नवा कर्णधार, नवा संघ आणि दक्षिण आफ्रिकेतच घडला होता इतिहास...

फोटो स्रोत, Getty Images
वर्ष 2007. वेस्ट इंडिजमध्ये आयोजित 50 ओव्हरच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.
जेतेपदाचा दावेदार असलेल्या भारतीय संघाला श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्ध पराभवामुळे घरी जाण्याची वेळ ओढवली.
या पराभवाची तीव्र प्रतिक्रिया देशभरात उमटली. खेळाडूंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. खेळाडूंच्या फोटोला काळं फासण्यात आलं. भारतीय संघाचे प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी राजीनामा दिला. कर्णधार राहुल द्रविडनेही कर्णधारपद सोडलं.
यानंतर भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. चांगली कामगिरी करत भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकली पण एकदिवसीय मालिकेत त्यांचा निसटता पराभव झाला. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली दक्षिण आफ्रिकेत दाखल झाले होते.
युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी राहुल द्रविडने ट्वेन्टी20 वर्ल्डकपमधून माघार घेतली होती. द्रविडने सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या अनुभवी खेळाडूंनाही तसंच करण्याचं आवाहन केलं.
तेंडुलकर आणि गांगुली यांनी द्रविडचं म्हणणं ऐकत पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाने या प्रकारात केवळ एकच सामना खेळला होता.
अनुभवी खेळाडू संघात नसल्याने निवडसमितीने विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंग धोनीकडे भारतीय संघाची धुरा सोपवली.
धोनीच्या नेतृत्वाखालील संघात हरभजन सिंग आणि युवराज सिंगसारखे अनुभवी खेळाडू होते पण तरीही धोनीच्या नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवण्यात आला. 2007 मध्ये ट्वेन्टी20 हा प्रकार नव्याने उदयास येत होता. त्यामुळे पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सगळ्याच संघांसाठी नवं आव्हान होतं.
50 ओव्हरच्या वर्ल्डकप स्पर्धेत दबदबा राखणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिलं जात होतं.
घरच्या मैदानावर खेळणार असल्यामुळे एरव्ही चोकर्स अशी हेटाळणी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेकडून मोठ्या अपेक्षा होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
उत्तम गोलंदाजी चमू आणि आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंमुळे पाकिस्तानकडेही आशेने पाहिलं जात होतं. भारतीय संघ मात्र त्यादृष्टीने चर्चेत नव्हता.
अनुभवी खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे फलंदाजी कमकुवत झाली असा होरा होता. त्याचवर्षी काही महिन्यांआधी वर्ल्डकप स्पर्धेतच दारुण पराभव झाल्यामुळे भारतीय संघाचं पारडं कमी मापलं जात होतं. त्यातच भारतीय संघाचा नायकही नवीन होता.
खेळाडू म्हणून धोनीने तोवर आपली छाप उमटवली होती पण कर्णधार म्हणून त्याची ही पहिलीच मोहीम असणार होती आणि तीही थेट वर्ल्डकप.
वर्ल्डकप सुरु झाला. भारताची पहिली लढत लिंबूटिंब स्कॉटलंडशी होती. हमखास विजयाची खात्री अशी ही लढत पावसामुळे रद्द झाली. सुरुवातच अशी विचित्र झाली. दुसरी लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होती.
भारताने रॉबिन उथप्पाच्या अर्धशतकाच्या बळावर 141 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानचा संघ नियमितपणे विकेट गमावत होता. पण मिसबाह उल हक नेटाने लढत राहिला. त्याने 53 धावांची खेळी केली.
पाकिस्तानने आटोकाट प्रयत्न केले पण सामना टाय झाला. तत्कालीन स्पर्धेच्या नियमानुसार सामन्याचा निकाल बोलआऊटने होणार असल्याचं स्पष्ट झालं. लगोरीसदृश प्रकारात भारतीय संघाने सनसनाटी विजय मिळवला.
धोनीने वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी या बोलआऊटचा म्हणजे बॉलरने बॅट्समनविना स्टंप्स उडवण्याचा सराव करुन घेतला होता. त्याचं फळ मिळालं.

फोटो स्रोत, Getty Images
न्यूझीलंडने 190 धावांचा डोंगरच उभारला. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी पुरेपूर प्रयत्न केले पण भारतीय संघाला 10 धावा कमी पडल्या. इंग्लंडविरुद्ध गौतम गंभीर-वीरेंद्र सेहवाग जोडीने 136 धावांची खणखणीत सलामी दिली. हे दोघे बाद होताच थोडी घसरण झाली पण त्यानंतर जे घडलं ते अकल्पित होतं.
शैलीदार डावखुरा फलंदाज युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात 6 चेंडूत 6 षटकार लगावत विक्रम रचला. युवराजने 16 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांसह 58 धावांची खेळी केली. ट्वेन्टी20 प्रकारातल्या सार्वकालीन महान खेळींमध्ये या खेळीची नोंद आहे.
भारतीय संघाने 218 धावा केल्या. इंग्लंडनेही जोरदार आक्रमण केलं पण भारतीय संघाने 18 धावांनी निसटता विजय मिळवला.
यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा कस लागला. 61/4 अशी स्थितीतून युवा रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीने भारताला बाहेर काढलं. रोहितने नाबाद 50 तर धोनीने 45 धावा केल्या. भारताने 153 धावांची मजल मारली.
रुद्रप्रताप सिंगच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघाने गुडघे टेकले. त्यांना 116 धावाच करता आल्या. श्रीसंत, हरभजन सिंगने त्याला चांगली साथ दिली

फोटो स्रोत, Getty Images
या विजयासह भारतीय संघाने सेमी फायनल गाठली. पण तिथे ऑस्ट्रेलियाच्या संघाचा अडथळा होता. वर्ल्डकप स्पर्धेत सातत्याने दमदार खेळासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ प्रसिद्ध होता.
भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या उडवल्या. युवराज सिंगने 70 तर रॉबिन उथप्पाने 34 तर धोनीने 36 धावांची खेळी करत त्याला साथ दिली. भारताने 189 धावांचं लक्ष्य ठेवलं.
मॅथ्यू हेडनने फटकेबाजी करत चांगली सुरुवात करुन दिली पण दुसऱ्या बाजूने त्यांनी सातत्याने विकेट्स गमावल्या. हेडन बाद झाल्यावर अँड्यू सायमंड्सवर ऑस्ट्रेलियाच्या आशा केंद्रित झाल्या. इरफान पठाणने त्याला बाद करत खिंडार पाडलं.
भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला नमवत भारताने फायनलमध्ये धडक मारली.
फायनलमध्ये पुन्हा एकदा भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान होतं. जोहान्सबर्गच्या चाहत्यांनी पुरेपूर भरलेल्या वाँडरर्स मैदानावर भारतीय संघाने 157 धावा केल्या. गौतम गंभीरने 8 चौकार आणि 2 षटकारांसह 54 चेंडूत 75 धावांची खेळी केली.
रोहित शर्माने 16 चेंडूत 30 धावांची वेगवान खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्ताननेही धावगती राखली पण त्यांच्या विकेट्स पडत गेल्या.
प्राथमिक फेरीप्रमाणे या सामन्यातही मिसबाहने सगळी जबाबदारी खांद्यावर घेतली. मिसबाह सामना फिरवणार असं चित्र होतं.
शेवटच्या षटकात 13 धावांची आवश्यकता होती. शेवटची जोडी मैदानात होती. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पटावर दाखल झालेल्या जोगिंदर शर्माला गोलंदाजी देण्याचा धाडसी निर्णय धोनीने घेतला.
पहिला चेंडू वाईड गेला. पुन्हा टाकलं गेलेल्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही. दुसऱ्या चेंडूवर मिसबाहने षटकार लगावताच भारतीय चाहत्यांवरचं दडपण वाढलं.
लक्ष्य केवळ सहा धावांवर आलेलं. मिसबाह स्ट्राईकवर. पारडं पाकिस्तानच्या बाजूने झुकलं होतं.
तिसऱ्या चेंडूवर अक्रॉस जाऊन षटकार लगावण्याचा मिसबाहचा प्रयत्न शॉर्ट फाईनलेगच्या दिशेने उंचावला. चेंडूखाली श्रीसंत होता. चेंडू खाली येत येत त्याच्या हातात जाऊन विसावला आणि भारतीय चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

फोटो स्रोत, Getty Images
हिरो होऊ पाहणारा मिसबाह खलनायक झाला आणि महेंद्रसिंग धोनी नवा नायक म्हणून प्रस्थापित झाला. रांचीचा हा शिलेदार अख्ख्या देशाची शान होऊन गेला. काही महिन्यांपूर्वी धोनीला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं होतं. तोच धोनी आता समस्त भारतवासीयांचा लाडका झाला.
धोनीने जेतेपदाचा करंडक उंचावला आणि भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाची जणू नांदीच झाली. तेंडुलकर-द्रविड-गांगुली यांचा वारसा सांभाळणारा नवनायक शिलेदार म्हणून धोनीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं. त्या क्षणापासून जवळपास दशकभर भारतीय संघाची धुरा धोनीकडेच राहिली.
क्रिकेटविश्वातल्या सार्वकालीन यशस्वी कर्णधारांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. तुफान फटकेबाजी करणाऱ्या धोनीच्या नावामागे फिनिशर धोनी हे बिरुदही लागलं.
विरोध सरला आणि आयपीएलला दारं खुली झाली
बीसीसीआयचे प्रशासक ललित मोदी यांनी 2000दशकाच्या सुरुवातीला ट्वेन्टी20 लीगची कल्पना मांडली होती. पण या कल्पनेला मूर्त स्वरुप लाभलं नाही.
पहिल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकपपूर्वी बीसीसीआय या फॉरमॅटसाठी फारसं उत्सुक नव्हतं. त्यातच झी समूहाने आयसीएल नावाची लीग सुरु केली. जगभरातले तसंच भारतातले अनेक खेळाडू या लीगमध्ये सहभागी झाले.
बीसीसीआयच्या परवानगी विना ही लीग सुरु झाली. त्यामुळे बीसीसीआयने या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर बंदी घातली.
भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकताच बीसीसीआयला या फॉरमटचं भविष्य जाणवलं. शरद पवारांच्या नेतृत्वातील बीसीसीआयने ललित मोदींकडे लीगला मूर्त स्वरुप देण्याची जबाबदारी दिली. वर्षभरातच आयपीएलचा डंका पिटला गेला.
संघ आणि खेळाडूंचा लिलाव यातून कोटीच्या कोटी उड्डाणं झाली. आयपीएलने क्रिकेटचे सगळेच आयाम बदलून टाकले. एप्रिल-मे हे आयपीएलचे महिने म्हणून निश्चित झाले. जगातले सगळे क्रिकेटपटू दोन महिने भारतात डेरेदाखल होऊ लागले.
देशासाठी खेळताना एकमेकांविरुद्ध उभे ठाकणारे भिडू एकमेकांचे मित्र होऊन खेळू लागले. विविध संस्कृतीचं अनोखं मिश्रण या स्पर्धेनिमित्ताने पाहायला मिळालं. आयपीएल हा आयसीसीच्या कॅलेंडरचाच अलिखितपणे भाग झालं.
ट्वेन्टी20 प्रकाराला भारताने आपलंसं केलं. भारतीय संघ नियमितपणे ट्वेन्टी20 खेळू लागला. दुर्देवाने धोनीने जेतेपदाचा करंडक उंचावल्यानंतर पुन्हा कोणत्याही भारतीय कर्णधाराला हा करंडक पटकावता आला नाही.
नवी पहाट

फोटो स्रोत, Getty Images
16 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेतच U19 वर्ल्डकपच्या निमित्ताने महासंग्राम भरला आहे. मुलींसाठी U19 प्रकारातला हा पहिलाच वर्ल्डकप आहे. मिताली राज, झूलन गोस्वामी यांनी प्रदीर्घ काळ चालवलेला वारसा हरमनप्रीत कौर, स्मृती मन्धाना यांच्याकडून शफाली वर्माकडे आला आहे.
सीनिअर संघाकडून खेळणारी शफाली या संघाची कर्णधार आहे. सर्वाधिक अनुभव तिच्याकडे आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या गुणी मुली तिच्या ताफ्यात आहेत. यांच्या जोडीने सपोर्ट स्टाफची फौज अथक मेहनत करत आहे.
भारतीय महिलांना विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. शफाली आणि तिच्या फौजेला पहिल्याच U19 वर्ल्डकपवर नाव कोरण्याची सुवर्णसंधी आहे.
काही महिन्यांपूर्वी वूमन्स आयपीएलसाठी Viacom18 कंपनीने वूमन्स आयपीएलसाठीचे टेलिकास्ट राईट्स विकत विकले. अवघ्या काही दिवसांपूर्वी वूमन्स आयपीएलचे 5 संघ पक्के झाले. अहमदाबाद, लखनौ, मुंबई, दिल्ली, बंगळुरु अशा पाच शहरांचे संघ असणार आणि एकूण मूल्यांकन 4700 कोटी रुपये एवढं आहे.
येत्या काही दिवसात महिलांचा ट्वेन्टी20 वर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेतच होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शफाली आणि सेनेकडे इतिहास रचण्याची संधी आहे. धोनीप्रमाणे ट्रेंडसेटर होण्याची संधी शफालीकडे आहे. बिनधास्त खेळासाठी ओळखली जाणारी शफाली नव्या भारताची नायिका होऊ शकते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








