अविमुक्तेश्वरानंद स्नान न करताच प्रयागराज माघ मेळ्याहून परतले; शंकराचार्य असण्याबाबतचा वाद नेमका काय?

फोटो स्रोत, ANI
- Author, सैय्यद मोजिज इमाम
- Role, बीबीसी प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेला माघ मेळा एका वादामुळे चर्चेत आला आहे.
उत्तराखंडच्या ज्योतिर्मठचे प्रमुख स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी 28 जानेवारीला जाहीर केलं की, ते या माघ मेळ्यात स्नान करणार नाहीत. त्यांना दु:खी अंतःकरणानं मेळ्यातून जावं लागत आहे.
त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या वक्तव्यात दावा केला आहे की, एखादा शंकराचार्य स्नान न करताच मेळ्यातून परत येण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना आहे.
याबाबत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एक्सवर पोस्ट करून यासाठी भारतीय जनता पार्टीला जबाबदार ठरवलं आहे.
अविमुक्तेश्वरानंद सरस्वती 18 जानेवारीला मौनी अमावस्येच्या दिवशी संगमावर स्नान करण्यासाठी जात होते.
त्यावेळेस उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर त्यांनी धरणं आंदोलन सुरू केलं होतं. आधी त्यांनी मागणी केली होती की दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, त्यानंतरच ते स्नान करतील.
त्याला उत्तर देत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अविमुक्तेश्वरानंद यांना स्नान करण्याचं आवाहन केलं होतं.
मौनी अमावस्येच्या दिवशी काय घडलं?
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या माघ मेळ्यात 18 जानेवारीला मौनी अमावस्येच्या पवित्र स्नानाच्या दिवशी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना पोलीस अधिकाऱ्यांनी रथासह जाण्यास अडवलं होतं.
त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांबरोबर त्यांचा वाद झाला. अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रशासनावर आरोप केला की, त्यांना संगमात स्नान करण्यापासून रोखण्यात आलं.
यादरम्यान ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं, त्यांचे फोटो त्यांनी दाखवले.
ते म्हणाले, "ही घटना प्रयागराजच्या आयुक्त सौम्या अग्रवाल यांच्यासमोर झाली आहे."
या आरोपानंतर प्रयागराजच्या विभागीय आयुक्त सौम्या अग्रवाल, जिल्हाधिकारी मनीष वर्मा आणि पोलीस आयुक्त जोगिंदर कुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती.

फोटो स्रोत, ANI
सौम्या अग्रवाल म्हणाल्या, "शंकराचार्य त्यांचा रथ आणि जवळपास 200 अनुयायांसह संगमावर पोहोचले होते. रात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेदरम्यान संगमावर प्रचंड गर्दी आणि धुकं होतं. त्या वेळेस रथासह तिथं जाणं सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक होतं."
त्या म्हणाल्या, "त्यांना (शंकराचार्य) पालखीतून खाली उतरून पायी जाण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचे अनुयायी आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला आणि धक्काबुक्की झाली. यादरम्यान अविमुक्तेश्वरानंद यांच्या अनुयायांनी बॅरिकेड्सचंही मोठं नुकसान केलं."
त्यानंतर मेळा प्राधिकरणानं अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस जारी केली होती.
या नोटीस नुसार, "त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी 18 जानेवारीला त्रिवेणी संगमावर जबरदस्ती जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊ शकली असती."
प्राधिकरणानं विचारलं की, स्वामींना भविष्यात मेळ्यात उपस्थित राहण्यापासून का रोखण्यात येऊ नये आणि यावर त्यांच्याकडून उत्तर मागण्यात आलं.
मात्र आणखी एका नोटिसमध्ये, मेळ्याच्या अधिकाऱ्यांनी 2022 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत त्यांच्याकडून 'शंकराचार्य' या पदवीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करून वाद आणखी वाढवला.
त्याला उत्तर देताना अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "प्रशासन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री किंवा देशाचे राष्ट्रपती ठरवणार नाहीत की कोण शंकराचार्य आहे."
राजकीय आरोप-प्रत्यारोप

प्रयागराजमध्ये 27 जानेवारीला, कॉम्प्युटर बाबा आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांनी अविमुक्तेश्वरानंद यांची भेट घेतली आहे.
समाजवादी पार्टीनं अविमुक्तेश्वरानंद यांना पाठिंबा दिला आणि पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रयागराजला जाऊन त्यांची भेट घेतल्यानंतर या वादाला राजकीय वळण मिळालं.
अखिलेश यादव म्हणाले, "जर एखाद्या अधिकाऱ्यानं शंकराचार्यांकडे त्यांचं प्रमाणपत्र मागितलं, तर सनातन धर्माचा यापेक्षा मोठा अपमान आणखी असू शकत नाही. साधू आणि संतांचा अपमान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात आम्ही उभे राहू, मग ते सरकार असो की एखादी व्यक्ती."
अविमुक्तेश्वरानंद यांना पाठिंबा देत माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीदेखील वक्तव्यं केलं. उमा भारती यांनी एक्सवर लिहिलं, "मला विश्वास आहे की, स्वामी अविमुक्तेश्वरानंदजी महाराज आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये काहीतरी सकारात्मक तोडगा निघेल."
त्यांनी पुढे म्हटलं, "मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शंकराचार्य असण्याचा पुरावा मागणं, हे प्रशासनानं त्यांच्या मर्यादा आणि अधिकारांचं केलेलं उल्लंघन आहे. हा अधिकार फक्त शंकराचार्यांचा आणि विद्वानांच्या परिषदेचा आहे."
अर्थात या प्रकरणाबाबत भाजपाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांना स्नान करण्याचं आवाहन केलं होतं.

फोटो स्रोत, Shailendra
केशव प्रसाद मौर्य म्हणाले, "मी ज्योतिष्पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या चरणी नमस्कार करतो. त्यांना विनंती आहे की, त्यांनी स्नान करून हे प्रकरण संपवावं."
या प्रकरणाबाबत ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ कलहंस म्हणाले, "केशव प्रसाद मौर्य जे म्हणाले ती पक्षाच्या हायकमांडची भूमिका आहे. तर जिल्हा प्रशासनानं घेतलेली भूमिका उत्तर प्रदेशच्या सरकारच्या भूमिकेनुसार आहे. या प्रकरणाबाबत पक्षात अस्वस्थता दिसते आहे."
अर्थात मुख्यमंत्री आदित्यनाथ या प्रकरणात कोणाचंही नाव न घेता म्हणाले की 'काहीजण कालनेमि' आहेत.
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी गुरुवारी (29 जानेवारी) हरियाणातील सोनीपतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात भाषण करताना हे वक्तव्यं केलं.
ते म्हणाले, "धर्माच्या आडून सनातन धर्माला कमकुवत करण्याचा कट आखणारे अनेक कालनेमि असतील. आपल्याला त्यांच्यापासून सावध राहावं लागेल. आपल्याला त्यांच्यापासून सतर्क राहावं लागेल."
'कालनेमि'वाल्या वक्तव्यामुळे वाढला वाद
हिंदू पौराणिक कथेनुसार, रामायणात 'कालनेमि'चा उल्लेख आढळतो. तो एक मायावी राक्षस आणि रावणाचा भाऊ होता.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "एक राजकारणी जो मुख्यमंत्री आहे, तो शिक्षणाबद्दल बोलत नाही, आरोग्याबद्दल बोलत नाही, कायदा-सुव्यवस्थेबद्दल बोलत नाही, राज्याच्या समृद्धीबद्दल बोलत नाही, तो कालनेमि आणि धर्म-अधर्माबद्दल बोलतो. हे कितपत योग्य आहे?"
ते म्हणाले, मुख्यमंत्र्यानं आपल्या राज्याच्या समृद्धीबद्दल बोललं पाहिजे, धर्म-अधर्माचा मुद्दा धर्माचार्यांवर सोडला पाहिजे."
अर्थात राज्य सरकारला पाठिंबा देत रामभ्रदाचार्य म्हणाले, "गंगेपर्यंत रथ नेता येत नाही, अशा नियम आहे. पोलिसांनी त्यांना अडवलं होतं की तुम्ही जाऊ नका...आम्ही स्वत: संगमात पायी जातो. त्यामुळे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी अन्याय केला होता. त्यांच्यावर अन्याय झालेला नाही."
अर्थात द्वारका शारदा पिठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना पाठिंबा दिला.

ते म्हणाले, "तीन शंकराचार्यांनी अविमुक्तेश्वरानंद यांना पाठिंबा दिला आहे आणि प्रशासनानं त्यांच्याकडे प्रमाणपत्र मागणं चुकीचं आहे."
काँग्रेसनं देखील अविमुक्तेश्वरानंद यांना पाठिंबा दिला होता. अर्थात गेल्या वर्षी अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची मागणी केली होती.
बुधवारीच (28 जानेवारी) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी त्यांची भेट घेतली होती.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती कोण आहेत?
आदि शंकराचार्यांनी देशाच्या चार दिशांना चार मठ स्थापन केले होते. त्यांना पीठ म्हटलं जातं.
देशात चार शंकराचार्य आहेत. श्रृंगेरी मठ, गोवर्धन पीठ, द्वारका पीठ, आणि ज्योतिर्मठ. गुरू शिष्य परंपरेनुसार शंकराचार्याची निवड केली जाते.
अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा जन्म 15 ऑगस्ट 1969 ला उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात झाला होता.
ते जगद्गुरू स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य आहेत. त्यांनी 2003 मध्ये संन्यास घेतला.
प्रतापगडमधील ब्राह्मणपुर गावात जन्मलेल्या उमाशंकर पांडेय यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण प्रतापगडमध्येच घेतलं. नंतर ते गुजरातला गेले, तिथे त्यांचं पुढील शिक्षण झालं.
त्यांनी जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्याकडून दीक्षा घेतली. त्यांना 15 एप्रिल 2003 ला दंड संन्यासाची दीक्षा मिळाली. त्यानंतर त्यांचं नवीन नाव स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती झालं.
त्यानंतर ते उत्तराखंडमधील ज्योतिर्मठमधील धार्मिक आणि प्रशासकीय कामकाजावर देखरेख करू लागले.
त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे की ते गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे सर्वात प्रमुख शिष्य होते आणि पिठाच्या बहुतांश जबाबदाऱ्या त्यांच्याच खांद्यावर होत्या.

11 सप्टेंबर 2022 ला स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनानंतर, त्यांनी ज्योतिष पीठ (ज्योतिर्मठ) चे शंकराचार्य म्हणून कार्यभार सांभाळला.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती विद्यार्थी राजकारणात देखील सक्रिय होते.
ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ कलहंस म्हणतात, "त्यांनी 1994 मध्ये संपूर्णानंद विद्यापीठात एबीव्हीपीकडून विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली होती."
त्यांच्यावर विरोधी पक्षाला पाठिंबा दिल्याचा आरोप होतो आहे. मात्र वेळोवेळी ते सरकारांशी लढत आले आहेत.
समाजवादी पार्टीच्या सरकारच्या काळात त्यांच्यावर लाठीचार्ज देखील झाला होता. त्यावेळेस ते गंगेत मूर्ती विसर्जनावर बंदी घालण्याविरोधात रस्त्यावर उतरले होते.
गंगेला 2008 मध्ये राष्ट्रीय नदी जाहीर करण्यासाठी त्यांनी दीर्घ उपोषण केलं होतं.
वाराणसीत काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या वेळेस मंदिरं तोडली जाण्याचा त्यांनी विरोध केला होता आणि ज्ञानवापीमध्ये पूजा करण्याच मागणी केली होती.
जानेवारी 2024 मध्ये, अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेकाच्या आधी, अविमुक्तेश्वरानंद यांनी त्या समारंभात सहभागी होण्यास नकार दिला होता. तसंच त्यावेळेस 'बांधकामाधीन असलेल्या मंदिरा'साठी अभिषेक समारंभ आयोजित करण्यावर आक्षेप देखील घेतला होता.
एक वर्षापूर्वी, त्यांनी उत्तरांखडमधील केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोनं गायब झाल्याचाही आरोप केला होता. याला त्यांनी 'घोटाळा' म्हटलं होतं.
शंकराचार्य होण्याबद्दलचा काय होता वाद?
सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबर 2022 ला ज्योतिर्मठचे शंकराचार्य म्हणून अविमुक्तेश्वरानंद यांच्या पट्टाभिषेक करण्यावर स्थगिती दिली होती.
याचिकेत आरोप करण्यात आला होता की अविमुक्तेश्वरानंद यांनी स्वत:ला ज्योतिर्मठाचा उत्तराधिकारी शंकराचार्य म्हणून जाहीर करून न्यायालयाच्या कारवाईला निष्फळ करण्याचा प्रयत्न केला होता. जेणेकरून एक 'अयोग्य आणि अपात्र व्यक्ती' अनधिकृतरित्या पदावर राहू शकेल.
अविमुक्तेश्वरानंद यांचे जवळच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे की हिंदू परंपरेत कोणतंही पीठ शंकराचार्यांशिवाय राहणं मान्य नाही.
त्यांचा दावा आहे की ते स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे मुख्य शिष्य होते. तसंच इतर शंकराचार्यांनी त्यांच्याबाबत कोणताही औपचारिक आक्षेप घेतला नव्हता.
त्यांचा असाही युक्तिवाद आहे की सर्वोच्च न्यायालयानं दिलेली स्थगिती फक्त पट्टाभिषेकच्या औपचारिक प्रक्रियेवर आहे. ती शंकराचार्य म्हणून काम करण्याच्या किंवा त्या पदवीचा वापर करण्याबाबत नाही.

फोटो स्रोत, ANI
जून 2024 मध्ये भाजपानं लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाच्या निमित्तीनं त्यांच्यावर हिंदूंना हिंसक म्हटल्याचा आरोप केला होता. त्यावेळेस स्वामी अविमुक्तेश्वरानंद, राहुल गांधी यांच्या बचावासाठी पुढे आले होते.
ते म्हणाले होते की राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो आहे.
त्यावेळेस पत्रकारांशी बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले होते, "आम्ही राहुल गांधींचं संपूर्ण भाषण नीट ऐकलं आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की हिंदू धर्म हिंसेचं समर्थन करत नाही."
अर्थात, त्यानंतर एक वर्षानंतरच स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची घोषणा केली होती.
त्यांचा आरोप होता की राहुल गांधी यांनी मनुस्मृती या प्राचीन संस्कृत ग्रंथाचा 'अपमान' केला आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मनुस्मृतीला सनातन धर्माचा पाया म्हणत दावा केला की राहुल गांधी यांनी लोकसभेत या ग्रंथाचा अपमान करणारी वक्तव्यं केली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











