ऑनलाईन पेमेंटमुळे कसे होतात अनावश्यक खर्च? तज्ज्ञांनी सांगितलेला '24 ते 48 तासांचा नियम' समजून घ्या

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अजित गढवी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतात यूपीआय पेमेंटचा नुसता विस्तारच झालेला नाही तर ते लोकप्रियदेखील झालं आहे. कारण यूपीआयनं पेमेंट करणं सोयीचं झालं आहे. अगदी चहासाठी 10 -15 रुपये देण्यापासून ते मुलांच्या शाळेच्या लाखो रुपयांच्या फीपर्यंत असंख्य गोष्टींचं पेमेंट मोबाईल फोनवरून यूपीआयद्वारे केलं जातं.
आता लोक पैसे काढण्यासाठी वारंवार एटीएमवर जात नाहीत. त्यामुळे एटीएमची संख्या कमी होते आहे.
यूपीआयद्वारे पेमेंट करण्याची सुविधा अत्यंत जलद आणि सोपी झाली आहे. मात्र रोख रकमेऐवजी पेमेंट करण्यासाठी यूपीआयचा वापर केल्यामुळे तुमच्या अनावश्यक खर्चात वाढ झाली आहे का?
'फायनान्शियल लीकेज' म्हणजे नकळत होणाऱ्या आर्थिक खर्चात भर पडतीये का? तुम्ही छोट्या खर्चांकडे दुर्लक्ष करत आहात का आणि दर महिन्याला तुमचा मोठा खर्च होतो आहे का?
यूपीआयद्वारे पेमेंट करण्याच्या सुविधेमुळे ग्राहकांना अस्वस्थ वाटत आहे का आणि जर तसं असेल, तर खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करता येईल? हे जाणून घेण्यासंदर्भात बीबीसीनं आर्थिक तज्ज्ञांशी संवाद साधला.
नोटांशी असलेलं भावनिक नातं
विनोद फोगला सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत. ते म्हणतात, "यूपीआयमुळे निश्चितच लोकांच्या पैसे खर्च करण्याच्या वर्तनात बदल झाला आहे. ते अनावश्यक खर्च करत असल्याचं दिसून येतं. यामागचं कारण म्हणजे लोक नोटांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असतात."
"त्यामुळे जेव्हा तुम्ही रोखीनं म्हणजे नोटा देऊन खर्च करता, तेव्हा त्याकडे नीट लक्ष देता. मात्र जेव्हा तुम्ही मोबाईलवरून यूपीआयद्वारे पेमेंट करता, तेव्हा त्याकडे तुम्ही तितकंस लक्ष देत नाहीत."
तुम्ही जेव्हा ऑनलाइन पेमेंट करता, तेव्हा तुमच्या बँक खात्यातून किंवा डिजिटल वॉलेटमधून पैसे कापले जातात. त्यामुळे साहजिकच तुम्ही हातानं नोटा दिलेल्या नसतात आणि परिणामी त्याकडे जास्त लक्ष दिलं जात नाही.
विनोद फोगला पुढे म्हणतात, "यूपीआयची सुविधा डोळ्यासमोर ठेवून, अनेक ब्रँड मार्केटिंगच्या अशा पद्धती तयार करत आहेत की लोकांना त्यांच्यावर खर्चावर नियंत्रण ठेवता येत नाही."
"उदाहरणार्थ- अनेक ठिकाणी ऑफर्स असतात की तीन शर्ट खरेदी करा आणि त्यावर तीन शर्ट मोफत मिळवा. जर तुम्ही कपडे रोख रक्कम देऊन म्हणजे नोटा देऊन खरेदी करायला गेलात तर तुम्ही मर्यादित खर्च कराल. मात्र मोबाईलवरून यूपीआयचा वापर करून अनावश्यक खर्च केला जाऊ शकतो."

फोटो स्रोत, Getty Images
फायनान्शियल गोल प्लॅनर (आर्थिक उद्दिष्टांचं नियोजन करणारे) प्रियांक ठक्कर देखील या मुद्द्याशी सहमत आहेत.
बीबीसीशी बोलताना ठक्कर म्हणाले, "500 रुपयांची नोट देताना तुम्ही काही सेंकद तरी विचार करता. मात्र क्यूआर कोड स्कॅन करून यूपीआयनं पैसे देताना कोणीही तितका विचार करत नाही."
ते पुढे म्हणाले, "पेटीएम, गुगल पे, फोनपे यासारख्या डिजिटल पेमेंट ॲपमुळे ऑनलाईन पेमेंट करणं खूप सोपं झालं आहे. आता चहा, दूधापासून ते मोठाल्या खरेदीपर्यंत सर्व गोष्टींसाठी क्यूआर कोड स्कॅन करून यूपीआयद्वारे पेमेंट केलं जातं. मात्र यामुळे लोकांच्या नियोजनात नसलेल्या खर्चात वाढ झाली आहे."
ठक्कर म्हणतात, "जेव्हा तुम्ही तुमच्या पाकिटातून नोट काढून एखाद्याला देता, तेव्हा तुमच्या खिशातून पैसे गेल्याची जाणीव तुम्हाला होते. मात्र जेव्हा तुम्ही मोबाईलचा वापर करून क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करता, तेव्हा तुम्हाला तसं काही वाटत नाही."
"त्यामुळेच 50-100 रुपयांच्या छोट्या खर्चाचा तुम्ही विचार करत नाही. मात्र असे छोटे खर्च वाढून, महिनाअखेरीस एकूण खर्च मात्र वाढलेला असतो."
ठक्कर म्हणाले, "तुम्ही चहासाठी 20 रुपये, कार पार्किंगसाठी 30 रुपये खर्च करता. एखादी ऑफर असते म्हणून ऑनलाईन काहीतरी खरेदी खरता, इत्यादी. यातून एकप्रकारे तुमच्या खिशाला आर्थिक गळती लागते.
"त्यातून दीर्घ कालावधीत तुमची बरीचशी रक्कम खर्च होते आणि त्याचा तुमच्या बचतीवर परिणाम होतो. मात्र हाच सर्व खर्च जर तुम्हाला खिशातील पाकिटातील रोख रक्कम देऊन करावा लागला, तर कदाचित तुम्ही इतका खर्च करणार नाही."
ग्राहकांच्या वर्तनावर होणारे वेगवेगळे परिणाम
वित्तीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात की रोखीनं म्हणजे नोटांद्वारे खर्च करताना आणि ऑनलाईन पेमेंटच्या स्वरूपात खर्च करताना ग्राहकांचं वर्तन वेगवेगळं असू शकतं.
डॉ. आत्मन शाह अहमदाबादमधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
डॉ. शाह म्हणतात, "मानसशास्त्रानुसार जेव्हा ग्राहक रोखीनं म्हणजे नोटा देऊन खर्च करतो, तेव्हा ग्राहकाला त्याच्याकडे किती पैसे शिल्लक आहेत, याची जाणीव असते."
ते पुढे म्हणतात, "जेव्हा तुमच्या खिशात 100 रुपये असतात आणि त्यातील 20 रुपये तुम्ही खर्च करता, तेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव असते की तुमच्याकडे आता 80 रुपयेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तुम्ही सतर्क होता."
"मात्र जेव्हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट करता, तेव्हा पैसे थेट तुमच्या बँक खात्यातून कापले जातात. त्यामुळे त्यावेळेस असा विचार तुमच्या मनात येत नाही. त्यातूनच छोट्या-छोट्या खर्चांमध्ये वाढ होते."

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. शाह म्हणाले, "काही संशोधनानुसार, जे लोक डिजिटल पेमेंटचा वापर करून खर्च करतात, ते रोखीनं म्हणजे नोटा देऊन खर्च करणाऱ्यांपेक्षा जवळपास 40 ते 45 टक्के अधिक खर्च करतात. डिजिटल पेमेंट करताना पैसे खर्च झाल्याची किंवा गमावल्याची भावना म्हणजे खर्चाची वेदना कमी असते."
"त्यामुळेच डिजिटल पेमेंट करताना अधिक खर्च करण्यास कोणताही मानसिक अडथळा येत नाही. त्याशिवाय ऑटो-पेमेंट आणि सबस्क्रिप्शन सारख्या सुविधांमुळे दीर्घकालीन खर्चाच्या सवयींना चालना मिळते. कॅशबॅक आणि लॉयल्टी रिवॉर्ड्ससारखी वैशिष्ट्यं पुन्हा खरेदी करण्यास, अधिक खरेदी करण्यास प्रोत्साहन देतात."
प्रत्येक खर्चाची नोंद ठेवा
जर यूपीआयचा वापर करून जास्तीचा खर्च होत असेल, तर अशा खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही गोष्टींचा सल्ला दिला जातो.
फायनान्शियल गोल प्लॅनर प्रियांक ठक्कर म्हणतात, "तुमच्या खर्चाचा मागोवा ठेवण्यासाठी किंवा त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वात आधी दर आठवड्याला तुमचं बँक स्टेटमेंट आणि मोबाईल वॉलेट स्टेटमेंट तपासा. तुमच्या खर्चाची विभागणी तीन प्रकारांमध्ये करा. पहिला आवश्यक खर्च, दुसरा जीवनशैलीशी निगडीत खर्च आणि तिसरा आनुषंगिक खर्च."
"तुमच्या राहणीमानाशी किंवा रोजच्या जगण्यातील खर्चाला आवश्यक खर्च मानतात. तर विशिष्ट सुविधांसाठी केला जाणारा खर्च जीवनशैलीशी निगडीत खर्चाच्या श्रेणीत येतो. फक्त भावनिक खर्च आनुषंगिक खर्चाच्या प्रकारात मोडतो. महिन्याच्या शेवटी, तुम्ही कोणते खर्च टाळू शकला असता, ते पाहा."

फोटो स्रोत, Getty Images
सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर विनोद फोगला सांगतात, "अगदी तुम्ही एखाद्याला 500 रुपये उसनवार दिले, तर तेदेखील लिहून ठेवा. दररोज तुम्ही जो खर्च करता, पेमेंट करता, त्याची नोंद ठेवा. अगदी 5-10 रुपयांच्या अतिशय किरकोळ खर्चाचीही नोंद ठेवा."
"कारण जेव्हा तुम्ही मोबाईलवरून यूपीआयद्वारे पेमेंट करता, तेव्हा अनेक छोटे खर्च होतात आणि त्यांची बेरीज केल्यावर ती मोठी रक्कम होते."
याव्यतिरिक्त, विनोद फोगला सल्ला देतात की, "मोबाईलमधून यूपीआय पेमेंट करताना लोक उत्साहाच्या भरात खरेदी करत आहेत. असा खर्च थांबवण्यासाठी एक '24 ते 48 तासांचा नियम' बनवा."
"समजा, तुम्हाला एखाद्या गोष्टीची खरेदी करावीशी वाटत असेल, मात्र ती अजिबात आवश्यक नसेल, तर ती विकत घेण्यापूर्वी एक किंवा दोन दिवस वाट पाहा. जर दोन दिवसांनीदेखील तुम्हाला वाटत असेल की ती वस्तू विकत घ्यावी, तरच ती वस्तू विकत घ्या."
ते पुढे म्हणतात, "आगामी काळात, यूपीआयचा वापर वाढतच जाणार आहे. कारण रोख रकमेचा वापर करण्यासाठी कॅश काढण्यासाठी एटीएममध्ये वारंवार जावं लागतं. तसंच रोख रक्कम घरात ठेवावी लागते, पैशांची देवाणघेवाण करावी लागते इत्यादी समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर यूपीआयनं पेमेंट करताना मात्र अशी कोणतीही समस्या येत नाही."
ऑनलाईन पेमेंटमध्ये भारत जगात आघाडीवर
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) म्हणते की जलद ऑनलाईन पेमेंट करण्यात भारत जगात आघाडीवर आहे.
भारतातील जवळपास 85 टक्के डिजिटल पेमेंट्स यूपीआयद्वारे होतात. तर जगभरात 50 टक्के डिजिटल पेमेंट्स यूपीआयचा वापर करून केले जातात. भारतात दररोज सरासरी 64 कोटीहून अधिक यूपीआय ट्रान्झॅक्शन केले जातात.

फोटो स्रोत, Getty Images
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) नुसार, ऑक्टोबर 2025 मध्ये यूपीआय ट्रान्झॅक्शनची संख्या 20.7 अब्जावर पोहोचली. यातून तब्बल 27.28 लाख कोटी रुपयांचं पेमेंट करण्यात आलं. हा एक विक्रम आहे.
सप्टेंबर 2025 शी तुलना करता यात 9.5 टक्क्यांची वाढ झाली. तर गेल्या दोन वर्षांमध्ये यात 16 टक्क्यांची वाढ झाली आहे.
बेजबाबदारपणे खर्च करण्याच्या सवयीला आळा कसा घालाल?
जर तुम्हाला यूपीआय पेमेंटचा वापर करत बेजबाबदार, अनियंत्रित खर्च करण्याची सवय असेल, तर तुमच्या खर्चाला आळा घालण्यासाठी तुम्ही काही पावलं उचलू शकता.
ती पुढीलप्रमाणे,
1. तुमच्या खिशात थोडी रोख रक्कमदेखील ठेवा. जेव्हा तुम्ही रोख पैसे देऊन खर्च कराल आणि इतरांच्या हातात तुमचे पैसे जातील, तेव्हा तुम्ही खर्चाबद्दल सतर्क व्हाल.
2. कोणतीही वस्तू लगेच खरेदी करू नका. जर तुम्हाला एखादी छोटी वस्तू खरेदी करायची इच्छा होत असेल, तर एक मिनिटभर थांबा. असं केल्यास, तुम्ही अनेक गोष्टी विकत घेणं टाळू शकता.
3. जर तुम्हाला काहीतरी महागडी वस्तू खरेदी करावीशी वाटत असेल, तर 24 ते 48 तास वाट पाहा. जर दोन दिवसांनंतरदेखील तुम्हाला ती वस्तू विकत घ्यायची इच्छा होत असेल, तरच ती विकत घ्या.
4. तुमचा होणारा प्रत्येक खर्च मग तो मोठा असो की छोटा, तो एका डायरीत लिहून ठेवा. या खर्चाची विभागणी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये करा. या खर्चाच्या नोंदीमधून कोणते अनावश्यक खर्च टाळता आले असते, ते पाहा.
5. एक महिना शक्य असेल तर रोखीनं पैसे देण्याचा प्रयत्न करा. मग त्या महिन्यातील खर्चाची तुलना आधीच्या महिन्यातील खर्चाशी करा.
( हा लेख केवळ गुंतवणुकीचे कोणते पर्याय उपलब्ध असतात याची माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञाशी किंवा तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करावी.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











