आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांचा भीषण कार अपघातात मृत्यू, जाणून घ्या या खेळाडू विषयी

2016 च्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांचा सोमवारी (9 फेब्रुवारी 2026) पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झालाआहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालघरच्या मनोर जवळ अवजड वाहनाला पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात या नेमबाजाचा मृत्यू झाला आहे.
अपघातामध्ये कारचालक किरकोळ जखमी झाला असून, मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. यामध्ये संभाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे सहकारी यश प्रशांत चौधरी (22) गंभीर जखमी झाले आहेत.
संभाजी पाटील पुण्यावरून अहमदाबाद येथे यश चौधरी यांच्यासह प्रशिक्षणासाठी जात होते.
त्यांची कार दुर्वेस येथे आल्यावर चालकाचं नियंत्रण सुटून कार अवजड वाहनाला धडकली आणि हा अपघात झाला.
घटनास्थळाहून आलेल्या फोटोंमध्ये दिसतंय की ती धडक इतकी जोरदार होती की दणकट फॉर्च्यूनर गाडीचा चक्काचूर झाला.
मनोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पाटील हे त्यांच्या मित्राच्या गाडीतून गुजरातला नेमबाजीच्या सरावासाठी जात असताना ही घटना घडली.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार संभाजी पाटील हे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी होते. माजी ऑलिम्पिकपटू जसपाल राणा हे संभाजी पाटील यांचे प्रशिक्षक होते.
संभाजी पाटील हा आंतरराष्ट्रीय नेमबाज होते. ते पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुल येथे क्रीडा अधिकारी (गट ब) म्हणून काम करत होते.
2018 मध्ये झालेल्या 53 व्या ऑल इंडिया रेल्वे शूटिंग स्पर्धेच्या 25 मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात संभाजी पाटील यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं.
तसेच 2019 मध्ये 54व्या ऑल इंडिया रेल्वे शूटिंग स्पर्धेत वैयक्तिक 25 मीटर शूटिंग प्रकारात सुवर्णपदक मिळवलं होतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











