अमेरिकेत पत्नी अन् मुलासमोरच भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या; डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

फोटो स्रोत, Chandramouli Nagamallaiah
- Author, इमरान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात चंद्रमौली नागमल्लैया (वय 50 वर्षे) या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
चंद्रमौलींचं शिक्षण बंगळूरूमध्ये झालं होतं. ते आधी तिप्पासंद्रा आणि नंतर आरटी नगर परिसरात राहत होते.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रमौली त्यांच्या मनमिळाऊ आणि हसतमुख स्वभावामुळे सर्वांना आवडायचे.
त्यांचे जुने मित्र बी. एस. व्यंकटेश यांनी बीबीसीला सांगितलं, "त्याच्यावर नाराज होणं कठीण होतं. तो लगेच तुमचा हात पकडायचा आणि त्याच्या स्मितहास्यानं सर्वांना आपलसं करून घ्यायचा."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडियावर लिहिलं आहे की, "चंद्रमौली यांच्या 'भयावह हत्ये'बद्दलच्या बातम्यांची माहिती मिळाली. क्युबातून आलेल्या एका बेकायदेशीर स्थलांतरितानं चंद्रमौली यांची त्यांची पत्नी आणि मुलासमोर निर्घृणपणे हत्या केली. असं आपल्या देशात कधीही व्हायला नको होतं."
ट्रम्प म्हणाले की, आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येईल.
चंद्रमौली यांना ओळखणारे त्यांच्याबद्दल काय म्हणतात?
डलासमधून आलेल्या वृत्तांनुसार, चंद्रमौली यांच्यावर योरदानिस कोबोस-मार्टिनेज या मोटलमधील कर्मचाऱ्यानं हल्ला केला होता.
असा आरोप आहे की, चंद्रमौली यांनी दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला वॉशिंग मशीनच्या दुरुस्तीशी निगडीत सूचना मार्टिनेजला देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर अनेक वार करण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली.
एका शेजाऱ्यानं सांगितलं, "आम्ही पाहिलेला तो व्हीडिओ खूपच भयानक होता."
चंद्रमौली आधी तिप्पासंद्रामध्ये एक छोटंसं रेस्टॉरंट चालवायचे. नंतर ते आरटी नगर मध्ये राहण्यास गेले. तिथे त्यांनी पेईंग गेस्टचा (पीजी) व्यवसाय सुरू केला.
तिप्पासंद्राचे माजी नगरसेवक अभिलाष रेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही सर्व त्यांना ओळखायचो. ते खूप मनमिळाऊ व्यक्ती होते. एक चांगले मित्र होते. आम्हाला जेव्हा त्यांच्याबाबतच्या या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा आम्हा सर्वांना धक्का बसला."
"आमच्या स्थानिक रेसिडेंट्स ग्रुपमधील सर्वजण देखील हादरले. अनेकांचा तर यावर विश्वासच बसला नाही."
चंद्रमौली यांचे मित्र व्यंकटेश म्हणाले की, "त्याच्याबद्दल कोणाचीही काहीही तक्रार नव्हती. त्याची हत्या करण्यात आली आहे, ही अविश्वसनीय गोष्ट आहे. तो कोणालाही त्रास देणारा व्यक्ती नव्हता. या हत्येत काहीतरी गडबड आहे, जी माझ्या लक्षात येत नाहीये."
आरटी नगरमधील सरकारी कर्मचारी असलेले आणखी एक शेजारी त्यांचं नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, "ते खूप चांगले व्यक्ती होते. आम्हाला जेव्हा ही बातमी कळली, तेव्हा खूप दु:ख झालं. त्यांचं कुटुंबं खूप चांगलं आहे. त्यांचा मुलगा देखील माझ्या मुलाचा मित्र होता. दोन्हीं मुलं एकत्र खेळायचे."
ते पुढे म्हणाले, "माझा मुलगा खूप अस्वस्थ झाला आहे. कारण गौरव (चंद्रमौली यांचा मुलगा) त्याचा चांगला मित्र होता."
शेजाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, चंद्रमौली यांची मेहुणी आणि त्यांचा पती डलासमध्येच राहतात. त्यांचा मोटलचा व्यवसायदेखील आहे.
आणखी एका शेजाऱ्यानं सांगितलं, "त्यांच्याबरोबर असं घडलं याचं आम्हाला खूप दु:ख आहे. त्यांचं कुटुंब खूप शांत स्वभावाचं होतं. आम्हाला नेहमी त्यांचा हसतमुख चेहराच आठवतो."
चंद्रमौली यांच्या आईची तब्येत बरी नसते. आता त्या तिप्पासंद्रामधील घरातून एका नातेवाईकाकडे गेल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ही फक्त एक हत्या नाही, तर अमेरिकेच्या सुरक्षा आणि स्थलांतरितांशी निगडीत धोरणाबाबतचा एक गंभीर प्रश्न आहे.
ट्रम्प यांनी लिहिलं, "मला टेक्सासमधील डलासमध्ये चंद्र नागमल्लैया यांच्या हत्येच्या भयावह बातम्यांची माहिती मिळाली आहे. ते एक सन्मानित व्यक्ती होते. त्यांची पत्नी आणि मुलासमोर क्युबातून आलेल्या एका बेकायदेशीर स्थलांतरितानं त्यांची निर्घुण हत्या केली. असे लोक आपल्या देशात कधीच नसायला हवेत."
राष्ट्राध्यक्षांनी असादेखील दावा केला की आरोपीला आधीदेखील अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती. ते म्हणाले, "या व्यक्तीला आधीदेखील गंभीर गुन्ह्यांसाठी अटक झाली होती. त्यात बालशोषण, कार चोरी आणि चुकीच्या पद्धतीनं ताब्यात घेण्याचा समावेश आहे. मात्र, जो बायडन यांच्या सरकारच्या काळात त्याला पुन्हा आपल्या देशात सोडण्यात आलं, कारण क्युबाला असा माणूस त्यांच्या देशात नको होता."

फोटो स्रोत, Reuters
या वक्तव्यात ट्रम्प यांनी स्थलांतरितांच्या धोरणाबाबत कडक भूमिका घेत म्हटलं, "या बेकायदेशीर गुन्हेगार स्थलांतरितांशी मवाळपणे वागण्याची वेळ आता संपली आहे."
अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागानुसार, कोबोस-मार्टिनेज हा एक बेकायदेशीर स्थलांतरित आहे. त्याची अमेरिकेतून हद्दपार करण्याचा अंतिम आदेश जारी करण्यात आला होता.
या विभागानं दावा केला की त्याला डलासमधील एक डिटेंशन सेंटरमध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, यावर्षी जानेवारी महिन्यात त्याला ऑर्डर ऑफ सुपरव्हिजन म्हणजे देखरेखीच्या आदेशाखाली सोडण्यात आलं होतं. कारण क्युबानं "त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे" त्याचा स्वीकार करण्यास नकार दिला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)










