सोने-चांदी तारण कर्ज किती सुरक्षित? वेळीच परतफेड केली नाही तर दागिन्यांचं काय होतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अजित गढवी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतीयांचं सोन्यासोबत भावनिक नातं आहे. सोन्याकडं गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिलं जातंच, पण त्याचबरोबर आर्थिक अडचणीतला आधारही मानलं जातं. अनेकदा आर्थिक गरजा भागविण्यासाठी सोनं तारण ठेवून कर्ज घेतलं जातं.
सोन्यावर कर्ज घेण्याचं प्रमाण वाढलं असलं तरी, आता चांदीवरही कर्ज घेण्याचा एक पर्याय उपलब्ध झाला आहे.
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीही वेगाने वाढत आहेत. या मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ होत असतानाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेद्वारे चांदीवर कर्ज घेण्यासंबंधीचे नियम बदलण्यात आले आहेत.
सोने आणि चांदी हे दोन्ही धातू आहेत, ज्यांच्या किमती वेगाने वाढत आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने एक अधिसूचना जारी करून चांदीवर कर्ज घेण्यासंदर्भात काही नियम बदलले आहेत.
सोने-चांदीवर कर्ज कसं घ्यायचं, चांदी तारण ठेवून किती कर्ज मिळू शकतं आणि त्यासंबंधी RBI चे नवीन नियम काय आहेत, हे आपण जाणून घेऊया.
चांदी तारण ठेवून कर्ज घेणं सोपं
भारतीय रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक परिपत्रक प्रसिद्ध केले असून चांदीवर कर्ज घेण्याचे नियम बदलले आहेत. हे बदल 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील.
या नियमांनुसार सर्व व्यावसायिक बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका चांदीवर कर्ज देऊ शकतात. त्याचप्रमाणे शहरी आणि ग्रामीण सहकारी बँकाही चांदीवर कर्ज देऊ शकतील.
ही सुविधा NBFCs आणि हाउसिंग फायनान्स कंपन्यांनाही देण्यात आली आहे.
कोणत्या प्रकारच्या सोने-चांदीवर कर्ज मिळणार नाही?
RBI ने स्पष्ट केले आहे की, प्राथमिक (बुलियन) स्वरूपातील सोने किंवा चांदीवर कर्ज मिळणार नाही.
म्हणजे बिस्कीट, इन्गोट्स, उच्चतम शुद्धतेच्या नाण्यांवर कर्जं मिळणार नाहीत. पण ज्वेलरी आणि नाण्यांवर कर्ज मिळू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचप्रमाणे
- गोल्ड /सिल्व्हर ETF किंवा म्युच्युअल फंडांवर कर्ज मिळणार नाही.
- ज्या सोनं किंवा चांदीचे मालकी हक्क शंकास्पद आहेत त्यावर बाबतीत कर्ज मिळणार नाही.
- आधीच बँकेत गहाण ठेवलेल्या सोने/चांदीवर पुन्हा कर्ज मिळणार नाही.
- RBI च्या नियमांनुसार कर्जाची मुदत जास्तीत जास्त 12 महिने असेल.
कर्जासाठी किती दागिने तारण ठेवता येतात?
RBI च्या परिपत्रकानुसार एका कर्जदाराने गहाण ठेवलेल्या दागिन्यांच्या एकूण वजनावर मर्यादा असेल.
- सोन्याच्या दागिन्यांसाठी- जास्तीत जास्त 1 किलो
- चांदीच्या दागिन्यांसाठी- जास्तीत जास्त 10 किलो
नाण्यांसाठी:
- सोन्याची नाणी- जास्तीत जास्त 50 ग्रॅम
- चांदीची नाणी- जास्तीत जास्त 500 ग्रॅम

फोटो स्रोत, Getty Images
किती कर्ज मिळू शकते?
सोनं आणि चांदी तारण ठेवून एखादी व्यक्ती किती कर्ज घेऊ शकते यावरही मर्यादा आहेत. कर्जाची रक्कम ही लोन टू व्हॅल्यू रेशोवर ठरते.
म्हणजे जर तुमच्या दागिन्यांची किंमत ही अडीच लाख ते पाच लाख रुपयांच्या दरम्यान असेल तर तुम्हाला त्या रकमेच्या 80 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते.
जर दागिन्यांची किंमत अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर 85 टक्क्यांपर्यंत रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. आणि दागिन्यांचे मूल्य 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरीही 75 टक्क्यांपर्यंत रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते.
कर्जासाठी सोनं आणि चांदीची किंमत कशी ठरवतात?
सोनं आणि चांदीच्या किमती प्रत्येक दिवशी बदलत असतात. मग अशावेळी कर्जासाठीच्या दागिन्यांची किंमत कशी ठरवली जाते?
RBI ने सांगितलं आहे की, हे मूल्य ठरवताना खालीलपैकी जी किंमत किमान असेल ती निश्चित केली जाईल.
मागील 30 दिवसांची सरासरी क्लोजिंग प्राईस, किंवा IBJA (India Bullion & Jewellery Association) ने जाहीर केलेली आदल्या दिवसाचे अंतिम दर म्हणजे closing price किंवा SEBI ने आदल्या दिवशी जाहीर केलेली closing price यांपैकी जी किंमत कमी असेल त्यानुसार मूल्य ठरवलं जातं.
सोन्या-चांदीवर घेतलेलं कर्ज फेडता आलं नाही तर?
कोणतंही कर्ज हे वेळेत फेडणं आवश्यक असतं. रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार जर कर्जाची रक्कम वेळेत परत केली नाही, तर बँक किंवा कर्ज देणारी वित्तीय संस्था गहाण ठेवलेल्या दागिन्यांचा लिलाव करू शकते.
अर्थात, अशा लिलावाच्या आधी कर्जदाराला आगाऊ नोटीस देणे बंधनकारक आहे.
कर्जदाराचा पत्ता नसेल तर त्यांना सार्वजनिक नोटीस द्यावी लागेल. त्यानंतर एक महिना थांबावं लागेल. त्यानंतरही कर्जदाराशी संपर्क झाला नाही, तर दागिन्यांचा लिलाव करण्यात येईल.

फोटो स्रोत, Getty Images
लिलावाच्या वेळी बँकेने या दागिन्यांचे राखीव मूल्य जाहीर करणं आवश्यक आहे. ही किंमत दागिन्याच्या सध्याच्या किमतीच्या 90% पेक्षा कमी नसावी. जर दोन वेळा लिलाव अपयशी ठरला, तर दागिन्यांची किंमत 85% पर्यंत कमी करता येईल.
कर्ज फेडल्यानंतर दागिने वेळेवर परत देणे बँकेसाठी बंधनकारक आहे. त्यामध्ये जर उशीर झाला तर कर्जदार किंवा वारसाला प्रतिदिन ₹5,000 नुकसानभरपाई द्यावी लागेल.
सोने किंवा चांदीवर कर्ज कधी घ्यावं?
सोनं किंवा चांदी तारण ठेवून कर्ज घेणं हा शेवटचा पर्याय असावा, असं अर्थतज्ज्ञ सांगतात.
मिथुन जठाल हे प्रमाणित आर्थिक सल्लागार आहेत. त्यांनी सांगितलं की, सोनं किंवा चांदी तारण ठेवल्यावर तुम्हाला स्टोअरेज कॉस्टही भरावी लागते. त्यामुळे व्याजदर वाढतात. त्यापेक्षा ETF/म्युच्युअल फंड्स, शेअर्स किंवा इन्शुरन्स पॉलिसीवर कर्ज घेणे अधिक योग्य आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मिथुन जठाल सांगतात की, वेळेवर कर्ज न फेडल्यास दागिन्यांचा लिलावही होऊ शकतो.
कर्जदार आर्थिक अडचणीत आहे असे मानले जाते आणि त्याचा CIBIL score वर परिणाम होतो. व्याजदर 18–23% पर्यंत जाऊ शकतो.
अहमदाबाद इथल्या मनी प्लान्ट फिनमार्ट या संस्थेचे संचालक मेहुल शाह सांगतात की, सोनं किंवा चांदीच्या दागिन्यावर कर्ज घेणं हा आणिबाणीच्या काळातला शेवटचा पर्याय असावा.
हे दागिने पिढ्यान पिढ्या हस्तांतरित केले जात असतात. जर वेळेवर कर्ज फेडता आलं नाही, तर ते तुम्ही कायमचे गमावू शकता.
( हा लेख केवळ गुंतवणुकीचे कोणते पर्याय उपलब्ध असतात याची माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञाशी किंवा तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करावी.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











