मोदी मंत्रिमंडळ 3.0 मध्ये मंत्रिपद कोणाला? एनडीएच्या घटकपक्षांना सत्तेत नेमका किती वाटा?

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, GETTY IMAGES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात नेमके कोणाला स्थान मिळणार, मित्र पक्षांच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार, भाजपातून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार याकडे सर्वाचंच लक्ष लागलेलं आहे.

नरेंद्र मोदी आज (रविवार) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत.

शपथविधी समारंभच्या आधी एनडीएचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मंत्रिमडळातील सदस्यांची यादी देऊ शकतात.

मंत्र्यांच्या यादीत कोणाचं नाव असेल आणि कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार याबद्दल यासाठी व्यक्त होणाऱ्या अंदाज यांचा ऊत आला आहे.

प्रसार माध्यमांमध्ये एनडीएच्या घटक पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर राजकीय विश्लेषक वेगवेगळ्या पद्धतीनं आघाडी सरकारच्या गरजा आणि नाईलाज यांचं विश्लेषण करत आहेत.

एनडीएच्या बैठकीत घटक पक्ष आणि त्यांच्यातील सहकाऱ्यांना देण्यात आलेल्या महत्त्वावरून सुद्धा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकणाऱ्यांच्या नावाचा अंदाज बांधला जात आहे.

मोदी मंत्रिमंडळ 3.0 मध्ये एनडीएच्या घटक पक्षांतील सहकाऱ्यांना स्थान तर मिळेलच मात्र त्याचबरोबर भाजपातून नवे चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. कारण मागील मंत्रिमंडळातील 20 मंत्र्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

एनडीएच्या घटक पक्षांना किती मंत्रिपदं?

इंडियन एक्सप्रेसनुसार तेलगू देसम पार्टीचे 16 खासदार निवडून आले आहेत. या पक्षाला दोन मंत्रिपदं मिळू शकतात. पवन कल्याण यांच्या जन सेना पक्षाचे दोन खासदार निवडून आले आहेत. त्यांनादेखील एक मंत्रिपद मिळू शकतं.

ज्या नावांची चर्चा होते आहे त्यात श्रीकाकुलम मतदारसंघाचे खासदार राम मोहन नायडू, गुंटुरचे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी आणि चित्तूरचे खासदार डी. प्रसाद राव यांचा समावेश आहे.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, GETTY IMAGES

नीतीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड)च्या तीन खासदारांना देखील केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती (रामविलास) या पक्षाला एक मंत्रिपद मिळू शकतं.

एनडीटीव्हीनुसार जेडीयू चे माजी अध्यक्ष राजीव रंजन सिंह 'लल्लन' आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे विश्वासू संजय झा यांची नाव कॅबिनेट मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

मंत्रिमंडळात उत्तर प्रदेशातील दलित चेहऱ्याला स्थान?

एनडीटीव्हीनं लिहिलं आहे की चार डझन मंत्री शपथ घेऊ शकतात. सूत्रांनुसार भाजपाकडून मित्र पक्षांना सांगण्यात आलं आहे की सध्या दबाव टाकू नये. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. यावर सहमती झाल्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे निश्चित झालं आहे.

एनडीटीव्हीनं लिहिलं आहे की उत्तर प्रदेशात भाजपाला दणका बसला आहे. त्याचं प्रतिबिंब मोदी मंत्रिमंडळात देखील दिसू शकतं.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, GETTY IMAGES

भाजपाला बहुमत मिळाल्यास संविधान आणि आरक्षण संपवलं जाईल अशी प्रतिमा निर्माण करण्यात विरोधी पक्षांना यश आलं होतं. नव्या 'टीम मोदी' कडून या गोष्टीला उत्तर दिलं जाऊ शकतं.

भाजपा या बाबीचा गांभीर्यानं विचार करते आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील दलित चेहऱ्याला मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.

नीतीश आणि चिराग यांना किती वाटा

जनता दल युनायटेडचे 12 खासदार निवडून आले आहेत. तर चिराग यांच्या पक्षाचे पाच खासदार आहेत.

बिहार मध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे बिहार मधील खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.

टाइम्स ऑफ इंडिया नुसार कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनादेखील मंत्रिपद मिळू शकतं. टाइम्स ऑफ इंडियानं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर लिहिलं आहे की गुरुवारी एनडीएच्या बैठकीत यासाठी फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, GETTY IMAGES

घटक पक्षांना प्रत्येक पाच जागांसाठी एक मंत्रिपद दिलं जाणार आहे. मात्र कुमारस्वामी यांच्या जनता दल (सेक्युलर) ला दोनच जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांना एक राज्य मंत्रिपद मिळू शकतं.

मात्र कुमारस्वामी यांचा राजकीय प्रभाव लक्षात घेता त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं. कुमारस्वामी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत.

महाराष्ट्राला किती मंत्रिपदं

इंडियन एक्सप्रेसनुसार मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील मंत्र्यांचादेखील समावेश असेल कारण महाराष्ट्रात याच वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात महायुतीला दणका बसला आहे.

शिवसेनेला (शिंदे) सात जागा मिळाल्या आहेत तर एनसीपी (अजित पवार) ला फक्त एक जागा जिंकता आली आहे. तर भाजपाला नऊ जागा जिंकता आल्या आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं दणदणीत कामगिरी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आपल्या मित्र पक्षांची स्थिती कमकुवत दिसू नये असं भाजपाला वाटतं.

भाजपामधील नेत्यांचा विचार करता, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर, बिप्लव कुमार देव आणि बासवराज बोम्मई यांना मंत्रिपदं मिळू शकतात.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, GETTY IMAGES

राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जेपी नड्डा आणि अश्विनी वैष्णव यांना पुन्हा संधी मिळू सकते.

इंडियन एक्सप्रेसनं सूत्रांच्या आधारे लिहिलं आहे की एनडीएचा विस्तार केला जाऊ शकतो. यासाठी अपक्षांनादेखील संदेश पाठवले जात आहेत. 18 व्या लोकसभेत निवडून गेलेल्या सात अपक्षांपैकी सांगलीचे विशाल पाटील इंडिया आघाडीत सहभागी झाले आहेत.

भाजपाचे नेते वायएसआरसीपी चे खासदार देखील संपर्कात आहेत. पक्षाचे चार खासदार निवडून आले आहेत.

जीतनराम मांझी, जयंत चौधरी आणि अनुप्रिया पटेल

हिंदूस्थानी अवाम मोर्चाचे जीतनराम मांझी, आरएलडीचे जयंत चौधरी आणि अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांना देखील मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

मात्र एनडीएच्या बैठकीत जयंत चौधरी यांना ज्या पद्धतीनं मागे बसवण्यात आलं होतं, त्यावरून पक्षाला राज्य मंत्रिपदापेक्षा अधिक मिळण्याची शक्यता दिसत नाही.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, GETTY IMAGES

जयंत चौधरी यांचा पक्ष निवडणुकीच्या आधीच एनडीएमध्ये सहभागी झाला होता. त्यांच्या पक्षाने उत्तर प्रदेशात दोन जागांवर उमेदवार उभे केले होते आणि दोन्ही जागी त्यांचे उमेदवार निवडून आले. जयंत चौधरी पश्चिम उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांना जाट आणि शेतकरी नेते मानलं जातं.

यावेळेस भाजपाचा जाट चेहरा असणारे केंद्रीय मंत्री संजीव बालियान निवडणूक हारले आहेत. त्यामुळे असं मानण्यात येतं आहे की या समाजाला खूश करण्यासाठी जयंत चौधरी यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं.

शिवराज आणि खट्टर भाजपा अध्यक्षपदाच्या शर्यतीत

भाजपा आणि आरएसएस कडून पक्षाचा अध्यक्ष बदलला जाऊ शकतं असं सांगितलं जातं आहे. सध्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ याच महिन्यात संपतो आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची नावं भाजपा अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचा अंदाज देखील वर्तवला जातो आहे.

या निवडणुकीत भाजपाला 240 जागांवर विजय मिळाला आहे. बहुमतापेक्षा भाजपाला 32 जागा कमी मिळाल्या आहेत. पक्षाला 2019 च्या निवडणुकीत 303 जागांवर विजय मिळाला होता. एनडीएला एकूण 293 जागा मिळाल्या आहेत.

मनोहरलाल खट्टर

फोटो स्रोत, GETTY IMAGES

कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने या निवडणुकीत चांगलं यश मिळवलं आहे. इंडिया आघाडीला 233 जागांवर विजय मिळाला आहे.

कॉंग्रेसला मागील निवडणुकीत 52 जागा मिळाल्या होत्या. मात्र या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षानं 99 जागा जिंकल्या आहेत. इंडिया आघाडीच्या इतर घटक पक्षांमध्ये समाजवादी पार्टी ला 37, टीएमएसी ला 29, डीएमके ला 22, शिवसेनेला (उद्धव ठाकरे) 9, आम आदमी पार्टीला 3 आणि झारखंड मुक्ती मोर्चाला 3 जागा मिळाल्या आहेत.