‘एक्स’ला सोडून ‘ब्लूस्काय’कडे वळतायेत यूजर्स, कोण आहे या नव्या प्लॅटफॉर्मचे मालक?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, टॉम जरकेन
- Role, टेक्नोलॉजी रिपोर्टर
गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर ब्लूस्काय हा शब्द सतत दिसतोय. इंटरनेट वापरकर्त्यांमध्येही त्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
इलॉन मस्कच्या ‘एक्स’ (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध असणारा हा चांगला पर्याय असल्याचं म्हटलं जातंय. ब्लूस्कायचा लोगो आणि त्याचे रंगही एक्ससारखेच आहेत.
ब्लूस्कायची प्रसिद्धी वेगाने वाढत आहे. दररोज यावर जगभरातून दहा लाख नवीन अकाऊंट्स तयार होत आहेत. ही बातमी तुम्ही वाचत असताना, या नव्या प्लॅटफॉर्मचे 1.67 कोटी वापरकर्ते होते. आतापर्यंत तेही वाढले असतील.
हे ब्लूस्काय नेमकं आहे काय? आणि लोकांमध्ये याला का पसंती दिली जात आहे? ते समजून घेऊया.
काय आहे ब्लूस्काय अॅप?
ब्लूस्काय एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असल्याचं कंपनीनं म्हटलंय. ते खरंच आहे. कोणत्याही दुसऱ्या सोशल मीडिया अॅपसारखंच ते आहे.
प्लॅटफॉर्म उघडल्यावर डाव्या बाजुला एक बार दिसतो. त्यावर सर्च, नोटिफिकेशन, होम पेज आणि असे अनेक पर्याय उपलब्ध असतात.
या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करतात येतात. तसंच, इतरांच्या पोस्टवर कमेंट करता येतात आणि आपल्याला आवडलेल्या दुसऱ्यांच्या पोस्ट लाइक आणि रिपोस्टही करता येतात.

फोटो स्रोत, Bluesky
सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक्ससारखं म्हणजे पूर्वीच्या ट्वीटरसारखंच दिसतं.
पण त्यात फरक आहे, तो माहितीच्या विकेंद्रीकरणाचा. म्हणजे प्लॅटफॉर्म वापरणारा त्याची माहिती कंपनीकडून वापरल्या जाणाऱ्या सर्वरसोबतच इतर सर्वर्सवरही टाकू शकतो.
त्यामुळे इतर कोणत्याही अकाउंटवरूनही यूजर ब्लूस्कायवर साइन अप करू शकतात. पण बहुतेक लोक असं करत नाहीत. यावर नोंदणी करणारे बहुतेक लोक त्यांच्या यूजरनेमपुढं ''.bsky.social' असंच लावतात.


कोण आहेत ब्लूस्कायचे मालक?
ब्लूस्काय ट्विटरसारखंच दिसतं. कारण हा प्लॅटफॉर्म ट्विटरचे आधीचे मालक जॅक डोर्सी यांनीच बनवला आहे.
ब्लूस्कायला ट्विटरचंच विकेंद्रीत स्वरूप बनवणार असल्याचं त्यांनी मागे एकदा म्हटलंही होतं.
म्हणजे कोणतीही एक व्यक्ती किंवा संस्था त्याचा मालक असणार नाही.
पण प्लॅटफॉर्म विकसित करणाऱ्या समूहात आता जॅक डॉर्सी नाहीत. मे 2024 मध्येच ते कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधून बाहेर पडले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
ब्लूस्कायवरचं त्यांचं अकाउंटही त्यांनी सप्टेंबर महिन्यात बंद केलं.
आता जे ग्रॅबर याचे मुख्य अधिकारी म्हणून काम पाहतात. कंपनीतले बहुतेक शेअर त्यांच्या नावावर असले तरी अमेरिकन पब्लिक बेनिफिट कंपनी म्हणून ते हा प्लॅटफॉर्म चालवतात.
कशामुळे मिळतेय ब्लूस्कायला एवढी लोकप्रियता?
ब्लूस्काय 2019 पासून सुरू आहे. पण तेव्हा इन्व्हिटेशन म्हणजे आमंत्रण असेल तरच अॅपवर नोंदणी करता येत होती. हा नियम या वर्षी फेब्रुवारीपर्यंत लागू केलेला होता.
प्लॅटफॉर्म व्यापक स्तरावर सर्वांसाठी खुला करण्याआधी तंत्रज्ञानात झालेल्या चुका आणि इतर समस्या सोडवण्यासाठी डेव्हलपर्सना संधी मिळाली.
त्यानं बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या. पण नोव्हेंबर महिन्यात अचानक एवढे यूजर्स वाढल्यामुळे पुन्हा काही समस्या येऊ लागल्या. प्लॅटफॉर्म मध्येच बंद पडायला लागलं.
नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प जिंकून आल्यानंतर लगेचच या प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांमध्ये वाढ होणं हा निव्वळ योगायोग नव्हता.
एक्सचे मालक इलॉन मस्क ट्रम्प यांचे समर्थक आहेत. ट्रम्प यांच्या प्रशासनात त्यांच्यावर मोठी जबाबदारीही सोपवली आहे.
सहाजिकच, ट्रम्प यांच्या विरोधात असणा-यांनी एक्सचा वापर सोडून दिला आणि ब्लूस्कायचा पर्याय निवडला.

फोटो स्रोत, Bluesky
पण काही लोकांनी याशिवाय वेगळी कारणही सांगितली आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर गार्डियन या वृत्तपत्राने हा ‘विखारी मीडिया प्लॅटफॉर्म’ असल्याचं सांगून एक्सवर पोस्ट करणं बंद केलं.
आता ब्लूस्काय अॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड केलं जात आहे. गुरूवारी ब्रिटनमधून सर्वाधिक डाऊनलोड झालेल्या तीन अॅपमध्ये ब्लूस्कायचाही समावेश होता.
पॉप सिंगर लिजो यांच्यापासून ते टास्कमास्टरच्या ग्रेग डेविसपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी ब्लूस्काय वापरत असल्याचं जाहीर केलं. काहींनी तर एक्सचा मर्यादित वापर करणार किंवा ते वापरणं पूर्णपणे बंद करणार असल्याचंही सांगितलं आहे.
बेन स्टिलर, जॅमी ली कर्टिस आणि पेटन ओस्वाल्ट यांच्यासारखे अनेक मोठे लोक ब्लूस्कायवर येणार आहेत.
ब्लूस्कायच्या लोकप्रियतेत दिसणारी ही वाढ महत्त्वाची आहे. पण एक्सला आव्हान देता येईल अशी परिस्थिती अजून आलेली नाही.
एक्स यूजर्सची संख्या सांगत नाही. पण ती कोट्यवधीत असल्याचं म्हटलं जातं. दररोज २५ कोटी लोक एक्स वापरत असतात असं इलॉन मस्क मागे म्हणाले होते.
कशी होते ब्लूस्कायची कमाई?
काही आणि गुंतवणूकदारांकडून मिळालेली गुंतवणूक आणि भांडवलाच्या जोरावर ब्लूस्काय सुरू करण्यात आलं होतं. त्यासाठी कोट्यवधी डॉलर्सचं गोळा केले.
पण नवीन यूजर्स आले तसा प्लॅटफॉर्मचा खर्च इतका वाढला की, तो पूर्ण करण्यासाठी नवे मार्ग शोधावे लागले.
ट्विटर त्यांच्या भरभराटीच्या काळात जहिरातींच्या माध्यमातून पैसे कमावत असे. पण ब्लूस्कायने त्यापासून लांब रहायचं ठरवलं. त्याऐवजी त्यांनी सेवांवर शुल्क लावायचं ठरवलं. यूजरच्या नावाचं खास तयार केलेलं डोमेन नाव देऊन हे अॅप पैसे आकारू शकतं.
हे मॉडेल गुंतागुंतीचं वाटतं. पण या पद्धतीने खास तयार केलेलं डोमेन वापरल्यानंतर अॅप आणखी आपलंसं वाटतं. यूजर्सची अॅपबद्दची आपुलकी वाढते.
समजा एखाद्याचं यूजर नेम @twgerken.bsky.social असं असेल तर @twgerken.bbc.co.uk. असं यूजरनेम जास्त अधिकृत वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
ही कल्पना अकाउंट व्हेरिफाइड असल्याचंही काम करते. म्हणजे ज्या संस्थेकडे अशी वेबसाईट असेल त्यांनाच ते यूजरनेम वापरण्याची परवानगी देता येईल.
ब्लूस्काय जाहिरातीतून पैसा कमावणार नसेल तर अर्थातच युजर्स कडून नोंदणी करताना वर्गणी घेतली जाईल. तरच त्यांना प्लॅटफॉर्म चालवणं शक्य असेल.
यातून फार पैसा कमावता आला नाही तरी त्यात वेगळं काही नाही. बहुतेक तंत्रज्ञानातल्या स्टार्ट अप्सची सध्या हीच स्थिती आहे.
इलॉन मस्क यांनी 2022 मध्ये ट्विटर खरेदी केलं होतं. त्याआधी आठ वर्षांत ट्विटरला नफा फक्त दुपटीनं वाढवता आला होता.
मस्क यांनी ट्विटर किती किमतीत विकत घेतलं ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्यावेळी ट्विटरच्या मालकाला मस्क यांनी 44 अब्ज डॉलर दिले होते.
ब्लूस्कायचं भविष्य कसं असेल हे आत्ताच सांगता येत नाही. पण ज्या वेगानं त्याचा प्रसार होत आहे तोच वेग कायम राहिला तर, अनेक शक्यता वर्तवता येतील.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











