खालिदा झियांना श्रद्धांजली देण्यासाठीच्या जयशंकर यांच्या बांगलादेश भेटीवर का होत आहे चर्चा?

बांगलादेशच्या हंगामी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार तौहिद हुसैन यांची भेट घेताना जयशंकर.

फोटो स्रोत, @hamidullah_riaz

फोटो कॅप्शन, बांगलादेशच्या हंगामी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार तौहिद हुसैन यांची भेट घेताना जयशंकर.
    • Author, सजल दास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बीएनपीच्या अध्यक्ष खालिदा झिया यांना श्रद्धांजली देण्यासाठी बांगलादेशमध्ये आलेले भारताचे परराष्ट्र मंत्री आणि हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार यांच्यात कोणतीही औपचारिक बैठक झाली नाही. त्यामुळं यावरून अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत.

भारत सरकारकडून पाठवण्यात आलेल्या शोक संदेशातील भाषेबद्दही चर्चा केली जात आहे.

खालिदा झिया यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेक देशांचं सरकारी प्रतिनिधी बांगलादेशच्या दौऱ्यावर आले होते.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशिवाय पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक, भूतानचे परराष्ट्र मंत्री लेओनपो डी. एन. धुंगेल, नेपाळचे परराष्ट्र मंत्री बाला नंदा शर्मा, श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ आणि मालदीवचे शिक्षण मंत्री अली हैदर अहमददेखील बांगलादेशात आले.

मुख्य सल्लागारांच्या प्रेस विंग आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानुसार, आलेल्या नेत्यांपैकी पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष आणि नेपाळचे परराष्ट्र मंत्री यांच्याबरोबर बांगलादेशचे मुख्य सल्लागार प्राध्यापक मोहम्मद युनूस यांची औपचारिक बैठक झाली.

तर भारत, भूतान, श्रीलंका आणि मालदीव या देशांच्या प्रतिनिधींबरोबर कोणतीही बैठक झाली नाही.

इतर देशांबाबत फारशी चर्चा झाली नाही. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी भेट न होण्याबाबत वेगवेगळी स्पष्टीकरणं आणि विश्लेषण समोर येत आहेत.

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते महबूबुल आलम म्हणाले की, या छोटेखानी दौऱ्यात भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची भलेही मुख्य सल्लागारांबरोबर भेट झाली नाही. मात्र, कायदे सल्लागार आसिफ नजरुल आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांबरोबर त्यांच्या बैठका झाल्या.

ढाक्यात खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांच्याबरोबर भारताचे परराष्ट्र मंत्री

फोटो स्रोत, @hamidullah_riaz

फोटो कॅप्शन, ढाक्यात खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांच्याबरोबर भारताचे परराष्ट्र मंत्री

भविष्यातील संबंधांवर लक्ष

दरम्यान हंगामी सरकारचे परराष्ट्रविषयक सल्लागार तौहीद हुसैन म्हणाले की, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्याकडे द्विपक्षीय संबंध किंवा राजकीय दृष्टीकोनातून न पाहणंच योग्य ठरेल.

त्यांनी खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्काराला भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी उपस्थित असण्याला 'एक सकारात्मक संकेत' म्हटलं. मात्र असंही म्हटलं की, दोन्ही देशांमधील तणावाच्या संबंधांना या दौऱ्यामुळं किती दिलासा मिळेल, हे 'काळच ठरवेल'.

याशिवाय, खालिदा झिया यांच्या निधनावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या शोक संदेशाचंही विश्लेषण करण्यात येतं आहे.

बांगलादेशच्या हंगामी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार तौहीद हुसैन यांच्यासोबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

फोटो स्रोत, @DrSJaishankar

फोटो कॅप्शन, बांगलादेशच्या हंगामी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार तौहीद हुसैन यांच्यासोबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

आंतरराष्ट्रीय संबंधांबाबतच्या अनेक विश्लेषकांना वाटतं की, बीएनपीच्या अध्यक्षांना श्रद्धांजली देण्यासाठी भारताच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याचा दौरा आणि भारत सरकारचा शोक संदेश हा भविष्यातील संबंध पुढे नेण्याबाबत भारताच्या भूमिकेचा स्पष्ट संकेत आहे.

अर्थात, त्यांना असंदेखील वाटतं की यामुळे विद्यमान बांगलादेश सरकारबरोबरचं भारताचं अंतर आणखी स्पष्ट झालं आहे.

बुधवारी (31 डिसेंबर) खालिदा झिया यांच्या अंत्ययात्रेच्या आणि दफनविधीच्या दिवशी भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि भूतानच्या प्रतिनिधींनी आपापल्या सरकारांच्या वतीनं तारिक रहमान यांना शोक संदेश दिले.

यादरम्यान कायदे सल्लागार आसिफ नजरुल आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलीलूर रेहमान यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांनी बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांची भेट घेतली.

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयानं काय म्हटलं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यानंतर प्रश्न निर्माण होतो की, एस जयशंकर यांनी मुख्य सल्लागारांची भेट का घेतली नाही?

परराष्ट्रविषयक बाबींचे सल्लागार तौहीद हुसैन यांनी गुरुवारी (1 जानेवारी) या प्रश्नाचं उत्तर पत्रकारांना दिलं.

ते म्हणाले की, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या या दौऱ्याकडे द्विपक्षीय संबंधांच्या किंवा डिप्लोमॅटिक दृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही.

ते म्हणाले, "भारताचे परराष्ट्र मंत्री आले, त्यांचा दौरा छोटेखानी होता. मात्र ते संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यानंतर गेले."

जयशंकर यांच्याबरोबर कोणतीही खासगी बैठक न होण्याचा उल्लेख करत ते म्हणाले, "समोरा-समोर आमची कोणतीही चर्चा झाली नाही. अशी कोणतीही संधी मिळाली नाही.

परदेशातून आलेले इतर पाहुणेदेखील होते. पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्षदेखील होते. त्यांच्याशीदेखील त्यांनी हस्तांदोलन केलं. हा एक शिष्टाचार आहे, ज्याचं पालन सर्वजण करतात."

ते म्हणाले, "माझं त्यांच्याशी जे बोलणं झालं, ते डिप्लोमॅटिक नव्हतं. ते पूर्णपणे शिष्टाचाराअंतर्गत, सर्वांसमोर झालं. त्यामुळे द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्याची कोणतीही संधी नव्हती."

बीएनपीच्या अध्यक्ष खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्कारात राष्ट्रीय संसद भवनाच्या दक्षिण प्लाझामध्ये मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले.

ढाक्यात खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांची भेट घेताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जसशंकर

फोटो स्रोत, @hamidullah_riaz

फोटो कॅप्शन, ढाक्यात खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांची भेट घेऊन भारताचे परराष्ट्र मंत्री एस जसशंकर यांनी पंतप्रधान मोदींचं पत्र दिलं होतं.

बीएनपीचे नेते आणि कार्यकर्त्यांबरोबर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते आणि अनेक देशांच्या सरकारांचे प्रतिनिधीदेखील श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले होते.

आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विश्लेषकांना वाटतं की, खालिदा झिया यांना श्रद्धांजली वाहून आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन अनेक देशांनी बांगलादेशबरोबर भविष्यात संबंध पुढे नेण्यासाठी डिप्लोमॅटिक संदेश दिला आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या शेजारी देश असलेल्या बांगलादेश दौऱ्याला विशेष महत्त्व दिलं जातं आहे.

ढाका विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंधांच्या प्राध्यापक लाइलुफर यास्मीन यांना वाटतं की खालिदा झिया यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शोक संदेश आणि भारताचे परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा, हे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दिशेनं उचललेलं पाऊल आहे.

त्या म्हणाल्या, "भारत गेल्या दीड वर्षापासून बांगलादेशच्या ज्या अंतर्गत भावना समजण्यात अपयशी ठरला होता, त्या भावना अखेर भारताला समजल्या आहेत, याचं हे एक चिन्ह आहे."

अर्थात, यास्मीन यांना वाटतं की मुख्य सल्लागाराशी भेट न होण्याकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचं कोणतंही कारण नाही.

भेट न घेण्याचा निर्णय कोणाचा?

त्या म्हणतात, "भेट का झाली नाही, याचे अंदाज बांधले जाऊ शकतात. कदाचित वेळेचा प्रश्न असेल. याशिवाय, जयशंकर कोणाला भेटले? त्यांच्याकडे वेळ होता की नाही? याकडे दोन्ही बाजूंनी पाहावं लागेल."

तर, माजी राजदूत मुंशी फैज अहमद यांना वाटतं की, या दौऱ्यातून हे आणखी स्पष्ट झालं आहे की भारताचे बांगलादेशच्या विद्यमान सरकारबरोबर चांगले संबंध नाहीत.

त्यांच्या मते, भारताला या दौऱ्यातून हा संदेशदेखील द्यायचा होता की, भारताला बांगलादेशबरोबर चांगले संबंध हवे आहेत.

त्यांना वाटतं की, मुख्य सल्लगाराशी भेट न होण्यामागचं कारण हे आहे की भारत भविष्याकडे पाहतो आहे.

मुंशी फैज अहमद यांचं असंही म्हणणं आहे की मागच्या अनुभवांच्या आधारे कोणताही देश द्विपक्षीय संबंधांवर अतिरिक्त चर्चा करू इच्छित नाही.

ते बीबीसीला म्हणाले, "जयशंकर यांना भेटायचं नसेल आणि बांगलादेशनंदेखील विशेष रस दाखवला नाही, अशी शक्यता आहे. ते जे काम करण्यासाठी आले होते, ते केलं आणि निघून गेले. यात चिंतेची कोणतीही बाब नाही."

बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांची भेट घेताना पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष सादिक अयाज

फोटो स्रोत, @ChiefAdviserGoB

फोटो कॅप्शन, बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांची भेट घेताना पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष सादिक अयाज

माजी राजूदत आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विश्लेषकांना वाटतं की बीएनपीच्या अध्यक्ष खालिदा झिया यांच्या निधनानंतर दक्षिण आशियातील अनेक देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीनं, पुन्हा एकदा प्रादेशिक राजकारणातील बांगलादेशचं महत्त्व स्पष्ट झालं आहे.

अर्थात त्यांना असंही वाटतं की अवामी लीगचं सरकार सत्तेतून हटवण्यात आल्यानंतर बांगलादेश आणि भारत यांच्यातील बिघडलेले संबंध लवकर आधीसारखे होणार नाहीत.

विश्लेषकांचं म्हणणं आहे की खालिदा झिया यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारे पाठवण्यात आलेला शोक संदेश भू-राजकीय आणि डिप्लोमॅटिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे.

त्यांच्या मते, या संदेशाच्या माध्यमातून भारतानं द्विपक्षीय संबंधांमध्ये एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.

अनेक विश्लेषक जयशंकर यांनी घेतलेली तारिक रहमान यांची भेट आणि मुख्य सल्लागारांशी प्रत्यक्ष भेट न होण्याकडे 'भविष्यातील राजकारणाच्या तयारी'च्या दृष्टीकोनातून पाहत आहेत.

भारतासाठी बीएनपी हाच पर्याय?

माजी राजदूत मुंशी फैज अहमद यांचं म्हणणं आहे की आगामी निवडणुकींमध्ये बीएनपी सत्तेत येऊ शकते, असं मानून भारत बीएनपीबरोबर संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे.

ते म्हणाले, "आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. सद्यपरिस्थितीत बीएनपी हीच भारताची पहिली पसंत आहे."

विश्लेषकांचं म्हणणं आहे की भारत आणि बीएनपीमध्ये प्रदीर्घ काळापासून एक प्रकारचं 'अंतर' आणि 'अविश्वास' राहिला आहे.

अर्थात, खालिदा झिया यांच्या निधनावर नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात आलेल्या सरकारी आणि वैयक्तिक शोक संदेशातून हे सिद्ध होतं की भारताला आता बीएनपीबरोबरचे संबंध सामान्य करायचे आहेत आणि डिप्लोमॅटिक संपर्क वाढवायचा आहे.

विश्लेषकांना असंही वाटतं की भारतानं या संधीचा वापर करून हंगामी सरकारबद्दलची अस्वस्थता काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

भारत सरकारच्या शोक संदेशात बांगलादेश आणि भारतामध्ये प्रदीर्घ काळापासून असलेल्या ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख करण्यात आला.

संदेशात बांगलादेशमधील स्थैर्य आणि लोकशाहीतील सातत्य यावरदेखील भर देण्यात आला.

खालिदा झिया यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला सन्मान देऊन भारतानं बांगलादेशच्या अंतर्गत राजकारणात सहभागी होण्याचा आणि मैत्रीचा हात पुढे करण्याचा संदेशदेखील दिला आहे.

संदेशात म्हटलं आहे, "मला दृढविश्वास आहे की तुमच्या (तारिक रहमान) सक्षम नेतृत्वाखाली बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीमध्ये त्यांच्या (खालिदा झिया) मूल्यांना पुढे नेलं जाईल आणि नवीन सुरुवातीची खातरजमा करत, यातून भारत-बांगलादेशमधील घनिष्ठ आणि ऐतिहासिक भागीदारीला अधिक समृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन होईल."

आंतरराष्ट्रीय संबंधांचे विश्लेषक या भागाला विशेष महत्त्वाचं मानतात. त्यापैकी काहींचं म्हणणं आहे की मोदी यांचा हा संदेश मूलत: 'भूतकाळ विसरून भविष्याकडे पाहण्याचा' आणि बांगलादेशच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत प्रमुख राजकीय शक्तींबरोबर काम करण्याच्या इच्छेचा संकेत आहे.

अर्थात, ढाका विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे प्राध्यापक लाइलुफर यास्मीन या संदेशाला डिप्लोमॅटिक दृष्टीकोनातून फार वेगळं समजत नाहीत.

त्या म्हणतात, "जेव्हा कोणत्याही पक्षाच्या नेत्याला संदेश दिला जातो, तेव्हा 'नेतृत्व' शब्दाचा वापर केला जातो. मात्र याचा असा अर्थ नाही की त्यांनी (नरेंद्र मोदी) असं म्हटलं आहे की बीएनपीचा निवडणुकीत विजय होईल. याचा इतका सोपा अर्थ काढणं योग्य ठरणार नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.