विषाणुजन्य आजाराचं संक्रमण झाल्यानं पुण्यातील प्राणी संग्रहालयात 8 दिवसात 16 हरणांचा मृत्यू, प्रकरण काय?

फोटो स्रोत, Rajiv Gandhi Zoological Park
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठीसाठी
राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील हरणांचा मृत्यू हा लाळ खुरकत या विषाणुजन्य आजारामुळे झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहरातील कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये आठ दिवसांत तब्बल 16 हरणांचा मृत्यू झालेला होता.
याचं कारण शोधण्यासाठी मृत हरणांचे जैविक नमुने विविध प्रयोग शाळांमध्ये पाठवण्यात आले होते.
राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्राच्या अहवालानुसार, प्राणीसंग्रहालयातील वन्य प्राण्यांना लाळ खुरकत या विषाणुजन्य आजाराचं संक्रमण झालं असल्याचं कारण प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.
लाळ खुरकतच्याा संक्रमणादरम्यान प्राण्यांची रोग प्रतिकारक क्षमता कमी होते, पावसाळी प्रतिकूल वातावरण असेल तर प्राण्यांची स्ट्रेस पातळी वाढते.
त्यामुळे त्यांचं मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण वाढतं, अशी माहितीही प्राथमिक तपासातून समोर आली आहे.
दरम्यान, ही मृत हरणं 'चितळ' या प्रकारातील होती. तसेच यामध्ये मादी हरणांची संख्या जास्त होती. 16 मृत हरणांमध्ये 14 मादी तर 2 नर हरणांचा समावेश होता.
अचानकपणे इतक्या मोठ्या संख्येनं हरणं दगावल्यामुळे प्राणी संग्रहालय प्रशासनाला तसेच वन्यजीवप्रेमींनाही मोठा धक्का बसला होता.
मात्र, हरणांच्या अशा अचानक मृत्यूमागे नेमकी काय कारणं असून शकतात? अन्नातून विषबाधा झाली आहे की हा एक साथीचा रोग असू शकतो, या अनुशंगानं या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू होता.
आठ दिवसांत 16 हरणांचा मृत्यू
पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय किंवा कात्रज सर्पोद्यान म्हणून ओळखलं जाणारं हे प्राणीसंग्रहालय खूप प्रसिद्ध असून इथे पशू, पक्षी, प्राणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात.
त्यामुळेच 16 हरणांच्या अचानक मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमींसोबतच नागरिक आणि प्राणी संग्रहालय प्रशासनातही चिंतेचं वातावरण पसरलं होतं.
प्राणी संग्रहालय प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, प्राणीसंग्रहालयात 7 जुलै अगोदर नर 39 व मादी 60 अशी एकूण 99 चितळ प्रकारातील हरणं होती.
मात्र 7 जुलै यातील पहिल्या हरणाचा मृत्यू झाला. त्यानंतर 12 जुलैपर्यंत एकूण 16 हरणांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच प्राणी चिकित्सक आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.
आठवडाभरात अशाप्रकारे हरणांचा सलग मृत्यू झाल्यानं या प्रकरणाकडं गंभीरतेनं पाहिलं गेलं.
मृत हरणांचे जैविक नमुने विभागीय वन्यजीव प्रशिक्षण केंद्र नागपूर, बरेली, भोपाळ आणि ओडिशामधील नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
प्राणी संग्रहालयात इतक्या मोठ्या संख्येनं अचानक हरणांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असल्याची माहिती राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम पवार यांनी दिलेली.
कारण काय?
राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील हरणांचा मृत्यू हा लाळ खुरकत या विषाणुजन्य आजारामुळे झाला. तशी माहितीराष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्राच्या तापासातून समोर आली.
प्राथमिक तपासातून प्राणीसंग्रहालयातील वन्य प्राण्यांना लाळ खुरकत या विषाणुजन्य आजाराचं संक्रमण झालं असल्याचं कारण समोर आलं.
मात्र, सुरुवातीला हरणांच्या अशा प्रकारे मृत्यू होण्यामागचं कारण स्पष्ट झालं नव्हतं.
त्यामुळे मृत हरणांचे नमुने तपासणीसाठी विविध प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते, त्याचा अहवाल आल्यानंतरच नेमकं कारण काय असू शकतं हे स्पष्ट होईल, अशी माहिती राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली होती.
त्यावेळी ते म्हणाले होते, "ही घटना धक्कादायक आहे. ज्या हरणांचा मृत्यू झालाय, त्यांचा आहार कमी कमी होत चालला होता, परंतु इतर कोणतीही लक्षणं आढळली नव्हती. त्यामुळे नक्की काय झालं असेल हे आता सांगता येणं कठीण आहे."
पुढे ते असंही म्हणाले होते की, "हा कोणता साथीचा आजार आहे की खाद्यपदार्थांमार्फत काही विषबाधा झाली आहे की अजून वेगळं काही कारण आहे, यावर अहवाल आल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल. येत्या दोन दिवसांत अहवाल येईल तेव्हाच हरणांच्या मृत्यूचं कारण समजू शकेल."

फोटो स्रोत, Rajiv Gandhi Zoological Park
इतर हरणांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये अशी कोणती संशयास्पद लक्षणं दिसत आहेत का, त्यासाठी काय उपाययोजना चालू आहेत यावरही त्यांनी भाष्य केलं.
ते म्हणाले होते, "12 जुलैपर्यंत आठ दिवसांच्या कालावधीत हरणांच्या मृत्यूच्या घटना घडल्या. त्यानंतर एकही हरिण मृत्युमुखी पडलेलं नाही. पुन्हा असं होऊ नये म्हणून, आम्ही सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेत आहोत. जी हरणं उद्यानात आहेत, त्यांच्यावर निरीक्षण ठेवून औषधोपचार केले जात आहेत, जेणेकरून त्यांचा जीव जाऊ नये."
पुढे ते म्हणाले होते, "हरणांचा वावर असलेल्या परिसराचं निर्जंतुकीकरण केलं आहे. जे कर्मचारी हरणांच्या सहवासात असतात, त्यांना खाऊ घालतात, त्यांची देखभाल करतात त्यांना हातमोजे घालायला लावले आहेत."
"शिवाय त्यांना इतर प्राण्यांच्या संपर्कात जायलाही मज्जाव केला आहे. जर हा कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव असेल तर त्यांच्यामार्फत इतर हरणं किंवा प्राणी बाधित होणार नाही याची काळजी सगळे कर्मचारीही घेत आहेत. इतर प्राण्यांवर प्राणीसंग्रहालयातील पशुवैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांद्वारे लक्ष ठेवलं जात आहे." असंही ते म्हणाले.
परंतु, तरीही हरणांचा परिसर इतर प्राण्यांपासून वेगळा ठेवला असल्यानं इतर प्राण्यांना संसर्ग होण्याची शक्यता तशी कमी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं.
विविध पातळ्यांवर होतेय तपासणी
हरणांना दिल्या जाणाऱ्या अन्नातून विषबाधा झाली असेल का, असा संशय व्यक्त केला जात होता.
त्यामुळे त्या अन्नाचे आणि पाण्याचेही नमुने त्यावेळी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, अशी माहिती डॉ. घनश्याम पवार यांनी दिलेली.
प्राणी संग्रहालय प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय केंद्रातील तज्ज्ञांनी तसेच महाराष्ट्र शासनाच्या पशुरोग तज्ज्ञांनी देखील प्राणीसंग्रहालयात जाऊन पाहणी केली होती.
हरणांच्या मृत्यूबाबत विविध पातळ्यांवर तपासणी सुरु होती.
त्यासाठी देशातील विविध प्रयोगशाळांमध्ये मृत हरणांचे जैविक नमुने तपासणीसाठी पाठवले होते.

फोटो स्रोत, Getty Images
मृत प्राण्यांच्या शरीराचे अवयव आणि रक्ताचे नमुने तपासणीसाठी बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेतील नॅशनल रेफरल सेंटर फॉर वाईल्ड लाइफ डीसीज मॉनिटरींग अँड प्रिव्हेन्शन, ओडिशा राज्यातील भुवनेश्वर मधील आयसीएआरचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन फूट अँड माउथ डीसीजमध्ये पाठवले होते.
तसेच, भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऍनिमल डिसीज या प्रयोगशाळेत, पुण्यातील औंध येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, नागपूर येथील गोरेवाडामधील विभागीय वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र अशा सर्व ठिकाणच्या प्रयोगशाळांमध्ये देखील पाठविण्यात आले होते.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर येथील प्रयोगशाळेतून मिळालेला अहवाल आणि राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्राचा अहवाल यांत साम्य आढळलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











