'मुलांवर विश्वासच राहिला नाही, मित्र-भाऊही नको वाटतात', बालपणीच्या लैंगिक शोषणाचा मनावर कसा होतो आघात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, क्रांती यादव
- Role, बीबीसी मराठीसाठी
(सूचना- या लेखातील तपशील तुम्हाला विचलित करू शकतात.)
"एक दिवस शाळेत माझ्या लघवीच्या जागेतून रक्त येत होतं. शरीरावर रॅशेस आल्या होते. पिरियड सुरू झालेत त्यामुळे होतंय, असं मला वाटलं. पण नंतर जाणवलं की, हे काही तरी वेगळं आहे. मग एका दिवशी मांत्रिकानं दिलेलं पाणी प्यायले नाही. तेव्हा समजलं की, तो माझ्या गुप्तांगाला हात लावत होता."
विदर्भातील एका 22 वर्षीय मुलीनं बीबीसीबरोबर बोलताना सांगितलेला हा धक्कादायक अनुभव.
युनिसेफच्या अहवालानुसार 20 वर्षांखालील किमान 12 कोटी मुलींना सुमारे 10 पैकी 1 लैंगिक संबंध ठेवण्यास किंवा इतर लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडले गेले आहे. प्रत्यक्ष आकडा कदाचित खूप जास्त असू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
या पार्श्वभूमीवर बालपणी होणाऱ्या लैंगिक शोषणामुळं होणारे मानसिक परिणाम, तरुणींवरील वैयक्तिक आणि सामाजिक परिणाम, पालकांवरील परिणाम तसंच याबाबत मानसशास्त्रज्ञ काय सांगतात? याचा बीबीसी मराठीनं आढावा घेतला.
'मुलांशी बोलायलाही घाबरते'
सोलापूर जिल्ह्यातली एक 24 वर्षीय मुलगी तिचे धक्कादायक अनुभव सांगत होती.
"मी सहा वर्षाची असेन. माझा चुलत काका अनेक वेळा माझ्या गुप्तांगाला हात लावायचा. माझा एक चुलत भाऊ मला शेजारी झोपायला लावायचा. घाणेरडे स्पर्श करायचा. चुलत मामा खांद्यावर हात टाकून छातीला स्पर्श करायचा. हे सर्व माझ्यासोबत एकापाठोपाठ घडलं.
मला किळस यायची. काय चाललंय ते काहीच समजत नसायचं. कुणी माझ्यासोबत असं केलं, की मी त्यांच्यापासून दूर रहायचे. ते लोक कुठंही दिसले तरी हृदयात धडधड व्हायचं. जसजशी समज वाढत होती, तसं समजायला लागलं की, आपल्यासोबत जे घडलं ते घाणेरडं आहे.
मला लहानपणी कुणी 'गुड टच, बड टच' सांगितलं असतं, तर हे चुकीचं आहे असं मला समजलं असतं. आजही रात्री अचानक मी दचकून उठते. गर्दीच्या ठिकाणी जाणं मी टाळते. कारण गर्दीत कुणी असा स्पर्श केला तर लहापणापासून झालेलं सर्व पुन्हा आठवतं."

फोटो स्रोत, Getty Images
विदर्भातील 22 वर्षांची एक मुलगी म्हणाली की, "सहावीच्या सुटीत माझ्या शरीरात थोडे बदल दिसायला लागले. घरच्यांना वाटलं मला भूतबाधा झाली. मग माझ्या आईने मला मांत्रिकाकडं नेलं.
मांत्रिकाने सांगितलं की, मला 23 भुतांनी झपाटलं आहे. भूतबाधा काढावी लागेल. त्यामुळं माझी आई मला महिनाभर रोज त्याच्याकडे घेऊन जायची. तो पाण्यामध्ये काही तरी टाकून मला प्यायला द्यायचा.
एक दिवस शाळेत असताना माझ्या गुप्तांगातून रक्त येत होतं. शरीरावर रॅशेस होत्या. मासिक पाळी सुरू झाली असावी असं मला वाटलं. पण नंतर जाणवलं की, काही-तरी वेगळं आहे. नंतर एक दिवस मी मांत्रिकानं दिलेलं पाणी प्यायलेच नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, तो माझ्या गुप्तांगाला हात लावत होता. त्यामुळं तिथं जखम होत होती.
मला त्याचा प्रचंड मानसिक आघात झाला. आज आठ वर्षानंतर मला स्युडोसिझर नावाचा आजार झाला आहे. फिट येतात तसाच हा आजार असतो.
कुठलंही बलात्कार प्रकरण, लैंगिक शोषण याबाबत समजलं वाचलं, पाहीलं की मला ट्रिगर होतं. हातपाय थरथरतात, माझं तोंड एका बाजूला होतं आणि मी पूर्ण बेशुद्ध होते.
सुरुवातीला 5 ते 10 मिनिटं हे असं व्हायचं. पण आता मी दीड ते दोन तास मी बेशुद्ध होते. या सर्वाचा माझ्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर एवढा परिणाम झाला आहे की, मला सांगताही येत नाही."

पुढे ती म्हणाली, "मी तिसरीला होते, तेव्हा शेजारी बांधकाम करणारे कामगार माझ्या गुप्तांगाला हात लावायचे. त्याचदरम्यान शेजारच्या मुलानंही तेच केलं होतं. अशा अनेक प्रकरणांनंतर मी त्या मांत्रिकाबाबत घरी सांगितलं. पण मला कुणीच मदत केली नाही. कारण पुन्हा प्रतिष्ठेचा मुद्दा.
मला आजपर्यंत न्याय मिळाला नाही. आजही तो मांत्रिक मोकाट फिरतोय. आजही मुलींसोबत हेच सर्व करत असणार. अन् मी हॉस्पिटलमध्ये मानसिक आजारावर उपचार घेत आहे. अनेकदा आत्महत्येचा विचार येतो. त्यानं माझं बालपण हिरावून घेतलं."
पुण्याल्या एका 20 वर्षांच्या तरुणीनं म्हटलं, "माझ्यासोबत त्या मुलाने काय केलं? हे आठवायचीही इच्छा नाही. मी त्याला दादा म्हणायची. कधी विचारही केला नव्हता की, तो माझ्याशी असं वागेल.
आता वाटतं की, सख्खा भाऊ सोडला तर कुणी भाऊ होऊ शकत नाही. आता तर माझा मुलांवर विश्वासच राहिला नाही. मुलांपासून दूरच बरं वाटतं. कुणी मित्र, भाऊ नको. सारखं तेच आठवत राहतं आणि त्रास होतो. रडायला येतं, भीती वाटते. विश्वास कुणावर ठेवायचा, हा प्रश्न आयुष्यभर माझ्या सोबत राहील."
पालकांवर होणारा परिणाम
या प्रकारांचा पीडित तरुणींबरोबरच त्यांच्या कुटुंबांवरही खोलवर परिणाम होत असतो. अनेकदा ही कुटुंबं भीतीपोटी काही बोलत नाहीत.
पुण्यातील तरुणीचा भाऊ म्हणाला, "माझ्या बहिणीसोबत जे झालं ते ऐकून अंगावर काटा आला. तो माझा मित्र होता. मी त्याला मोठा भाऊ मानायचो. आता बहीण म्हणते, दादा मी आता कोणत्याच पुरुषावर विश्वास ठेवणार नाही. ती स्वतःलाच दोष देते.
मला वाटतं मारहाण करून मानसिकता बदलत नाही. पण, मुलांनी बलात्कारी असल्याची जाणीव मुलीला करून देऊ नये असं वाटतं. एका पुरुषाच्या वाईट वागण्यामुळे माझी बहीण प्रत्येक पुरुषाविषयी संशयी बनली."

फोटो स्रोत, Getty Images
सोलापूरच्या तरुणीचे पालक म्हणाले की, पाल्याचे लहान वयात लैंगिक शोषण झाल्याचं समजताच पालकांना प्रचंड धक्का बसतो.
जीवापाड जपलेल्या मुलीला एवढ्या भयावह प्रसंगाला, वेदनेला सामोरं जावं लागल्याचं दुःख होतं. मुलीचं रक्षण करता आलं नाही, पालक म्हणून अपयशी ठरलो, याचं शल्य त्यांच्या मनात कायम राहतं. "
त्यातही लैंगिक शोषण झालेल्या मुलांच्या पालकांपेक्षा मुलीचे पालक जास्त तणावात असतात. मुलीचे लग्न होईल का? तिचा संसार नीट होईल का? तिची बदनामी होईल, अशी भीती असते. लैंगिक अत्याचारातून मुलगी गरोदर राहिली तर पालकांच्या त्रासात आणखी भर पडते.

कुटुंबाच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होतो. भावनिक उलथापालथ, चिंता, चिडचिडेपणा, नैराश्य, नवरा-बायकोचे संबंध बिघडणं, सामाजिक कार्यक्रमातील सहभाग कमी होणं, आत्महत्येचे विचार, अत्याचार करणाऱ्याच्या खुनाचे विचार अशा भावना मनात येऊ लागतात.
त्यातही वडिलांपेक्षा आई जास्त तणावात असते. ती मुलांमध्ये भावनिकदृष्ट्या जास्त गुंतलेली असते. स्वतः स्त्री असल्याने शोषणाच्या वेदना तिला कळतात. त्यात लहानपणी तिलाही त्याचा सामना करावा लागला असेल, तर त्याचं गांभीर्य अधिक जाणवतं.
त्यात शोषण करणारी व्यक्ती समोर निवांत जगताना दिसत असेल, तर आपण त्यांच्याविरोधात काही करू शकलो नाही, ही भावना त्यांना खात राहते.
लैंगिक शोषणामागची मानसिकता
याबाबत मानसशास्त्रज्ञ मुग्धा जोशी सांगतात, "शरीर ही आपली अतिशय जवळची गोष्ट असते. शरीराबरोबर कोणीही मनाविरुद्ध काही तर तर त्याचा मनावर परिणाम होतो. शारीरिक शोषणातून झालेली वेदना असेल, तर वारंवार त्याचा त्रास होऊ लागतो.
वय वाढतं तसं नेमकं काय झालं हे कळू लागतं आणि त्याचं गांभीर्यही जाणवतं. त्यामुळं मनात जे काही साचलेलं असतं, ते योग्य मानसिक थेरपी घेऊन मन मोकळं करायला हवं. तसं केलं नाही तर आयुष्यभरासाठी आपण असुरक्षिता आणि भीतीसह जगतो.
अनेकदा 60 वर्षाच्या महिलाही छातीसमोर पर्स धरलेल्या दिसतात. ते नैसर्गिक असलं तरीही असुरक्षिताही त्यातून दिसते. त्यासाठी ती स्वत:ला सुरक्षित करत असते.
"लैंगिक शोषण तीव्र स्वरुपाचं असेल तर समोरच्या व्यक्तीची पारख करण्याबाबत, स्वत: च्या निर्णय क्षमतेवर, कामावर किंवा लग्नानंतर पार्टनरसोबतच्या लैंगिक नातेसंबंधांवर परिणाम होतात. तसचं सर्वच पुरुषांची भीती आणि त्यांच्याबाबत तिरस्कार वाटू लागतो."

डॉ. मुग्धा यांच्या मते, "मुलांना फक्त गुड टच, बॅड टच एवढंच शिकवावं असं नाही. लहान बाळांनाही सुरक्षित अणि असुरक्षित स्पर्श कळतो. अगदी डोळ्यांची भाषाही त्यांना समजते.
पण नकोसा स्पर्श झाल्याचं मुलांना सांगताही यायला हवं. त्यासाठी त्यांना बोलतं करायला हवं. त्यासाठी प्ले थेरपी आहे. त्यात मुलं बोलतात आणि त्यांची भाषा समजून घेतली जाते. अगदी मोठी मुलं-मुलीही नकोशा स्पर्शाबाबत बोलत नाहीत. कारण हे होणारचं, असं गृहीत धरलं जातं."
सांगायला सुरुवात केली की, भीती कमी होऊ लागते. त्यात सर्व स्त्री- पुरुषांबाबत धोका असल्याची भावना कमी होऊ लागते, असंही मुग्धा जोशी म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
मुग्धा जोशी यांनी यात आणखी एका बाजूकडे लक्ष वेधलं.
"शोषण किंवा अत्याचार करणाऱ्याचाही विचार करायला हवा. ती व्यक्तीही आतून खचलेली असू शकते. त्याने चूक मान्य केली किंवा अपराधी भावना असेल तर त्याच्यावरही काही अत्याचार झाला आहे का? हे पाहायला हवं.
अत्याचार करणाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करायला हवं. अनेकदा त्यांच्याच स्पर्शाविषयी खूप गोंधळ असतो. मायेचा स्पर्श मिळालेला नसतो. त्यामुळं त्यांना लैंगिक स्पर्श हवासा वाटतो. त्यामुळं त्यांना कोणत्याही प्रश्नच उत्तर हे स्पर्श आहे असं वाटतं," असं त्या म्हणाल्या.
सध्या सेक्श्युअल कंटेंट खूप उपलब्ध आहे. त्यामुळं लैंगिक शोषणाकडं वळण्याचं प्रमाणही वाढलंय. दुसरी बाब म्हणजे, एखादी 60 वर्षाची व्यक्ती 5 वर्षाच्या मुलीचं-मुलाचं शोषण करत असेल तर, त्याचा एकटेपणा, शरिराने व्यक्ती सोबत असण्याची गरज, लोकांनी समजून घ्यावं अशी भावना अशा बाबी असू शकतात, असंही म्हणतात.
"आपल्याकडे पितृसत्ताक पद्धतीमुळं पुरुषाची गरज पूर्ण झालीच पाहिजे. मग ती कोणतीही असेल. पण, अनेकदा भावनिक गरजांचा विचार होत नाही. डावलण्यात येतात. त्यामुळे पुरुष त्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी शरीराचा माध्यम म्हणून उपयोग करतात.
आपण लैंगिक शोषण केलंय, असा त्यांना पश्चाताप असला तरी, हे आजूबाजूला सर्वच करत आहेत, समाजमान्यच आहे. जरी ते अनैतिक आणि अनैसर्गिक असलं तरी आपलं कोणी काही करत नाही, असं म्हणत करत राहतात."
मुलांवर होणारा परिणाम
बाल लैंगिक शोषणाचा मुलांवर होणाऱ्या परिणामाबाबत डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की, "बाल लैंगिक शोषणाचा मुलांच्या मनावर काही तत्काळ होणारे परिणाम असतात तर काही दीर्घकालीन.
तत्काळ परिणामांमध्ये अनेक वेळा मुलांमध्ये अचानक वागण्यात, बोलण्यात बदल दिसून यायला लागतात. काही वेळा मुलं एकदम शांत, बोलेनाशी होतात. त्यांच्या स्वभावामध्ये बदल होतात."

फोटो स्रोत, Getty Images
"अस्वस्थपणा, चिडचिड, झोप कमी होणे, भूक कमी होणे असे परिणाम दिसतात. प्राथमिक पातळीवर बघायला गेलं, तर नैराश्यात दिसून येणारी सगळी लक्षणं म्हणजे निराशा, अस्वस्थता, स्वतःविषयी अपराधीपणाची भावना जाणवू लागते.
पॅनिक अटॅक आल्यासारखं, छातीत धडधड, अस्वस्थ होणं, मन एका ठिकाणी न लागणं, झोप न येणं, भूक न लागणं अशी सगळी लक्षणं दिसून येतात," अशी माहिती डॉ. दाभोलकरांनी दिली.
पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर
पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डरबाबत डॉ. दाभोलकर म्हणाले की, "नंतर दिसून येणारा आणखी एक महत्त्वाचा मानसिक आजार म्हणजे पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर. यात धक्कादायक प्रसंगाचा मनावर परिणाम होतो. उदाहरण द्यायचं झाल्यास अपघात सिनेमांमध्ये जसे फ्लॅशबॅक बघायला मिळतात, तसे त्या घटनेचे फ्लॅशबॅक मनामध्ये येतात."
"घटनेशी संबंधित थोडी आठवणही आली, त्या ठिकाणी गेलं, तरी ती व्यक्ती दिसली तर फ्लॅशबॅक आल्यासारखं होतं. छातीत धडधड सुरू होते, अस्वस्थ वाटायला लागतं, स्पष्ट विचार करता येत नाही. ज्या जागा, गोष्टी त्या आठवण देतात, त्या टाळण्याकडे त्या व्यक्तीचा कल व्हायला लागतो. हे पोस्ट ट्रॉमेटिक डिसॉर्डरमध्ये दिसून येतं," असं दाभोलकर म्हणाले.
शाळेमध्ये घटना घडली असेल तर पीडित मूल शाळेमध्ये किंवा पाळणाघरात जाणं टाळायला लागतं. नातेवाईकांच्या घरी असं झालं असेल, तर त्यांना टाळायला लागतात. अशा स्वरूपाची काही लक्षणं सुरुवातीच्या कालखंडामध्ये मुलांमध्ये दिसून येतात," असंही त्यांनी सांगितलं.
सर्वेक्षण अहवाल काय सांगतो?
युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (युनिसेफ) आंतरराष्ट्रीय बालकांच्या विरोधातील हिंसाचाराचे वर्गीकरण, न्यूयॉर्क 2023 सर्वेक्षण अहवालनुसार जगातील 560 दशलक्ष ( 5 पैकी 1) लहान मुली आणि महिलांना आजच्या काळात लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
युनिसेफ अहवालानुसार 20 वर्षांखालील किमान 12 कोटी मुलींना सुमारे 10 पैकी 1 लैंगिक संबंध ठेवण्यास किंवा इतर लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडले गेले आहे, प्रत्यक्ष आकडा कदाचित खूप जास्त असेल. जबरदस्ती लैंगिक संबंधाची तक्रार करणाऱ्या सुमारे 90 टक्के किशोरवयीन मुली म्हणतात की त्यांचा पहिला गुन्हेगार त्यांच्या ओळखीचा कोणीतरी होता.
डब्ल्यूएचओने प्रकाशित केलेल्या अंदाजानुसार जगभरातील सुमारे 3 पैकी 1 (30%) महिलांना त्यांच्या आयुष्यात लैंगिक हिंसाचाराला सामोरे जावे लागले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











