पाहिजेत."

दुर्दैवानं, "आम्ही जगभरात उंच इमारतींची खूप वेळा अशीच उदाहरणं पाहिली आहेत, जिथे आगीपासून बचाव करण्याच्या मानकांच्या बाबतीत त्या इमारती सक्षम ठरलेल्या नाहीत. तिथे सुरक्षेबाबतची ही गृहितकं खरी ठरलेली नाहीत."

आगीपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे मुद्दे -

  • उंच इमारतीत राहण्यास जाण्यापूर्वी आगीपासून बचाव करण्यासाठीच्या उच्च मानकांची पूर्तता त्या इमारतीत झाली असल्याची खातरजमा करू घ्या
  • आगीपासून बचाव करण्याचं प्रशिक्षण देणाऱ्या फायर ड्रील किंवा सराव सत्रांचा शक्य असेल तितका अधिक सराव करावा.
  • आग लागल्यावर जिन्यातील पायऱ्यांनी एकापाठोपाठ एक शक्य तितक्या वेगानं तळमजल्यावर पोहोचावं.
  • कुटुंब किंवा गटानं खाली उतरताना उगीच घोळक्यानं उतरू नये, यामुळे जिन्यातून खाली उतरण्याचा वेग कमी होतो आणि धोका वाढतो
  • उंच इमारतीत लिफ्टच्या वापराची सवय असली तरीदेखील उतरताना अधूनमधून जिन्याचा वापर करून तळमजल्यावर यावं, यामुळे जिन्यातून खाली उतरण्याचा सराव होतो आणि अंदाज येतो. उंच इमारतींच्या बाबतीत जिन्यातून खाली उतरणं वाटतं तितकं सोपं नसतं. उतरताना अतिशय थकवादेखील येऊ शकतो. म्हणून सराव महत्त्वाचा ठरतो.
  • आग लागल्यास जीव वाचवण्यासाठी इमारतीतून बाहेर पडण्याचे कोणते मार्ग आहेत तसंच एकूण इमारतीची रचना कशी आहे याची माहिती असली पाहिजे
  • आग लागल्यानंतर घाबरून न जाता, मात्र शक्य तितक्या वेगानं हालचाली करत इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा.
  • जिन्यातून खाली उतरत असताना एक बाजू मोकळी ठेवावी. रहिवासी जिन्यातून खाली उतरत असतानाच अग्मिशमन दलाचे जवान जिन्यानं वर येण्याची शक्यता असते

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)