जिममध्ये जायचा कंटाळा आलाय? मग नक्की ट्राय करा 'एक्झरसाईज स्नॅकिंग'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ल्युसी हुकर
- वाचन वेळ: 5 मिनिटे
फिट राहण्यासाठी तासनतास जिममध्ये घाम गाळा, डोंगर चढा किंवा फिटनेस क्लास लावा, असं आपल्याला नेहमीच सांगितलं जातं.
पण जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल किंवा तुमची इच्छा नसेल तर? जो ब्लॉड्जेट यावर एक सोपा उपाय सांगतात तो म्हणजे 'ॲक्टिव्हिटी स्नॅक्स'.
याचा अर्थ, तुमच्या रोजच्या धावपळीच्या वेळापत्रकात अगदी सहजपणे करता येतील असे व्यायामाचे छोटे छोटे प्रकार.
जो ब्लॉड्जेट या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये संशोधक आहेत. दिवसभरात आपण ज्या छोट्या-छोट्या हालचाली करतो, त्याचा आपल्या आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो, यावर त्यांनी अभ्यास केला आहे.
त्या एका पॉडकास्टमध्ये सांगतात की, " श्वास भरेल आणि हृदयाचे ठोके वाढतील असा खूप वेगानं व्यायाम करणं हे शरीरासाठी चांगलंच आहे. पण आरोग्य सुधारण्यासाठी फक्त एवढंच करणं गरजेचं नाही, तर लहान लहान हालचालीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत."
जो ब्लॉड्जेट यांच्या मते, फिट राहण्यासाठी तुम्हाला खास जिमचे कपडे घालायची किंवा महागडी मेंबरशिप घेण्याची अजिबात गरज नाही. त्यासाठी काही सोप्या टिप्स त्या देतात.
1. दिवसभरात अधून-मधून थोडी हालचाल करत राहा
तुमच्या रोजच्या कामात व्यायामाचे छोटे छोटे प्रकार समाविष्ट करण्याचे खूप मार्ग आहेत.
तांत्रिक भाषेत याला त्या 'VILPA' म्हणतात. पण सोप्या शब्दांत सांगायचं तर 'रोजची कामं करतानाच थोडी जास्त ताकद लावून ती करणं'.
त्यांच्या मते, "तुमच्या दैनंदिन आयुष्यात अशा संधी शोधा जिथं तुम्हाला स्वतःला थोडं जास्त पुश करता येईल. म्हणजे नेहमीचीच कामं करा, पण ती करताना थोडा अधिक जोर लावा किंवा वेग वाढवा."

फोटो स्रोत, Getty Images
जो ब्लॉड्जेट यांनी फिट राहण्यासाठी काही साध्या टिप्स सांगितल्या आहेत:
- लिफ्ट आणि पायऱ्यांचा असा करा वापर : 12 व्या मजल्यापर्यंत पायऱ्यांनी जाणं सगळ्यांनाच जमेल असं नाही. मग काय करायचं? पहिल्या दोन मजल्यापर्यंत पायऱ्यांनी चढून जायचं आणि मग तिथून पुढे लिफ्ट घ्यायची.
- बसमधून एक स्टॉप आधी उतरा : जर तुम्ही ऑफिसला बसने जात असाल, तर अगदी ऑफिसच्या समोर न उतरता एक स्टॉप आधी उतरा. आणि तिथून ऑफिसपर्यंत शक्य तितक्या वेगाने चालत जा. यासाठी तुम्हाला वेगळे स्पोर्ट्स शूज किंवा कपडे घालायची गरज नाही, तुम्ही साध्या कपड्यांतही हे करू शकता.
- चालण्याचा वेग वाढवा : जर तुम्हाला चालायची सवय असेलच, तर पूर्ण वेळ आरामात न चालता मधूनच थोडा वेग वाढवा. समजा रस्त्यावरचे 2 खांब किंवा 2 झाडं येईपर्यंत एकदम जोरात चाला आणि मग पुन्हा आरामात चाला. यामुळे शरीराला चांगली गती मिळते.
चांगली गोष्ट ही आहे की, जर तुम्ही सध्या फारसा व्यायाम करत नसाल, तरी काही हरकत नाही. दिवसातून फक्त 3 ते 4 वेळा, प्रत्येकी फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी केलेली थोडी धावपळ किंवा वेगाने केलेली हालचाल ज्याने शरीराला थोडा जास्त ताण पडेल.
यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि आयुष्य वाढायला मदत होते.
2. फक्त जिमवर अवलंबून राहू नका
तुम्ही आठवड्यातून एकदा फुटबॉल खेळत असाल किंवा अधूनमधून जिममध्ये जात असाल, तर "मी खूप फिट आहे" अशा थाटात राहू नका. जो ब्लॉड्जेट यांच्या मते, आपल्यापैकी बरेच जण 'ॲक्टिव्ह काऊच पोटॅटो' असतात.
म्हणजे काय तर, तुम्ही जिममध्ये जाऊन व्यायाम करता हे चांगलंच आहे, पण जर तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये एका जागी बसून स्क्रीनकडे बघत असाल किंवा संध्याकाळी सोफ्यावर लोळत असाल, तर त्या अर्ध्या तासाच्या व्यायामाचा फारसा उपयोग होत नाही.
त्या म्हणतात, "जिममध्ये घालवलेली ती 30 मिनिटं तुमच्या दिवसाचा एक छोटासा भाग आहेत. मग उरलेल्या 23.5 तासांचं काय? तिथेही हालचाल असणं गरजेचं आहे."
थोडक्यात सांगायचं तर सकाळी 30 मिनिटं व्यायाम केला म्हणजे दिवसभर बसून रहायचं असं नसतं, तर दिवसभर शरीर कसं हसतं-खेळतं आणि उत्साही राहील याकडे लक्ष द्या.

फोटो स्रोत, Getty Images
तुम्हीही दिवसभर एका जागी बसून राहणारे असाल, तर त्या काही सोप्या टिप्स देतात:
- उभे राहा : काम करताना मधूनच आपल्या जागेवरून उठून उभं राहण्याची सवय लावा.
- चालायला जा : जेवणाच्या सुट्टीतला अर्धा वेळ फोनमध्ये डोकं खुपसून बसण्यापेक्षा, थोडं बाहेर फेरफटका मारण्यासाठी वापरा.
- चालता चालता मीटिंग : ऑफिसमधली एखादी चर्चा किंवा फोनवरची मीटिंग बसून करण्याऐवजी चालता चालता करा. यालाच 'वॉक अँड टॉक' म्हणतात, जे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे.
थोडक्यात काय, तर तासनतास एका जागी खिळून बसू नका. फोनवर बोलताना असो किंवा मग जेवण झाल्यावर, शरीराला थोडी हालचाल द्या.
संशोधन असं सांगतं की, एका जागी खूप वेळ बसून राहण्यापेक्षा थोड्या-थोड्या वेळाने हालचाल करणं कधीही चांगलं.
जो ब्लॉड्जेट म्हणतात, "दर 15 ते 30 मिनिटांनी तुम्ही एकदा जागेवरून उठू शकता का? थोडं शरीर हलवायचं, हात-पाय मोकळे करायचे आणि मग पुन्हा कामाला लागायचं."
याचा अर्थ असा नाही की तुम्ही जिम सोडली पाहिजे. ते सांगतात की, व्यायामाचा एक क्रम असतो जसं की, जोराचा व्यायाम ज्याने हृदयाचे ठोके वाढतात, हा आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर आहे. त्यानंतर मध्यम स्वरूपाची हालचाल, जसं की वेगाने चालणं.
3. बसून राहण्याचा वेळ कमी करा
सहसा आरोग्याबद्दलच्या नियमांमध्ये 'किती व्यायाम करायचा' यावर जास्त भर दिला जातो. पण जो ब्लॉड्जेट असं सुचवतात की, याकडे उलट्या बाजूने बघा. म्हणजेच, आपण 'हालचाल न करता' किती वेळ बसून राहतो, तो वेळ कसा कमी करता येईल?
कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनी आता हाच विचार लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली आहे.
सोपं गणित असं आहे की, समजा तुम्ही दिवसातले 8 तास झोपता, तर उरलेल्या 16 तासांपैकी किमान अर्धा वेळ म्हणजेच 8 तास तुमचं शरीर कोणत्या ना कोणत्या हालचालीत असलं पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
जो ब्लॉड्जेट शेवटी काही खास टिप्स देतात-
- हालचाल सुरू ठेवा : दिवसातून 8 तासांपेक्षा जास्त वेळ एका जागी बसून राहू नका. हा वेळ तुम्ही जितका कमी कराल, तितकं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं आहे.
- लहान मुलांना मोकळं सोडा : ऑस्ट्रेलियात असा सल्ला दिला जातो की, शाळेत न जाणाऱ्या लहान मुलांना 1 तासापेक्षा जास्त वेळ एका जागी म्हणजे बाबागाडी किंवा कार सीटमध्ये बसवून ठेवू नका. जर पाऊस असेल आणि बाहेर जाता येत नसेल, तर घराच्या आतच फुग्यांसोबत खेळायला लावा, जेणेकरून त्यांची धावपळ होईल.
- घरकामात व्यायाम : बाजारातून सामानाची पिशवी उचलून आणणं, घराची साफसफाई करणं किंवा बागकाम करणं या सगळ्यामुळे शरीराची हालचाल तर होतेच, पण तुमची ताकद आणि बॅलन्स (समतोल) सुधारायलाही मदत होते.

फोटो स्रोत, Getty Images
शेवटी एक महत्त्वाची गोष्टही त्या सांगतात, ती म्हणजे व्यायाम नक्की किती करायला हवा याचा कोणताही 1 ठराविक नियम नाही. तुम्ही जितकी जास्त हालचाल कराल, तितकं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे."
शेवटी एक लक्षात ठेवा, फिट राहण्यासाठी जिम गाठण्याची गरज नाही, फक्त तुमची जिद्द हवी.
आजपासूनच व्यायामाचे हे छोटे 'स्नॅक्स' सुरू करा आणि स्वतःमध्ये एक नवा उत्साह अनुभवा. लक्षात ठेवा, प्रत्येक छोटी हालचाल तुम्हाला आरोग्याच्या दिशेने एक पाऊल पुढे घेऊन जाते!"
चला तर मग, स्वतःला फिट ठेवण्यासाठी आज काय 'स्नॅक्स' घेताय?
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











