वेलदोड्याच्या प्रत्येक पाना-फुलावर का लक्ष ठेवावं लागतं? हे पीक अतिशय अवघड का समजलं जातं?

वेलचीला सर्वात कठीण पीक का म्हणतात? याच्या शेतकऱ्यांसमोर कोणत्या अडचणी आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रिती गुप्ता
    • Role, तंत्रज्ञान रिपोर्टर, मुंबई

"लोकांना बऱ्याचदा वाटतं की वेलदोडा हे एक फायदेशीर पीक आहे. कदाचित तसं असेलही. मात्र त्याचबरोबर ते लागवड करण्यासाठीचं सर्वात कठीण पीकदेखील आहे," असं स्टॅनली पोथन म्हणतात.

ते केरळमध्ये गेल्या अनेक दशकांपासून वेलदोड्याची लागवड करत आहेत.

वेलदोड्याला एक सुगंधी चव असते. त्यामुळे शतकानुशतके वेलदोडा किंवा आपण ज्याला वेलचीही म्हणतो मौल्यवान पीक ठरलं आहे. पण त्याची लागवड करणं अतिशय कठीण असतं.

सुंदर मात्र नाजूक अशा वेलचीच्या पिकाची खूप काळजी घ्यावी लागते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुंदर मात्र नाजूक अशा वेलचीच्या पिकाची खूप काळजी घ्यावी लागते

"वेलची ही एक अतिशय नाजूक वनस्पती आहे. त्यामुळे वेलचीच्या पिकावर रोग पडण्याची आणि त्यावर कीटकांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्हाला सतत शेतात राहून त्याची देखभाल करावी लागते. प्रत्येक पानावर, प्रत्येक फुलावर लक्ष ठेवावं लागतं. या पिकाकडे दररोज लक्ष देण्याची आवश्यकता असते," असं पोथन म्हणतात.

हवामानाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील पीक

हवामानाच्या बाबतीतदेखील वेलचीचं पीक अतिशय संवेदनशील असतं.

पोथन पुढे सांगतात की, "गेल्या वर्षीचा उन्हाळा अत्यंत भीषण होता. प्रचंड उष्णता होती. उष्णतेच्या तडाख्यामुळे आम्हाला बरंचसं पीक गमवावं लागलं. जगात वेलचीचं सर्वाधिक उत्पादन ग्वाटेमालामध्ये होतं."

"त्या हंगामात ग्वाटेमालामधील जवळपास 60 टक्के पीक नष्ट झालं. आम्हालाही केरळमध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं."


स्टॅनली पोथन म्हणतात की वेलची हे 'सर्वात कठीण' पीक आहे.

फोटो स्रोत, Stanley Pothan

फोटो कॅप्शन, स्टॅनली पोथन म्हणतात की वेलची हे 'सर्वात कठीण' पीक आहे.

भारतीय मसाले मंडळाच्या (इंडियाज स्पाइस बोर्ड) आकडेवारीनुसार, वेलचीचं उत्पादन घटल्यामुळे गेल्या वर्षी वेलचीच्या किंमतीत तब्बल 70 टक्क्यांची वाढ होऊन ती 1,178 रुपये (10 पाउंड, 13 डॉलर) प्रति किलोवर पोहोचली होती. आधीच्या वर्षाच्या तुलनेत यात 70 टक्क्यांची वाढ झाली होती.

वेलची नेहमीच महाग राहिली आहे. सर्वसाधारणपणे वजनानुसार किंमतीचा विचार करता, केशर आणि व्हॅनिला नंतर हे तिसरं महागडं मसाल्याचं पीक आहे.

शेतकऱ्यांना वेलचीचं उत्पादन वाढवायचं आहे, मात्र तसं करणं सोपं नाही.

"एखादा तीव्र उन्हाळा किंवा अकाली पाऊस पडल्यास या पिकाच्या लागवडीसाठी लागणारे सर्व प्रयत्न वाया जाऊ शकतात. वेलचीच्या लागवडीचं हेच कठोर वास्तव आहे," असं पोथन म्हणतात.

उत्पादन वाढवण्यासाठीचे प्रयत्न

सरकारच्या निधीवर चालणारी इंडियन कार्डमम रिसर्च इन्स्टिट्यूट (आयसीआरआय) म्हणजे भारतीय वेलची संशोधन संस्था वेलचीच्या पिकाची देखभाल करणं सोपं जावं, शेतकऱ्यांचे श्रम आणि अडचणी कमी व्हाव्यात तसंच खर्चही कमी व्हावा यासाठी प्रयत्न करते आहे.

"आमचं उद्दिष्ट वेलचीच्या पिकात सुधारणा करणं, कीटक आणि रोगांवर लक्ष ठेवणं, मातीचं व्यवस्थापन करणं, क्षमता वाढवणं आणि तंत्रज्ञानाचं हस्तांतरण या गोष्टीवर आहे," असं ए. बी. रामेश्वरी म्हणतात. ते आयसीआरआयचे संचालक आहेत. ही संस्था स्पाईस बोर्ड ऑफ इंडियाचा एक भाग आहे.

या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे आयसीआरआयचं ॲप. शेतकरी या ॲपचा वापर मातीच्या स्थितीचं निरीक्षण करण्यासाठी करू शकतात. त्याचं सर्वोत्तम पद्धतीनं व्यवस्थापन कसं करावं यासाठी शेतकऱ्याच्या गरजेनुरुप हे ॲप सूचना देतं.

वेलचीपेक्षा फक्त केशर आणि व्हॅनिलाच महाग असतात

फोटो स्रोत, Graayma

फोटो कॅप्शन, वेलचीपेक्षा फक्त केशर आणि व्हॅनिलाच महाग असतात

"आता तंत्रज्ञान शेतीपासून अलिप्त राहिलेलं नाही. वेलची उत्पादक शेतकऱ्यांसाठी ते दररोज वापरायचं साधन झालं आहे. या ॲपचा वापर करून ते मातीची स्थिती तपासतात, पर्जन्यमानावर लक्ष ठेवतात आणि रोगांसंदर्भातील इशारे पाहतात. हे सर्व ते फोनवरील ॲपद्वारे करतात," असं डॉ. रामेश्वरी सांगतात.

"आज अगदी छोटे शेतकरीदेखील डिजिटल साधनांचा वापर करत आहेत. यासाठी आता त्यांना फक्त स्थानिक साधनांवर अवलंबून राहावं लागत नाही. ते मातीची गुणवत्ता, आर्द्रता किंवा ओलावा आणि अगदी रोगाची लक्षणंदेखील तपासू शकतात," असं ते पुढे म्हणतात.

वेलचीच्या सुधारित जातींवर संशोधन

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, वैज्ञानिक वेलचीच्या अधिक टिकाऊ जातींचा शोध घेत आहेत.

"आम्ही प्रामुख्यानं वेलचीच्या अशा जातींवर लक्ष केंद्रित करत आहोत, ज्या मोठे रोग आणि कीटकांच्या बाबतीत सहनशील किंवा त्यांना तोंड देण्यास सक्षम असतील, त्याचबरोबर या जाती अधिक प्रमाणात उत्पादन करणाऱ्या आणि हवामानातील बदलांना तोंड देऊ शकणाऱ्या असतील," असं प्रीती चेट्ट म्हणतात. त्या केरळ कृषी विद्यापीठात नवस्पती प्रजनन आणि अनुवंशशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

त्यांना या प्रयत्नांना एक मोठं यश मिळालं आहे. त्यांनी मर्यादित किंवा कमी पाण्यावर वाढू शकणारी वेलचीची एक जात शोधून काढली आहे. संशोधकांना वेलचीच्या पीकाबाबत जे गुणधर्म किंवा वैशिष्ट्यं अपेक्षित आहेत, त्यासाठीचे अनुवांशिक बाबी किंवा जुनकीय माहिती शोधण्यासाठी ते वेलचीच्या अनुवांशिक किंवा जनुकिय रचनेचादेखील सखोल अभ्यास करत आहेत.

यातून समोर येणाऱ्या ज्ञानामुळे वेलचीच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जातीच्या लागवडीला गती मिळू शकेल.

डॉ. चेट्टी सांगतात, "इतर मसाल्यांप्रमाणेच वेलचीचा देखील मर्यादितच अभ्यास झालेला आहे. विशेषकरून त्याच्या रेणूंच्या पातळीवरील संशोधन मर्यादितच आहे."

"लागवडीसंदर्भात किंवा उत्पादन वाढवण्यासाठीच्या वैशिष्ट्यांसाठी लागणाऱ्या रेणूच्या पातळीवरील जनुकीय माहितीचा किंवा मार्करचा अभाव आहे. आम्ही आता त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत."

वेलची वाळवण्याच्या महत्त्वाच्या प्रक्रियेत 'ग्राम्य'ची भूमिका

वेलचीच्या लागवडीतील एक महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे शेंगा काढल्यानंतर त्या वाळवणं.

पारंपारिकदृष्ट्या फक्त मोठ्या शेतकऱ्यांनाच स्वत:चे ड्रायर बसवणं शक्य होत होतं. हे ड्रायर चालवण्यासाठी बऱ्याचदा इंधन म्हणून लाकडाचा वापर केला जात असे.

"वेलचीच्या शेंगा वाळवण्याच्या या कामासाठी छोट्या शेतकऱ्यांना मध्यस्थ किंवा शेजाऱ्यांवर अवलंबून राहावं लागायचं. त्याचा बऱ्याचदा वेलचीच्या गुणवत्तेवर परिणाम होत असे," असं अन्नू सनी म्हणतात.

त्यांनी केरळमधील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 2016 मध्ये 'ग्राम्य' या सामाजिक उपक्रमाची स्थापना केली होती.

"वेलची ही मसाल्यांची राणी आहे. ते नगदी पीक असल्यामुळे, अनेकजण त्याची लागवड करू लागले आहेत," असं त्या म्हणतात.

"हे अतिशय अवघड पीक आहे. वेलचीची लागवड कशी करायची, त्याला कशाची आवश्यकता असते, त्यावर कधी पावलं उचलावी आणि कधी वाट पाहावी हे सर्व चांगल्या प्रकारे समजण्यासाठी 10 ते 12 वर्षे लागतात. याच्या लागवडीचा प्रत्येक हंगाम हा एक नवीन प्रयोग असतो," असं अन्नू पुढे म्हणतात.

शेतकऱ्यांना वेलची वाळवण्याच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी ग्राम्यनं हीट-पंप ड्रायर आणले आहेत.

यासाठी ग्राम्य 10 रुपये प्रति किलो शुक्ल आकारतं. मात्र लाकडं जाणून वाळवण्याच्या प्रक्रियेपेक्षा ते खूपच स्वस्त आहे. लाकडाचा इंधन म्हणून वापर केला तर त्यासाठी जवळपास 14 रुपये प्रति किलोचा खर्च येतो.

त्या पुढे म्हणतात, "या प्रक्रियेत उत्पादनाची म्हणजे शेवटी हाती येणाऱ्या वेलचीची फिनिशिंग खूप चांगली असते. यातून धूर निघत नाही, असमान उष्णता दिली जात नाही. तसंच वेलचीच्या शेंगांचा नैसर्गिक हिरवा रंग टिकून राहतो. ही बाब खूपच महत्त्वाची आहे, कारण वेलचीची किंमत त्याच्या रंगावरच अवलंबून असते."

वेलचीच्या सेंद्रिय शेतीचे प्रयोग

खतं आणि कीटकनाशकांचा वापर करून वेलचीचं उत्पादन घेणं बरंच कठीण आहे. मात्र काही शेतकरी यात एक पाऊल पुढे जात आहेत. ते लागवडीसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर करत आहेत.

"मी जेव्हा पहिल्यांदा याची सुरूवात केली होती. तेव्हा नेमकं काय करायचं आहे, याची मला कल्पना नव्हती," असं मॅथ्यूज गेरोज म्हणतात. ते आधी बँकेत होते आणि 2020 मध्ये केरळमध्ये शेती करू लागले.

"कार्डमम रिसर्च इन्स्टिट्यूटमधील वैज्ञानिकांशी मी जेव्हा पहिल्यांदा बोललो, तेव्हा त्यातून माझ्या हाती निराशा आली. ते म्हणाले की, वेलची हे खूपच संवेदनशील पीक आहे आणि सेंद्रिय पद्धतीनं ते वाढवणं कठीण आहे," असं मॅथ्यूज म्हणाले.

मॅथ्यूज गेरोज बँकिंगमधून सेंद्रिय शेतीकडे वळले

फोटो स्रोत, Mathews Geroge

फोटो कॅप्शन, मॅथ्यूज गेरोज बँकिंगमधून सेंद्रिय शेतीकडे वळले

सुरूवातीला त्याचं म्हणणं बरोबर असल्याचं दिसून आलं. मॅथ्यूज यांचं पहिलं पीक कीटकांमुळे नष्ट झालं स्थानिक व्यापाऱ्यांनी त्यांची वेलची घेण्यास नकार दिला. कारण ती खराब स्थितीत दिसत होती.

दोन वर्षे प्रयोग केल्यानंतर मॅथ्यूज यांनी वृक्षायुर्वेदाच्या प्राधीन भारतीय लागवड पद्धतीचा वापर करण्यास सुरूवात केली. या पद्धतीमुळे अधिक यश आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र तरीदेखील ते सोपं नाही.

मॅथ्यूज म्हणतात, "आजही, वेलचीच्या शेतीत मी निपुण झालो आहे, असं मी म्हणणार नाही. अजूनही ती आव्हानात्मक आहे. काही हंगाम चांगले असतात, तर काही नसतात. मात्र आता मला या पिकाची लय समजते. केव्हा कृती करायची, कधी वाट पाहायची, कधी निसर्गाला त्याचं काम करू द्यायचं, हे आता मला समजतं."

शेवटी, मॅथ्यूज गेरोज यांना वाटतं की सेंद्रिय शेती, पारंपारिक पद्धतीनं केल्या जाणाऱ्या सेतीशी स्पर्धा करू शकेल.

ते पुढे म्हणतात, "टिकणारी, शाश्वत स्वरुपाची शेती उत्पादन खर्च करण्यापासून सुरू होते. अनेक शेतकऱ्यांना वाटतं की सेंद्रिय शेती म्हणजे खूप खर्चिक असते."

"मात्र जर तुम्ही तुमचा उत्पादन खर्च लक्षात घेतला, त्यावर काम केलं आणि तुमच्या शेतातील माती समजून घेतली, तर तुम्ही रसायनांवर कमी अवलंबून राहून चांगलं उत्पन्न मिळवू शकता."

वेलचीच्या शेतीतील कुशल मजूरांचं महत्त्व

वेलचीच्या शेतीतील आणखी एक पैलू ज्यात लवकर बदल होण्याची शक्यता नाही. तो म्हणजे कुशल मजूरांची आवश्यकता.

पोथन यांच्या एकूण खर्चापैकी 75 टक्के रक्कम मजूराीवर खर्च होते. यातील बहुतांश खर्च कापणीच्या वेळेस होतो.

पोथन म्हणतात, "कापणी हे एक कौशल्यानं करायचं काम आहे. बहुतांशपणे महिला हे काम करतात. नेमकी कोणती शेंग तयार झाली आणि कोणती तयार झालेली नाही, हे त्यांना अचूक माहित असतं. मग शेंगांच्या गुच्छातून त्या एक किंवा दोन अशा शेंगा तोडू शकतात."

"45 दिवसांनी पुढच्या फेरीच्या वेळेस त्या पुन्हा त्याच रोपावर परत येऊन तयार झालेल्या शेंगा तोडू शकतात. त्यामुळेच हे काम मजुरांवर अवलंबून असलेलं आहे."

अन्नू सनी सांगतात की, "वेलचीच्या लागवडीचं यांत्रिकीकरण मर्यादित आहे. तुम्ही फवारणी किंवा तण काढण्याच्या कामात यंत्रांचा वापर करू शकता. मात्र छाटणी किंवा कापणी यंत्रांद्वारे करू शकत नाही."

"आमच्या शेताला भेट देणारा प्रत्येक इनोव्हेटर, संशोधक वेलचीकडे पाहतो आणि म्हणतो, 'आम्ही ही समस्या सोडवू.' मात्र अद्याप त्यासंदर्भात काहीही ठोस झालेलं नाही."

पोथन सनी यांच्याशी सहमत आहेत.

ते म्हणतात, "वेलचीच्या लागवडीत कोणताही शॉर्टकट नाही. तुम्ही यात सर्वकाही स्वयंचलित करू शकत नाही. हे अशा पिकांपैकी एक पीक आहे, ज्यात विज्ञान आणि आत्मा या दोघांचीही आवश्यकता आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)