'डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी', म्हणत चालीरीतींचे दडपण नाकारणारी मुक्त स्त्री

संत जनाबाई

फोटो स्रोत, Bhaskar Hande

फोटो कॅप्शन, संत जनाबाई
    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

वारकरी संप्रदाय आणि मराठी संस्कृतीच्या वैचारिक घुसळणीच्या अमृतमंथनातून सर्वांत मौल्यवान रत्न कोणतं हाती लागलं असेल तर त्याचं उत्तर अर्थातच संत जनाबाई हेच द्यावे लागेल.

अनेक अडचणींचा डोंगर समोर असून देखील तत्कालीन शूद्र समाजात जन्मलेली, एक घरकाम करणारी महिला मध्ययुगीन भारतीय कालखंडात केवळ संतपदालाच पोहोचली नाही तर तिच्या ओव्या, अभंग आजही आपल्या आयुष्याचा भाग आहेत. यातच संत जनाबाईंचे वेगळेपण आपल्याला दिसून येते.

संत ज्ञानेश्वरांनी जेव्हा संस्कृतच्या बंदिस्त बेडीतून भगवद्गगीता मुक्त केली. त्यानंतर महाराष्ट्रात आत्मोन्नतीचा मार्ग लाखो जनसामान्यांसाठी खुला झाला आणि त्याच मार्गाला पुढे संत नामदेवांनी भागवत धर्माचे, वारकरी संप्रदायाचे रूप देऊन अधिक व्यापक केला.

यातूनच महाराष्ट्रात महिला, दलित, गोरगरीब आणि अल्पसंख्यांक समाजातील लोकांना देखील उन्नतीचा मार्ग खुला झाला. त्याच मार्गावर चालणाऱ्या आणि त्यांच्यानंतर लाखो लोकांना ही प्रेरणा देणाऱ्या संत जनाबाई होत्या.

विठ्ठलाला आपला सखा, बंधू, माय-बाप सारं काही समजणाऱ्या जनाबाईंनी सगुण-निर्गुणातला भेदच मिटवून टाकला आणि खऱ्या अर्थाने अद्वैत तत्त्वज्ञान कुठल्याही दंभाचा अंगीकार न करता जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं.

जनाबाई या विठ्ठलाशी आत्मिक स्तरावर इतक्या एकरूप झालेल्या होत्या की त्यांच्यासाठी विठ्ठल, कृष्ण हेच सत्य होते. त्या अवस्थेत त्या विठ्ठलाशी संवाद साधायच्या, त्याला खाऊ-पिऊ घालायच्या.

इतकंच काय तर, साक्षात जगाचा चालक असलेला विठ्ठल त्यांची सगळी कामे करायचा. त्यांच्यासाठी पाणी भरायचा, दळण दळायचा, त्याहून पुढे जाऊन तो त्यांची वेणी-फणी देखील करायचा, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे.

आज आपल्याजवळ जनाबाईंचे साडेतीनशे अभंग उपलब्ध आहेत. हे अभंग संख्येने जरी कमी असले तरी त्यातून जनाबाईंच्या तत्त्वज्ञानाची बैठक आपल्याला समजते.

हजारो वर्षांपासून जे तत्त्वज्ञान मोठे मोठे प्रकांड पंडित सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, ते तत्त्वज्ञान अगदी काही शब्दांत जनाबाई सहज मांडून जातात. त्यातून त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती मोठा होता, याची आपल्याला कल्पना येऊ शकते.

संत जनाबाईंचे चरित्र, डॉ. सुहासिनी इर्लेकर

फोटो स्रोत, Maharashtra Government

फोटो कॅप्शन, संत जनाबाईंचे चरित्र, डॉ. सुहासिनी इर्लेकर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जनाबाईंसाठी हे तत्त्वज्ञान म्हणजे एखादी बौद्धिक कसरत किंवा शब्दांचे मायाजाळ नव्हते तर त्या प्रत्यक्ष ते जगत होत्या. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला अमृतानुभव त्या रोज चाखत होत्या यातूनच त्या त्यांच्या आधी झालेल्या आणि नंतर होणाऱ्या शेकडो तथाकथित विद्वानांपेक्षा विद्यावान होत्या, हेच आपल्या लक्षात येतं.

मराठवाड्यातील परभणीपासून 45 किमी अंतरावर असलेल्या गंगाखेड येथे दमा आणि कुरुंड या दाम्पत्याच्या पोटी संत जनाबाईंचा जन्म झाला. मराठी विश्वकोशाने जनाबाईंची जन्मतारीख निश्चित नाही, असे म्हटले आहे.

संत नामदेवांचा जन्म 1270चा आणि जनाबाई या संत नामदेवांपेक्षा चार-पाच वर्षं मोठ्या होत्या म्हणजे त्यांचा जन्म अंदाजे 1265-66 चा असावा.

जनाबाईंच्या आई-वडिलांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. दमा आणि कुरुंड हे दाम्पत्य वर्णव्यवस्थेनुसार शूद्र असावे, असा अंदाज अभ्यासक मांडतात. पुढे जनाबाईंनी देखील याचा उल्लेख केल्याचे दिसते.

दमा आणि कुरुंड यांनी दामाशेटी यांच्या पदरात त्यांना टाकले. म्हणजे पुढील आयुष्यात दामाशेटी यांनीच त्यांचा सांभाळ केला. दामाशेटी यांचे पुत्र हे संत नामदेव होते.

संत जनाबाई या संत नामदेवांहून चार-पाच वर्षं मोठ्या होत्या. तेव्हा संत जनाबाईंनी नामदेवांना अंगा-खांद्यावर खेळवले असल्याची शक्यता आहे, असं डॉ. सदानंद मोरे यांनी 'रिंगण'च्या संत जनाबाई विशेषांकात म्हटले आहे.

पुढे संत नामदेवांचा आध्यात्मिक अधिकार पाहून त्या स्वतःला 'नामयाची जनी' किंवा 'नामयाची दासी' असेच म्हणताना दिसतात.

संत जनाबाई यांचे चरित्र

डॉ. सुहासिनी इर्लेकर यांनी जनाबाईंचे चरित्र लिहिले आहे. महाराष्ट्र शासनाने हे प्रकाशित केले आहे. त्यानुसार, गंगाखेड येथील दाम्पत्य दमा आणि कुरुंड यांना मूलबाळ नव्हते.

या दाम्पत्याने विठ्ठलाची आराधना केली. विठ्ठलाने त्यांना दृष्टांत दिला त्यावेळी विठ्ठलाने सांगितले की तुला एक मुलगी होईल. ती खूप सद्गुणी असेल. तिचे नाव जनाबाई असे ठेव.

दामाशेटला ही मुलगी अर्पण कर, असेदेखील विठ्ठलाने सांगितले. या आख्यायिकेनुसार दमा-कुरुंड यांना मुलगी झाली. त्यांनी काही काळानंतर ही मुलगी दामाशेट यांच्याकडे सोपवली. अल्पावधीतच कुरुंड आणि नंतर दमा यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढील आयुष्य जनाबाई या नामदेवांच्याच घरी वाढल्या.

विठ्ठलाला आपला सखा, बंधू, माय-बाप सारं काही समजणाऱ्या जनाबाईंनी सगुण-निर्गुणातला भेदच मिटवून टाकला आणि खऱ्या अर्थाने अद्वैत तत्त्वज्ञान कुठल्याही दंभाचा अंगीकार न करता जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं.
फोटो कॅप्शन, विठ्ठलाला आपला सखा, बंधू, माय-बाप सारं काही समजणाऱ्या जनाबाईंनी सगुण-निर्गुणातला भेदच मिटवून टाकला आणि खऱ्या अर्थाने अद्वैत तत्त्वज्ञान कुठल्याही दंभाचा अंगीकार न करता जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं.

नामदेवांच्या घरी किती जण राहत होते, याबाबतचा अभंग जनाबाईंनी लिहिला आहे. त्या म्हणतात,

नामदेवाचे घरीं । चौदाजण स्मरती हरी ॥1॥

चौघेपुत्र चौघी सुना । नित्य स्मरती नारायणा ॥2॥

आणिक मायबाप पाही । नामदेव राजाबाई ॥3॥

आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी । पंधरावी ती दासी जनी ॥4॥

या श्लोकाप्रमाणे त्या त्यांच्याच कुटुंबातील एक म्हणून राहू लागल्या आणि त्यांच्या घरी जी कामे आहेत त्या करू लागल्या.

दामाशेट यांचे कुटुंब भगवतभक्त होते. या वातावरणात त्यांनाही पांडुरंगाच्या भक्तीचा लळा लागला. अभंग, गवळणी, भजने सातत्याने कानावर पडत असल्यामुळे जनाबाई देखील आपल्या भावना गाण्यातून अभंगातून व्यक्त करू लागल्या. पुढे हेच अभंग अजरामर झाले.

'धरला पंढरीचा चोर' हे गाणे ज्या व्यक्तीने ऐकले नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात सापडणे कठीणच आहे. ही रचना संत जनाबाईंचीच आहे.

'संत जनाबाई आणि ग्रामीण स्त्री'

संत जनाबाई या केवळ कवियित्री किंवा संतच नव्हत्या तर त्यांनी आपल्या अभंगातून स्त्री मुक्तीची संकल्पना देखील मांडली होती. तेव्हा आजच्या काळातील संशोधक त्यांच्याकडे आकर्षित झाले नसते तरच नवल होते.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या 'स्त्री-मुक्तीचा आत्मस्वर' या पुस्तकात जनाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची चिकित्सा केली आहे.

जनाबाईंची जनमानसांत कशी प्रतिमा आहे, त्यांचे वारकरी संप्रदायातील काय स्थान आहे, याबाबद्दल डॉ. भवाळकर म्हणतात, "जनाबाई महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा, विशेषतः स्त्री जीवनाचा, एक भाग कायमचा बळकावून बसली आहे.

विठ्ठलाने सगुणरूपाने तिच्याबरोबर दळणकांडण, धुणी-भांडी, झाडलोट, शेणगोठा ही ग्रामीण कष्टकरी स्त्रीची नित्य कामे करीत राहणे, तिच्या ताककण्या खाणे, तिची वेणफणी करणे, तिच्या मागे मागे हिंडणे या प्रकारच्या वर्णनाच्या अक्षरशः शेकडो ओव्या ग्रामीण स्त्रीच्या मुखी शेकडो वर्षे गुंजत आहेत."

जनाबाई विठ्ठलाशी इतक्या एकरूप झालेल्या आहेत की विठ्ठल त्यांची वेणी घालून देतो,

तुळशीचे वनी जनी उकलिते वेणी I हाती घेऊनी लोणी, सेवा करी चक्रपाणी

त्याही पुढे जाऊन विठूराया जनाबाईंसाठी अंघोळीचे पाणी देखील आणून देतो. जनाबाई आपल्या अभंगात म्हणतात,

जनी बैसली न्हायाला, पाणी नाही विसणाला I हाती घेऊनी घागरी, देव निघाले तातडी II

या दोन्ही अभंगांबाबत तारा भवाळकर म्हणतात, "ही लोकपरंपरेतील स्त्रियांची जात्यावरची एक ओवी. या दोन्हीत केवळ आशयाचा आणि रचनेचाच सारखेपणा आहे असे नाही, तर भावनेचा जिव्हाळा किती एकसारखा आहे याचा प्रत्यय येतो. श्रम करणाऱ्या जनाबाईमध्ये जणू या परंपरेतील ग्रामीण स्त्रीने स्वतःलाच पाहिले आहे, अनुभवले आहे."

विठ्ठल

फोटो स्रोत, Vitthal Rukmini Mandir Samiti

याच बरोबर तारा भवाळकर असे देखील मांडतात की, संत जनाबाई या महिला मुक्तीचा अत्युच्च अविष्कार आहेत. देवाच्या प्रीतीसाठी जनाबाई या निर्भय बनलेल्या आहेत आणि त्यांच्यावर आता सामाजिक चालीरीतींचे दडपण देखील नाही.

'डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी' या जनाबाईंच्या अभंगाचा संदर्भ देत तारा भवाळकर म्हणतात, "डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, असा जाहीर गजर करीत जनी निघाली. पंढरीच्या वाटेवर पाल मांडून बसली. लोकांनी खुशाल शंखध्वनी करावा. तिला कुणाचीच पर्वा नाही."

पुढे त्या म्हणतात, "या अभंगातून व्यक्त होणारा निर्भर निःसंगपणा तिच्या अव्याभिचारी निष्ठेचा पुरावा ठरतो. तिच्या निर्भर मुक्ततेचा पुरावा ठरतो. जनभयच नव्हे तर आता देवाचेही भय राहिले नाही. 'आता भीत नाही देवा I आदिअंत तुझा ठावा' ही आत्मनिर्भरता मानवी मुक्त मनाची सर्वोच्च अवस्था आहे. जनाबाईने ती आत्मबळाने प्राप्त केली आहे.

विठ्ठल 'भाऊ, बहीण, सखा, माऊली' सारंच काही

वारकरी परंपरते विठ्ठलाला, ज्ञानोबांना, तुकोबांना 'माऊली' म्हटलं जातं. ज्या वेळी वारीत लोक जातात, ते देखील एकमेकांना 'माऊली' अशीच हाक मारतात. विठ्ठलाला वारकरी संप्रदायात आज जे माऊली म्हटलं जातं त्याचं श्रेय संतांनाच आहे. त्यात ही जनाबाईंचं महत्त्वाचं योगदान आहे.

लहानपणीच आई-वडिलांच्या प्रेमाला दुरावलेल्या जनाबाईंसाठी विठ्ठलच सारं काही होता. त्यातून त्यांनी आपले अभंग लिहिले आहेत. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी श्रीविठ्ठल एक महासमन्वय या पुस्तकात हे जिव्हाळ्याचे संबंध उलगडून दाखवण्यात आले आहे.

ढेरे लिहितात, नामदेवांची शिष्या जनाबाई ही तर माता-पित्यांच्या सुखाला बाळपणीच आंचवलेली होती.

माय गेली बाप मेला I आतां सांभाळी विठ्ठला

ढेरे लिहितात, अशी तिची भावना स्वाभाविक आहे. जन्मदात्या मात्या-पित्यांची पाखर दुरावल्यामुळे ती विठ्ठलालाच काकुळतीने सांगते आहे.

मी तुझें गा लेकरू I नको मजशी अव्हेरू II

ये ग ये ग विठाबाई I माझे पंढरीचे आई II

'हाच जनाबाईंच्या वाणीचा प्राणस्वर बनलेला आहे. ती निढळावर हात ठेवून आपल्या आणि विश्वाच्या आईची निरंतर वाट पाहत आहे', असं ढेरे लिहितात.

जसं जनाबाई विठ्ठलाला माऊली म्हणतात तसंच त्या ज्ञानदेवांना देखील माऊली म्हणतात.

अहो सखिये साजणी I ज्ञानाबाई वो हरणी

मज पाडसाची माय I भक्तवत्साची ते गाय

विठ्ठल

फोटो स्रोत, Padmandha Prakashan

या सुंदर शब्दांत जनाबाई ज्ञानदेव आणि त्यांच्या भक्तांचा संबंध हळुवारपणे उलगडून दाखवतात.

जसं संत जनाबाई आणि विठुरायाचा भावातीत संबंध आपल्याला त्यांच्या अभंगातून दिसतो. त्याचप्रमाणे संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या नात्यातून वारकरी संप्रदायाची समृद्ध बाजू समोर येते. लहानपणी अनाथ असलेल्या जनाबाई पुढे चालून नामदेवांच्या धर्म-बहीणच बनल्या.

त्यांच्यात गुरू शिष्यांचे नाते तर होतेच; पण नामदेवांच्या भागवदधर्माच्या प्रसारात त्या एखाद्या सहकाऱ्याप्रमाणेच होत्या. त्या स्वतःला जरी अभिमानाने 'नामयाची दासी' म्हणवून घेत असल्या तरी त्या या अध्यात्ममार्गाच्या स्वामिनी होत्या याबाबत कुणालाच शंका नसावी.

स्त्री मुक्तीचा आत्मस्वर

फोटो स्रोत, Lokwangmay Gruh Prakashan

डॉ. तारा भवाळकर लिहितात की, "1350 मध्ये जनाबाई या नामदेवांबरोबरच पायरीच्या चिऱ्यात अंतर्धान पावल्या अशा लोकश्रद्धा आहे."

संत जनाबाईंनी साडेतीनशेच्या जवळ अभंगाची रचना केली आणि ते अभंग आज प्रत्येक वारकऱ्यांच्या आणि लाखो ग्रामीण महिलांच्या ओठावर आहेत.

मनात प्रेमभाव आणि भक्तिभाव असेल तर ती व्यक्ती अनाथ राहू शकत नाही उलट तिन्ही जगाचा स्वामीच भगवंत विठ्ठल त्या व्यक्तीचा जीवश्च कंठश्च सखा होतो, माऊली होतो हीच आशा आणि प्रेरणा प्रत्येक हरीभक्ताला त्यांच्या चरित्रातून मिळते.

संदर्भ :

  • संत जनाबाई चरित्र, डॉ. सुहासिनी इर्लेकर, प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
  • श्रीविठ्ठल एक महासमन्वय, डॉ. रा. चिं. ढेरे, पद्मगंधा प्रकाशन
  • स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर, डॉ. तारा भवाळकर, लोकवाङमय गृह प्रकाशन, रिंगण - 2015, संत जनाबाई विशेषांक - संपा. सचिन परब, डॉ. श्रीरंग गायकवाड)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)