'जेसीबी लावून पुतळा तोडला'; वाराणसीतील अहिल्याबाई होळकर पुतळा तोडल्याचा वाद काय? - ग्राऊंड रिपोर्ट

वाराणसीतील अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचा वाद नेमका काय?

फोटो स्रोत, Getty Images/ANI

फोटो कॅप्शन, वाराणसीतील अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचा वाद नेमका काय?
    • Author, सय्यद मोजिज इमाम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, वाराणसी
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

उत्तर प्रदेशातील वाराणसी शहर सध्या चांगलंच चर्चेत आहे. हिंदूंची पवित्र धार्मिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराचे प्रतिनिधित्व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते येथून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

पंतप्रधानांचा मतदारसंघ असल्याने वाराणसीमध्ये सध्या विकासाची अनेक कामे वेगाने सुरू आहेत. याच कामांचा एक भाग म्हणून ऐतिहासिक मणिकर्णिका घाटाचाही कायापालट केला जात आहे.

स्थानिक लोकांच्या मते, या कामासाठी जुनी बांधकामे पाडण्यात आली आहेत आणि या तोडफोडीमुळे तिथल्या लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचा वाद

याठिकाणी असलेला इंदूरच्या होळकर घराण्यातील महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा पुतळाही तोडण्यात आला आहे, असा अनेकांचा आरोप आहे.

मात्र, वाराणसीचे महापौर अशोक तिवारी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महापौरांच्या म्हणण्यानुसार, "तो पुतळा सुरक्षित ठिकाणी ठेवला असून, घाटाचे काम पूर्ण झाले की तो पुन्हा सन्मानाने बसवला जाईल."

जेव्हा मूर्ती तोडली गेली, तेव्हा आम्ही त्याला कडाडून विरोध केला होता, असं पाल समाजाचे अध्यक्ष महेंद्र पाल सांगतात.
फोटो कॅप्शन, जेव्हा मूर्ती तोडली गेली, तेव्हा आम्ही त्याला कडाडून विरोध केला होता, असं पाल समाजाचे अध्यक्ष महेंद्र पाल सांगतात.

अहिल्याबाई होळकरांचा पुतळा तोडल्याच्या बातमीमुळे परिसरात मोठा गदारोळ झाला आणि लोकांनी जोरदार निदर्शने केली. याप्रकरणी पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यातही घेतले आहे.

या आंदोलनात सहभागी झालेले काशीच्या पाल समाजाचे अध्यक्ष महेंद्र पाल सांगतात की, "अहिल्याबाई होळकर आमच्या पूर्वज होत्या आणि त्या पाल समाजाचा मान होत्या."

त्यांनी पुढे दावा केला की, "आम्ही स्वतः तिथे जाऊन पाहिले, तेव्हा सरळ जेसीबी (JCB) लावून पुतळा तोडण्याचं काम सुरू होतं. आपल्या दैवताचा असा अपमान झालेला पाहून आम्ही विरोध केला, पण पोलिसांनी आम्हाला अडवलं आणि तिथे फिरकूही दिलं नाही.'"

मणिकर्णिका घाटावर नक्की काय घडलं?

वाराणसीच्या 'चौक' भागातून अरुंद गल्ल्यांमधून वाट काढत आपण मणिकर्णिका घाटावर पोहोचतो.

या वाटेवर अंत्यसंस्कारासाठी जाणारे लोक आणि गंगेत स्नान करून पूजा-अर्चा करण्यासाठी आलेले भाविक सतत भेटत असतात.

वाराणसीमध्ये 80 पेक्षा जास्त घाट असले तरी, धार्मिकदृष्ट्या मणिकर्णिका घाटाचं महत्त्व काही वेगळंच आहे.

सध्या याच घाटाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय. मात्र, कामादरम्यान पुतळा तोडल्याच्या आरोपांमुळे आता तिथे वाद पेटला आहे.

पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या बनारसमध्ये 'विकास की वारसा' हा वाद नेहमीच चर्चेत असतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या बनारसमध्ये 'विकास की वारसा' हा वाद नेहमीच चर्चेत असतो.

वाद वाढल्यानंतर घाट परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली. तिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून, सध्या कोणालाही आत सोडलं जात नाही.

गंगा नदीच्या बाजूनं पाहिलं तर, आजूबाजूला सगळीकडे नुसती माती आणि वाळू साचलेली दिसते.

जागोजागी दगड फुटलेले पडलेले दिसतात. विकासाच्या नावाखाली प्रशासन जुन्या परंपरा आणि घाटाच्या मूळ रूपाशी छेडछाड करतंय, असं तिथल्या लोकांचं स्पष्ट मत आहे.

विकासाचं काम जरूर व्हावं, पण बनारसचं जुनं पौराणिक रूपही टिकून राहावं, अशी इथल्या स्थानिकांची इच्छा आहे.
फोटो कॅप्शन, विकासाचं काम जरूर व्हावं, पण बनारसचं जुनं पौराणिक रूपही टिकून राहावं, अशी इथल्या स्थानिकांची इच्छा आहे.

काशीत मूर्ती घडवण्याचं काम करणारे अजय शर्मा बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाले, "इथल्या भिंतींवरील मूर्तींची सरळ तोडफोड करण्यात आली आहे. आमचा विरोध विकासाला मुळीच नाही, उलट सौंदर्यीकरण आणि नूतनीकरण व्हावं असंच आम्हाला वाटतं. पण, आपली जुनी पौराणिक दैवतं सुरक्षित राहिली पाहिजेत, एवढीच आमची मागणी आहे."

त्यांनी पुढे असा दावा केला की, "याआधीही 10 ते 25 वर्षांपूर्वी विकासाची कामं झाली होती. पण आता अहिल्याबाईंचा पुतळा, गणपतीची मूर्ती आणि गंगा मातेची मूर्ती इथून गायब झाली आहे."

मात्र, वाराणसीचे महापौर अशोक तिवारी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

"सर्व मूर्ती आम्ही सुरक्षित जपून ठेवल्या आहेत आणि घाटाचं काम पूर्ण झालं की त्या पुन्हा बसवल्या जातील," असं त्यांनी स्पष्ट केलं.

अजय शर्मा यांच्या मते, अहिल्याबाई होळकर यांचा जो ऐतिहासिक पुतळा तिथे होता, तो आता खंडित झाला आहे.
फोटो कॅप्शन, अजय शर्मा यांच्या मते, अहिल्याबाई होळकर यांचा जो ऐतिहासिक पुतळा तिथे होता, तो आता खंडित झाला आहे.

महापौरांनी पुढे सांगितलं की, "मणिकर्णिका घाटाचा कायापालट करून तिथे आधुनिक सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. यासाठी अंत्यसंस्कारासाठी 38 नवीन प्लॅटफॉर्म बांधले जात असून तिथे धुरासाठी चिमण्यांची सोय असेल. यामुळे पावसाळ्यातही अंत्यसंस्कार करणं सोपं होईल.

महापौर अशोक तिवारी यांनी पुढं म्हटलं की, "अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या लोकांसाठी सोयीचे रॅम्प, बसण्यासाठी प्रतीक्षालय आणि पाहण्यासाठी व्ह्यूविंग गॅलरी बांधली जाणार आहे. लाकडं वाहून नेण्यासाठी वेगळा रस्ता, नोंदणी कार्यालय आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याचीही सोय केली जाईल.

खुद्द 'डोमराजा' यांच्या विनंतीवरूनच पंतप्रधानांनी या कामाला सुरुवात केली आहे, असा दावा महापौरांनी केला आहे.

मणिकर्णिका घाटावर रात्रंदिवस अंत्यसंस्कार सुरू असतात आणि या अंत्यसंस्काराचे विधी करणाऱ्या समाजाच्या प्रमुखाला 'डोमराजा' असं संबोधलं जातं.

रोजगार जाण्याची भीती

मणिकर्णिका घाटाचा हा वाद फक्त पुतळा तोडण्यापुरता मर्यादित नाही. घाटाच्या आजूबाजूला व्यवसाय करणाऱ्या अनेकांना आता आपला रोजगार जाण्याची भीती आहे.

घाटाचा कायापालट झाल्यानंतर आपल्याला इथे काम मिळेल की नाही, या काळजीत इथले स्थानिक व्यावसायिक आहेत.

यामध्ये पिढ्यानपिढ्या पूजाविधी करणाऱ्या पुरोहितांचाही समावेश आहे. तिथे पुरोहित म्हणून काम करणारे राहुल मिश्रा सांगतात, "त्या मणीच्या दोन्ही बाजूंना अहिल्याबाईंचा पुतळा होता आणि त्यांच्या मांडीवर शिवलिंग होतं. सुमारे 300 वर्षं जुना असलेला तो मणी ही वाराणसीच्या 80 घाटांमधील सर्वात देखणी आणि अद्भुत गोष्ट होती."

'मणि' म्हणजेच मणिकर्णिका घाटाचा सर्वात पवित्र आणि प्राचीन गाभा जिथे ऐतिहासिक मूर्ती आणि धार्मिक खुणा आहेत.

मणिकर्णिका घाटाचं एक विहंगम दृश्य
फोटो कॅप्शन, मणिकर्णिका घाटाचं एक विहंगम दृश्य

राहुल मिश्रा यांनी दावा केला की, "जिथे तो 'मणी' होता, ती जागा माझे वडील झप्पू महाराज यांचे आजोबा छन्नन महाराज यांची होती. माझे वडील तिथेच बसायचे.

स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना आम्ही टिळा लावायचो आणि त्यातून मिळणाऱ्या दान-दक्षिणेवर आमचा उदरनिर्वाह चालायचा." त्यांनी पुढे असाही आरोप केला की, सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता तो भाग पाडून टाकला.

पिंटू यादव

पिंटू यादव यांचा लाकूड विक्रीचा व्यवसाय असून ते अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडं पुरवतात.

पिंटू यादव यांचा आरोप आहे की, महानगरपालिका आता जबरदस्तीने दुकान पाडण्याच्या धमक्या देत आहे. त्यांची मुलं अजून शिकत असून, हा व्यवसायच त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार आहे, असं ते सांगतात.

यावर उत्तर देताना महापौर अशोक तिवारी म्हणतात, "लाकूड विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 5-6 दुकानदारांसाठी आम्ही खास 'स्टोअर रूम' बांधत आहोत. त्यांना तिथे दुकानं दिली जातील."

त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, "तिथून कोणालाही बाहेर काढलं जात नाहीये. कोणाचाही रोजगार हिरावला जाणार नाही."

पुतळ्यांच्या तोडफोडीचं राजकारण

अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या या वादाला चांगलंच राजकीय वळण लागलंय. अनेक राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय बीबीसीशी बोलताना म्हणाले "सरकार वारंवार खोटं का बोलतंय? जो पुतळा तोडला गेला, त्याचे व्हिडिओ तिथल्या स्थानिक लोकांनी, पुरोहितांनी आणि गंगापुत्रांनी म्हणजेच नाविकांनी व्हायरल केले आहेत, ते काँग्रेसने बनवलेले नाहीत."

वाराणसीत अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा तोडफोडीवरून वाद

फोटो स्रोत, ANI

वाद वाढल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः वाराणसीचा दौरा केला. "एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काही खोटी चित्रं मुद्दाम व्हायरल केली जात आहेत," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

"यापूर्वी जेव्हा 'काशी विश्वनाथ धाम'चा विकास होत होता, तेव्हाही असेच कट रचले गेले होते. बाहेरून तुटलेल्या मूर्ती आणून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला होता. आताही मणिकर्णिका घाट आणि दालमंडीच्या कामांबाबत तशाच अफवा पसरवल्या जात आहेत," असं आदित्यनाथ म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय
फोटो कॅप्शन, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय

योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं की, कोणत्याही मूर्तीची तोडफोड झालेली नाही आणि सर्व धार्मिक प्रतीकं पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांच्या मते, "पूर्वी काशीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या कमी होती, पण आता ती प्रचंड वाढली आहे. 'एआय'च्या मदतीने खोटे व्हिडिओ बनवून लोकांच्या भावनांशी खेळणं कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही," असा कडक इशाराही त्यांनी दिला.

या प्रकरणानंतर पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. दरम्यान, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निघालेल्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांनाही पोलिसांनी वाटेतच रोखलं.

वाराणसीचे महापौर अशोक तिवारी यांनी मात्र हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
फोटो कॅप्शन, वाराणसीचे महापौर अशोक तिवारी यांनी मात्र हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

"सरकारला आपला वारसा आणि इतिहासच संपवून टाकायचा आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे," असं ते म्हणाले.

अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्यावरून बहुजन समाज पक्ष अध्यक्षा मायावती यांनीही चिंता व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, भाजप आमदार नीलकंठ तिवारी यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

"विरोधकांकडे आता कोणताही ठोस मुद्दा उरलेला नाही, म्हणूनच ते मुद्दाम विकासकामात अडथळे आणत आहेत," असं त्यांनी म्हटलंय.

अहिल्याबाई होळकर आणि काशीचं नातं

बनारस हिंदू विद्यापीठातील इतिहासाच्या प्राध्यापक बिंदी परांजपे यांच्या मते, काशीच्या विकासामध्ये अहिल्याबाई होळकर यांचं योगदान विसरता येणार नाही. 18 व्या शतकात माळवा राज्याच्या (सध्याचं इंदूर) महाराणी असलेल्या अहिल्याबाई एक अत्यंत दूरदृष्टी असलेल्या राज्यकर्त्या होत्या.

अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रात झाला. पती खंडेराव होळकर आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर त्यांनी संपूर्ण साम्राज्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

त्यांनीच 1780 मध्ये प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यांच्या याच कार्याची आठवण म्हणून मंदिर परिसरात त्यांचा पुतळा बसवण्यात आला होता.

प्राध्यापक बिंदी परांजपे सांगतात की, "त्या मोठ्या शिवभक्त होत्या. केवळ काशीच नाही, तर देशभरातील अनेक मंदिरांचा त्यांनी कायापालट केला. पण शिवभक्त असल्यामुळे काशीबद्दल त्यांना मनापासून ओढ होती."

काशीच्या जडणघडणीत महाराणी अहिल्याबाई होळकरांचा मोलाचा वाटा राहिला आहे, असं प्राध्यापक बिंदी परांजपे सांगतात.
फोटो कॅप्शन, काशीच्या जडणघडणीत महाराणी अहिल्याबाई होळकरांचा मोलाचा वाटा राहिला आहे, असं प्राध्यापक बिंदी परांजपे सांगतात.

प्राध्यापक बिंदी परांजपे यांनी माहिती दिली की, "अहिल्याबाई या धनगर समाजातील होत्या. महाराष्ट्रात या समाजाला धनगर म्हटले जाते, जो पारंपरिकपणे मेंढपाळ समाज म्हणून ओळखला जातो. इंग्रजीमध्ये याच समाजाला 'शेपर्ड' असे संबोधले जाते."

बिंदी परांजपे यांच्या मते, अहिल्याबाईंचे मराठा शासकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याचबरोबर त्यांनी त्या काळातील दिल्लीच्या राज्यकर्त्यांशीही अत्यंत समंजस आणि संतुलित संबंध राखले होते.

त्या पुढे म्हणाल्या की, "होळकर राजघराण्याने जारी केलेल्या नाण्यांवर बेलपत्र आणि शिवलिंगाचे चित्र पाहायला मिळते. धार्मिकदृष्ट्या ही हिंदू धर्माची महत्त्वाची प्रतीकं आहेत. पण विशेष म्हणजे, त्या काळातील शासन व्यवस्थेचा मान राखत, या नाण्यांवर तत्कालीन मुघल बादशहाचे नाव देखील कोरलेले दिसते."

13 ऑगस्ट 1795 रोजी, वयाच्या 70 व्या वर्षी या थोर महाराणीने जगाचा निरोप घेतला.

मणिकर्णिका घाटाचा इतिहास

प्राध्यापक बिंदी परांजपे सांगतात की, "पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शिव माता सतीचं पार्थिव शरीर घेऊन जात होते, तेव्हा त्यांच्या कानातील 'मणी' (बाळी किंवा कुंडल) या ठिकाणी पडलं होतं. याच कारणामुळे या घाटाला 'मणिकर्णिका' असं नाव पडलं."

वाराणसीच्या घाटांविषयी अभ्यासक राणा पीबी सिंह यांनी आपल्या 'द रिवर फ्रंट गंगा घाट' या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या मते, 'मत्स्य पुराणात' देखील मणिकर्णिकेचा उल्लेख येतो. या ठिकाणाला पाच सर्वात पवित्र जलस्त्रोतांपैकी एक मानलं जातं.

वाराणसी

फोटो स्रोत, Getty Images

BHU चे निवृत्त प्राध्यापक राणा पीबी सिंह सांगतात की, "इतिहासानुसार मणिकर्णिकेचा उल्लेख 12 व्या शतकात, साधारण 1190 च्या सुमारास येतो. मात्र, त्याचे कोणतेही पुरातत्वीय पुरावे आज उपलब्ध नाहीत. त्याआधी चौथ्या शतकात गुप्तकाळातील शिलालेखांमध्ये या घाटाचा उल्लेख आढळतो."

ते पुढे सांगतात की, "18 व्या शतकातील शिलालेखात या घाटाचं वर्णन मिळतं. 1630 मध्ये पेशवे बाजीराव यांनी या घाटाचं बांधकाम सुरू केलं होतं, पण ते काम पूर्ण होऊ शकलं नाही."

राणा पी.बी. सिंह यांच्या मते, यानंतर 1711 मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी या घाटाचं पुन्हा बांधकाम करून घेतलं. त्यानंतर 1830 मध्ये ग्वाल्हेरच्या राणी बैजाबाई यांनी या घाटाचा जीर्णोद्धार केला. पुढे सरकारने 1965 मध्ये या घाटाची डागडुजी केली.

मणिकर्णिका घाटावर रात्रंदिवस अंत्यसंस्कार सुरू असतात. अशी श्रद्धा आहे की, या घाटावर अंत्यसंस्कार झाल्यामुळे आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)