बिहार एक्झिट पोलनुसार नवीन सरकार कोण स्थापन करतंय?

नितीश कुमार, तेजस्वी यादव, प्रशांत किशोर

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, बिहार विधानसभा निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी झाले तर पहिल्या टप्प्याचे मतदान 6 नोव्हेंबर रोजी झाले होते. निवडणूक निकाल 14 नोव्हेंबरला जाहीर होतील.

या निवडणुकीत दोन आघाड्यांमध्ये सत्ताधारी एनडीए आणि महागठबंधन यांच्यात महत्त्वाची लढत आहे. तिसरा पक्ष जनसुराज देखील पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरला आहे.

एनडीए आघाडीत पाच पक्षांचा समावेश आहे. 243 जागांची बिहार विधानसभा निवडण्यासाठी भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढवत आहेत.

तर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) 29 जागांवर आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) व हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) प्रत्येकी 6 जागांवर निवडणूक लढवत आहेत.

दुसरीकडे महागठबंधनने जागावाटपाची अधिकृत घोषणा केलेली नाही. महागठबंधनमध्ये राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, सीपीआय (एम-एल), सीपीआय आणि विकासशील इंसान पार्टी (वीआयपी) यांचा समावेश आहे.

आरजेडी 143 जागांवर, काँग्रेस 61 जागांवर, सीपीआयएमएल 20 जागांवर, वीआयपी 13 जागांवर, सीपीआय (एम) 4 आणि सीपीआय 9 जागांवर निवडणूक लढवत आहे.

बिहार निवडणुकीत मतदान संपल्यानंतर वेगवेगळे एक्झिट पोल्स येऊ लागले आहेत, यात बहुतेक एक्झिट पोल्समध्ये एनडीए आघाडीच्या विजयाचे दावे करण्यात आले आहेत.

अनेकदा एक्झिट पोल्स आणि अंतिम निकालांमध्ये फरक दिसून आलेला आहे. त्यामुळे हे अंतिम निकाल नाहीत हे स्पष्ट करणे आवश्यक आहे .

दोन टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानानंतर बिहारमध्ये मतमोजणी 14 नोव्हेंबरला होईल आणि तेव्हाच अंतिम निकाल समोर येतील.

'एक्झिट पोल'मध्ये कुणाचं सरकार?

मॅट्राइज-IANS च्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 147 ते 167 जागा, महागठबंधनाला 70 ते 90 जागा आणि इतरांना 2 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

यात भाजपला 65 ते 73 जागा, जेडीयूला 67 ते 75 जागा, एलजेपी (आर) ला 7 ते 0 जागा, 'हम' पक्षाला 4 ते 5 जागा आणि आरएलएमला 1 ते 2 जागा दिल्या गेल्यात.

महागठबंधनमध्ये राष्ट्रीय जनता दल अर्थात 'राजद'ला 53 ते 58 जागा, काँग्रेसला 10 ते 12 जागा, व्हीआयपीला 1 ते 4 जागा आणि डाव्या पक्षांना 9 ते 14 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 48 टक्के, तर महागठबंधनाला 37 टक्के मते मिळू शकतात.

चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 130 ते 138 जागा, महागठबंधनला 100 ते 108 जागा आणि इतरांना 3 ते 5 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

ग्राफिक्स

दैनिक भास्करच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 145 ते 160 जागा, तर महागठबंधनला 73 ते 91 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 133 ते 159 जागा आणि महागठबंधनाला 75 ते 101 जागा मिळतील असा अंदाज आहे.

पीपल्स इनसाइटच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 133 ते 148 जागा, तर महागठबंधनला 87 ते 102 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 184 ते 209 जागा, महागठबंधनला 32 ते 49 जागा आणि इतर पक्षांना 1 ते 5 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 133 ते 148 जागा, तर महागठबंधनला 87 ते 102 जागा मिळतील.

सध्याची स्थिती काय आणि जिंकण्यासाठी किती जागा हव्यात?

बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीकडे किमान 122 जागा आवश्यक असतील.

सध्या बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आहे, तर 'राजद'चे तेजस्वी यादव हे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बिहारमध्ये विधानसभा निवडणुका 1952 मध्ये सुरू झाल्या. तेव्हापासून 2020 पर्यंत बिहारमध्ये 17 वेळा विधानसभा निवडणुका झाल्या आहेत.

सध्याच्या घडीला बिहार विधानसभेत भाजपचे 80 आमदार, राजदचे 77, जेडीयूचे 45 आणि काँग्रेसचे 19 आमदार आहेत.

तसेच, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) (लिबरेशन) चे 11, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्युलर) चे 4, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे 2, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे 2, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचा एके आणि 2 अपक्ष आमदार आहेत.

गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा?

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका 1952 मध्ये सुरू झाल्या. तेव्हापासून 2020 पर्यंत बिहारमध्ये 17 वेळा विधानसभा निवडणुका झाल्या आहेत.

फेब्रुवारी 2005 मध्ये झालेल्या निवडणुकीत सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यामुळे ऑक्टोबरमध्ये पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या.

यात 2010 मध्ये भाजपला 91 तर जदयूला 115 आणि राजदला फक्त 22 जागा मिळाल्या. 2015 मध्ये परिस्थिती बदलली भाजपला 53 तर जदयूला 71 आणि राजदला 80 जागा मिळाल्या. त्यानंतर 2020 मध्ये भाजप 74 जदयू 43 आणि राजद 75 अशी स्थिती होती.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.