संदेशखाली : पश्चिम बंगालचं राजकारण पेटवणाऱ्या बेटाचा ग्राउंड रिपोर्ट

संदेशखाली

फोटो स्रोत, Shib Shanker Chatterji/BBC

    • Author, अमिताभ भट्टासाली
    • Role, बीबीसी न्यूज, बांगला

सुंदरबन परिसराच्या संदेशखाली बेटावर पोहोचण्यासाठी कालिंदी नदी ओलांडावी लागते. हा बांगलादेशातून घुसखोरी करण्यासाठीचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे.

नदीच्या अलिकडून धामाखाली घाटावरून नावेचा वापर करून संदेशखालीला जावं लागतं. त्याच ठिकाणी घुसखोरीच्या आरोपात बीएसएफनं अटक केलेल्या काही महिला आणि पुरुषांशी मी काही वर्षांपूर्वी बोललो होतो.

त्या सायंकाळी तीन नावांमध्ये बसून सीमेपलिकडून आलेल्या दीडशेपेक्षा अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. धामाखालीच्या त्या किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापलिकडं असलेलं संदेशखाली दिसत होतं.

पण काही दिवसांपूर्वीपर्यंत शांत असलेलं हेच बेट सध्या भारतीय राजकारणात सर्वाधिक चर्चेत आलेलं आहे. काही आठवड्यांपूर्वी या बेटावर महिलांकडून मोठ्या प्रमाणात झालेल्या आंदोलनानं ते राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं आहे.

महिला हातात काठ्या आणि झाडू घेऊन रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. शाहजहान शेख, शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांच्या अटकेची मागणी या महिला करत होत्या.

राज्यातील सत्ताधारी तृणमूल कांग्रेसचे हे तीन नेते आणि त्यांचे सहकारी दीर्घकाळापासून परिसरातील लोकांवर अत्याचार करत असल्याचा त्यांचा आरोप होता.

त्यांच्यावर लैंगिक शोषण आणि शेतजमिनी बळजबरीनं बळकावल्या असल्याचा आरोपही होता. शिबू हाजरा आणि उत्तम सरदार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

शाहजहान शेख फरार आहे. त्यामुळे या आरोपांवर त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

पीठा-पुली बनवण्यासाठी बोलवायचे

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हे आरोप करणारे लोक कुठं भेटतील अशी विचारणा आम्ही संदेशखालीमधील बाजारात एका दुकानदाराकडं केली.

त्यावर "संदेशखालीचा जवळपास प्रत्येक माणूस हा आरोप करत आहे. तुम्ही कुठल्याही भागात जा, तिथं तुम्हाला काही वर्षांपासून कसा अत्याचार सुरू आहे ते ऐकायला मिळेल," असं उत्तर मिळालं.

बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षाद्वारे काही अंतरावर गेल्यानंतर महिला आणि पुरुष रस्त्याच्या किनाऱ्यावर बांबू कापताना दिसले. पण कॅमेरा पाहून ते बोलायला तयार होत नव्हते.

एका महिलेनं म्हटलं, "माध्यमांमध्ये आमचे चेहरे दिसतील याची भीती आहे. यापूर्वी जे कोणी माध्यमांशी बोलले त्यांच्यावर हल्ले झाले, त्यांना धमक्या मिळाल्या."

पण काही वेळानं त्यांच्यापैकी एक महिला चेहरा झाकून बोलायला तयार झाल्या.

त्या म्हणाल्या की, "महिलांना पीठा-पुली (बंगालचा एक विशिष्ट पदार्थ जो तांदळाच्या पीठामध्ये खोवा भरून केला जातो) बनवण्यासाठी नेलं जात होतं. त्यांच्या घरात आई-बहिणी नाहीत का? त्यांच्या घरी कोणी पीठा-पुली बनवत नाही का? सुंदर महिलांना नेऊन पीठा-पुली का बनवून घेतलं जात होतं? कधी पीठा-पुली बनवण्याच्या बहाण्यानं, कधी मांस आणि भातच्या बहाण्यानं तर कधी पार्टीच्या मिटिंगच्या नावाखाली बोलावलं जातं. त्याची काहीही निश्चित अशी वेळ नव्हती."

संदेशखाली

फोटो स्रोत, Shib Shankar Chatterji/BBC

काही वेळानं आणखी एक महिला म्हणाली, "सायंकाळी सात वाजता, रात्री नऊ वाजता, 10 वाजता आणि अगदी रात्री 11 वाजताही बोलावलं जात होतं. तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात मिटिंगसाठी बोलवल्यानंतर जावंच लागत होतं. जे जाणार नाही त्यांच्या घरातील पुरुषांना दुसऱ्या दिवशी मारहाण केली जात होती."

एक पुरुषानं कॅमेऱ्यापासून चेहरा लपवत सांगितलं की, "समजा आज मिटिंग असेल तर त्यांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात न्यायचे. सुंदर आणि कमी वयाच्या महिला आणि तरुणींना निवडून-निवडून आत न्यायचे. लहान मुलं आणि वयस्कर महिलांना बाहेर बसवायचे. आतून दार लावून घेत होते. आतमध्ये काय होत होतं, हे सांगू शकत नाही."

आत नेमकं महिलांबरोबर काय होत होतं? या प्रश्नावर जवळपास सगळेच म्हणाले की, एवढी लज्जास्पद गोष्ट कशी सांगणार असं त्या महिला म्हणायच्या.

दुसरी एक महिला म्हणाली की, "तिथं महिलांवर अत्याचार केले जात होते. एखादी महिला किंवा तरुणी या अत्याचाराबाबत स्वतः सांगू शकत नव्हती? पोलिसांकडं गेल्यास ते नेत्यांकडे जाऊनच वाद संपवा असं सांगत होते. पाणी डोक्यावरून गेल्यानंतर रस्त्यावर उतरण्यासाठी आमचा नाइलाज झाला."

संदेशखालीच्या विविध गावांमध्ये फिरल्यानंतर मात्र, आम्हाला एकही अशी महिला भेटली नाही, जिच्या स्वतःबरोबर अशाप्रकारे लैंगिक शोषणाचा प्रकार घडला असेल.

सामूहिक बलात्काराचा आरोप

सुरुवातीला या आरोपांबाबत अनेकांना संशय वाटला. सोशल मीडियाच्या सध्याच्या काळात महिलांवर एवढे दिवस अत्याचार होऊनही हे प्रकरण समोर कसं आलं नाही? असे प्रश्न उपस्थित होत होते.

संदेशखालीमध्ये यावरून गोंधळ सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत त्या परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (आरएसएस) वर्चस्व असल्याचं सांगितलं होतं.

"त्या परिसरात आरएसएस संघटना कार्यरत आहे. सात-आठ वर्षांपूर्वीही तिथं दंगली झाल्या होत्या. तो दंगलींच्या दृष्टीनं संवेदनशील भाग आहे. आम्ही सरस्वती पूजेच्या दिवशी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं होतं. पण त्यादिवशी काहीतरी वेगळंच घडणार होतं," असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं.

पण मुख्यमंत्र्यांनी ज्या आरएसएसवर आरोप केले आहेत, त्याचे प्रवक्ते डॉ. जिष्णू बसू यांनी उलट प्रश्न उपस्थित केला आहे. "आमची संघटना तिथं एवढी शक्तीशाली असती तर अशी अमानवी घटना घडली असता की?" असं ते म्हणाले.

अखेर आंदोलन सुरू झाल्याच्या दोन आठवड्यांनंतर दोन महिलांनी सामुहिक बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी संदेशखालीमध्ये दौरा केला. किमान दोन महिलांबरोबर सामुहिक बलात्कार झाल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं.

"संदेशखालीमध्ये अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालं आहे. मला स्वतःला सामुहिक बलात्काराच्या दोन तक्रारी मिळाल्या आहेत. बलात्काराची एक तक्रार तर मी स्वतःच उभं राहून नोंदवली आहे," असं शर्मा म्हणाल्या.

यापूर्वी दुसऱ्या एका महिलेनं दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब देत बलात्काराचा आरोप केला होता.

शाहजहान, शिबू आणि उत्तम कोण आहेत?

शाहजहान आणि शिव प्रसाद हाजरा दोघं उत्तर 24-परगना जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. शेख जिल्हा परिषदेच्या मत्स्य आणि पशुपालन विभागाचे प्रमुख आहेत. ते दोघं संदेशखालीमधील दोन वेगवेगळ्या भागातील तृणमूल काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष आहेत. उत्तम सरदार त्यांचे सहकारी आहेत.

पण शाहजहान शेख हेच परिसरातील मोठे नेते आहेत. ते पूर्वी माकपमध्ये होते. पण डाव्यांच्या सरकारच्या अखेरच्या काळात त्यांचा तृणमूलकडं ओढा वाढला. अखेर त्यांनी औपचारिकरित्या तृणमूलमध्ये प्रवेश केला.

शाहजहान
फोटो कॅप्शन, शाहजहान

स्थानिकांच्या मते शाहजहान शेख यांनी एकेकाळी मच्छिमारी, मजुरी, रिक्षा चालवणं अशी कामं केली आहेत. पण सध्या त्यांच्याकडं राजवाड्यांसारखी तीन मोठी घरं, 17 गाड्या, मच्छिमारीचे अनेक तलाव आणि दोन वीट भट्ट्यांसह प्रचंड संपत्ती आहे.

गेल्या जानेवारी महिन्यात मीडियामध्ये त्यांचं नाव आलं होतं.

राज्यातील रेशन घोटाळ्याप्रकरणी माजी अन्नमंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना आधीच अटक झाली आहे.

मलिक यांचे नीकटवर्तीय असल्यानं ईडीच्या पथकानं पाच जानेवारीला शेख यांच्या घराची झडती घेतली होती. त्यावेळी तिथं शेकडो लोक जमा झाले. त्यांनी ईडीचे अधिकारी, त्यांच्याबरोबर असलेले केंद्रीय यंत्रणांचे जवान आणि पत्रकारांना मारहाण करत पळवून लावलं होतं.

तेव्हापासूनच शाहजहान शेख फरार आहेत. आता ज्यांच्या शेतजमिनींवर बळजबरी बळकावल्या होत्या, ते लोक सरकारी अधिकाऱ्यांकडं तक्रारी करत आहेत.

शेतजमिनीत खारं पाणी

शाहजहान शेख आणि त्यांच्या जवळच्या तृणमूल नेत्यांनी स्थानिक सामान्य लोकांकडून हिसकावूनच त्यांची बहुतांश मालमत्ता जमवलेली आहे, असा स्थानिकांचा आरोप आहे.

संदेशखालीच्या लोकांनी सामुहिक याचिका दाखल करत बळजबरी जमिनी बळकावल्याचा आरोप केला आहे.

एका भागात आमची भेट एका सरकारी पथकाबरोबर झाली. त्याठिकाणी अनेक लोक त्यांच्या जमिनीची कागदपत्रं घेऊन आले होते.

त्यात उर्मिला दास नावाच्या एक महिलाही होत्या. त्यांनी आम्हाला आपबिती सांगितली. "माझ्या शेतात वर्षातून तीनदा धान पिकायचं. दोन वर्षांपूर्वी शिबू हाजरानं त्यात खारं पाणी घुसवलं. त्याठिकाणी आता मच्छिमारीसाठी तलाव तयार केला आहे. त्यांनी भाडं म्हणून एकावर्षी काही पैसे दिले होते. त्यानंतर काहीही दिलं नाही. माझ्याकडं तेवढीच जमीन होती. आता मजुरी करून पोट भरावं लागतं. पैसे मागायला गेलं तर लोक तिथं अपमान करायचे. आमची जमीन परत करावी अशी सरकारला विनंती आहे. आम्ही तिथं परत शेती करू," असं त्या म्हणाल्या.

कालिंदी नदीच्या किनाऱ्यावरच्या बांधावरून जाणाऱ्या एकानंही असंचं काही सांगितलं. "शिबू हाजरा इथूनचं नदीचं खारं पाणी शेतीत घुसवायचा. त्या लोकांनी गावातील फुटबॉलच्या मैदानावरही कब्जा केला आहे," असं ते म्हणाले.

राजकीय आरोप प्रत्यारोप

तृणमूल काँग्रेस एक मोठा पक्ष आहे. त्यांची पक्ष संघटना मजबूत आहे. त्यामुळं पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत सगळी माहिती पोहोचत असते. त्यात पोलिस आणि गुप्तचर विभागही आहे.

मग तृणमूल काँग्रेसचे काही नेते दीर्घकाळ संदेशखालीतील लोकांवर कथित अत्याचार करत राहिले आणि त्याबाबत नेतृत्वाला माहिती कशी मिळाली नाही? आणि माहिती मिळाली असेल तर कारवाई का झाली नाही?

पक्षाचे प्रवक्ते अरुप चक्रवर्ती यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावर ते म्हणाले की, "दहा वर्षांपासून हा अत्याचार सुरू आहे, असं म्हणत आहेत. पण कोणत्याही व्यक्तीनं फेसबुकवर काही पोस्ट लिहिली नाही किंवा तक्रारही केली नाही. संदेशखालीमध्ये दहा वर्ष आमदार राहिलेले माकप नेते निरापद सरदार आणि भाजप नेते विकास सिंह यांनाही तक्रार करता आली असती ना, आतापर्यंत हे आरोप समोर का आले नाहीत?"

संदेशखाली

फोटो स्रोत, Shib Shanker Chatterji

"अपवाद म्हणून अशी घटना घडली असेल कोणाच्या जमिनीवर बळजबरी ताबा घेतला असेल, तर त्याची तक्रार करण्याची व्यवस्था आहे. पोलिस त्याची चौकशी करेल. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसह अनेकांना अटक केली आहे, यावरूनच पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत माहिती मिळते," असं ते म्हणाले.

अरूप चक्रवर्ती म्हणाले की, "लोकसभा निवडणूक जवळ आल्यानंतर धार्मिक शक्ती अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतील. बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येकवेळी निवडणुकीत असंच केलं जातं. हेच भाजपचं चरित्र आहे."

संदेशखालीच्या लोकांचं असं म्हणणं आहे की, ते तृणमूल काँग्रेसचेच समर्थक आहेत आणि ते ममता बॅनर्जी यांच्या पक्षालाच मत देतात.

सध्या संपूर्ण संदेशखालीमध्ये भगवे झेंडे दिसत आहेत. नुकतेच ते लावण्यात आल्याचं स्पष्ट जाणवत आहे. काही घरांवर 'जय श्रीराम' लिहिल्याचंही पाहायला मिळतं. पण भाजप किंवा आरएसएसचं झेंडे किंवा भिंतींवरही काही लिहिलेलं नाही.

भाजपननं संदेशखालीचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर नेला आहे. त्यांचे नेते रोज संदेशखालीला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस त्यांना जाऊ देत नाहीत. त्यावरून रोज भाजप नेते-कार्यकर्ते आणि पोलिसांत वाद आणि संघर्ष होत आहे. त्याचे फोटो व्हिडिओ माध्यमांतून देशभरात पसरत आहेत.

भाजप प्रवक्त्या केया घोष म्हणाल्या की, "संदेशखालीमध्ये महिलांच्या शोषणाची बाब देशभरात पोहोचवून आम्हाला निवडणूक जिंकायची नाही. आम्ही स्थानिक महिलांची स्थिती देशासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचं कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या महिला मुख्यमंत्री आहेत. त्या बंगालमधील मुलींची दुर्दशा सर्वांसमोर मांडण्यात अपयशी ठरल्या आहेत."

"महिला स्वतः म्हणत आहेत की त्या तृणमूल काँग्रेसच्या समर्थक आहेत. तरीही तरीही पीठा बनवण्याच्या नावाखाली पक्षाच्या कार्यालयात बोलावून मनोरंजनासाठी त्यांचा वापर केला जात आहे. यापेक्षा आणखी लज्जास्पद काय असणार?" असंही त्या म्हणाल्या.

राष्ट्रीय माध्यमांमध्ये मिळणारं कव्हरेज आणि भाजपच्या शक्तीशाली आयटी सेलच्या माध्यमातून संदेशखालीच्या मुद्द्यावर सोशल मीडियावर नियमितपणे पोस्ट करून देशभरात हा मुद्दा पसरला आहे.

तृणमूल काँग्रेसवर दबाव

संदेशखालीमुळं तृणमूल काँग्रेस निवडणुकीच्या तोंडावर दबावात असल्याचं लक्षात येणं फार कठिण नाही.

राजकीय अभ्यासक विश्वज्योती भट्टाचार्य म्हणाले की, सुमारे गेल्या दोन वर्षांपासून तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते आणि मंत्री भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांत अटकेत आहेत.

संदेशखाली

फोटो स्रोत, Shib Shanker Chatterji

फोटो कॅप्शन, संदेशखाली

"अशा प्रत्येक प्रकरणामध्ये पक्षानं वारंवार भाजपच्या विरोधात केंद्रीय संस्थांच्या दुरुपयोगाचा आरोप केला आहे. पण यावेळी शक्तीशाली स्थानिक नेत्यांच्या विरोधात स्थानिक नागरिकांनीच आरोप केला आहे. त्यामुळं तृणमूल कांग्रेस प्रचंड दबावात आहे. तसंच केंद्रीय आयोगाची पथकं सातत्यानं राज्याचा दौरा करत आहेत. तसंच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करत आहेत. माझ्या मते, तृणमूल काँग्रेस प्रथमच अशाप्रकारच्या विरोध आणि आव्हानाचा सामना करत आहे," असं ते म्हणाले.

पक्ष आणि प्रशासनानं डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं संदेशखालीच्या घटनांवरून अगदी स्पष्ट आहे. उत्तर 24-परगनाच्या दोन मोठ्या मंत्र्यांनी या भागाचा दौरा केला आहे. प्रत्येक भागात पुरुष आणि महिलांना 'समजावलं' जात आहे.

जमीन बळकावल्याच्या प्रकरणाच्या आरोपाच्या चौकशीसाठी सरकारी कर्मचारी गावोगावी फिरत आहेत. प्रत्येक गावात पोलिसांचा पहारा आहे. स्वतः पोलिस महासंचालकही गावात एक रात्र राहिले आहेत. बॅटरी रिक्षाद्वारे ते संपूर्ण बेटावर फिरले आहेत.

शुक्रवारी (23 फेब्रुवारी) संदेशखालीमध्ये नव्यानं गोंधळ सुरू झाल्यानंतर आणि तृणमूल काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर पोलिस महासंचालक पुन्हा इथं पोहोचले.

त्यामुळं आता तृणमूल काँग्रेस हा दबाव सहन करण्यात यशस्वी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नाचं उत्तर निवडणुकीनंतरच समोर येणार आहे.