IAS पूजा खेडकरांच्या वाहनावरील दिव्यावरून वाद, वाहनांना दिवा लावण्याचे काय नियम आहेत?

फोटो स्रोत, Getty Images / Pooja Khedkar FB
'लाल दिव्याची गाडी' हा आजही आपल्यापैकी अनेकांच्या घरांत होणाऱ्या करिअरच्या चर्चेमध्ये आवर्जून निघणारा विषय असतो. लाल दिव्याची गाडी मिळवायची म्हणजे, मोठा सरकारी अधिकारी बनायचं, असा त्याचा सरळ अर्थ. त्यामुळं कायम दिवे असलेल्या सरकारी गाड्यांचं सर्व-सामान्यांना आकर्षण असलेलं दिसून आलं आहे.
चर्चेत असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत जे वाद समोर आलेत, त्यातही असाच एक गाडीवरील दिव्याचा वाद आहे. त्यांनी त्यांच्या खासगी महागड्या गाडीवर दिवा लावल्याचा हा वाद समोर आला आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांच्यासह बडे सरकारी अधिकारी, पोलीस, न्यायाधीश अशा प्रशासनातील मोठ्या हुद्द्यांवरील अधिकाऱ्यांच्या गाडीवर वेगवेगळ्या प्रकारचे दिवे असल्याचं पाहायला मिळतं.
पण 2017 मध्ये सरकारनं एक नियम करत व्हीआयपी कल्चर संपवलं आणि मंत्री, नेते यांच्या गाडीवर दिवे वापरण्याच्या परंपरेला छेद दिला होता.
दरम्यान, ज्यांना गरज आणि अधिकार आहे, त्यांच्याही वाहनांवर कोणत्या प्रकारचे दिवे असावेत याबाबतचेही काही नियम आहेत.
ते नियम नेमके काय आहेत? कोणत्या दिव्याचा वापर कोणते अधिकारी करू शकतात? हे आपण जाणून घेऊयात.
सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भातील एका सुनावणीदरम्यान गाडीवरील लाल आणि अंबर दिव्यांच्या वापराच्या मुद्द्यावरून फटकारल्याचं पाहायला मिळालं होतं.
प्रशासनातील अधिकाऱ्यांची पदे आणि त्यांच्या दर्जानुसार या दिव्यांच्या वर्गीकरणाचा आणि त्यानुसार वापर करण्याच आदेश सुप्रीम कोर्टानं दिला होता.
त्यानुसार निळ्या, लाल आणि अंबर दिव्यांचं वर्गीकरण करण्यात आलं होतं. त्या वर्गीकरणाची माहिती राजपत्रामध्येही देण्यात आलेली आहे.

महसूल कायदेतज्ज्ञ डॉ. संजय कुंडेटकर यांनी एका लेखाच्या माध्यमातून या वर्गीकरणाबाबत आणि त्यांच्या वापराबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
यात प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या पातळीवरील पदं आणि त्यानुसार दिव्यांचे वर्गीकरण तसंच ते कोणी वापरायला हवे याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
या दिव्यांमध्ये प्रामुख्यानं लाल, निळा आणि अंबर (केशरी) अशा प्रकारचे दिवे असतात. त्यातही प्लॅशर असलेला आणि फ्लॅशर नसलेला असं वर्गीकरण असतं. फ्लॅशर म्हणजे फोटोचा फ्लॅश चमकावा तसा चमकत असणारा. तसंच गोल फिरणारा आणि गोल न फिरणारा अशाप्रकारचंही वर्गीकरण दिव्यांमध्ये आढळतं.
लाल दिवा-फ्लॅशरसह गोल फिरणारा
या दिव्याचा वापर कोणी करावा याबाबतचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, विधान परिषदेचे सभापती, विधानसभा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्षनेते हे मान्यवर त्यांच्या वाहनावर फ्लॅशरसह गोल फिरणारा लाल दिवा वापरू शकतात.
लाल दिवा - फ्लॅशरविना आणि गोल न फिरणारा
लाल दिव्याचा वापर खालील व्यक्ती करू शकतात
- विधान परिषदेचे उपसभापती
- विधान सभेचे उपाध्यक्ष
- सर्व राज्यमंत्री
- राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष
- मुख्य सचिव
- महाधिवक्ता
- राज्य निवडणूक आयोग आयुक्त
- लोकायुक्त
- उपलोकायुक्त
- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचे अध्यक्ष
- राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष
- वैधानिक विकास मंडळांचे अध्यक्ष
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष
- मुख्य माहिती आयुक्त
या व्यक्तींच्या शासकीय वाहनावर फ्लॅशरविना (गोल न फिरणारा) लाल दिवा वापरता येतो.
अंबर दिवा - फ्लॅशरविना, गोल न फिरणारा
खालील व्यक्ती त्यांच्या शासकीय वाहनावर, फ्लॅशरविना आणि गोल न फिरणारा अंबर (केशरी रंगाचा) दिवा वापरू शकतात.
- प्रधान सचिव
- अपर मुख्य सचिव
- सचिव
- अपर मुख्य सचिव पदाला समकक्ष अधिकारी
- पोलीस महासंचालक
- महासंचालक पदाला समकक्ष अधिकारी
- जिल्हा परिषद अध्यक्ष
- 'अ' आणि 'ब' वर्ग महानगरपालिकांचे महापौर

फोटो स्रोत, Getty Images
तसंच प्रधान मुख्य वनसंरक्षक, विभागीय आयुक्त, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, 'अ' आणि 'ब' वर्ग महानगरपालिकांचे आयुक्त यांनाही हा दिवा वापरता येतो.
निळा दिवा - फ्लॅशरविना गोल न फिरणारा
- जिल्हाधिकारी
- उपविभागीय दंडाधिकारी
- तालुका दंडाधिकारी/तहसीलदार
या अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनावर आणि पोलिसांच्या वाहनांवर फ्लॅशरविना गोल न फिरणारा निळा दिवा असेल.
या शासकीय वाहनांवरील निळा दिवा चालू-बंद न होणारा आणि स्थिरपणे कायम सुरू असणारा असेल.
जांभळी काच आणि आत लाल चमकणारा, चालू-बंद होणारा दिवा
रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहने यांना अशा प्रकारचा जांभळी काच असलेला आणि आणि आत लाल चमकणारा तसंच चालू-बंद होणारा दिवा वापरण्याची परवानगी असेल.

फोटो स्रोत, Getty Images
अंबर दिवा - फ्लॅशरसह, स्थिर सुरू राहणारा निळा-लाल किंवा निळा-पांढरा एकत्रित विविध रंगाचा दिवा
अति महत्वाच्या व्यक्ती (व्हीआयपी)साठीची शासकीय वाहने, अति महत्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) ताफ्यातील शासकीय वाहने अशा प्रकारचा दिवा वापरू शकतील.
तसंच इतरही काही महत्त्वाचे नियम आहे. त्यानुसार -
- अशा प्रकारच्या दिव्यांचा वापर फक्त शासकीय वाहनांवर करता येतो.
- खासगी वाहनांवर असे दिवे लावल्यास ते बेकायदेशीर ठरते.
- खाजगी वाहनांवर पोलीस, आर्मी लिहिणे तसे स्टिकर लावणे किंवा अशी चिन्हे लावणेही बेकायदेशीर आहे.
2017 मध्ये मंत्र्यांच्या गाडीवरील दिवा काढला
वर दिलेल्या माहितीमध्ये नेत्यांनी वाहनांवर कोणते दिवे वापरावे याची माहिती असली. तरी सध्या राजकीय नेते म्हणजे मंत्री त्यांच्या वाहनांवर कोणत्याही प्रकारचा दिवा वापरत नाहीत.
केंद्रात नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात 2017 मध्ये मंत्र्यांच्या गाडीवरील लाल दिव्यांच्या नियमात बदल करण्यात आला होता.

फोटो स्रोत, Getty Images
व्हीआयपी कल्चरला विरोध दर्शवत केंद्र सरकारनं मंत्र्यांच्या गाड्यांवरील लाल दिवे काढण्याचा निर्णय घेतला होता.
त्यावेळी नव्या नियमानुसार फक्त आणीबाणीच्या सेवांशी संबंधित वाहने, पोलीस, रुग्णवाहिका यांनाच वाहनावर दिव्याचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली होती.
त्यानंतर केंद्र सरकारमधील मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री यांनी तातडीनं त्यांच्या गाड्यांवरचे लाल दिवे काढले होते.











