वर्ल्ड कप IND vs AUS : राहुल, विराटच्या झुंजार खेळी; भारतानं ऑस्ट्रेलियाला असं हरवलं...

फोटो स्रोत, Getty Images
केएल राहुल आणि विराट कोहलीच्या भक्कम खेळींच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सनी हरवून आयसीसी वन डे विश्वचषकात विजयी सलामी दिली आहे.
चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर भारतासमोर विजयासाठी 200 धावांचं लक्ष्य होतं. इशान किशन, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर हे तीन फलंदाज खातंही न उघडता माघारी परतल्यामुळे भारताची अवस्था 3 बाद 2 रन्स अशी बिकट झाली होती.
मग विराट कोहली आणि राहुलच्या खेळींनी भारताचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी रचली आणि भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. मग विराट बाद झाल्यावर राहुलनं हार्दिकच्या सहाय्यानं भारताला विजय मिळवून दिला.
राहुलला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
राहुल आणि विराटनं वाचवलं!
खरंतर जॉश हेझलवूडच्या बॉलिंगवर विराट कोहलीला जीवदान मिळालं. मिच मार्शनं त्याचा झेल सोडला तेव्हा विराट 12 धावांवर खेळत होता.
या जीवदानानंतर विराट आणि राहुल जोडीनं टीम इंडियाची गाडी रुळावर आणली. दोघांनीही खराब बॉलची वाट पाहणं पसंत केलं.
झॅम्पाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये राहुलनं 3 चौकार लगावले आणि आपले इरादे स्पष्ट केले.

फोटो स्रोत, Getty Images
विराटनं 75 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. वन-डे कारकीर्दीमधील हे त्याचं 67 वं अर्धशतक आहे तर विश्वचषक स्पर्धांमधलं विराटचं हे सातवं अर्धशतक आहे.
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात करो या मरोची स्थिती ओढवली असताना विराटची खेळी टीम इंडियाला दिलासा देणारी ठरली. विराटनं एकूण 116 बॉल्समध्ये 6 चौकारांसह 85 रन्सची खेळी केली.
केएल राहुलनं सर्वाधिक नाबाद 97 धावा केल्या. त्यानं 8 चौकार आणि 2 षटकारही लगावले.
तर हार्दिक पांड्या 11 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूडनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

फोटो स्रोत, Getty Images
राहुलला यावर्षी दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियाच्या बाहेर राहावं लागलं होतं. आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावत त्यानं दमदार पुनरागमन केलं.
त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम अडचणीत सापडलेली असताना त्यानं ही महत्त्वाची खेळी केली.
भारताचे दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद
मिचेल स्टार्कनं पहिल्याच ओव्हरमध्ये इशान किशनला शून्यावर आऊट केलं. शुबमन गिल डेंग्यूनं आजारी असल्यानं इशानला खेळण्याची संधी मिळाली होती, पण त्याला तिचा फायदा उचलता आला नाही.
त्यानंतर जॉश हेझलवूडनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. त्यानं कॅप्टन रोहित शर्माला शून्यावर एलबीडबल्यू आऊट केलं.
हेझलवूडनंच श्रेयस अय्यरलाही शून्यावर बाद केलं.

फोटो स्रोत, Getty Images
वन-डे विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्यांदाच टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर शून्यावर आऊट झाले आहेत. यापूर्वी 1983 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारतीय टीमवर ही वेळ आली होती.
त्यावेळी 17 धावांत भारताचा निम्मा संघ बाद झाला होता. पण कपिल देवनं ऐतिहासिक खेळी करून भारताला सावरलं होतं.
अशा पडल्या ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स
चेपॉकच्या पिचवर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 199 धावांतच थोपवून धरलं.
भारताकडून रविंद्र जाडेजा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं 3 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवनं 2 आणि अश्विनननं 1 विकेट घेत जडेजाला भक्कम साथ दिली. जाडेजा-कुलदीप-अश्विन या फिरकी त्रिकुटानं ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या गाठू दिली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
कांगारुंच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलं नाही.
स्टीव्ह स्मिथनं सर्वाधिक 46 धावा केल्या. मिचेल स्टार्कनं शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत 200 धावांचा टप्पा ओलांडण्याचा प्रयत्न केला पण त्याचे प्रयत्न अपुरे ठरले.

फोटो स्रोत, Getty Images
या सामन्यात जसप्रीत बुमरानं मिचेल मार्शला शून्यावर बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं होतं. विराट कोहलीनं स्लिपमध्ये मार्शचा अप्रतिम झेल घेतला.
पण वॉर्नर आणि स्मिथनं अर्धशतकी भागीदारी रचून कांगारूंचा डाव सावरला. दोघांनी परिस्थितीशी जुळवून घेत खेळ केला.
ही जोडी डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच कुलदीपनं वॉ वॉर्नरला 41 रन्सवर माघारी धाडत भारताला दुसरा ब्रेकथ्रू मिळवून दिला.

फोटो स्रोत, Getty Images
स्मिथ मोठी खेळी करण्यासााठी सेट झाल्यासारखा दिसत होता. पण रवींद्र जाडेजानं त्याला 46 धावांवरच माघारी धाडलं. जाडेजाच्या फिरकीवर स्मिथ पूर्णपणे फसला आणि बोल्ड झाला.
चेन्नईच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याचा भरपूर अनुभव असलेल्या रवींद्र जाडेजानं ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला तीन धक्के दिले.
त्यानंतर जाडेजानं डावातल्या तिसाव्या षटकात मार्नस लबुशेनला 27 धावांवर विकेटकीपर के एल राहुलकरवी झेलबाद केलं. मग अॅलेक्स कॅरीलाही शून्यावर एलबीडबल्यू आऊट केलं.

फोटो स्रोत, Getty Images
आर अश्विननं घरच्या मैदानात खेळताना कॅमेरून ग्रीनला माघारी धाडलं. कॅमेरून 8 धावांवर असताना हार्दिकनं त्याचा कॅच टिपला.
मग कुलदीप यादवनं ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला आहे, त्यानं धोकायदक ग्लेन मॅक्सवेलची त्यानं दांडी उडवली. मॅक्सवेल 15 धावा काढून बाद झाला.
जसप्रीत बुमरानं कर्णधार पॅट कमिन्सला अवघ्या 15 रन्समध्ये माघारी धाडून ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का दिला आहे. बुमराच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरनं कमिन्सचा कॅच टिपला.
तर हार्दिक पंड्यानं अॅडम झाम्पाला बाद केलं. शेवटी सिराजनं मिचेल स्टार्कला बाद केलं आणि ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला.
मॅचदरम्यान मैदानात घुसला 'जार्वो'
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न करत असलेल्या भारतीय फिल्डर्सना मैदानावर आणखी एका इसमाला रोखावं लागलं.
सामना सुरू झाल्यानंतर काही वेळातच स्वतःला क्रिकेट फॅन म्हणवणारा 'जार्वो' मैदानात घुसला.
जार्वोचं खरं नाव आहे डॅनियल जार्विस. तो इंग्लंडचा असल्याचं सांगितलं जातं. टीम इंडियाची जर्सी घालून तो मैदानात आला होता.

फोटो स्रोत, Reuters
विराट कोहलीनं जार्वोला थांबवलं आणि त्याला परत जाण्याचा सल्ला दिला. केएल राहुलही जार्वोला मैदानातून बाहेर जा म्हणून सांगताना दिसतानाचे फोटो प्रसारित झाले आहेत.
जार्वो टीम इंडियाची जर्सी घालून मैदानात घुसला होता. अखेर सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.
क्रिकेट सामन्याच्या दरम्यान मैदानात घुसखोरी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला जार्वो फॅन्ससाठी नवा नाही. त्यानं यापूर्वी देखील अनेकदा मैदानात घुसखोरी केलीय.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 2021 मध्ये ओव्हलवर झालेल्या कसोटी सामन्यात जार्वो मैदानात घुसला होता. त्यावेळी त्यानं इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोला धक्का दिला होता.
त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, इथे वाचा.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्यात जार्वोनं मैदानात घुसखोरी केल्यानं क्रिकेट फॅन्सनी नाराजी व्यक्त केली.
‘सामान्य चाहत्यांना तिकीट मिळणं अवघड आहे. त्यावेळी जार्वोला मैदानात प्रवेश कसा मिळाला?’ असा प्रश्न विचारत फॅन्सनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.

फोटो स्रोत, Getty Images
या मॅचमध्ये झाले हे रेकॉर्ड
- वन-डे विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्यांदाच टीम इंडियाचेदोन्ही सलामीवीर शून्यावर आऊट झाले. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचे टॉप चार पैकी तीन फलंदाज शून्यावर आऊट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- वन-डे विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात वेगवान 50 विकेट्स घेण्याचा विक्रम मिचेल स्टार्कनं केलाय. त्यानं 19 सामन्यात हा विक्रम केलाय.
- डेव्हिड वॉर्नरनं वन-डे विश्वचषकात सर्वात कमी सामन्यात 1000 धावा पूर्ण केल्या. वॉर्नरनं 19 सामन्यांमध्ये हा विक्रम केला.

फोटो स्रोत, Getty Images
वन डे विश्वचषकात सर्वात जलद 1000 धावा करणारे फंलदाज
डेव्हिड वॉर्नर - 19
सचिन तेंडुलकर- 20 पारी
एबी डिविलियर्स- 20 पारी
विवियन रिचर्ड्स- 21 पारी
सौरव गांगुली- 21 पारी
*रोहित शर्मानं 18 वर्ल्ड कप मॅचेसमध्ये 978 धावा केल्या आहेत. त्यामुळे रोहितकडे वॉर्नरचा विक्रम मोडण्याची संधी होती. पण तो शून्यावरच माघारी परतला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








