सहा रुपयांचं एक अंडं, ज्याची किंमत नंतर सव्वा दोन लाख रुपये झाली

फोटो स्रोत, DANISH HAMID
लहानपणी आपण सगळ्यांनीच सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीची गोष्ट ऐकलेली असते. काश्मीरमध्ये सध्या एका सोन्याच्या अंड्याचीच चर्चा आहे...म्हणजे हे अंड सोन्याचं नाहीये, पण त्याची जी किंमत आहे ती सोन्याच्या भावापेक्षा कमी नाहीये. तब्बल सव्वा दोन लाख रुपये किंमत ज्या अंड्याला मिळाली त्याची गोष्ट आहे तरी काय?
खरंतर हे सहा रुपये किंमतीचं साधं अंड...पण मशीद बनविण्यासाठी ज्या भावनेनं एका गरीब महिलेनं ते दान केलं, त्यामुळे त्याची किंमत सव्वा दोन लाखांहून अधिक झाली.
काश्मीरमधल्या सोपोरमधील माल मापनपुरा गावात कित्येक महिन्यांपासून एका मशिदीचं बांधकाम सुरू आहे. ईदच्या दिवशी मशीद समितीने घरोघरी जाऊन रोख रक्कम आणि सामान दान म्हणून घेण्याचा निर्णय घेतला. लोकांनीही दान म्हणून पैसे, भांडी, कोंबड्या, तांदूळ अशा गोष्टी दिल्या.
मशीद समितीचे एक सदस्य नसीर अहमद सांगतात की, “आम्ही दान घेत होतो, तेव्हा एका छोट्याशा घरातून एक महिला हळूहळू माझ्यापाशी आली आणि एक अंडं देऊन तिनं म्हटलं की, माझ्याकडून याचा स्वीकार करावा.”
ही महिला अतिशय गरीब आहे आणि एका छोट्या, मोडकळीला आलेल्या घरात आपल्या एकुलत्या एका मुलासोबत राहते.
ते सांगतात की, इतर गोष्टी तर विकण्यासाठी दिल्या, पण या अंड्याचं काय करायचं हा प्रश्नच होता.
नसीर पुढे सांगतात, “खरंतर ते सहा रुपयांचं एक साधं अंडं होतं. पण त्या गरीब बाईनं ज्या भावनेनं परमेश्वरासाठी दिलं होतं, त्यामुळे त्याचं मोल करणं कठीण होतं. मी समितीच्या इतर सदस्यांना म्हटलं की, अंड्यावरही बोली लावूया आणि तीन दिवस विक्रीसाठी ठेवून ते परत घेऊ.”
नसीर यांनी अंडं दान करणाऱ्या महिलेची ओळख सार्वजनिक न करता घोषणा केली की, अंड्याचाही लिलाव केला जाणार आहेत. त्यांनी स्वतःच्या खिशातून दहा रुपये काढून या अंड्याची बोली सुरू केली.
नसीर यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली बोली दहा हजार रुपयांची लागली. त्यानंतर अंड्याची किंमत वाढतच गेली.
गावाचे माजी सरपंच तारिक अहमद सांगतात, “अडीचशे लोकवस्ती असलेल्या या गावात मोठी जामा मशीद नव्हती. आम्ही मशिदीचं काम सुरू केलं. पण छतापर्यंत पोहोचेपर्यंतच काम थांबलं, कारण निधी नव्हता.”
केवळ एका अंड्यामुळे आम्हाला सव्वा दोन लाख रुपये मिळतील, असं आम्हाला वाटलंही नव्हतं.
बोलीच्या शेवटच्या दिवशी काय झालं?
मशिदीच्या समितीनं ठरवलं होतं की, अंड्याची बोली ही तीन दिवसांपर्यंत लागेल.
नसीर अहमद सांगतात की, दोन दिवस अंड्यावर 10, 20, 30 आणि 50 हजार रुपयांची बोली लागली होती आणि प्रत्येकवेळी अंडं परत केलं जायचं.
नंतर पुन्हा घोषणा करण्यात आली की, शेवटच्या दिवशी सात वाजता लिलाव बंद होईल आणि शेवटची बोली लावणाऱ्याला अंडं दिलं जाईल.
सोपोरमधील तरूण व्यापारी दानिश हमीद यांनीही बोली लावली होती.

फोटो स्रोत, DANISH HAMID
54 हजार रुपयांची बोली जेव्हा दोन वेळा लागली, तेव्हा मागच्या रांगेत बसलेल्या दानिश यांनी बुलंद आवाजात पुढची बोली लावली, “70 हजार.”
अशा रीतीने या अंड्यातून एकूण दोन लाख 26 हजार 350 रुपयांची रोख रक्कम जमा झाली.
दानिश यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, हे अंडं कोणी दान केलंय हे आम्हाला सांगितलं नव्हतं. पण एका गरीब महिलेने अंडं दान करून आपली भावना व्यक्त केल्याचं आम्हाला माहीत होतं. त्या भावनेनेच धनिकांना अधिकाधिक निधी देण्याची प्रेरणा दिली.
ते पुढे सांगतात, “मी जेव्हा 70 हजार रुपयांमध्ये अंडं खरेदी केलं, तेव्हा माझीही भावना हीच होती.”
आता हे अंडं कुठे आहे?
नसीर सांगतात की, हे अंडं आता साधारण राहिलं नाहीये, त्याचं एक प्रतीकात्मक महत्त्व आहे.
ते म्हणतात, “मी या अंड्याला सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करत आहे. त्यासाठी एक चांगली फ्रेम बनवून घेतोय, जेणेकरून ते नीट राहील.”

फोटो स्रोत, Getty Images
हे अंडं त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि प्रत्येक पाहणाऱ्यासाठी एक आठवण बनून राहावं अशी नसीर यांची इच्छा आहे. एका महिलेनं स्वतःच्या परिस्थितीचा विचार न करता ते अंडं परमेश्वरासाठी दिलं, त्याचं मोल कसं करणार, असं नसीर म्हणतात.
“प्रामाणिक भावनेची किंमत नसते. त्यामुळेच हे अंडं आयुष्यभर आमच्या घरात सुरक्षित राहिल.”











