भारतात ख्रिसमसला झालेल्या तोडफोडीच्या घटनांची आंतररराष्ट्रीय माध्यमांनी घेतली 'अशी' दखल

फोटो स्रोत, Devendra Shukla
भारतात अनेक ठिकाणी ख्रिसमसचा उत्सव साजरा करणाऱ्या लोकांबरोबर जबरदस्ती झाल्याच्या आणि हल्ला झाल्याच्या बातम्या समोर आल्या.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि केरळसह अनेक ठिकाणांहून अशा बातम्या आल्या. या घटनांची चर्चा भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये तर झालीच, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी देखील याची दखल घेतली.
अनेक जाणकार आणि मानवाधिकार संघटनांनी या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली.
त्याचबरोबर भारतात 'ख्रिश्चन समुदायाला असणाऱ्या धोक्या'संदर्भात त्यांनी भारत सरकारकडे सुरक्षा पुरवण्याचीदेखील मागणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्रिसमसच्या सणानिमित्त 25 डिसेंबरच्या सकाळी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या होत्या. तसंच ते सकाळी दिल्लीतील एका चर्चमध्ये गेले होते.
अनेक आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी मोदींच्या चर्चला भेट देण्यासोबतच या हल्ल्यांच्या बातम्याही प्रामुख्यानं दाखवल्या.
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधील वृत्तांकन
'अरब टाइम्स कुवेत'नं ख्रिसमसच्या दिवसाचा एक व्हीडिओ पोस्ट केला. हा व्हीडिओ दिल्लीतील असल्याचं सांगितलं जातं आहे. या व्हीडिओमध्ये काहीजण लाल हॅट घातलेल्या आणि ख्रिसमस साजरा करत असलेल्या काही महिलांना हॅट काढून घरी जाण्यास सांगत आहेत. अर्थात बीबीसी या व्हीडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.
'अरब टाइम्स कुवेत'नं म्हटलं की, भारतातील ख्रिश्चन समुदायातील लोक अतिशय उत्साहानं ख्रिसमस साजरा करतात. मात्र यावेळच्या ख्रिसमसमध्ये ख्रिश्चन अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
अरब टाइम्सनुसार, या घटनांसाठी जाणकार, 'उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवादाच्या उदया'ला जबाबदार धरत आहेत.
या घटनांच्या वृत्तांकनात ओडिशात घडलेल्या एका घटनेचाही उल्लेख आहे. यात रस्त्याच्या कडेला सांताक्लॉजच्या टोप्या विकणाऱ्या दुकानदारांना काहीजण धमकावत होते.
तसंच मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका व्हीडिओचा देखील यात उल्लेख आहे. या घटनेबद्दल अरब टाइम्सनं लिहिलं आहे की, सत्ताधारी भाजपाचा एक नेता पोलिसांच्या उपस्थितीत एका ख्रिश्चन तरुणीला धमकावताना दिसत आहे.
तर 'द इंडिपेंडेंट' या ब्रिटनमधील वृत्तपत्रानं भारतातील हिंदुत्ववादी उजव्या विचारसरणीच्या गटाकडून ख्रिसमस साजरा करण्यामध्ये अडथळा निर्माण केल्याच्या बातम्या प्रकाशित केल्या. त्यांनी म्हटलं आहे की, ख्रिश्चन आणि मानवाधिकार गटांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, Devendra Shukla
'द इंडिपेंडेंट'नं कॅथलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाचा संदर्भ देत वक्तव्यं छापलं. यात अशा हल्ल्यांचा तीव्र निषेध करण्यात आला आहे आणि ख्रिश्चन समुदायावरील वाढत्या हल्ल्यांबाबत 'चिंता व्यक्त केली आहे.'
'द टेलीग्राफ' या ब्रिटनमधील वृत्तपत्रानंदेखील छापलं की, हिंदू संघटनांनी अनेक ठिकाणी चर्चेमध्ये होत असलेलं सेलिब्रेशन थांबवण्याचा प्रयत्न केला.
तुर्कियेच्या 'टीआरटी वर्ल्ड'नं म्हटलं की, 'भारतात भीतीच्या सावटाखाली ख्रिसमसचं सेलिब्रेशन.'
टीआरटी वर्ल्डनं म्हटलं की, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि केरळसह अनेक ठिकाणी ख्रिसमस साजरा करत असलेल्या ख्रिश्चन समुदायातील लोकांवर हल्ले झाले. यात हिंदुत्ववादी संघटनांचा समावेश होता.
ख्रिसमसला काय घडलं?
भारतात ख्रिसमस मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. मात्र त्याचबरोबर अनेक ठिकाणी ख्रिसमस साजरा करत असलेल्या लोकांवर हल्ला झाल्याच्या आणि अनेक ठिकाणी तोडफोड झाल्याच्या बातम्या आल्या.
बीबीसीचे सहयोगी पत्रकार आलोक पुतुल यांच्या मते, छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी ख्रिसमसला विरोध करत अनेक ठिकाणी तोडफोड केली.
यात आरोप करण्यात आला आहे की, बुधवारी (24 डिसेंबर) रायपूरमधील मॅग्नेटो मॉलमधील कर्मचाऱ्यांना त्यांची जात आणि धर्म विचारून धमकावण्यात आलं. तसंच तोडफोड करण्यात आली.

फोटो स्रोत, Vishal Bhatnagar/NurPhoto via Getty Images
मॅग्नेटो मॉलच्या मार्केटिंग विभाग प्रमुख आभा गुप्ता यांच्यानुसार, "मोठ्या संख्येनं लोक लाठ्या आणि हॉकी स्टिक घेऊन मॉलमध्ये शिरले. मग त्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. ते कर्मचाऱ्यांची ओळखपत्र पाहात होते आणि विचारत होते की, तुम्ही हिंदू आहात की ख्रिश्चन."
ख्रिसमसनिमित्त मॉलमध्ये सजावट करण्यात आली होती. हिंदुत्ववादी संघटनांच्या जमावानं त्या सजावटीची देखील पूर्ण तोडफोड केली. आभा गुप्ता यांच्यानुसार किमान 15 ते 20 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.
इतर अनेक ठिकाणीदेखील दुकानदारांना मारहाण केल्याच्या आणि तोडफोड केल्याच्या बातम्या आल्या आहेत.
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये देखील काही ठिकाणी ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थना सभा आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये मारहाण केल्याच्या आणि गोंधळ केल्याच्या घटनांच्या बातम्या आल्या आहेत.
पंतप्रधानांनी दिल्या होत्या ख्रिसमसच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ख्रिसमसनिमित्त ते गुरुवारी (25 डिसेंबर) सकाळी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चमध्ये गेले होते.
या भेटीशी निगडीत अनेक फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शेअर केल्या आहेत.

फोटो स्रोत, @narendramodi/X
पंतप्रधान मोदींनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, "दिल्लीतील द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशनमध्ये ख्रिसमसच्या सकाळच्या सर्व्हिसमध्ये सहभागी झालो. सर्व्हिसमध्ये प्रेम, शांतता आणि करुणेचा शाश्वत संदेश प्रतिबिंबित झाला. ख्रिसमसची भावना आपल्या समाजात सद्भावना आणि बंधुत्व आणो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











