भारताला पाठिंबा देणारे डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर छापा

जॉन बोल्टन यांनी अलीकडेच भारतावर टॅरिफ लावण्यास तीव्र विरोध केला होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जॉन बोल्टन यांनी अलीकडेच भारतावर टॅरिफ लावण्यास तीव्र विरोध केला होता

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर आणि कार्यालयावर शुक्रवारी (22 ऑगस्ट) अमेरिकेची गुप्तहेर आणि सुरक्षा यंत्रणा असलेल्या एफबीआयच्या एजंटांनी छापा टाकला.

गोपनीय कागदपत्रांशी निगडीत एका प्रकरणासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे.

जॉन बोल्टन, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचे पाठिराखे होते. मात्र नंतर दोघांमध्ये वाद झाला होता आणि बोल्टन यांनी त्यांचं पद सोडलं होतं.

रशिया-युक्रेन युद्धाबाबतच्या ट्रम्प यांच्या भूमिकेवर बोल्टन कठोर टीका करत आले आहेत. अलीकडच्या काळात ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफला देखील बोल्टन यांनी तीव्र विरोध केला आहे.

ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात, 2019 मध्ये राजीनामा दिल्यापासूनच बोल्टन ट्रम्प यांच्यावर टीका करत आले आहेत.

बोल्टन यांना विश्वासघातकी म्हणाले ट्रम्प

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काम करताना आलेल्या अनुभवांवर

बोल्टन यांनी 2020 मध्ये एक पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, ट्रम्प यांना परराष्ट्र धोरणाबद्दल काहीही माहिती नाही.

त्यानंतर व्हाईट हाऊसनं त्यांच्यावर गोपनीय माहितीचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता.

त्यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत एफबीआयनं कोणतंही वक्तव्यं दिलेलं नाही. मात्र या प्रकरणाशी निगडीत सूत्रांनी बीबीसीचे सहकारी असलेल्या सीबीएस न्यूजला सांगितलं की हा छापा काही मर्यादेपर्यंत गोपनीय कागदपत्रांशी निगडीत आहे.

बोल्टन यांनी आतापर्यंत या कारवाईवर कोणतंही वक्तव्यं दिलेलं नाही. तसंच त्यांना अटकदेखील करण्यात आलेली नाही किंवा त्यांच्यावर कोणताही गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला नाही.

ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात, जॉन बोल्टन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात, जॉन बोल्टन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते

पत्रकारांनी याबाबतीत विचारल्यावर ट्रम्प म्हणाले की, त्यांना या प्रकरणात 'हस्तक्षेप करायचा नाही'. मात्र ते बोल्टन यांना 'विश्वासघातकी' म्हणाले.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प असंही म्हणाले की, त्यांनी झडतीचे थेट आदेश दिलेले नाहीत.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वेन्स म्हणाले की, बोल्टन यांच्या विरोधात करण्यात आलेली कारवाई राजकीय हेतूनं प्रेरित नाही.

शुक्रवारी (22 ऑगस्ट) सकाळी मेरीलँडमधील बेथेस्डास्थित बोल्टन यांच्या घराबाहेर पोलिसांच्या गाड्या आणि एफबीआयचे अधिकारी दिसले. यातील काही अधिकारी घरात बॉक्स घेऊन जाताना दिसले.

एफबीआयचे एजंट बोल्टन यांच्या वॉशिंग्टन डीसी मधील कार्यालयातदेखील पोहोचले.

शुक्रवारी (22 ऑगस्ट) दुपारी बोल्टन मेरीलँडमधील त्यांच्या घरी परतले. मात्र बाहेर उपस्थित असलेल्या पत्रकारांशी ते काहीही बोलले नाहीत.

भारतावर टॅरिफ लावण्याच्या विरोधात

रशियाकडून कच्चे तेल विकत घेतल्यामुळे अमेरिकनं भारतावर टॅरिफ लावले. बोल्टन याच्या विरोधात आहेत.

अलीकडेच त्यांनी हिन्दुस्तान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की, रशियावर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे भारताकडून होणारी रशियन कच्च्या तेलाची आयात थांबणार नाही.

बोल्टन म्हणाले होते, "रशियावर कोणतेही नवीन निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. चीनवर कोणतेही नवीन निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. प्रत्यक्षात चीन रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची सर्वाधिक आयात करतो. मात्र, भारताला वेगळं करून लक्ष्य करण्यात आलं आहे."

जॉन बोल्टन, मेरीलँडमधील त्यांच्या घराबाहेर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जॉन बोल्टन, मेरीलँडमधील त्यांच्या घराबाहेर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बोल्टन यांचं म्हणणं होतं की, "भारतानं रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू आयात करू नये असं मला वाटतं. कारण माझं मत आहे की, चीनकडून निर्माण होणारे धोके लक्षात घेणं, भारत आणि अमेरिका, दोघांच्याही हिताचं आहे. चीन आणि रशियाची आघाडी आणि त्यामुळे जगाला निर्माण होणारा धोकादेखील लक्षात घेतला पाहिजे."

ते पुढे म्हणाले होते, "भारताला एकटं पाडणं आणि फक्त त्यांच्याच विरोधात शिक्षा म्हणून टॅरिफ लावणं, अनेकांना विचार करायला भाग पाडतं की, अमेरिकेनं भारताच्या बाबतीत हात झटकले आहेत. यामुळे भारत रशिया आणि चीनच्या अधिक जवळ जाईल अशी मला चिंता वाटते."

ट्रम्प सरकारच्या विचित्र धोरणांचाच हा भाग असल्याचं बोल्टन यांनी म्हटलं होतं. ते म्हणाले होते की, सद्यपरिस्थितीत भारत-अमेरिका संबंधांवर खूपच विपरित परिणाम झाला आहे.

त्यांच्या मते, "दुर्दैवानं, ट्रम्प यांनी टॅरिफच्या बाबतीत जे केलं आहे, त्यामुळे भारत आणि इतर अनेक देशांबरोबर कित्येक दशकांपासून निर्माण झालेला विश्वास कमकुवत होतो आहे. तो पूर्ववत करण्यास प्रदीर्घ काळ लागेल."

अमेरिका ही भारताच्या निर्यातीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारताच्या एकूण निर्यातीपैकी 18 टक्के निर्यात अमेरिकेत होते. भारताच्या जीडीपीत त्याचा वाटा 2.2 टक्के आहे.

काही अंदाजांनुसार, अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत 0.2 ते 0.4 टक्क्यांची घसरण होऊ शकते. यामुळे भारताचा विकासदर सहा टक्क्यांच्या खाली येऊ शकतो.

यादरम्यान, भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये सुधारणा होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

ट्रम्प आणि बोल्टन यांच्यातील वाद

2020 मध्ये बोल्टन यांनी 'द रूम व्हेयर इट हॅपन्ड' हे पुस्तक लिहिलं होतं.

या पुस्तकात त्यांनी 2018 ते 2019 दरम्यान ट्रम्प सरकारमध्ये काम करताना आलेले अनुभव दिले आहेत.

या पुस्तकात त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर तीव्र टीका करत लिहिलं होतं, "पुराव्यांचा डोंगर हे सिद्ध करतो की ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्यास लायक नाहीत."

त्यावेळेस अमेरिकेच्या न्याय मंत्रालयानं बोल्टन यांच्यावर गोपनीय माहिती उघड न करण्याच्या कराराचं गंभीर उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

जॉन बोल्टन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं होतं की ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्यास लायक नाहीत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जॉन बोल्टन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं होतं की ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्यास लायक नाहीत

मात्र जून 2021 मध्ये हा खटला मागे घेण्यात आला होता. तोपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन राष्ट्राध्यक्ष झाले होते.

माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळात बोल्टन संयुक्त राष्ट्रसंघात राजदूत होते. जानेवारी महिन्यात ट्रम्प सरकारनं बोल्टन यांची सीक्रेट सर्व्हिस सुरक्षा काढली होती.

बोल्टन यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प सरकार वापरत असलेल्या मार्गांवर देखील उघडपणे प्रश्न उपस्थित केले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीदेखील बोल्टन यांच्यावर तीव्र टीका केली आहे.

ट्रम्प यांनी बोल्टन यांच्यावर आरोप केला आहे की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असताना त्यांनी परदेशात अमेरिकन सैन्याद्वारे हस्तक्षेप करण्याची भूमिका घेतली होती.

ट्रम्प यांच्या इतर टीकाकारांना देखील चौकशीला तोंड द्यावं लागतं आहे. यामध्ये न्यूयॉर्कच्या ॲटर्नी जनरल लॅटिटिया जेम्स आणि कॅलिफोर्नियातील डेमोक्रॅटिक पक्षाचे सीनेटर ॲडम शिफ यांचा समावेश आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.